मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

काळ्या ढगांवर देवा

क्लिक कर ना माउस

आमच्या पृथ्वीवर आता

पाड ना धो धो पाऊस

पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा

सिमेंटच्या जंगलांचा कहर

बदलून दे ना आता

हिरवागार स्क्रीन सेव्हर

 *

ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर

देवा करून घे अपडेट

नाहीतर उन्हाळ्यात गारा

अन पावसाळ्यात ऊन थेट

 *

जास्त पाणी साठवण्या

हार्ड डिस्कची वाढवून घे जागा

पावसासाठी आम्हाला का

करावा लागतो त्रागा

 *

समुद्री वादळांचा धोका

मान्सूनला नेतो पळवून

त्यांचा बंदोबस्त कर तू

ANTI वायरस चालवून

 *

पाऊस झटपट पाडण्या

देवा वाढवून घे RAM

नाहीतर म्हणावे लागेल

आम्हाला हे राम

 *

देवा इंजिनिअर बोलावून

सिस्टम अपग्रेड करण्यास सांग

नाहीतर पावसावाचून आमचे

जगणे व्हायचे HANG…

कवी : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९८ – मला तुझ्यात शोध तू…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९८ – विजय साहित्य ?

☆ मला तुझ्यात शोध तू….! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(वृत्त कलिंदनंदिनी.)

चुकेन मी, तरी पुन्हा, वसेन माणसात मी

मला तुझ्यात शोध तू, दिसेन काळजात मी. . . . !

*

मनास सागणे नको, जपावयास गोडवा

हसून गोड बोल तू, फसेन आरशात मी. . . . !

*

उगाच फूल लाजले , तुला उन्हात पाहता

पहा जरा स्वतःकडे, असेन त्या फुलात मी . . . !

*

मनामनात होतसे , क्षणाक्षणात कालवा

हवेत थांब मोकळ्या , घुसेन कुंतलात मी. . . !

*

निघून दूर चालली, प्रवास दूरचा जरी

अबोल प्रीत छेड तू, शिरेन अंतरात मी

*

खुशाल वाट चाल तू, चुकू नको नव्या पथा

नसेन सोबतीस मी, बसेन आठवात मी. . . !

*

विशाल त्या पथावरी, जपून टाक पावले

नसेन मी तुझा जरी, उरेन आसवात मी. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ध्यास… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ध्यास… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

घडुन घडत नाही सर्व ही कष्ट वाया

झिजत शिणत राही व्यर्थ ही नित्य काया

फिरुन परत लागे यावया; बंद सारे

बुडवत हसणारे भेटलेले किनारे

फळत फुलत नाही स्वप्न.. आशा मनीची

छळत.. सलत राही धार ही श्रावणाची

टळुन टळत नाही दैव हे दु:खदायी

निसटुन पळण्याची जन्मत: सोय नाही

 *

अवजड दिवसांचे घेऊनी नित्य ओझे

कण्हत.. थकत चाले, धापती श्वास माझे

हरतच जगण्याचे चालले खेळ सारे

मरणहि हुलकावी, वाकुल्या दावणारे

 *

तरिपण विजयाचा सोडला ध्यास नाही

अवखळ जगण्याची सोडली कास नाही

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

नीती आणि धर्म

आत्तापर्यंतच्या चोवीस भागातून आपण संत तुकारामांच्या अनेक विषयांवरील अभंगांचा अभ्यास केला. या भागात त्यांनी माणसाच्या नीती आणि धर्माविषयी रचलेले काही अभंग आपण पाहू.

रडोनिया मान/ कोण मागता भूषण/

देवे दिले तरी गोड/ राही रुची आणि कोड//

लाविता लावणी/ विके भिके केज्या दानी//

तुका म्हणे धीरा/ विण कैसा होतो हिरा//

या अभंगात माणसाने खरेपणाने आणि धीराने वागावे असे महाराजांना लोकांना सांगायचे आहे. मला मान द्या असे रडगाणे लावून जर कोणी मान देत असेल तर त्यात काय मोठे भूषण आहे? लहान मुलाने रडावे आणि आपला हट्ट पुरा करावा तसाच हा प्रकार आहे. न मागता मिळतो तो खरा मान, मोठेपणा. म्हणून माणसाची वृत्ती समाधानी असावी. परमेश्वराने माझ्या पदरात जे दान टाकले आहे, ते गोड मानले आणि त्यात समाधान ठेवले तर ते खरे सुख आहे. उदाहरणादाखल महाराज पुढे सांगतात की, शेतात स्वतः राबून पिकवलेले धान्य दान केले तर त्यात खरे समाधान आहे. भीक मागून किंवा दुसऱ्याचे ओरबाडून घेतले आणि दानात दिले तर त्या दानाला काही अर्थ नाही. कोणत्याही प्रकारच्या उतावळेपणाने मोठेपणा मिळत नाही. जो धैर्यवंत असतो त्यालाच हिऱ्याची योग्यता लाभते.

पुढे ते सांगतात, ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने नीती धर्माच्या खुणा, संकेत पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.

पूज्या एकासनी आसनी आसन/

बैसता गमन मातेशी ते//

सांगतो ते धर्म नितीचा संकेत/

सावधान हित व्हावे तरी//

संता ठाया ठाव पूजनाची इच्छा/

जीवनीच वळसा सापडला//

तुका म्हणे एकाएकी वरासने/

 दुजे तेथे भिन्न अशोभ ते//

प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागावे. ज्या आसनावर पूज्य अशा देवांची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असतील, त्या आसनावर आपण बसू नये. ते पाप आहे. स्वतःची योग्यता नसताना, संतांप्रमाणे आपली ही पूजा व्हावी असे ज्याला वाटते, तो भवसागरात गटांगळ्या खातो आहे असे समजावे. श्रेष्ठ आसनावावर संत बसले असताना आपण तेथे जाऊन बसणे म्हणजे स्वतःची शोभा करून घेण्यासारखे आहे.

यासी कोणी म्हणे नींदेची उत्तरे/

नागवला खरे तोचि एक//

 आडवाट जाता लावी नीट सोयी/

धर्मनिती तेही ऐसी आहे//

नाइका सुखे करावे ताडण/

पाप नाही पुण्य असे फार//

जन्मव्याधी फार चुकतील दुःखे/

खंडावा हा सुखे मान त्याचा//

तुका म्हणे निंब दिधल्यावाचून/

अंतरीचा शीण कसा जाय//

 महाराजांना या अभंगात मुख्यतः काय सांगायचे आहे? तर ते म्हणजे दुर्जनाला शासन झालेच पाहिजे. कोणाला माझे हे भाषण निंदा वाटेल, पण ही निंदा नाही. कोणी आड मार्गाला जात असला तर त्याला सुयोग्य मार्गाला लावणे ही खरी धर्मनिती आहे. चांगल्या नीतीची गोष्ट सांगत असता जर कोणी ती ऐकली नाही तर त्याला खरपूस मार द्यावा. (शब्दांचा) त्यात पाप नसून ते पुण्यकर्मच ठरेल. असे केल्याने जन्मरूपी व्याधी आणि इतर अनेक दुःखातून त्याची सुटका होईल. म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी. अंग तापाने फणफणल्यावर त्याला कडुलिंबा सारखे कडू औषध द्यावे लागते ना? दुर्जनाला सुधारण्यासाठी शिक्षा करणे क्रमप्राप्त आहे.

एका विठ्ठलाच्या चरणाशी सर्व नीती, धर्म शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्व लोकांना विठ्ठलापाशी भक्ती भाव ठेवण्यास सांगतात.

पृथक मी सांगो किती/ धर्म नीती सकळ/

अवघीयांचा एक ठाव/ शुद्ध भाव विठ्ठली//

क्षरा अक्षराचा भाग/ करा लाग पंढरीये/

तुका म्हणे आगामीचे/ मथिले साचे नवनीत//

 महाराज म्हणतात की ते प्रत्येकाला धर्म आणि नीती विषयी वारंवार किती सांगणार? एकच करा, सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवावा. हेच धर्म आणि नीतीचे तात्पर्य आहे. तो क्षर ( सगुण) आणि अक्षररूप ( निर्गुण) पंढरपुरात आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी अवश्य जावे. सर्व शास्त्ररुपी दही घुसळून काढलेले लोणी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल हे दैवत तेथे आहे. भगवंताचे ध्यान अंतःकरणांमध्ये करणे हीच त्याची पूजा आहे. या वाचून सर्व वेगवेगळ्या उपाधी पापमूलक आहेत. त्या उपाधींचा संकल्प सुद्धा करू नये. लोकहो, भगवंताने श्रुती आणि स्मृती मध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत, त्याप्रमाणे आचरण ठेवणे, हाच खरा धर्म आहे. हा धर्म पाळल्याने सहज स्थिती प्राप्त होईल, ज्या स्थितीचा तुम्हाला कधी वीट येणार नाही. मनाची स्थितप्रज्ञता ही सहज स्थिती आहे. त्यामुळे सुखाने अति आनंद होणार नाही किंवा दुःखाने अतीव दुःख होणार नाही.

नीतिमत्तेबद्दल तुकाराम महाराज आणखी काय सांगतात ते पाहूया.

नये पाहो मुख मात्रागमन्याचे/

तैसे अभक्त्याचे गुरुपुत्रा//

म्हणउनी बरे धरिता एकांत/

तेणे नवे घात भजनासी//

नये होऊ कदा निंदकाची भेटी/

जया द्वैतपोटी चांडाळाच्या//

*तुका म्हणे नको बोलो त्यासी गोष्टी/

जयाचिया दृष्टी पापवाढे/

त्यांचे म्हणणे असे आहे की, जो विकृत वृत्तीचा आहे, (मात्रागमन्या )- मातेशी गैर वृत्तिने वागणार्‍याचे तोंड कधी पाहू नये. गुरुची निंदा करणाऱ्या शिष्याचे, हरीची निंदा करणाऱ्याचे मुखही पाहू नये. आपल्या भक्तीत, भजन कीर्तनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी एकांतात राहणे सर्वोत्तम! निंदकाची भेट घेणे टाळावे, कारण त्याच्या तोंडात गोडवा असला तरी पोटात कपट असते. अशा माणसांना नुसत्या पाहण्याने सुद्धा पाप वाढते. नीती धर्माच्या कल्पना जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात.

अग्निमाजी पडे धातू/ लीन होऊनी राहे आंतु/

होय शुद्ध न पावे धातू/ पटतंतूप्रमाणे//

बाह्य रंगाचे कारण/ मिथ्या अवघेची भूषण/

गर्व ताठा हे अज्ञान/ मरण सवे वाहतसे//

पुरे मातलिया नदी/ लव्हाळा नांदे जीवनसंधी*/

वृक्ष उन्मळोनी भेदी/ परी तो कधी भंगे ना//

हस्ती परदळ जो भंगी/ तया पायी न मरे मुंगी/

कोण जाय संगी/ पाणोवाणी तयाच्या//

पिटीता घणेवरी सैरा/ तया पोटी राहे हिरा/

तैशा काय तगती गारा/ तया थोरा होऊनी//

लीन दीन हेचि सार/ भव उतरावया पार/

पुढे माथा भार/ तुका म्हणे वाहोनी*//

माणसाने नेहमी दीन असावे. हा गुण किती चांगला आहे त्याची उदाहरणे महाराज देतात.

१) अग्नीमध्ये पडलेले सोने न जळता शुद्ध होते, परंतु वस्त्र किंवा धागा आगीत पडला तर त्याचा नाश होतो. बाह्यात्कारी भूषणे हा केवळ दिखावा असतो.

२) गर्व किंवा ताठा हे केवळ अज्ञान आहे. जीव गेला तरी अज्ञान तसेच राहते.

३) महापूर आला तर वृक्ष उन्मळून पडतात आणि लव्हाळी मात्र तशीच टिकून राहतात. * वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळे वाचती ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले आहे.

४) हत्ती शत्रूचा विध्वंस करतो, परंतु त्याच्या पायाखाली मुंगी मरत नाही. म्हणून हत्तीच्या मागोमाग झुंज खेळायला कोण जाणार?

५) हिरा घणाने फुटत नाही, पण गारा हिर्‍या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्या घणाखाली टिकतात का?

 या सर्व उदाहरणांचा अर्थ एकच की, सर्वांनी दीन पणाने नम्र होऊन रहावे. मोठेपणाची ऐट कधी, कशाने गळून पडेल हे सांगता येत नाही. नम्रता, लीनता हे भवसागर पार करण्याचे फार मोठे साधन आहे. ज्याला मोठेपणाचा गर्व असेल

तो या भवसमुद्रात बुडून जाईल.

पुढील लेखात तुकाराम महाराजांनी रचलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… १५ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – २ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – २ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ११ ते २०

महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यन्

न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि ।

अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया

ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः ॥ ११॥

*

नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं

शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु ।

अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो

विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम् ॥ १२॥

*

विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितै-

रवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः ।

हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां

कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे ॥ १३॥

*

स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये

जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा ।

अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां

गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः ॥ १४॥

*

जडानन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्

ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् ।

निलिम्पैर्निर्मुक्तानपि च निरयान्तर्निपततो

नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि ॥ १५॥

*

स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपा-

मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति ।

मुदायं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः

समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः ॥ १६॥

*

कृतक्षुद्रैनस्कानथ झटिति सन्तप्तमनसः

समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः ।

अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरिता-

न्नरानूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे ॥ १७॥

*

निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां

प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः ।

समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां

श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः ॥ १८॥

*

पुरो धावं धावं द्रविणमदिराघूर्णितदृशां

महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम् ।

ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो

वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि ॥ १९॥

*

मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-

स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौङ्कुमरुचि ।

सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं

जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु ॥ २०॥

– – – – 

मराठी भावानुवाद 

लाभ जयाचा नाही ध्याने अमाप दानाने

घोर तपस्ये प्राप्त न होई विविध यागाने

या सकलांहुनी प्रभावशाली गङ्गे तव दर्शन

सामान्यांसी प्राप्ती सहजी माधवपद पावन ॥११॥

*

एक कटाक्षे तुझिया होते भवभयहारण

तव मूर्ती करि जगताचे या सदैव कल्याण

क्षुब्ध जाहल्या शैलजेस त्या महेश सोडून

सदोदीत तुजला मस्तकावरी करितो धारण ॥१२॥

*

जगात भरली असंख्य पापे उन्मत्त बोल

निंदक भेदी धर्म सांडिती आक्रमिती टवाळ

समस्त पातकी पापे क्षालित तुझिया पाण्यातुन

निर्मल विजयी प्रवाह हा तव एकचि विश्वातुन ॥१३॥

*

पतीत दीन उद्धारास्तव अवतर अवनीवरी

बांधुनिया निजपाशी कुंतले ठेवी मन्मथअरी

निर्मोही तरी दोष मोह ठेवी तुजला बांधुन

दोष तुझा की सांग माते सारे सद्गुण ॥१४॥

*

पङ्गू अंध बधीर मूक मूढ पापी पीडित

पापांपासुन मुक्तिसाठी पांथस्थ रखडत

त्यागिती सर्व देव तयांसी नरकात जायचे

तूची श्रेष्ठ भेषज अससी उद्धार दीनांचे ॥१५॥

*

स्वाभाविक शीतल नि विमल नीर तुझे महान

महिमा त्याचा काय वदावा सर्वा करि पावन

तुझिया स्पर्शे मोक्ष मिळोनी गेले स्वर्गात

सगरपुत्र द्यूलोकी अजुनी स्तवन तुझे गात ॥१६॥

*

लघूपातकांचा होता पस्तावा मग जीवनी

पातकहरणा असंख्य असती तीर्थक्षेत्र त्रिभुवनी

पापांना ज्या नाही उतारा पश्चात्तापाचा

अनुपम पावन करुनी मार्ग दावि मुक्तीचा ॥१७॥

*

खजिना धर्माचा तो मुख्य तीर्थांचे स्थान

कितीक आमोदासी देशी प्रज्ञे समाधान

आच्छादुनी चिंतेसी ठेवी विमल वस्त्र परिधान

लक्ष्मीवास हरण करी दुःखा तव रूप छान ॥१८॥

*

आशा जोपासुनी धनाची मंदबुद्धी झालो

धनपिसाट राजांसामोरी नतमस्तक झालो

स्वार्थापोटी सोडुन निजहित मति का मूढावी

करुणामयी होई हे माते वियोग तव हटवी ॥१९॥

*

लहरींनी पवनाच्या जलतरंग जे उठले

पद्मपराग केशरवर्णी चहूकडे विखुरले

सुरस्त्रियांच्या वक्षांवरचे कर्दमगरूसम आले

ऐसे जल तव नष्ट करो मम जननमरण जाळे ॥२०॥

– क्रमशः भाग दुसरा – 

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुखी निद्रा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुखी निद्रा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गाढ झोप तुझी माझी 

‘त्यानेच’ नशिबी लिहिली,

जरी होतसे उकाड्याने

साऱ्या अंगाची काहीली !

*

येईल कशी आठवण 

उदरातल्या आगडोंबाची,

भरतो स्वप्नातच खळगी 

भाकर तुकड्याने पोटाची !

*

जगूया उद्याच्या आशेवर 

मिळावे कोरड्याचे घास,

जगावे तर लागेल दोघां 

असेपर्यंत शरीरात श्वास !

असेपर्यंत शरीरात श्वास !

(चित्रकार – अनिल खरे, मिनिआपोलीस, USA)

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महागाई… ☆ वंदना अशोक हुळबत्ते ☆

वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ महागाई… ☆ वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

पाहता पाहता

पेट्रोल, डिझेल वाढले

महागाईचे भूत उरावर बसले

खर्चाचा ताळमेळ बसेना

कारभार कसा चलवावा कळेना ?

 

झाली नोकरीत कपात

बसली लाथ कंबरड्यात

नाही सरकार जगू देत

नाही आई ती मरू देत

दात टोकरून पोट कधी भरतं ?

जगण्याच कोड अधिक बिकट होत

 

भाजीला मिळते तेल चमचाभर

खमंग फोडणीच स्वप्न उधारीवर

आधीच मान टाकली शाळूने

जेवणाशी कट्टी केली भाकरीने

 

दूधाने पण गाठली शंभरी

मुलेबाळे भुकेने तळमळली

भेटच होत नाही हातातोंडाची

सारखी गाठ पडते महागाईची

 

नाही धरला मोह श्रीमंतीचा

नाही धरला मोह पर्यटनाचा

नाही धरला मोह सोन्याचा

तरी

बट्ट्याबोळ झाला संसाराचा

© वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

सांगली

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?  विविधा ?

☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

बालकवींची ‘औदुंबर‘ कविता शाळेत शिकताना आणि नंतरही ‘ पायवाट पांढरी तयातून आडवी-तिडवी पडे.. ’ ही ओळ आली की मन तिथेच थबकायचे, आजही थबकते..

ग्रामीण भागात, गाव-खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर पाय चालायला लागले की रस्त्यापेक्षा पायवाटा याच चालणाऱ्या पायांच्या सोबती असतात. अगदी बालपणापासूनची ही सोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी हवीशी वाटत राहते.

आमच्या शाळेच्या परीक्षा झाल्या की खऱ्या अर्थाने आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. या सुट्टीचे वेध खूप आधीपासून लागलेले असायचे. ही सुट्टी म्हणजे नुसती धमाल असायची. बांधलेल्या खोंडाचे दावं सोडल्यावर जसे खोंड उधळतं तशीच सर्वांची स्थिती असायची.. वार्षिक परीक्षांची दावी सुटलेली असायची.. दावणीत उभा राहून कंटाळलेले पाय उड्या मारत उधळायला आतुरलेले असावेत तशी अवस्था व्हायची. काहींच्या घरातल्यांनी ‘झाल्या एकदाच्या परीक्षा ‘ म्हणत निश्वास सोडलेला असायचा.. सगळी बंधने सैल केली जायची. काहींच्या घरात तर परीक्षा होत्या हे ही ठाऊक नसायचे.. पोट भरण्यासाठी येरवाळी जाऊन सांजंला परत येण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नसायचा.. पण गल्लीतल्या कुणा वडीलधाऱ्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष असायचे.. शाळेच्या वेळात एखादे पोरगं दिसले तर “ काय रं, शाळंला गेला न्हाईस ? “ लगेच विचारलं जायचं. दोन-चार दिवस पोरं उंडारताना दिसली की कुणीतरी विचारायचं, “ झाल्या व्हय रं परीक्षा ? “

परीक्षा एकदाची झाली की ओढ असायची ती पोहायला जायची. सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, पोहण्यासाठी गुरवांच्या विहिरीवर पोरांची झुंबड असायची.. विहीरवर जाण्याची प्रत्येकालाच एवढी आतुरता असायची की जो तो पायवाटा शोधायचा, काहीजण तर सांदी-कुपाडीतून नव्याच पायवाटा तयार करायचे.. अंतर कमी करून आपल्या आपल्या इप्सितापर्यंत, ध्येयापर्यंत लवकरात लवकर नेणाऱ्या या पायवाटा किंवा पाऊलवाटा सर्वांनाच प्रिय असतात. रस्ते, राजमार्ग तयार करावे लागतात पण पायवाटा कुणी बनवत नाही किंवा तयार करत नाही.. जिथून, माणूस असो किंवा जनावरे अनेकांचे पाय गेले की त्या आपोआप बनतात. गुरवांच्या विहिराला बक्कळ पाणी असल्याने आम्ही मठातून ओघळीत उतरून कधी बांधावरून तर कधी रानातून पोहोण्यासाठी पळतच जायचो..

येताना मात्र कडकडून भूक लागली असली तरी रमत गमत, गप्पा मारत पायवाटेवरून यायचो. आम्हां पोरांना त्यावेळी पायवाट ही प्रियच असायची आणि कुठेही जायचे यायचे झाले तरी पायवाटाच हव्याशा वाटायच्या.

माणूस गावातील असो किंवा शहरातील, प्रत्येकाचा फिरण्याचा, वावरण्याचा, जाण्या-येण्याचा एक क्षेत्रपरीघ असतो. खेडेगावात प्रत्येकाचा तो क्षेत्रपरिघ जवळपास सर्वांना, त्यातल्या त्यात मोठ्यांना ठाऊक असायचाच.. त्या बाहेर, आडवाटेलासुदधा कुणी पोरगं दिसलं तर “ काय रं, हिकडं कुणीकडं निगालायस ? “ म्हणून हटकलं जायचं. सांगितलेलं कारण पटलं नाही तर माघारी घराकडं पिटाळालं जायचं.. मोठ्या माणसांनासुद्धा “ आज हिकडं आडवाटंला कुणीकडं ? “ विचारलं जायचं.

आडवाटा या पायवाटा किंवा पाऊलवाटाच.. पण न गेलेल्यासाठी आणि क्वचित कधीतरी जाणाऱ्यासाठी त्या आडवाटा. तसेच काही कारण असल्याशिवाय कुणी आडवाटेला आढळायचं नाही. नाहीतरी सरळमार्गी माणसं आडमार्गाला जातीलच कशाला ?

एकदा मित्राच्या मावशीकडे, पेरिडला गेलो होतो.. डोंगरातल्या गावातली जनावरे चरायला डोंगरात जातात ती पायवाटेनच.. डोंगरातल्या पायवाटा तशा खडतर.. त्या सगळ्याच जनावरांच्या जाण्यायेण्याने तयार झालेल्या.. डोंगर चढण्या-उतण्याचे जनावरांचे ज्ञान आश्चर्य वाटण्याजोगे असते. जनावरे वर डोंगरात ज्या पायवाटेने जातात त्याच पायवाटेने उतरतात असे नाही. काही ठिकाणी त्यांची उतरताना घसरून पडू नये अशा विचाराने घसरणीच्या जागी उतरणीच्या पायवाटा जरा लांबून आलेल्या दिसतात.

पायवाटा वेड्या-वाकड्या, राना-वनातून जाणाऱ्या, उंच सखल असल्या तरी पावलांना त्या रस्त्यांपेक्षाही प्रिय.. प्रवासाचे आणि भवतालाशी, निसर्गाशी असणारे अंतर कमी करणाऱ्या.. पूर्वसुरीच्या पावलावर पाऊल टाकून वाट चालत रहावी असे अप्रत्यक्षरित्या सांगणाऱ्या.. शिकवणाऱ्या. पूर्वसुरीच्या पावलांनी आणि वहिवाटीने तयार झालेल्या पायवाटा.. वहिवाट थांबली की काही काळातच भवतालाशी एकरूप होऊन जातात. जीवनातली इतिकर्तव्यता संपली.. जीवनकार्य संपले याची जाणीव झाल्यावर आदितत्वाची एकरूप होऊन जाणाऱ्या, पंचमहाभूतात स्वतःला विलीन करणाऱ्या एखाद्या साधू-संतासारख्याच. पायवाटा तशाच असतात निरपेक्ष भावाने आपले कार्य करणाऱ्या.. त्यांना पायाखाली तुडवत जाणारा महापुरुष असो किंवा एखादा चोर-दरोडेखोर त्यांच्यालेखी सारे सारखेच असतात.

दिवसभर डोंगरात चरायला जाणारी जनावरे सांज उतरू लागली की पायवाटेने गोठयाकडे परततात.. कधी गोधुळ उडवीत तर कधी आतुर पावलांनी चालताना गळ्यातल्या घंटीच्या मंजुळ नादाने भोवतालाला सुखावत.. आमच्या तिळगंगेकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा, एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याने या तीरावर पाण्यात डुबकी मारून पुढच्या तीरावर प्रकट व्हावे तशा, पाण्यात डुबकी मारायच्या ते पुढच्या काठालाच नदीबाहेर यायच्या.. दिवसभर रानात कष्ट करणारे शेतकरी डोईवर वैरणीचा भारा घेऊन पायवाटेने नदीत उतरून दुसऱ्या काठावर येईपर्यंत पाण्याच्या स्पर्शाने शीण हरवून ओलेत्या पायांनी घरी परतायचे तशीच पायवाट सुस्नात होऊन दुसऱ्या काठावर यायची..

आयुष्यातील सुख-दुःखाचे कितीतरी सांगावे इकडून तिकडे, तिकडून इकडे येता-जाताना पायवाटेने पाहिलेले असतात.. कधी ती मनातून सुखावत असेलही. कधी ती कष्टीही होत असेल पण वरून मात्र ती असते एखाद्या स्थितप्रज्ञासारखी ! ‘ ‘ सुख-दुःख समे कृत्वा !’ म्हणत असल्यासारखी…. पांथस्थाचे मुक्कामापर्यंतचे अंतर कमी करायचे.. जवळची वाट होऊन त्याची वाट जवळ करायचे हे पायवाटेचे जीवनकार्य.. माहेराच्या ओढीने येणाऱ्या माहेरवाशिणीसाठी, पाडसाच्या ओढीने येणाऱ्या गाईंसाठी ती उरकती होते तर अनिच्छेने जड पावलांनी जाणाऱ्यासाठी ती उरकता उरकत नाही.

आता काळ बदलत गेलाय. माणूस वाहनांनी प्रवास करायला लागलाय. रस्त्यावरसुद्धा पाऊलांपेक्षा वाहनांची चाकेच जिथं जास्त धावायला लागलीत तिथं पायवाटांवर पाऊले कुठुन पडणार ? पायवाटांवरून पाऊलेच पडत नसल्याने कितीतरी पायवाटा, आडवाटा निर्सगात, भावतालात विरून गेल्यात.. तरी अजूनही रानावनात, डोंगरखोऱ्यात पायावाटा भेटतात तेंव्हा मन सुखावते.. त्यावरून चार पावले तरी चालावे असे वाटते.. कधी कधी या पायवाटा उदास असल्यासारख्या वाटतात.. एखादी माऊली सासुरवाशीण लेकीच्या आठवणीने उदास व्हावी तशा.

पायावाट पाहिली की वाटते, कितीतरी पावलांनी या पायवाटेवरून आपले घर जवळ केले असेल, कितीतरी माहेरवाशीणी, सासूरवाशींणी याच पायवाटांवरून आल्या-गेल्या असतील. कुणातरी एखाद्या सासुरवाशीणीला कधीतरी माहेर जवळ करणाऱ्या पायवाटेची आठवण येत असेल आणि ती मनात म्हणत असेल,

 रामरगाड्यात साऱ्या

 राब सुटता सुटंना

 हरवली पायवाट

 बापमाऊली भेटंना

 

 मना माहेराचा ओढा

 बाई मिटता मिटंना

 पायवाटेचं ह्या रिण

 बाई फिटता फिटंना

 खरंच, या पायवाटांचं ऋण कधीच फिटता फिटणार नाही.

 **

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रिंगणी भुईरिंगणी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रिंगणी भुईरिंगणी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत: वर्ण संख्या १६ यती ८ व्या अक्षरावर) 

शुभ्रखणी जांभूळली अवनीच्या गं अंगणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||ध्रु||

*

नागमोडी चाल तुझी खोडावर काटेकुटे

पानावर हिरव्याशा देखणी कलिका फुटे

शुभ्रकांती मनमोही भासते जणू चांदणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||१||

*

फुले जांभळी पांढरी कनकाचा वर गोंडा

देखण्याशा रुपावर मधमाशांचा गं लोंढा

तुला चिचुर्डी म्हणती कुणी डोर्ली भोरिंगणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||२||

*

अनेक रूपात तुझी नावे वेग वेगळाली

फुलाफळांसह फांदी बहराला पहा आली

वैद्य तू बहुगुणी पान, फूल, खोड, चणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||३||

*

कतेली कताई आणि निदिग्धिका, कंटकारी

नागमोडी चाल तुझी रानीवनी दिसणारी 

करतात सारे तुझी भाजी, आमटी, चटणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||४||

*

पावसात बहरते कटेरी तू कंटकारी

काटे रिंगणी गं बाई नावे तुझी किती सारी

रानरिंगणी म्हणती तुला गं मोतीरिंगणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||५||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१८ ☆ घर… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१८ ?

☆ घर ☆  प्रभा सोनवणे ☆

घरातली सगळीच घड्याळे

बंद पडली,

त्यांची टिकटिक ऐकू येत नाही!

 

बाहेर वाहनांची वर्दळ!

सवयीचे आवाज, हाॅर्नस्…

रिक्षा,बस, अँब्युलन्स…!!

सणावारी डी.जे.चं ध्वनिप्रदूषण!

 

आतल्या जगापेक्षा खूप वेगळं

बाहेरचं जग !

बाहेरच्या कोलाहलाने

काहीच बिघडत नाही,

आतल्या शांततेचं!

किती मूकं झालंय घर…

तुझ्या नसण्याने!

तू असताना—-

घड्याळे कधीच बंद

पडायची नाहीत,

इतका वेळ!

सदा टिकटिकत राहायची!

जिवंत असल्यासारखी!!!

 

कालचक्र थाबलंय जणू,

माझ्यापुरतं!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares