मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मी मस्त आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

श्री ब्रह्मानंद पै

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘मी मस्त आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

वय झाले अजून मस्ती गेली नाही

विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

कळते आहे पण वळत नाही

कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही

तरी पण मी मस्त आहे….

  

काय होतंय सांगता येत नाही

दुखतात गुढगे सांगायचे नाही

कुणाकडे जाताही येत नाही

सावकाश चालायचे हेच आता उरले

तरी पण मी मस्त आहे….

  

थकले शरीर जरी

नजर अजून शाबूत आहे

थकल्या जीवाला

थोडी उभारी देत आहे

तरी पण मी मस्त आहे….

 

आताशा  मोजकेच दात तासून 

त्यावर टोप्या (cap) घातल्यात

तेव्हा कुठे दुःख थांबले

कुस्करून खाल्ले

तेव्हा पचायला लागले

तरी पण मी मस्त आहे….

 

वाचायला घेतले धुरकट दिसते

चष्मा लावला तर पाणी सुटते

डोळे पुसत वाचण्यापेक्षा

न वाचलेले परवडते

तरी पण मी मस्त आहे….

 

लिहायला घेतले तर हात कापतात

शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात?

साधी स्वाक्षरी पण धड येत नाही

चेक परत का येतात तेच समजत नाही

तरी पण मी मस्त आहे….

 

उलटा बनियन तर नेहमीच असतो

तरी बरे तो आत झाकला जातो

घरातले हसतातच

तरी पण मी मस्त आहे….

 

कानात हुंकार वाजत असतात

शब्द अस्पष्ट ऐकू येतात

अनुभवाने समजून  घेतो

आणि मगच उत्तर देतो

तरी पण मी मस्त आहे….

 

वाचयला घेतले तरी लक्ष लागत नाही

वाचलेलेसुद्धा काही लक्षात रहात नाही

मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही

समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही

तरी पण मी मस्त आहे….

 

बरेच आयुष्य जगून घेतले

अजून थोडे बाकी आहे

उरलेले मात्र सुखात जावे

एवढीच इच्छा बाकी आहे

तरी पण मी मस्त आहे…

 

संसाराचे सारे पाश

आता पूर्ण सोडायचे आहेत

उरलेली पुंजी संपेपर्यंत

आनंदी जगायचे आहे

तरी पण मी मस्त आहे….

 

आपल्याच धुंदीत जगलो आहे

पाहिजे ते मिळवले आहे

उपभोगून आयुष्य सारे

गात्रे शिथिल होत आहेत

तरी पण मी मस्त आहे….

 

आयुष्यात ज्यांनी साथ दिली

काहींनी मध्येच साथ सोडली

कोणाचेच काही अडलं नाही

तरी सर्वांचा मी आभारी आहे

आणि मी मस्त आहे….

 

भार कोणावर टाकायचा नाही

झटपट मात्र बोलावणे यावे

इतरांना हवेहवे वाटताना

आपण निसर्गात विलीन व्हावे

तरी पण मी मस्त आहे….

          आणि  हे देवा  ,

तिथे पण मी मस्त रहावे….

लेखक: अज्ञात 

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई अजूनही वाट पाहते…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “आई अजूनही वाट पाहते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

आई अजूनही वाट पाहते… पण आम्ही मोठे झालो.

घर बदललेलं नाही.

त्या भिंती अजूनही तशाच आहेत.

दार अजूनही तसंच किरकिरत उघडतं.

 

फक्त एक गोष्ट बदलली आहे…

घरातले आवाज कमी झालेत.

 

आई अजूनही तिथेच आहे.

पण आम्ही… मोठे झालो.

लहानपण

लहानपणी घर म्हणजे गोंधळ असायचा.

सकाळी आईचा आवाज –

उठा आता! शाळेला उशीर होईल.

आम्ही चादरीत लपून बसायचो.

आई येऊन पांघरूण ओढायची –

चल… अजून झोपायचं नाही.

 

किचनमध्ये पोह्यांचा वास.

डब्यांसाठी घाई.

बाबा पेपर वाचत.

त्या सगळ्या गोंधळात

आई कायम धावत असायची.

पण तेव्हा आम्हाला वाटायचं…

आईला थकवा येतच नाही.

 

 वेळ

हळूहळू वर्षं गेली.

शाळा संपली.

कॉलेज सुरू झालं.

घरातले विषय बदलले.

Exam कधी आहे? ”

Job मिळाला का? ”

आई अजूनही तसंच विचारायची –

जेवलास का? ”

तो प्रश्न कधी बदललाच नाही.

 घर सोडण्याचा दिवस

एक दिवस बॅग भरली.

नोकरीसाठी शहर बदलायचं होतं.

आई शांतपणे कपडे घडी करत होती.

ती म्हणाली –

सगळं घेतलंस ना? ”

मी म्हणालो –

हो.

पण खरं सांगायचं तर

मी घरच तिथे ठेवून जात होतो.

दारातून बाहेर पडताना

आई म्हणाली –

कधी कधी फोन कर.

त्या चार शब्दांत

खूप काही होतं.

नवीन आयुष्य

नवीन शहर.

नवीन नोकरी.

नवीन लोक.

आयुष्य वेगाने चालायला लागलं.

Meeting.

Deadline.

Traffic.

फोन करायचं ठरवायचो…

पण वेळ नसायचा.

कधी कधी रात्री आईचा missed call दिसायचा.

मी message करायचो –

Busy होतो.

आई reply द्यायची –

ठीक आहे बाळा.

 

आईचं घर

आई अजूनही त्या घरात आहे.

सकाळी उठते.

चहा करते.

कधी कधी चार कप ठेवते.

मग हसते –

अरे… आता दोनच लोक.

किचन शांत.

भांड्यांचा आवाज कमी.

पण आठवणींचा आवाज जास्त.

 

गॅलरी

संध्याकाळी आई गॅलरीत उभी राहते.

रस्त्यावरची मुलं खेळत असतात.

कुणीतरी आई! म्हणत धावत येतं.

आई थोडं हसते…

आणि आत जाते.

कारण तिला आठवतं —

एकेकाळी त्या आवाजात आमचं नाव असायचं.

 जुने फोटो

एक दिवस आईने जुना अल्बम काढला.

 

फोटो –

शाळेचा.

पिकनिकचा.

दिवाळीचा.

एका फोटोमध्ये

आम्ही सगळे हसत होतो.

आई फोटोला हात लावते.

आणि हळूच म्हणते –

किती पटकन मोठे झाले.

 

सण

दिवाळी आली.

पूर्वी घरात धिंगाणा असायचा.

फटाके.

फराळ.

गोंधळ.

आता आई दोनच दिवे लावते.

 

एक देवासाठी.

एक दारासाठी.

 

ती म्हणते –

कदाचित यंदा येतील.

 

फोन

रात्री फोन वाजतो.

आई पटकन उचलते.

हॅलो? ”

मी म्हणतो –

आई, कशी आहेस? ”

ती लगेच म्हणते –

छान… तू जेवलास का? ”

मी म्हणतो –

हो.

ती अजून काही बोलायचा प्रयत्न करते.

पण मग म्हणते –

ठीक आहे… काम कर.

फोन ठेवला की

घर पुन्हा शांत होतं.

 

 सत्य

मोठं होणं वाईट नाही.

स्वप्नं पूर्ण करणंही चुकीचं नाही.

पण एक गोष्ट आपण विसरतो…

आपण मोठे होत असताना

आई अजूनही तिथेच थांबलेली असते.

ती अजूनही वाट पाहते.

एका फोनची.

एका भेटीची.

एका आई म्हणण्याची.

 

 एक दिवस

एक दिवस अचानक मी घरी गेलो.

दरवाजा उघडला.

आई मला पाहून थबकली.

अरे अचानक? ”

मी म्हणालो –

तुला भेटायला आलो.

त्या दिवशी किचन पुन्हा जिवंत झालं.

आईने चार पदार्थ केले.

घरात पुन्हा आवाज आला.

 

शेवट

त्या रात्री आई म्हणाली –

तू आलास की घर पुन्हा घर वाटतं.

ते वाक्य ऐकून

माझं मन भरून आलं.

कारण मला कळलं…

घर कधी रिकामं नसतं.

घरातली वाट पाहणारी आई

त्याला जिवंत ठेवत असते.

 

जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल…

तर एक काम करा.

आज आईला फोन करा.

फक्त एवढं म्हणा —

आई, कशी आहेस? ”

 

कारण…

आपण मोठे झालो असलो

तरी आई अजूनही वाट पाहते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सात वार…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सात वार…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

 आठवड्यातील सात वारांची निर्मिती कशी झाली व का? वाराची देवता कोणती..

आपण युगानुयुगे वर्षानुवर्षे

रवि, सोम, मंगळ अशा सात

वारांशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाही. यांच्याशिवाय कसलाही व्यवहार होणे अशक्य आहे.

राजा परिक्षिताला शाप मिळाला की या सात दिवसात एक दिवस तुझा मृत्यु निश्चित आहे. आणि प्रत्येक मनुष्याचा देखील जन्म व मृत्यूचा एक वार निश्चित आहे. एकंदरीत काय तर संपूर्ण विश्वच या सात वारांवरअवलंबून आहे. असे असताना आपण कधी असा विचार केला का?  तो म्हणजे या सात वारांची निर्मिती झाली कशी?  व ती कोणी केली?

ज्याच्याशिवाय आपले व्यवहार चालूच शकत नाहीत, त्याची दखल घेणे आपले आद्य कर्तव्य आहे. ज्ञानरूपीप्रकाशाशिवायअज्ञानरूपी अंधार नाहीसा होत नाही म्हणून हा लेखप्रपंच.

आज बहुतांशी समाज आपल्या वेद, शास्त्र, पुराणांना थोतांड समजणारा आहे. शिवाय देव व धर्माला न मानणारा आहे. पण आपल्याला ठाऊक आहे का या सात वारांचा निर्माता कोण आहे ते?

सृष्टीचा आरंभ होत असताना भगवान शंकरानी समस्त लोककल्याणासाठी या

वारांची कल्पना केली. थोडक्यात सांगायचे झाले तर भगवान शंकर संसाररूपी रोगाचा नाश करणारे वैद्य आहेत. तसेच औषधांचेही औषध आहेत.

भगवान शंकरांनी सात देवतांच्या नावांनी वारांची कल्पना केली व त्या प्रत्येक वाराचा स्वामी म्हणून ग्रहांची योजना केली. ते पुढीलप्रमाणे..

शिवपुराणानुसार…

 

देवता शंकर — स्वामी सूर्य

वार : रविवार

आरोग्य प्राप्ती

 

देवता मायाशक्ति – स्वामी चन्द्रमा

वार : सोमवार

सम्पत्तिप्राप्ति

 

देवता कुमार कार्तिकेय

स्वामी — मंगळ वार मंगळवार

व्याधिनिवारण

 

देवता भगवान विष्णु

स्वामी बुध वार बुधवार

पुष्टिवर्धक

 

देवता ब्रह्मदेव

स्वामी बृहस्पति

वार गुरुवार

आयुष्यवृद्धी

 

देवता इन्द्रस्वामी शुक्र

वार शुक्रवार

भोगदायक

 देवता यम

 

स्वामी शनैश्चर

वार शनिवार

मृत्युचे निवारण

 

अशाप्रकारे शिवपुराणानुसार सात वारांची सृष्टीच्या हितासाठी भगवान शंकरांनी निर्मिती केली. म्हणून आपल्या धर्मात देवता व ग्रहांना विशेष स्थान आहे.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दूर गेलेले भाऊ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “दूर गेलेले भाऊ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

एकाच आईच्या उदरातून जन्मलेली भावंडं मोठी झाल्यावर दूर का जातात…?

आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर काय परिणाम होतो…?

 

नाती अचानक तुटत नाहीत…

ती हळूहळू आतून कमकुवत होत जातात.

 

लहानपणी भाऊ-बहिणींमध्ये निरागस प्रेम असतं.

तेव्हा ना पैसा महत्त्वाचा असतो,

ना अहंकार,

ना संपत्ती.

 

एकमेकांशिवाय जेवण न करणारी भावंडं,

मोठेपणी एकमेकांचा चेहराही का पाहू इच्छित नाहीत…?

 

मनोविज्ञान सांगतं —

माणूस जसजसा मोठा होतो,

तसतसं त्याचं “मी” मोठं होत जातं.

 

स्वतःचं मत,

स्वतःचा अधिकार,

स्वतःचं अस्तित्व

यांना तो नात्यांपेक्षा जास्त महत्त्व देऊ लागतो.

 

आणि इथूनच सुरू होतो दुरावा…

 

कधी तुलना,

कधी पैसा,

कधी मालमत्ता,

कधी जोडीदारांचे हस्तक्षेप,

कधी न बोललेले गैरसमज,

तर कधी फक्त अहंकार…

 

पण खरं कारण फक्त बाहेर नसतं,

ते मनात असतं.

 

कारण नातं तुटण्याआधी संवाद तुटतो.

आदर संपतो.

समजून घेणं थांबतं.

 

आणि मग घर एकाच छताखाली असूनही,

मनं वेगवेगळ्या जगात राहू लागतात.

 

सगळ्यात मोठा आघात आईवर होतो.

 

जिने स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मुलांसाठी दिला,

तीच आई शेवटी मुलांमधला दुरावा पाहून आतून तुटत जाते.

 

आईला पैसा नको असतो,

तिला फक्त तिची मुलं एकत्र पाहायची असतात.

 

पण अनेकदा मुलं मोठी झाल्यावर आईशी वागणंही बदलतं.

तिच्या प्रेमात पक्षपात शोधला जातो,

तिच्या शब्दांमध्ये हस्तक्षेप दिसू लागतो,

आणि तिच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ लागतं.

 

आई मात्र शेवटपर्यंत घर जोडण्याचा प्रयत्न करत राहते…

स्वतःचं दुःख लपवून.

 

बहिणीची वेदना याहून वेगळी नसते.

तिच्यासाठी भाऊ म्हणजे तिचं माहेर,

तिचं बालपण,

तिची सुरक्षितता असते.

 

जेव्हा भाऊ एकमेकांपासून दूर जातात,

तेव्हा सर्वात जास्त तुटत असते ती बहीण…

 

कारण तिचं माहेर हळूहळू घर राहत नाही,

तर फक्त एक जागा बनून जातं.

 

पण या सगळ्याचा परिणाम फक्त दोन भावांपुरता मर्यादित राहत नाही…

संपूर्ण कुटुंब त्याची किंमत चुकवतं.

 

घरातील वातावरण शांत राहत नाही.

सण-उत्सव औपचारिक होतात.

एकत्र जेवणं बंद होतात.

लहान मुलं नात्यांपेक्षा वाद जास्त शिकतात.

 

पुढची पिढी प्रेम, त्याग आणि एकोप्याऐवजी

अहंकार, तुलना आणि दुरावा शिकते.

 

वृद्ध आई-वडिलांचं मानसिक आरोग्य खालावतं.

त्यांच्या आयुष्याची शेवटची वर्षं आनंदात नाही,

तर काळजीत जातात.

 

घरात पैसा असतो,

मोठं घर असतं,

सगळ्या सुखसोयी असतात…

पण मनःशांती नसते.

 

तत्त्वज्ञान सांगतं —

माणूस आयुष्यभर बाहेरचं जग जिंकण्याचा प्रयत्न करतो,

पण अनेकदा स्वतःचं घर हरवून बसतो.

 

कारण नाती टिकवण्यासाठी प्रेमापेक्षा जास्त गरज असते —

समजूतदारपणाची,

संवादाची,

आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवण्याची.

 

शेवटी उरतो तो फक्त एक प्रश्न —

ज्यांच्यासोबत बालपण गेलं,

त्यांच्यासोबत वृद्धत्व का नाही जाऊ शकत…?

 

कारण घर भिंतींनी नाही बांधलं जात,

ते मनांनी बांधलं जातं…

आणि मनं तुटली की,

सगळं असूनही माणूस आतून एकटा पडतो.

काही नाती पुन्हा जुळतात…

काही फक्त औपचारिक राहतात…

आणि काही कायमची शांत होऊन जातात.

हे पूर्णपणे माणसांच्या मनावर अवलंबून असतं.

जर अहंकार प्रेमापेक्षा मोठा झाला,

तर दुरावा कायम राहतो.

कारण वेळ फक्त अंतर वाढवत नाही,

तर मनालाही सवय लावतो —

“त्याच्याशिवायही आपण ठीक आहोत… “

पण प्रत्येक नात्याच्या आत खोलवर एक न बोललेली ओढ कायम असते.

विशेषतः भावंडांच्या नात्यात.

मनोविज्ञान सांगतं —

रक्ताच्या नात्यांमध्ये आठवणी कधी मरत नाहीत.

त्या फक्त शांत होतात.

म्हणूनच अनेकदा —

एखाद्या आजारपणात,

आई-वडिलांच्या दुःखात,

जुन्या फोटोमध्ये,

किंवा आयुष्याच्या एखाद्या कठीण वळणावर

मन पुन्हा त्या नात्यांना शोधू लागतं.

कारण माणूस बाहेर कितीही कठोर झाला,

तरी आत कुठेतरी त्याचं बालपण जिवंत असतं.

पण एक कटू सत्यही आहे —

प्रत्येक वेळी उशीर होण्यापूर्वी लोक बदलत नाहीत.

काहींना नात्यांची किंमत

आई-वडील गेल्यावर समजते.

काहींना वृद्धत्वात एकटेपणा आल्यावर समजते.

आणि काहींना आयुष्यभर समजतच नाही.

तत्त्वज्ञान सांगतं —

वेळ प्रत्येक जखम भरत नाही,

काही जखमा फक्त जगायला शिकवतात…

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

सावळ्या हरी,

ऐकू या तरी,

काय झाला रुसायला

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

रखुमाई म्हणते फुगवून गाल

भक्तांच्या चालीवर तुमचा ताल

या भक्ताघरी काय ठेवलाय हो?

उठसूट घुसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

कोणी ती तुमची जनी का बनी

तिची कशी केली वेणीफणी

दळणकांडण करून गेला

लुगडी धुवायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

तो एक वेडा तुकोबा वाणी

त्याने कुठे लिहिली चार-दोन गाणी

विमान धाडायची गरज होती का

फुकटचे बसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

उगाळलं चंदन हरकत नाही

एकनाथ तसा कुणी परका नाही

श्रीखंड्या बनून तिथंच राहिलात

पाणी भरायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

 चला जावू पुसायला ||

 

आणखीन तो एक सेना न्हावी

त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी

राजाची केली स्वतः हजामत

आणि बसला तासायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

भले दामाजीने धान्य वाटले

त्यासाठी तुम्ही काही करावे म्हटले

पितांबर सोडून

लंगोटीशिवाय काही नव्हतं नेसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

नाम्याचे गेला कीर्तन ऐकायला

अंगात आल्यावानी लागलात नाचायला

तरी बरं, तिथं कबीर होता

सावध करायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

चोखोबा एक तर जातीचा महार

त्याने कुठं केलं मायबाप जोहार

त्याच्या संगतीने ढोरं ओढलीत

रोहिदाच्या संग चामडी रंगवलीत

गोरीबासंग मडकी घडवलीत

आता कोण बाकी सांगा गुरुनाथ

काय झालं हसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

* * * *

कवी: अज्ञात

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ अकाऊंट क्लोज्ड…  – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अकाऊंट क्लोज्ड…  – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष 

संध्याकाळचे सहा वाजले होते. बाल्कनीत बसून हातातला चहाचा कप पेलताना जनार्दनरावांचे डोळे उगाचच शून्यात दाटले होते. नेहमीप्रमाणे मनात विचारांचे वादळ सुरू होते—गेल्या महिन्यात मुलगा-सुनेने स्वतंत्र राहण्याचा घेतलेला निर्णय, काल रस्त्यात भेटूनही न बोलता निघून गेलेला जुना मित्र, आणि दोन वर्षांपूर्वी ज्या नातेवाइकाला अडीअडचणीत मोठी आर्थिक मदत केली त्यानेच नंतर फिरवलेली पाठ!

 मी आयुष्यभर लोकांसााठी काय काय नाही केलं? पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि अपमान… जनार्दनराव स्वतःशीच पुटपुटले. त्यांच्या छातीत एक ओळखीची जाळणारी व्यथा जागी झाली.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात जनार्दनरावांचे जुने स्नेही आणि अभ्यासू लेखक ‘वपु’ उभे होते.

“काय जनार्दन, कसला विचार चालू आहे? चेहरा एवढा पडलेला का? ” वपुंनी आत येत विचारले.

जनार्दनरावांनी उसासा टाकला, “काय सांगू वपु, लोकांच्या वागण्या-बोलण्याचा फार त्रास होतो आजकाल. ज्यांच्यासाठी आयुष्य घासले, तीच माणसे अशी विचित्र वागतात. अपमान करतात, दुर्लक्ष करतात. उपकारांचे विस्मरण झाले आहे सगळ्यांना. “

वपु थोडे हसले. त्यांनी खिशातून एक छोटी वही काढली आणि समोरच्या टेबलावर ठेवत म्हणाले, “जनार्दन, एक सांगू? आपण या जन्मात येतो ते कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायला नाही, तर आधीच्या कुठल्यातरी जन्माची परतफेड करायला! आपण प्रत्येकाचे मनात एक ‘खाते’ उघडून बसलोय. आणि समोरच्याने आपल्या इच्छेनुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो. “

“पण वपु, त्रास तर होतोच ना? ” जनार्दनराव काकुळतीला येऊन म्हणाले.

“त्रास तेव्हाच होतो, जेव्हा आपण ते खाते अजून चालू आहे असे मानतो, ” वपु शांतपणे समजावून सांगू लागले, “तुम्ही दृष्टिकोन बदला. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत? समजा, एखादी जुनी परतफेड होती, ती या जन्मात पूर्ण झाली. तुमच्या उपकारांची कोणाला आठवण राहिली नाही? समजा, ते खाते आता पूर्ण झाले. बँकेत शिल्लक संपली की पासबुकावर कसा ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारतात? बस, तसेच मनातल्या या माणसांच्या नावावर ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारा आणि त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका! “

जनार्दनराव थबकले. वपुंचे शब्द थेट त्यांच्या मनाचा ठाव घेत होते.

वपु पुढे म्हणाले, “आपले मन जेवढे बलदंड असते ना जनार्दन, तेवढेच ते लवचीकही असते. आजवर तुम्ही मनाच्या हुकुमात राहिलात, त्याच्या भावनांची गुलामी केलीत. आता त्या मनाला सांगा—’बाबा रे, आजपासून मी तुला मुक्त करत आहे. ‘ परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय सुटका नाही. मग कशाला विचारता परमेश्वराला की मला का जगवलंस? जे घडतंय, ती केवळ परतफेड आहे, हे स्वीकारा. “

जनार्दनरावांनी डोळे मिटले. मनातल्या गच्च साचलेल्या आठवणींकडे ते एका वेगळ्या नजरेने पाहू लागले. मुलगा दूर गेला—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ मित्राने दुर्लक्ष केले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ नातेवाइकाने फसवले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘

आश्चर्य म्हणजे, एकेक खाते बंद झाल्याची भावना मनात येताच, छातीत वर्षानुवर्षे साचलेला तो जाळणारा भार हळूहळू हलका होऊ लागला.

वपु उठले, त्यांनी जनार्दनरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे म्हणाले, “हा प्रयोग करून बघा जनार्दन, आणि किती खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. अगदी उद्या मीसुद्धा तुम्हाला रस्त्यात भेटलो आणि ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा आणि माझी फाइलही बंद करा! “

वपु निघून गेले. जनार्दनराव पुन्हा बाल्कनीत येऊन उभे राहिले. आता संध्याकाळचा वारा त्यांना शांतवत होता. मनात दुःखाची किंवा रागाची कोणतीही भावना शिल्लक नव्हती.

 अनेक वर्षांनंतर आज जनार्दनरावांनी एक दीर्घ, मोकळा श्वास घेतला. कारण, त्यांच्या मनातील नकारात्मकतेची सर्व पासबुके आज खरोखरच जळून खाक झाली होती!

 

लेखक: श्री संजय मानके

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

सकाळी दारावर टकटक झाली.

सुनिताकाकूंनी दार उघडलं.

समोर वच्छलामामी उभ्या होत्या.

हातात स्टीलचा डबा.

“अगं…

काल तुझ्याकडून उसळ घेतली होती ना…

हा डबा. “

सुनिता काकूंनी झाकण उघडलं.

आत उसळ नव्हती…

चार गरम पुरणपोळ्या होत्या.

“मामी…

हे कशाला? “

मामी हसल्या…

“रिकामा डबा परत दिला की… नातंसुद्धा रिकामं होतं गं. “

तेवढ्यात सुप्रियाकाकूही आल्या.

“काय गं…

आज पुन्हा डब्यांची देवाणघेवाण? “

वच्छलामामी हसल्या.

“अगं…

आपल्या गल्लीत डबा फिरत नाही…

आपुलकी फिरते. “

सगळ्या हसायला लागल्या.

दुपारी सीमाताई आल्या.

त्यांच्या हातात छोटासा डबा होता.

“मामी…

थोडा चिवडा केला होता. “

मामींनी डबा घेतला.

संध्याकाळी तोच डबा परत गेला…

पण यावेळी त्यात घरचा शिरा होता.

सीमाताई म्हणाल्या…

“मामी…

तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता. “

मामी म्हणाल्या…

“बाळा…

रिकामा डबा परत पाठवला…

तर समोरच्याला वाटतं…

काम संपलं.

पण काहीतरी भरून दिलं…

की नातं अजून जिवंत आहे, असं वाटतं. “

त्या दिवशी चारही जणी चहा पित बसल्या होत्या.

गप्पा सुरू झाल्या.

सुप्रियाकाकू म्हणाल्या…

“आठवतंय…

पूर्वी आपल्या गल्लीत एकही घर असं नव्हतं…

जिथे डबे फिरत नव्हते. “

सुनिताकाकू लगेच म्हणाल्या…

“अगं…

एखाद्या घरात भजी झाली…

की चार घरात जायची. “

सीमाताई म्हणाल्या…

“दिवाळीत तर प्रत्येक दारात डबेच डबे. “

वच्छलामामी हसल्या.

“आणि कोणाच्या घरी बाळंतपण असलं…

तर महिनाभर त्या घरात स्वयंपाक करायची गरजच नसायची.

प्रत्येक घरातून एक डबा यायचाच. “

क्षणभर सगळ्या शांत झाल्या.

मग मामी हळू आवाजात म्हणाल्या…

“माझे यजमान गेले तेव्हा…

पहिले पंधरा दिवस…

मी स्वयंपाकच केला नव्हता. “

सुनिताकाकूंनी त्यांच्या हातावर हात ठेवला.

मामी पुढे म्हणाल्या…

“सकाळचा डबा कुणाकडून यायचा…

दुपारचा कुणाकडून…

रात्रीचा कुणाकडून…

तेव्हा समजलं…

भूक पोळीने भागते…

पण दुःख माणसांनी हलकं होतं. “

चारही जणींचे डोळे पाणावले.

तेवढ्यात बाहेरून एका लहान मुलाचा आवाज आला.

“आजी…

आई म्हणाली…

थोडी कोथिंबीर आहे का? “

मामी आत गेल्या.

कोथिंबीर ठेवली.

सोबत दोन टोमॅटो…

आणि एक काकडीही ठेवली.

मुलगा म्हणाला…

“आजी…

आईने एवढं मागितलं नव्हतं. “

मामी हसल्या.

“माहितीय…

पण रिकामा डबा…

आणि रिकामी पिशवी…

दोन्ही परत पाठवायची नसते. “

संध्याकाळी…

सुनिताकाकूंची सून ऑफिसवरून आली.

तिने विचारलं…

“आई…

आज पुन्हा कोणाचा डबा आला होता? “

सुनिताकाकू हसल्या.

“हो. “

“हे सगळं अजूनही चालतं? “

सुनिताकाकू म्हणाल्या…

“हो बाळा…

कारण…

भाजीची चव मसाल्याने येते…

पण नात्यांची चव…

देवाणघेवाणीने येते. “

दुसऱ्या दिवशी…

सुनेने पहिल्यांदाच खीर केली.

तिने एक छोटा डबा भरला.

आणि म्हणाली…

“आई…

हे मामींकडे देऊन येते. “

सुनिता काकू काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

कारण…

परंपरा सांगून टिकत नाही…

ती पाहून पुढे जाते.

आज…

आपल्या घरात मोठमोठे फ्रिज आहेत…

महागडी भांडी आहेत…

ऑनलाइन जेवण आहे…

पण…

शेजाऱ्याच्या दारात प्रेमाने ठेवलेला गरम डबा…

आजही कोणत्याच पैशाने विकत मिळत नाही.

कारण…

त्या डब्यात…

फक्त भाजी नसते…

आम्ही आहोत तुमच्यासोबतहा शब्दांविना दिलेला आधार असतो.

आजही…

काही जुन्या घरांत…

स्टीलचा डबा कधीच रिकामा परत जात नाही.

कारण…

त्या पिढीला माहिती होतं…

रिकामा डबा परत दिला…

तर पोट भरलेलं असेल…

पण नातं उपाशी राहील.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोकणातली गरिबी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कोकणातली गरिबी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

कोकणात पूर्वी गरिबी होती. आज हे वाक्य आपण सहज बोलून जातो. पण त्या गरिबीचा अर्थ फक्त घरात पैसे कमी होते एवढाच नव्हता. बाजारातून आज काय आणायचं, हा प्रश्न विचारण्याआधी, आज परसात काय आहे? हा प्रश्न विचारावा लागायचा. आणि कदाचित कोकणातल्या अनेक अप्रतिम पदार्थांचा जन्म याच प्रश्नातून झाला असावा.

परसात फणसाचं झाड होतं. फणस पिकेपर्यंत थांबायची गरज नव्हती. कच्चा फणस आला की भाजी. तो पिकला की गरे. गरे जास्त झाले की सांदणं. त्याची साठं. आणि सगळं संपल्यावर राहिलेल्या आठळ्याही कचऱ्यात नाहीत. त्या भाजून खायच्या. नाहीतर त्यांची भाजी.

एका फणसाच्या झाडाला कोकणी माणसाने बहुधा सांगूनच ठेवलं होतं – “तुझं काहीही वाया जाणार नाही! ”

आंब्याची गोष्ट तर आणखी मोठी. आंबा पिकण्याआधी कैरी. कैरीचं लोणचं. पन्हं. चटण्या. मग आंबा पिकला की रस. रस खाऊन झाला तरी गोष्ट संपत नाही. त्याची साठं. आंब्याचा शिरा.

आणि शेवटी राहिलेली बाठसुद्धा भाजून खायची.

पण या सगळ्यांचा खरा राजा—नारळ. कोकणाचा कल्पवृक्ष.

शहाळं असताना गोड पाणी आणि मऊ मलई. नारळ झाला की ओलं खोबरं. त्याचं दूध काढायचं. चटणीत घालायचं. भाजी-आमटीच्या वाटणात वापरायचं. मोदक, नारळीभात, करंज्या अशा कितीतरी पदार्थांत खोबरं. खोबरं सुकलं की सुकं खोबरं. त्यापासून तेल. पण नारळाचं मोठेपण स्वयंपाकघराच्या दाराशी संपत नव्हतं. करवंटीही कामाची.

आणि झावळी?

ती वाळली की तिच्या हिरांपासून झाडू. झावळ्यांचा उपयोग घर शाकारायला.

म्हणजे ज्या झाडाने ताटात चव दिली, त्याच झाडाने अंगण झाडायला झाडू दिला आणि डोक्यावर छप्परही दिलं!

त्याला कल्पवृक्ष म्हणणं ही केवळ काव्यात्मक उपमा नव्हती.

ती कोकणी माणसाने त्या झाडात शोधलेली पूर्ण उपयोगाची शक्यता होती.

परसात अळू उगवलं तर त्याचं फदफदं. तीच पानं बेसन-मसाला लावून गुंडाळली की अळूवड्या.

कोकम आलं—सरबत झालं. साल वाळवली की आमसूल.

चिंच आली— गर खाल्ला. आणि चिंचोकासुद्धा मुलांच्या जगात निरुपयोगी नव्हता.

म्हणजे त्या घरात कचरा कुठे संपतो आणि कच्चा माल कुठे सुरू होतो, याची सीमाच फार अस्पष्ट होती.

आज supermarket मध्ये गेल्यावर आपल्यासमोर शेकडो पर्याय असतात.

त्या काळात पर्याय कमी होते. पण कल्पकता जास्त होती.

आज आपला प्रश्न असतो— “आज काय खायचं? ”

तेव्हा प्रश्न बहुधा वेगळा असावा— “आज जे मिळालंय, त्यातून काय काय करता येईल? ”

दोन प्रश्न.

पण दोन अगदी वेगळ्या जीवनदृष्टी.

पहिल्या प्रश्नाला पैसा पर्याय देतो. दुसऱ्या प्रश्नाला कल्पकता.

कदाचित म्हणूनच कोकणी स्वयंपाकाची खरी श्रीमंती पदार्थांच्या संख्येत नव्हती. ती एका गोष्टीतून किती गोष्टी निर्माण करता येतात, यात होती.

फणस फक्त फळ नव्हता. आंबा फक्त आंबा नव्हता. कोकम फक्त सरबत नव्हतं. आणि नारळ तर कधीच फक्त नारळ नव्हता.

परसात जे उगवलं, त्याच्याशी त्या पिढीने जणू एक करारच केला होता— “तू जे देशील, त्यातून आम्ही काहीतरी चांगलं करू. ”

मला या वाक्यात फक्त पाककला दिसत नाही. एक संपूर्ण पिढी दिसते. कारण त्यांच्या आयुष्यातही त्यांना हवं ते सगळं मिळालं नाही.

हवा तितका पैसा नाही. हवी ती साधनं नाहीत. हव्या त्या संधी नाहीत. पण त्यांनी आयुष्याकडेही कदाचित आपल्या परसासारखंच पाहिलं.

जे उगवलं, त्याचा उपयोग केला. अभावाचं लोणचं घातलं. अडचणीचं सांदणं केलं. कष्टाचं सरबत केलं. आणि पुढच्या पिढीच्या ताटात शक्य तितकं चांगलं वाढलं.

आज आपल्या घरात पर्याय जास्त आहेत. फ्रिज भरलेले आहेत. बाजार एका फोनवर घरी येतो.

पण म्हणूनच कदाचित तो जुना प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे – समृद्धी म्हणजे आपल्या हातात किती गोष्टी आहेत हे,

की हातातल्या एका गोष्टीत किती शक्यता आपल्याला दिसतात हे?

कोकणातल्या त्या जुन्या परसांनी त्याचं उत्तर फार पूर्वी दिलं होतं.

त्यांच्याकडे फार काही नव्हतं. पण जे होतं, त्यातलं फारसं काही “फक्त एवढंच” नव्हतं. फणसात त्यांना अनेक पदार्थ दिसत होते. कैरीत पुढचा ऋतू दिसत होता. कोकमात वर्षभराची चव दिसत होती. नारळात तर अन्नापासून छपरापर्यंत एक संसार दिसत होता.

कदाचित म्हणूनच गरिबीने कोकणाला फक्त काटकसर शिकवली नाही. तिने एक वेगळीच श्रीमंती शिकवली.

निसर्गाने किती दिलं, यावर समृद्धी ठरत नाही. त्याने जे दिलं, त्यात आपल्याला किती शक्यता दिसल्या, यावर ती ठरते.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कपडे वाळत घालताना…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “कपडे वाळत घालताना…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

कपडे वाळत घालणं…दिसायला किती साधं काम! रोजच्या जगण्यातलं, सहज केलं जाणारं. पण कधी बारकाईने पाहिलंय का—बाई कपडे कसे वाळत घालते, यावरून तिच्या स्वभावाचीही थोडीशी झलक दिसते.

कुणी कपडे एकसारखे ताणून, अगदी सरळ रेषेत वाळत घालते. कुठे सुरकुती नको, एक कपडा दुसऱ्यावर नको. रंगांचीही एक वेगळीच मांडणी असते. तिच्या जगण्यातही कदाचित प्रत्येक गोष्टीला एक जागा असते… प्रत्येक कामाला एक क्रम असतो. विस्कटलेपण तिला फारसं रुचत नसावं.

कुणी मात्र हातात येईल तो कपडा घेते आणि वाऱ्यावर सोपवून देते.“वाळला म्हणजे झालं!”तिच्यासाठी नीटनेटकेपणापेक्षा काम पूर्ण होणं महत्त्वाचं असतं. आयुष्याकडेही ती कदाचित तसंच पाहत असावी—सगळं मनासारखं, आखीव-रेखीव असण्याची गरज नाही; प्रवास पुढे सुरू राहिला पाहिजे.

कुणी कपडे वाळत घालताना आधी ऊन कुठे आहे, वारा कुठून येतोय, पाऊस येण्याची शक्यता आहे का, हे पाहते.तिच्या या छोट्याशा कृतीतही आयुष्याचा मोठा धडा असतो—परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलत नाही; आपण परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यायचं असतं.

कुणी कपडे इतक्या जपून पसरते, जणू त्या प्रत्येक कपड्यात एखादी आठवण गुंडाळलेली असते. मुलाचा छोटासा शर्ट, नवऱ्याचा आवडता कुर्ता, स्वतःची एखादी साडी… कपडे तिच्यासाठी फक्त कपडे नसतात; त्यांना स्पर्श करताना तिच्या आयुष्यातले कितीतरी क्षण हाताला लागून जातात.

आणि काही स्त्रिया असतात…ज्या स्वतःचे कपडे शेवटी वाळत घालतात.

आधी मुलांचे, मग नवऱ्याचे, मग घरच्यांचे…सगळ्यांचे कपडे उन्हात व्यवस्थित पसरले की शेवटी स्वतःची एखादी साडी किंवा ओढणी त्या दोरीवर जागा शोधत असते.

कदाचित हीच तर तिच्या आयुष्याची गोष्ट असते—सगळ्यांसाठी जागा करून देताना स्वतःसाठी जागा थोडी उशिरा उरते.

कपडे वाळत घालताना कधी एखादा कपडा वाऱ्याने खाली पडतो. पुन्हा उचलावा लागतो. धूळ लागली असेल तर पुन्हा धुवावा लागतो.

आयुष्यही असंच नाही का?

कितीही जपून ठेवलेली नाती कधी वाऱ्याने हलतात…कितीही नीट आखलेले दिवस अचानक विस्कटतात…काही माणसं हातातून निसटून जातात…काही स्वप्नांना धूळ लागते…

पण आपण पुन्हा ते उचलतो. झटकतो. गरज पडली तर पुन्हा धुतो… आणि पुन्हा उन्हात टांगतो.

कारण जगणं थांबवता येत नाही.

कपडे वाळत घालताना आणखी एक गंमत असते. ओले कपडे जड असतात. पण तेच कपडे उन्हात काही वेळ राहिले की हलके होतात.

मनाचंही तसंच असावं कदाचित.

मनात साठवलेल्या काळज्या, दुःखं, अपेक्षा, नाराजी… सगळं ओलं असताना खूप जड वाटतं. पण ते थोडं वेळेच्या उन्हात, अनुभवाच्या वाऱ्यात आणि स्वीकाराच्या मोकळ्या आकाशाखाली ठेवलं की त्याचं ओझं कमी होत जातं.

म्हणूनच कदाचित कपडे वाळत घालणं ही फक्त घरकामाची कृती नसते.

ती एका स्त्रीची रोजची छोटीशी जीवनशाळा असते.

कपडे सरळ करताना ती कदाचित स्वतःलाही सावरत असते.सुरकुत्या काढताना आयुष्यातल्या सुरकुत्यांवरही हात फिरवत असते.वाऱ्यावर कपडे सोडताना काही गोष्टी नशिबावर सोडायला शिकत असते.आणि संध्याकाळी कोरडे कपडे गोळा करताना दिवसभरात स्वतःमध्ये साठलेलं काहीतरी पुन्हा घडी करून ठेवत असते.

म्हणून पुढच्या वेळी एखादी बाई कपडे वाळत घालताना दिसली, तर फक्त एवढंच पाहू नका की ती कपडे कसे टाकतेय…

कदाचित त्या कपड्यांच्या मांडणीत तिची शिस्त असेल,तिचा स्वभाव असेल,तिचं प्रेम असेल,तिचा थकवा असेल,तिची स्वप्नं असतील…

आणि सगळ्यात महत्त्वाचं—तिचं आयुष्याकडे पाहण्याचं एक शांत, अबोल तत्त्वज्ञान दडलेलं असेल.

कारण बाई कपडे फक्त वाळत घालत नसते…

ती रोजच्या रोज आपल्या आयुष्याची घडी घालत असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सध्याची बटाट्याची चाळ…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सध्याची बटाट्याची चाळ…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे.

त्रिलोकेकर, सोमण, गुप्तेच्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.

असा मी असा मीमधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.

लग्नातल्या जेवणावळी श्लोक आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नाव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.

कोकणातल्या अंतू बर्वासुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.

मुलाच्या घरची सगळी अपसव्यं त्याला आता मान्य झाली आहेत.ना जातीची, ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.

नामू परटान् आता लौंड्री घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.

नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायणदेखील त्याला एटिकेट्स शिकवित असतो.

हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.

लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड  साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.

आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखील पटकावतो.

सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नीतिमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.

नंदा प्रधान पहिल्यापासून जरा फॉरवर्डच होता.तोही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.

नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.

बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅन्सेलरसुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.

पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहीत आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहीत.

नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.

ऑनलाईन टीचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टीचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.

भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्त्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांचा वेष चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.

दोन तत्त्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणाबरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.

पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.

त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असा मी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते.

त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते की आज मी स्वीकारलेली ही आधुनिक संस्कृतीसुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.

पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला.

बदलत्या काळाची पावले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.

काळ बदलला, संस्कृती बदलली, वेषभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.

त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.

भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे.

नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.

पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.

पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरकही दाखवून दिला.

आणीबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.

खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.

त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

याव्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं ,नाटकं, पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहीच शंका नाही.

या आमच्या आयडॉलला लक्ष लक्ष प्रणाम।

कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares