मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — महिलांच्या आवडीची “झुरणीबाई” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — महिलांच्या आवडीची “झुरणीबाई” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा – – 

– – महिलांच्या आवडीची “झुरणीबाई”

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा… क्रमशः स्वरूपातील ही सिरीज! आधीच्या पोस्ट फेसबुक वॉलवर “लुप्त होणाऱ्या पाऊलखुणा” या फोल्डरमध्ये आहेतच.

आज अशा एका व्यवसाय व तो करणाऱ्या बाईंबद्दल सांगणार आहे ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही आजची सहावी पोस्ट!!

तर पूर्वी (विशेषतः तालुका आणि गावपातळीवर) गल्लोगल्ली एका बाईचा आवाज घुमायचा. तो इतक्या वर्षांनंतरही माझ्या स्मरणात आहे कारण एक प्रकारचा हेल काढून एका लयीमध्ये ती बाई मध्य आणि तार सप्तकात तिच्याकडे असलेल्या वस्तुंची जणू जाहिरात करायची. साधारण लमाणी, कोंगाडी किंवा दक्षिणी पद्धतीचा तो आवाज होता. ती हातातली काठी रस्त्यावर आपटत (आवाज करत) त्या ठेक्यात ती म्हणायची 

घे ग बाई sssssss

बिब्ब घे, सुया घे, पोत घे, दाभण घे

कायच नसलं तर…

केसाचा गुंता दे… नाकातली मोरनी घे

*

आणि मग तिथं सावलीचा एखादा कोपरा पाहून बसून जायची. डोक्यावर एक गाठोडं असायचं. ते ती उतरवून खाली ठेवून त्याची गाठ सोडून आतलं सगळं पसरून तिचे ते जणू चालते फिरते दुकान मांडायची. तसेच एका हातात काठी व त्यावर आडव्या दोन तीन छोट्या काठ्या बांधून त्यावर महिलांना लागणाऱ्या बांगड्या, नाकातले, कानातले, कंगवे असं विविध वस्तू भांडारच जणू असायच तेही ती जवळच्या एखाद्या झाडाला टेकवून उभं करायची.

आणि मग आजूबाजूच्या घरातील महिलांची तिथं गर्दी उसळायची.

अथवा अजून एक प्रकार यात होता तो म्हणजे तिने “हाळी’ दिली की घरंदाज घरातल्या महिला तिला हाक मारून थेट घराच्या अंगणात बोलवून घ्यायच्या आणि त्या घरातील महिलांची मग ती एकप्रकारे खाजगी शॉपिंग व्हायची.

आता मुळात ती जी बाई… तिला “झुरणी बाई” म्हणतात (आमच्या मराठवाड्यात तरी) इतर ठिकाणी कदाचित वेगळं नाव असेल.

तर ती जे काही ठेक्यात गायल्या सारखं म्हणायची त्यातले अनेक शब्दही आता अनेकांना कळणार नाहीत तर ते आधी सांगतो.

बिब्ब घे, सुया घे, पोत घे, दाभण घे

यातला बिब्ब म्हणजे औषधी बिब्बा नावाचे कडक वाळलेलं फळ, कुणाला काटा टोचला तर बिब्बा गरम करून त्याचा चटका काट्याच्या जागी दिला की काटा बाहेर निघून यायचा. असे अनेक उपयोग बिब्ब्यात होते. आजीबाईच्या बटव्यात बिब्बा हमखास असायचा.

आणि सुया म्हणजे शिवणकामासाठी लागणाऱ्या विविध साईजच्या सुया…

पोत म्हणजे… मुलींसाठी अथवा मोठ्या स्त्रियांसाठी गळ्यात घालायचे एकप्रकारचे नेकलेस… त्यात रंगीत मणी असतील तो नेकलेस आणि काळे मणी असतील तर ते मंगळसूत्र…!

आणि दाभण म्हणजे सुईचा मोठा (आणि दणकट) भाऊ म्हणता येईल, याच दाभणाच्या मदतीने धान्याचे पोते शिवले जायचे.

अशा विविध वस्तू झुरणी बाईकडे असायच्या ज्या दैनंदिन जीवनात स्त्रियांना लागायच्या.

अर्थात या वस्तू विक्रीमध्ये नेहमी पैसेच दिले जातील असेही नसायचे. तर कधी धान्य रूपातही मोबदला दिला जायचा. आणि विशेष म्हणजे मनासारखी खरेदी झाली तर घरमालकीण मग त्या झुरणी बाईला हक्काने थांबवून जेवायला घालूनच पाठवणी करायची.

आता खरी गंमत पुढं आहे. ती झुरणी बाई ओरडताना म्हणायची…

केसाचा गुंता दे… नाकातली मोरनी घे

म्हणजे काय? तेच तर या झुरणी बाईच्या लुप्त होत जाणाऱ्या प्रथेचे मुख्य आकर्षण आहे.

त्याकाळी घरोघरी स्त्रिया केस विंचरून झाल्यावर कंगव्यात अडकलेले (गळणारे) केस एकत्र बोळा केल्यासारखं करून घराबाहेरच्या एखाद्या खुंटीला अडकवलेल्या पिशवीत साठवून ठेवले जायचे. असं महिना दीड महिना केलं की ती पिशवी भरायची आणि त्या काळात मग जर झुरणी बाई गावात आली तर तिला ती केसांची पिशवी देऊन त्याच्या बदल्यात तिच्याकडे असलेल्यापैकी आवडीची वस्तू घेतली जात असे. म्हणजे पैशाऐवजी चक्क केस दिले जायचे. त्यावेळी झुरणी बाई पण हुशार असायची. तो गुंता लांबसडक केसांचा असेल तर थोड्या जास्त किमतीची वस्तू ती मालकिणीला द्यायची. आणि आखूड / बारीक केसाचे पुंजके (गुंता) असेल तर कमी किमतीची वस्तू!

असं का? तर आताचे माहित नाही पण त्याकाळात ज्या स्त्रियांचे केस थोडे आखूड असत मात्र त्यांना लांब वेणी किंवा छान अंबाडा बांधून त्यावर गजरा माळायचा असायचा त्या स्त्रिया मग गंगावण विकत घ्यायच्या. गंगावण म्हणजे थोडक्यात सप्लिमेण्ट्री तुम्हाला मिळालेले केस. आता हे गंगावण बनवणाऱ्या कारागिराकडे या झुरणी बाई घरोघरी गोळा केलेला तो केसाचा गुंता (पुंजका) देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घ्यायची. आणि त्या केसाना स्वच्छ शिकेकाई रिठा वापरून धुवून वाळवून मग तो कारागीर त्यापासून नवीन गंगावण बनवून ते बाजारात विकायचा.

आहे न गंमत!

विंचरलेले केस गोळा करून कोपऱ्यात कुठं टाकले तरी नंतर त्यातले काही पुन्हा घरात येऊन स्वयंपाकात पडू शकतात. हे ओळखून पूर्वजांनी किती छान हि प्रथा सुरु केलेली की एका पिशवीत ते गोळा करायचे अन ते विकून तुम्हाला एखादी पोत (गळ्यातलं) घेता येईल. त्या आकर्षणातून मग स्त्रियाही केस गोळा करण्याच्या कंटाळा न करता निगुतीने जपून ठेवायच्या!

या झुरणी बाईची अजून एक खासियत होती. ती म्हणजे, लहान मुलींचे नाक अथवा कान टोचण्यासाठी सगळ्यांनाच सोनाराकडे जाणे परवडत नसे मग अशा घरच्या मुलीचे कान नाक टोचण्याचे काम हि झुरणी बाई करायची.

त्यासाठीच तिची ती ओळ असायची 

केसाचा गुंता दे… नाकातली मोरनी घे

म्हणजे तुझ्या केसाचे पुंजके दे मग मी नाक पण टोचून देईन आणि त्या नाकात घालायला मोरनी (म्हणजे आजच्या भाषेत “नोजरी”) देईल असं ती म्हणायची. नाक कान टोचून झाल्यावर त्यावर कोमट खोबरेल तेलात थोडी हळद मिसळून छिद्राच्या जागी लावली जायची. जेणेकरून जखमेत सेप्टिक होऊ नये. म्हणजे हौस मौजेच्या नाक कान टोचणीत सुद्धा झुरणी बाईकडे आयुर्वेदाचे ज्ञान होते. हे किती भारी न!

तर अशी हि झुरणी बाईची कथा!

याबद्दल ग्रामीण भागाची खडानखडा माहिती असलेल्या माझ्या मामींना विचारलं की “अजूनही तिकडे अशा झुरणी बाई येतात का गल्लीत? ” 

तर म्हणाल्या की, तालुक्यासारख्या शहरात आता दिसत नाहीत मात्र खेड्यात अधून मधून दिसतात. पण ते प्रमाण कमी झालं आहे आता. “

असो… कालाय तस्मेय नमः!! तर अशी हि झुरणीबाई आणि तिच्या कलेची लुप्त होत जाणारी प्रथा!

डॉ. डीडी क्लास : कोणतीच गोष्ट टाकाऊ नसते… अगदी गळून जाणारे केस पण कामाला येतात… हि खरी आपली संस्कृती ज्यातून झुरणीबाई आणि गंगावण हि संकल्पना आली असावी. दारावर आलेल्या झुरणीबाईला जेवायला घालण्याचे, आणि तिला तितका वेळ नसेल तर भाकरी भाजी फडक्यात बांधून तिला देण्याचे औंदार्य त्याकाळात होते. “पैसे दिले बात खतम” असं आजच्या सारखं तेव्हा नव्हतं. विक्रेता आणि ग्राहक यांच्यात फक्त आर्थिक नाते नसायचे तर माणुसकीचेही असायचे. हे या झुरणीबाईच्या प्रथेतून सांगण्याचा माझा प्रयत्न!

दादा कोंडकेंच्या सोंगाड्या सिनेमातील एक प्रसिद्ध मराठी गाणे आठवलं… ते यावरच होते…

मी येनार बी न्हाई

*

एक सांगायच राहिलेच! तर हे जे गंगावण होते तेही आता लुप्त झालेय. याचे कारण म्हणजे त्याकाळी आखूड (लहान) केस असणे स्त्रीला न्यूनगंड असायचा. लांब केस हेच सौंदर्याचे परिमाण मानले गेलेले… त्यामुळे घरोघरी गंगावण असायचेच. मात्र आताच्या काळात बदललेली परिस्थिती, कामाच्या ठिकाणी जाताना करावा लागणारा प्रवास आणि त्यात लांब केसांची होणारी फरफट, वेळेअभावी इच्छा असूनही “लांब” केसांची निगा राखता न येणे… अशा विविध कारणांमुळे “लांब केस” हेच आऊटडेटेड झाले त्यामुळे गंगावणाची गरजच उरली नाही आणि तेही बिचारे काळाच्या ओघात लुप्त झाले! असो 

तर जशी हि झुरणीबाई तशीच अजून एक होती… बोहारीण बाई… तिला भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या पाऊलखुणांबद्दल!

तोवर स्टे ट्यून!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी ‘ झेंडे ‘ असे खाली का ओढले जातात? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी ‘ झेंडे ‘ असे खाली का ओढले जातात? ☆ श्री संभाजी बबन गायके

भारतीय चित्रपटसृष्टी आणि त्यातल्या त्यात हिंदी चित्रपटसृष्टीने पोलिसांची प्रतिमा अतिशय मलीन करून ठेवलेली आहे. मराठीत दादा कोंडके यांनी पोलिसांना पांडू हे नाव दिले आणि पुढे लोकांनी या पांडूचा मामाही करून ठेवला. हिंदीत काम करणा-या मराठी कलाकारांच्या भूमिका काय असतात हे सर्वच जाणतात… अहो, एक सौंदर्यवती मराठी अभिनेत्री काही वर्षे परदेशी राहून पुन्हा भारतात परतली… तर तिला पुन्हा सुरुवात म्हणून एका साबणाच्या की फरशी पुसण्याच्या रसायनाच्या जाहिरातीत चक्क कामवाल्या बाईची भूमिका करावी लागली..!

पोलिसांची लाचखोरी आणि इतर गैरवर्तन हा गंभीर मुद्दा असला तरी अनेक शूर, कर्तव्यदक्ष आणि अतिशय दर्जेदार कामगिरी करून दाखवलेल्या पोलिसांची, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे का? मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात काय चित्रपटातले कलाकार आले होते काय? कसाबला जिवंत पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनीच तळहातावर शीर घेतले होते! मानवत बाल हत्याकांड असो किंवा इतर शेकडो गुन्हे असोत, इंग्लंडच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना केले जाणारे आपले मराठी पोलिस दल आहे. असो.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई दौरा सुरु होता.. मुंबई पोलिस अर्थातच बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे होते. पंतप्रधानांनी अचानक त्यांची गाडी थांबवायला सांगितले… आणि त्यांनी एका पोलिस अधिकारी साहेबांना जवळ बोलाववून घेतले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं… पंतप्रधान एका (प्रोटोकॉलनुसार) पदाच्या बाबतीत कनिष्ठ पदावर असलेल्या पोलिस अधिका-याशी एवढी सलगी कशी दाखवतील?

मुंबईच्या अधोजगतात त्यावेळी खूप दरारा असलेल्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा याच पोलिस अधिकारी साहेबांना अगदी प्रेमळ फोन आला होता…. साहेबांनी फोन करणाऱ्या महान व्यक्तीस अत्यंत विनयाने सांगितले होते.. साहेब, माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाशी तुम्ही बोलणं काही बरं दिसत नाही… तुम्ही आमच्या आयुक्त साहेबांशीच बोलावं हे तुमच्या योग्यतेला धरून होईल!

सामाजिक नियम, कायदे यांच्याविषयी कमालीची असंवेदनशीलता दर्शवणा-या काही लोकांना याच वर्दीधारी साहेबांनी रस्त्यावर सामान्य लोकांसमोर पद संचलन करीत नेलं होतं.. सामान्य लोक याला धिंड काढणं असं म्हणतात बहुधा!

पण एवढं सगळं करूनही ‘हा तर माझ्या कामाचाच एक भाग आहे’ म्हणून नामानिराळे राहू शकणारे हे साहेब… जणू क्रिकेटच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील सर्वांत स्फोटक फलंदाजाचा अफलातून सूर मारून झेल घेणारा अष्टपैलू खेळाडू….. पुन्हा शांतपणे डीप फाईनलेगला उभा राहतो…. तसे! म्हणूनच पोलिस दलात प्रत्यक्ष लोकांत, समाजात जाऊन काम करण्याला फील्डवर असणे, अशी कंमेट केली जात असाव!

यांची कहाणी काही फार विशेष म्हणावी अशी नाही…. काही नाही सुमारे वीस खून केलेल्या, (यातील ब-याच महिला होत्या) कित्येक वेळा तुरुंगातून निसटून गेलेल्या (यात दिल्ली पोलिसांच्या तावडीतून तिहार तुरुंगातून याचं निसटून जाणं ही तर दिल्ली पोलिसांच्या तोंडावरचा कधीही पुसला जाणार नाही असा डाग म्हणावा लागेल) एका कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला या साहेबांनी एकदा नव्हे… दोनदा अटक केली होती! मुंबई पोलिस दलातील यांची सेवा फक्त सदतीस वर्षांची…. ए. सी. पी. म्हणून सेवानिवृत्त झाले. मुंबई पोलिस दलातील सर्वजण त्यांना मानतात. जातीय दंगलीदरम्यान लोकांच्यात थेट जाऊन लोकांना शांत, नियंत्रित करू शकणारे, हाती येतील त्या साधनाने मोठी आग विझवण्याची कामगिरी करून दाखवणारे, शांत आणि संयमी राहून गुन्हेगारांच्या आतल्या गोटातल्या बातम्या मिळवण्यासाठी अगदी जमिनीवर राहून (ग्राउंड लेवल, फील्ड वर्क) 

मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे… आणि ते असे दोनदा सन्मानित होणारे एकमेव पोलिस अधिकारी ठरले होते!

सबंध भारतातील सर्व पोलिस, गुप्तहेर यंत्रणा ज्याचा जीव खाऊन शोध घेत होत्या त्या चार्ल्स शोभराज नावाच्या गुन्हेगाराला गोव्यातून या साहेबांनी अगदी नाट्यमयरीत्या पकडले होते… त्याप्रसंगात त्यांनी चक्क हॉटेलमधील वेटरचे काम केले होते… असे सांगतात. या साहेबांच्या आयुष्यावर काही पुस्तके, चित्रफिती आणि नाटकेही निघाली होती. एकूणच अगदी दखल घेण्याजोगे, तमाम मराठी माणसांना आणि विशेषत: पोलिसात असणा-या सर्वांनाच अभिमान वाटावा, असे हे निवृत्त पोलिस अधिकारी आहेत… मधुकर बापूराव झेंडे त्यांचं नाव.

या साहेबांच्या पोलिस म्हणून केलेल्या कामगिरीवर चित्रपट निघाला पाहिजेच होता… पण कसा? जसे इतर शूर लोकांवर निर्माण केला जातो तसा… जसा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर काढला जातो तसा. पण… आपल्याच एका मराठी लेखक, दिग्दर्शकाने या शूर, कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान पोलिस अधिका-याचे जीवन पडद्यावर रेखाटताना चक्क विनोदी जॉनर वापरला आहे! Genre (जॉनर) म्हणजे प्रकार किंवा शैली. हे असं करणं हाच एक विनोद वाटावा. त्यापेक्षा या विषयावर मराठी वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमात एखादे skit (नाट्यप्रवेश) सादर करून त्याचे शुटींग चित्रपट म्हणून दाखवले असते तर खर्च वाचला असता. नाहीतरी या चित्रपटात घेतलेले बरेच कलाकार अशाच skit मध्ये काम करण्यात वाकबगार झालेले आहेतच!

चित्रपटात नाव मात्र वास्तविक जीवनातील माणसाचे वापरायचे… अगदी पद सुद्धा तेच. इन्स्पेक्टर मधुकर बापूराव झेंडे. गोव्यातील पोलिस इन्स्पेक्टर विनोदी दाखवायचा आणि त्याच्या तोंडी झेंडे नावाचा उच्चार ‘जेंडे’ असा दाखवायचा…. यामागे काय विचार असावा? आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराचा विषय असेल म्हणून असावे कदाचित, म्हणून चार्ल्स ऐवजी कार्ल (झेंडे साहेब मराठी म्हणून त्यांना कार्ल उच्चार करता येणार नाही म्हणून त्यांना कार.. लं म्हणायला लावायचं हे सुद्धा भारीच!) शोभराजचे भोजराज करणं अनिवार्य झालेलं असावं. कमीत कमी पदवीधर (इंग्लिश विषयासह) आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एम. पी. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पी. एस. आय. होता येतं! काही पोलिस अधिकारी modus operandi ला ऑपरंडाय ऐवजी ऑपरंडी म्हणत असतील सुद्धा… हा काही रूढ शब्दप्रयोग नाही पोलिसांचा!

मनोज वाजपेयी आता खरे पोलिस अधिकारी वाटू लागले आहेत. त्यांना मुख्य भूमिकेत घेऊन दिग्दर्शक, निर्मात्यांनी एक(च) बरे केले आहे! पण याही भूमिकेत दुसरा एखादा मराठी विनोदी कलाकार चालून गेला असताच!

झेंडे साहेबांचे सर्व सहकारी एकजात वेंधळे दाखवताना, साध्या भोळ्या चेह-याच्या भाऊ कदमांना चक्क पांडू हवालदारच दाखवले गेले आहे… आणि हे हवालदार साहेब चक्क घाबरट रंगवले गेले आहेत! ही पोलिसांची बदनामीच नव्हे काय? पांडू या शब्दाशी उच्चार जुळणारा एक मोठा शब्द मात्र वापराला जाईलच याचीही काळजी घेतली आहे. टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात… हे फरार होऊ पाहणा-या आरोपीस पकडताना म्हणले गेलेले खुपते प्रकारातले वाक्य वापरून आधीच अतिशय गंभीर असलेल्या प्रसंगात हलके फुलकेपणा आणण्याचा (केविलवाणा) प्रयत्नही झाला आहे. एक पोलिस (मग तो साधा भाऊ किंवा साध्या गणवेशातला का असेना) स्वत:च्या डोक्यात बादली (उपडी) घालून घेऊन गुन्हेगाराला त्या बादलीने धडक मारतो… किती अचूक दृश्य. ती बादली थेट गुन्हेगाराच्या डोक्यात नसती का घालता आली? असा बाळबोध प्रश्न पडायला पाहिजे खरं तर.

पण मधुकरराव झेंडे साहेबांची कामगिरी पहायला मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने पडद्यासमोर बसलेल्या किमान मराठी माणसाला तरी या प्रश्नपत्रिकेतील एकही प्रश्न समजत नाही… सोडवायचा तर प्रश्नच येत नाही! या सवालांचे जबाब खुद्द लेखक, दिग्दर्शकाकडे तरी असतील का?

जगप्रसिद्ध पोलिस दलातील एका अधिका-याच्या जगप्रसिद्ध कामगिरीवर आधारीत चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना संबंधित लोकांनी पोलिसांना गृहीत धरले आहे की काय? खुद्द झेंडे साहेबांशी हे लोक संपर्कात असतीलच… म्हणजे असावेत. मग साहेबांनी याला कशी संमती दर्शवली? कलात्मक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे असेल तर कायदेशीरदृष्ट्या योग्यच आहे म्हणा! मग मधुकर झेंडे ऐवजी सुधाकर पांडे हे नाव काही कमी आकर्षक वाटले नसते!

आता विषय जगात पोहोचला आहे… तो काही परत घेता येणार नाही. पण यापुढील काळात पोलिसांच्या कर्तबगारीवर चित्रपट, नाटक काढताना संबंधित खात्यातील ज्ञानी, अनुभवी लोकांचा एकदा सल्ला घेतला गेला पाहिजे, असे वाटते.

आणि हो, भारतीय सैन्याविषयी चित्रपट, नाटक लिहिण्यापूर्वी, आणि ते प्रकाशित करण्यापूर्वी संरक्षण खात्यातील जाणकार लोकांना दाखवलेच जावे, असा नियम असावा. नाहीतर सैनिकी चित्रपटात प्राणार्पण केले असे दाखवले गेलेले सैनिक प्रत्यक्षात सुखरूपपणे जिवंत आहेत, असे नंतर समजते! Cinematic Liberty घेण्यापूर्वी सारासार विचार आपले कलाकार, लेखक, दिग्दर्शक कधी करणार? निर्मात्यांना काय… पैसे वसूल झाल्याशी मतलब!

(श्री. मधुकरराव बापूराव झेंडे साहेब यांच्या कामगिरीविषयी पुस्तके उपलब्ध आहेत. ती शोधून वाचावीत. आता OTT वर आलाच आहे, subscription केलेच आहे म्हणून कोणताही चित्रपट पाहण्यात काही हशील नाही, असे मला संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर प्रामाणिकपणे वाटते. अर्थात, हा लेख म्हणजे माझेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय पहायचं आणि काय नाही हे सर्वस्वी वैय्यक्तिक निर्णय असतो. न्यायासाठी उत्तम काम केलेल्या आणि करणा-या, प्रसंगी प्राणांचे बलिदान देणा-या सर्वच पोलिस अधिका-यांना, कर्मचा-यांना अभिवादन!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातील सर्वात मोठा शब्द… ☆माहिती संग्राहक : श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगातील सर्वात मोठा शब्द… माहिती संग्राहक : श्री दिवाकर बुरसे

संस्कृत भाषेतच असे चमत्कार घडू शकतात!

संस्कृत भाषेतील एका अतिविशाल शब्दाचा परिचय करून घेण्यापूर्वी या शब्दाच्या लेखिकेविषयी सांगणे आवश्यक आहे.

*राणी तिरुमलाम्बिका*

विजयनगर साम्राज्याने भारतीय कला, साहित्य, संस्कृति, संगीत याला महत्वपूर्ण आश्रय दिला होता. १५२९ ते १५४२ या काळात अच्युतदेवराय हे सम्राट होते. त्यांची राणी तिरुमलाम्बिका या अतिविदुषी होत्या. तिरुमलाम्बिका यांना “राजाधिराजाच्युतरायसार्वभौमप्रेमसर्वस्वविश्वासभुवा” (राजाधिराज अच्युतराय सार्वभौम यांचे प्रेम व सर्वस्व विश्वास संपादन केलेली) असे म्हटले गेले आहे. त्यांचे संस्कृत भाषेखेरीज अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्या काव्ये नाटके, काव्यशास्त्र, वेद आणि पुराणांच्या ज्ञात्या होत्या. चम्पू काव्य शैलीत त्यांनी लिहिलेला – *वरदाम्बिकापरिणयचम्पूः*

(वरदाम्बिकाच्या विवाहाचे गद्यपद्यमय काव्य) हे संस्कृतातील मनोहरी काव्यांपैकी एक काव्य आहे.

कवी बाणभट्ट हे संस्कृत गद्यात दीर्घ सामासिक शब्दांच्या प्रयोगासाठी विख्यात आहेत पण तिरुमलाम्बिका सुद्धा या कलेत त्यांच्या तुलनेत जराही मागे नाहीत. चम्पू काव्याच्या रूपातील दीर्घ शब्दप्रयोग केलेली ही कृती पद्यमय असल्याने फार सरस आणि वाचनीय झाली आहे.

या काव्यातील एक खण्ड ‘तुण्डीरदेशवर्णनम्’, यात पुढे दिलेला प्रसिद्ध शब्द मिळतो. याला संस्कृत भाषेतला सर्वात मोठा शब्द मानतात. *छप्पन्न शब्दांशांनी आणि एकशे एक्याण्णव अक्षरांनी रचलेला हा शब्द* अनेक विशेषणे उपसर्ग, प्रत्ययांनी विभूषित आहे :—

*निरन्तरान्धकारितदिगन्तरकन्दलदमन्दसुधारसबिन्दुसान्द्रतरघनाघनवृन्दसन्देहकरस्यन्दमानमकरन्दबिन्दुबन्धुरतरमाकन्दतरुकुलतल्पकल्पमृदुलसिकताजालजटिलमूलतलमरुवकमिलदलघुलघुलयकलितरमणीयपानीयशालिकाबालिकाकरारविन्दगलन्तिकागलदलालवङ्गपाटलघनसारकस्तूरिकातिसौरभमेदुरलघुतरमधुरशीतलतरसलिलधारानिराकरिष्णुतदीयविमलविलोचनमयूखरेखापसारितपिपासायासपथिकलोकान्*

वरील अति दीर्घ सामासिक शब्दातील एकेका शब्दाचा /शब्दांशाचा अर्थ:

  • निरन्तरान्धकारित (सदा अंधारात वास्तव्य करणारा)
  • दिगन्तर (अन्यत्र)
  • कन्दलदमन्द (फळा फुलांनी युक्त)
  • सुधारस (फुलांतील मध)
  • बिन्दु (थेंब, कण)
  • सान्द्रतर (उत्कट, प्रबळ)
  • घनाघन (इन्द्र; वर्षाव करणारे मेघ)
  • वृन्द (दल)
  • सन्देहकर (सन्देह, संशय उत्त्पन्न करणारा)
  • स्यन्दमान (चन्द्रमा; प्रवाहित, वाहणारा)
  • मकरन्द (फुलातील मध)
  • बिन्दु (थेंब, कण)
  • बन्धुरतर (सुखद, सुदर, आकर्षक)
  • माकन्द (आम्र वृक्ष; माकन्दी पिवळे चन्दन)
  • तरु (वृक्ष)
  • कुल
  • तल्प (आसन, रक्षक)
  • कल्प (सक्षम, नृत्य)
  • मृदुल (सुकोमल, जल)
  • सिकता (वाळू)
  • जाल (जाळे)
  • जटिल (गुंतागुंतीचे)
  • मूल (मूळ)
  • तल
  • मरुवक (एक प्रकारची तुळस)
  • मिलद (मिळत असलेले)
  • लघु (लहान)
  • लघु (लहान)
  • लय (स्वराची मधुरता)
  • कलित (गुणगुणणारे, प्रेरित)
  • रमणीय (मनोरम)
  • पानीय (पोषित, संरक्षित, पाणी)
  • शालिका (कुटि, घर)
  • बालिका (कन्या)
  • करारविन्द (कमळासारखे हात.)
  • गलन्तिका (पाण्याचा झरा)
  • गलदेला (एक प्रकारचे गवत)
  • लवङ्ग (लवंग वृक्ष)
  • पाटल (गुलाब)
  • घनसार (कर्पूर, कपूर)
  • कस्तूरिकातिसौरभ (अतिशय सुगंधितत कस्तुरी)
  • मेदुर (चिकणे, घने)
  • लघुतर (लहान)
  • मधुर (गोड)
  • शीतलतर (अधिक गार)
  • सलिलधारा (जलधारा)
  • निराकरिष्णु (निरोधक, अडवणारा)
  • तदीय (त्यांचे)
  • विमल (स्वच्छ, सुन्दर)
  • विलोचन (नेत्र, दर्शन)
  • मयूख (प्रकाश किरणें)
  • रेखापसारित (रेषांनी विखुरले (अपसारित))
  • पिपासायास (तहानेलेले (पिपासु), थकलेले (आयास))
  • पथिक (प्रवासी)
  • लोकान् (मनुष्य)

खरे तर या शब्दाची संपूर्ण व्याख्या लिहायला अनेक पृष्ठे लागतील. पण याचा भावार्थ सांगायचा झाला तर तो असा सांगता येईल :

या प्रवाश्यांना तहानेमुळे होणा-या त्रासाचे निवारण या कन्यांच्या वेधक नेत्रांतील किरणांच्या गुच्छामुळे केले, प्रकाशकिरणे जी जलधारांवर हिलोरत होती, वेलची, लवंग, केशर, कापूर आणि कस्तुरी यांनी सुगंधित झालेल्या मधुर व शीतल जलाला कुमारींच्या कमळासारख्या हातात धारण केलेल्या घड्यांत, त्यांची पावले सुकोमल रेतीच्या पायघड्यांवर पडत होती नवमंजि-यांनी डवरलेल्या आम्रतरूंराजीमधे असलेल्या भूभागावर अंधार करीत होते आणि गुलाबादि फुलांतून टपकणा-या रसाच्या थेंबांमुळे आधिकच आकर्षक वाटत होती जशी मेघांची रांग घनदाट वर्षायुक्त मेघांची रांगेचा भ्रम निर्माण करते ज्यात विपुल प्रमाणात अमृतासम जल ओथंबले आहे.

माहिती संग्राहक : श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची आई ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आमची आई ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आमची ‘आई ‘म्हणजे एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्व. ••सर्वांचे लक्ष ठेवणारी.

‘आई ‘ या शब्दाची perfect ‘व्याख्या’ आणि ‘उदाहरण’ म्हणजे आमची ‘आई ‘. •• तिचे जग म्हणजे घर, मुल, नवरा. •• त्यात ती एवढी रमते की तिला व्यायामाला वेळच मिळत नाही. •असं तिचे म्हणणे असते. •• एक व्यायाम सोडला तर इतर कामे ती अगदी हुशारीने, आनंदाने, आवडीने, करण्यास तत्पर असते ••. फक्त थोडी दबक्या स्वभावाची आहे. •• त्यामुळे सर्वांशी पटत. •• पण तिच्या स्वभावाचा फायदा घेणारे बरेच असतात••. पटकन कोणाच्याही म्हणण्यात येते ••. कोणी काही म्हंटल तर लगेच त्याचा विचार करत बसते. हिरमुसते ••म्हणून आम्हाला तिच्या कडे लक्षच ठेवावे लागते •••. बरे असो..

खूप समजविल्यानंतर शेवटी नाईलाजाने का होईना पण ती आता सकाळी फिरायला जाऊ लागली. ••तिला आता आवडू ही लागल आहे. ••काल अचानक फिरून आल्यावर थोडी ‘disturb ‘वाटली. •• थोड्याच वेळात तिच्या बोलण्यातून लक्षात आले, की तिला शेजारच्या काकू भेटल्या होत्या. ••• ••लक्षात आलं काही तरी बोलण झाल असाव दोघींमधे. •• कळेलच. आई काही खूप वेळ मनात ठेवणार नाही. •••

थोड्या वेळात कळलेच सर्व.

शेजारच्या काकू म्हणजे अगदी regular walk, exercise करणाऱ्या. •• त्या आईला भेटल्या. •• तर लगेच म्हणाल्या अरे.! आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का? काय??? आज अगदी walk ला वगैरे! . सर्व ठीक ना. तब्येत वगैरे •••. काय??? डॉक्टर ने सांगितले की काय??? BP वगैरे ठीक ना. •• अग!! पण असं डोलत डोलत चाललीस तर, काही उपयोग होणार नाही •••. जरा स्पीड वाढव. •• तरच वर्ष सहा महिन्यांत काही फरक पडेल. ••• उद्या पासून माझ्या बरोबर चल. •• छान चार, पाच किलोमीटर चालत चक्कर मारून येत जाऊ••••• 

काकूंच्या बोलण्याची speed तर बुलेट ट्रेन च्या speed पेक्षाही जास्त होती.

बाप रे!! एका दमात एवढं सर्व •••..

आमची आई काकूंच्या या लांबलचक भाषणाने घाबरूनच गेली. •••आधीच खूप उत्साह होता ••. त्यात ही अशी भर पडली ••. आणि त्यात तसा स्वभाव. ••• झालं आता, मग काय कारणच मिळाले की मला जमणार नाही म्हणून. •••.

खरंच काही लोक बेफाम सुटतात. •• एवढ्या लांब लचक भाषणा ऐवजी, फक्त एवढं म्हंटल असतं अरे व्वा!! छान वाटलं ग, तुला बघुन. •• चला म्हणजे आता रोज सकाळी आपली भेट होणार. •• सर्व मजेत ना.

एवढं पुरेसं होतं समोरच्याला प्रोत्साहन द्यायला. व स्वतः चा मान टिकवायला. या दोन वाक्यात तुमची काळजी, प्रेम, आधार, आश्चर्य, चौकशी सर्व सामावले असते ••.. देवानें सर्वांना ओठ धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत. पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा जे समोरच्या च्या हृदयाला छेद नाही, तर हळुवार स्पर्श करतील. •••. पण प्रतिसाद देणारे कमी व प्रतिक्रिया देणारे नेहमीच जास्त भेटतात •••. जर प्रत्येकाने आपल्या मना बरोबर दुसऱ्या च्या मनाचाही विचार केला तर असं होणार नाही. थोडे कोमल उत्साह वर्धक शब्द वापरता आले पाहिजे ••••.

काय आणि किती आणि कोणाचे ऐकायचे हे आपण ठरवायचे असते. •• शब्द मनात झिरपू द्यायचे की कानावरूनच परतवून लावायचे. ••• खूप सज्जन व‌ प्रामाणिक राहिले आणि गरजेपेक्षा जास्त लक्ष व वेळ लोकांना दिला तर ते आपल्याला ‘फालतू’ समजतात. ••• गृहित धरतात. •••त्यामुळे प्रत्त्येक वेळी कसा ‘ stand ‘ घ्यायचा हे ठरविता आले पाहिजे. •••.

म्हणतात ना••• विचार filter करता आले पाहिजे. ••

 बाबांच्या लक्षात आले, ते म्हणाले, •••अग!! तू आपल्या स्पीड ने चाल. •••कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती कर. ••अग!! खूप ससे आडवे येतील. ••बस, त्यांच्या कडे दुर्लक्ष करायची हिम्मत ठेव. •••

जेमतेम आठ दिवस झाले तूला सुरवात करून. ••हळूहळू होईल सराव. •• आता त्या काकूंचे ऐकून तू आपले फिरणे बंद करू नकोस. • एवढं disturb व्हायला काय झालं???

प्रत्त्येकाचे काही specific क्षेत्र असते. •• त्यात तो उत्तम असतो ••. जसं तुला स्वयंपाक म्हंटला की तू कशी एकदम उत्साहाने कामाला लागते. ••अगदी पंधरा वीस जणांचे स्वयंपाक करणे, म्हणजे ‘बाएं हात का खेल आहे ‘ तुझ्या करिता. ••••

ते जमत का त्या काकुंना??? नाही ना. ••

एक व्यक्ती सगळ्याच जागी उत्तम कसा असू शकतो.??? अग, हा व्यायाम तुझ्या करिता गरजेचा आहे. •• तुला काय मेराथॉन मधे पन्नास ‌किलोमीटर चालायचे आहे का??? फक्त स्वतः च्या प्रकृती कडे लक्ष दे. •• अग!! आता खूप झाले स्वयंपाक आणि मुलांकडे लक्ष देणे••. आता स्वतः कडे लक्ष दे ••. स्वतः च्या आवडी निवडी जप. ••लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. ••• 

काही जण विचार न करता खूप बोलतात••त्यांच्या कडे दुर्लक्ष करायला शिक. किंवा उत्तर द्यायला शिक. •••

एक फुलपाखरू फक्त चौदा दिवस जीवन जगतो. पण किती बागडत ते. आयुष्याचा पूर्ण आनंद तो त्या तेवढ्या छोट्याशा आयुष्यात घेतो. ••••

तेंव्हा आता आपल्या आयुष्याची दिशा जरा बदल. •• तु आज पर्यंत घरासाठी खूप केले. •• आता स्वतः करिता जग. •• स्वतः च्या प्रकृती ची काळजी घे. •• बाबा पूढे म्हणाले, •••

अग! तुला ही पूर्ण हक्क आहे, आपल्या मनासारखं जगण्याचा. •••शरीर थकलं तरी मन कधीच थकत नाही. मनाला मनसोक्त उडू द्यावे. •••• 

प्रत्येक घरात अशी माणसे असावीत. जी एकमेकांचा विचार करतील. ••वेळेवर सावरतील. ••सांभाळतील. •• विचार परिवर्तन आणतील. •• योग्य सल्ला देतील. •• विचारांना दिशा देतील. ••आयुष्य म्हणजे राब राब राबणे नव्हे. ••तर आपापल्या परीने enjoy पण करता आले पाहिजे. •••वेळेवर बोललेले दोन‌ शब्द पूढच्या उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची शक्यता कमी करतात. ••• यालाच योग्य सल्ला देणे, किंवा ‘ counseling’ करणे म्हणतात ••••. प्रत्येकाचा आदर करणे, समंजसपणे वागणे, समजून घेणे, समजावीणे ज्या घरात जमते. त्या घरात सूख -शांती समाधान असते तेच त्यांच्या घरचे वास्तूशास्त्रज्ञ असतात ••. त्यांच्या असण्यानेच. घरात सकारात्मक उर्जा असते. •• विश्वास असतो. ••••

आपण जन्माला आलो आहोत ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद व उपभोग घेण्यासाठी. ••यांचे स्मरण असावे. ••••

म्हणतात ना•••• 

“मार्गदर्शन सही हो तो एक नन्हा-सा दीपक भी किसी सूरज से कम नही “।. ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सामाजिक बांधिलकी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “सामाजिक बांधिलकी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

‘सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, पुणे या सामजिक संस्थेतर्फे होतकरू मराठी तरुणाला व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘सामाजिक बांधिलकी’ जपत कॅनोन कंपनीचा कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला.’ —-

‘सामाजिक बांधिलकी’ हा शब्द आपण बरेच वेळा वर्तमानपत्रांत वाचतो. एखादा पुढारी म्हणतो, ‘अमुक अमुक ही आपली सामाजिक बांधीलकी आहे’. एखादा लेखक, एखादा विचारवंतही असेच काहीसे म्हणत असतो; पण समाज ज्या व्यक्तींचा झाला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने काय केले पाहिजे, हे कोणी नीट समजावून देत नाही. शेवटी हा विषय मोघमच राहतो. समाजामधील काही वरिष्ठ, अनुभवी, सज्जन व निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्ती समाजसुधारणेसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत असतात व त्यांच्यापुरती ही मार्गदर्शनाची बांधीलकी मर्यादित असते, असे समजले जाते. असे काही नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी थोडे का होईना, कार्य करणे आवश्यक आहे, त्यासच आपण ‘सामाजिक बांधिलकी’ असे संबोधतो. आज समाजासाठी कोणी काहीच करीत नाही, असे नव्हे. रोटरी क्लब, लायन्स क्लब, विविध सेवाभावी संस्था निश्चितच काही कार्य करीत आहेत. त्याचा समाजास उपयोगही होतो. तरीसुद्धा या संस्थांना काही मर्यादा पडतात व काही गोष्टींमध्ये सुधारणा करता येत नाही. हेच नेमके आज आवश्यक आहे. आज समाजामध्ये संस्कार कमी होत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे, आरोग्य बिघडत आहे, खून होत आहेत, दरोडे पडत आहेत, अनेक प्रकारची स्कँडल्स घडत आहेत. येनकेन प्रकारेण समाजस्वास्थ्य बिघडत आहे. अशा वेळी ‘सामाजिक बांधीलकी’ हा परवलीचा शब्द ठरू शकेल.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी आपली काही कर्तव्ये आहेत, आपण काही केले पाहिजे हे ठरविणे महत्त्वाचे आहे.

हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर सत्कर्म होतेचं…

…. कारण यंत्रणा ही त्या परमेश्वराची असते आपण निम्मितमात्र…

… माणसं जोडत राहूया…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गिरनारच्या पायऱ्या… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ गिरनारच्या पायऱ्या… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

गिरनारच्या पायऱ्या खरच खूप अवघड आहेत, एवढे अवघड बांधकाम कोणी आणि कसे केले असेल ह्या प्रश्नांची उत्तरे आणि पायऱ्या कोणी आणि कशा तयार केल्या ह्याचा इतिहास तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे.

– – – 

एका मुस्लिम शासकाच्या काळात हिंदूंना आपल्या धर्मस्थळाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी काय-काय करावं लागायचं, याबद्दल Gujarat मधल्या Junagadh ची एक रोचक ऐतिहासिक गोष्ट :

इ. स. १८८९, ठिकाण जूनागढ. १८५७ च्या क्रांतीला ३२ वर्षे झाली होती. त्या वेळेस इंग्रजांनी जवळपास संपूर्ण भारतावर ताबा मिळवला होता & अनेक रियासती इंग्रजांच्या अखत्यारीत आल्या होत्या. त्यापैकी एक रियासत म्हणजे Gujarat मधील जूनागढ, ज्याचे नवाब बहादुर खान होते.

जूनागढमध्येच उंच गिरनार पर्वत आहे, जिथे Hindu धर्मातील शतकानुशतके जुने दत्तात्रेय मंदिर आहे. इथे केवळ हिंदूच नाही तर Jain धर्माचीही अनेक देवळं व देरासर आहेत.

आज गिरनार चढण्यासाठी ropeway & पायऱ्या आहेत. पण पूर्वी श्रद्धाळूंना सरळ डोंगर चढावा लागायचा. अनेक महिने लागायचे. अनेक लोक मृत्यूमुखी पडायचे किंवा जंगली प्राणी त्यांना मारायचे.

एके दिवशी नवाबांचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई & नवाबांचे personal assistant पुरुषोत्तमराज झाला यांनी योग्य वेळ पाहून नवाबांसमोर विनंती ठेवली की—

“हिंदू & जैन श्रद्धाळूंना गिरनारवर जाणं खूप कठीण होतंय. लोक मरत आहेत. तर वर जाण्यासाठी पायऱ्या बांधता येतील का? ”

नवाबांनी मग Ahmedabad मधून एक British engineer ला बोलावलं. त्याने पाहणी करून सांगितलं की गिरनारपर्यंत पायऱ्या बांधण्याचा खर्च १ लाख ३० हजार रुपये येईल.

१८८९ मध्ये १,३०,००० रु. ही अत्यंत मोठी रक्कम होती. नवाबांना हे ऐकून धक्का बसला & त्यांनी नकार दिला.

तेव्हा हरिदास देसाई & पुरुषोत्तमराज झाला म्हणाले—

“आपण सरकारी खजिन्यातून पैसे देऊ नका. आम्ही एक लॉटरी काढतो. लोक १ रुपयाची लॉटरी खरेदी करतील. आकर्षक बक्षिसे ठेवू. & लॉटरीच्या गजटमध्ये स्पष्ट लिहू की हा पैसा गिरनारसाठी पायऱ्या बांधायला वापरला जाणार आहे, त्यामुळे हिंदू-जैन लोक मोठ्या संख्येने लॉटरी खरेदी करतील. ”

हे ऐकून नवाबांनी परवानगी दिली.

यानंतर १२ सदस्यांची एक कमिटी तयार झाली, ज्यांचे प्रमुख होते बेचरदास बिहारीदास.

१ ऑक्टोबर १८८९, १ रुपयांची लॉटरी जाहीर करण्यात आली. पहिलं बक्षिस ४०,००० ठेवण्यात आलं, नंतर ते १०,००० केले. सर्वात कमी इनाम ५ रुपये होतं. लॉटरीची जाहिरात Junagadhच्या राज्य गजट “दस्तूर-उल-अमल सरकार” मध्ये प्रकाशित झाली.

लॉटरीची स्कीम आकर्षक होती—

१२ तिकिटे खरेदी केली तर १ तिकीट फ्री

१०० तिकीट विकणाऱ्याला १५% कमिशन

न विकलेली तिकिटे परत करण्याची सोय

हे पाहून हिंदू, मुस्लिम, सिख & अगदी इंग्रजांनीही मोठ्या प्रमाणावर लॉटरी खरेदी केली.

१५ मे १८९२, रविवार—लॉटरीचे निकाल जाहीर होणार होते. भारतभरातून हजारो लोक जूनागढला जमले. तिकिटे Farazkhan यांच्या घरात ठेवली होती. कमिटीने पूर्ण पारदर्शकतेने ड्रॉ काढला.

एकूण १,२८,६६३ तिकिटे विकली गेली.

१०,००० रुपयांचं पहिलं बक्षिस मुंबईतील सविताबेन दाह्याभाई खांडवाला यांना मिळालं. त्यांनी संपूर्ण रक्कम गिरनारच्या पायऱ्या बांधण्यासाठी अर्पण केली. (१८९२ मधील १०,००० रु. = आजचे जवळपास १०० कोटी)

दुसरं बक्षिस २,५०० रु. पंजाबच्या खुदाबक्ष & लालचंद यांना मिळालं.

तिसरं बक्षिस १,५०० रु. नवसारीच्या बलवंतराय यांना मिळालं.

लॉटरीतून जवळपास १ लाख ३० हजार रुपये जमा झाले & British engineerच्या देखरेखीखाली पायऱ्या बांधण्याचं काम सुरू झालं.

.. पायऱ्या बांधायला १९ वर्षे लागली.

आज आपण गिरनारवर सहज पायऱ्यांनी चढतो, पण हे विसरून जातो की आपल्या पूर्वजांनी त्यासाठी किती मोठी मेहनत, धावपळ & आयोजन केलं होतं.

ज्या फोटोमध्ये दिसतंय, ते त्या जुन्या गिरनार लॉटरीचं तिकीट आहे, ज्यावर लिहिलं आहे की या लॉटरीसाठी जूनागढच्या नवाबांनी विशेष परवाना दिला आहे. डाव्या बाजूला लॉटरी कमिटीचे secretary पुरुषोत्तम के. गांधी यांचं नाव लिहिलेलं दिसतं.

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

रवींद्रनाथांची भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझ्या मते आपल्या भारताचं राष्ट्रगीत ‘ जन-गण -मन ‘ ही आहे. कारण रोज भारतातील लक्षावधी शाळांची सुरुवात या राष्ट्रगीताने होते. कोटी कोटी कंठातून हे राष्ट्रगीत निनादते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजाला प्रणाम करताना जेव्हा राष्ट्रगीताचे सूर कानी पडतात, तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाताना जेव्हा पडद्यावर राष्ट्रगीत सुरु होते, तेव्हा चित्रपटगृहात उपस्थित असलेली सगळी माणसे आपली भाषा, जात, धर्म, पंथ विसरून उभे राहून मानवंदना देतात, तेव्हा अभिमानाने रोमरोम फुलून येतो. कधी कुठे जाताना राष्ट्रगीताचे सूर कानी पडले तर नकळत पावले थांबतात. उभे राहा असे कोणी सांगावे लागत नाही. केवळ ५२ सेकंदात गायिले जाणारे हे राष्ट्रगीत रोमरोम पुलकित करते. जोपर्यंत हे सूर्य चंद्र आहेत, जोपर्यंत ही सस्यश्यामल भारतभूमी अस्तित्वात आहे, तोपर्यंत जन-गण-मन आहे आणि जोपर्यंत जण-गण-मन आहे, तोपर्यंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरही अमर आहेत.

अशा या जन-गण-मन आणि रवींद्रनाथ टागोरांवर काही लोकांनी नको ते आरोप केले. ज्या रवींद्रनाथांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली, स्वदेशीच्या चळवळीत पुढाकार घेतला, वंगभंगाला विरोध केला अशा देशभक्त आणि राष्ट्रभक्त रवींद्रनाथांना इंग्रजधार्जिणे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. तर काहींनी याच्याही पुढे जाऊन त्यांनी लिहिलेले जन-गण-मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिले असे म्हटले. या सगळ्या गोष्टींमुळे रवींद्रनाथांच्या संवेदनशील मनाला अपार वेदना झाल्या.

१९११ साली इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारतभेटीवर येणार होता. याच सुमारास वंगभंगाचा निर्णयही रद्द ठरवण्यात आला होता. तेव्हा तो आनंद साजरा करावा आणि पंचम जॉर्जचे स्वागत करावे असे ठरवण्यात आले. इंग्रज सरकारप्रती आपली निष्ठा अर्पण केलेले प्रद्योतकुमार ठाकूर हे रवींद्रनाथ टागोरांचे दूरच्या नात्यातील होते. प्रद्योतकुमार हे उच्चविद्याविभूषित होते पण इंग्रजांची चाकरी करण्यात धन्यता मानणारे होते. त्यांनी रवींद्रनाथांना पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी एक गीत लिहायला सांगितले. या गोष्टीचा रवींद्रनाथांना धक्का बसला आणि वाईटही वाटले. ब्रिटनचा स्वार्थावर आधारित राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता. आपल्या प्रगतीसाठी दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून त्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे हे रानटीपणाचे लक्षण आहे असे त्यांचे मत होते. यालाच जर ही मंडळी ‘ आधुनिक राष्ट्रवाद ‘ म्हणत असतील, तर राष्ट्रवाद या शब्दाची ही क्रूर चेष्टा आहे असे त्यांना वाटत होते.

इंग्रजांच्या चुकीच्या विचारांचा आणि धोरणांचा त्यांनी आपल्या भाषणातून आणि लेखनातून वेळोवेळी निषेध केला. त्यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतार्थ गीत लिहिण्यासाठी प्रद्योतकुमार यांना स्पष्ट नकार दिला. कोणी सांगितले म्हणून एखाद्याच्या स्तुतीप्रित्यर्थ आपली लेखणी झिजवणाऱ्या कवींपैकी रवींद्रनाथ नव्हतेच. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी पंचम जॉर्जला उद्देशून लिहिण्याऐवजी ‘ भारतभाग्यविधात्याला ‘ उद्देशून हे गीत लिहिले.

हा ‘ भारतभाग्यविधाता ‘ कोण हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्यविधाता म्हणजे केवळ एखाद्या भूप्रदेशावर आपले वर्चस्व असलेली पंचम जॉर्ज यांच्यासारखी एखादी व्यक्ती कदापिही शक्य नाही. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्यविधाता म्हणजे सर्व सृष्टीचा ईश्वर ज्याला ते मास्टर निर्मिक किंवा मास्टर पोएट म्हणून वेगवेगळ्या वेळी उल्लेख करतात. त्याशिवाय रवींद्रनाथांच्या कवितेत वेळोवेळी असे निनावी व्यक्तिमत्व पाहायला मिळते. त्या शक्तीला त्यांनी जगन्नियंता किंवा विश्वाचे संचालन करणारी शक्ती अशा स्वरूपातच पाहिले आहे. उदा. मागील एका लेखातील या काव्यपंक्ती पहा. एका प्रसंगी त्यांनी पाहिले की शरदातले ढग निळ्या आभाळात विहार करताना खाली असलेल्या भाताच्या पिकावर छाया धरीत तरंगत होते. ह्या अद्भुत दृश्याचा त्यांच्या मनाने ताबा घेतला. त्यांना हे सुंदर दृश्य निर्माण करणाऱ्या कारागिरांच्या हातांची आठवण झाली. आपल्या कवितेत ते म्हणतात

खेळ चालिला आज लपंडावाचा

छाया आणि प्रकाशाचा

भाताच्या शेतातून,

झपाट्याने जाताना,

निळ्या आकाशात

तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांचा,

ताफा हाकणारा तो कोण आहे बरं?

या अदृश्य हातांचा शोध घेण्याची त्यांना नेहमीच उत्कंठा असायची. तोच त्यांचा ‘भारतभाग्यविधाता’ आहे.

भारतभूमीवर त्यांचे किती प्रेम आहे ते त्यांच्या एका कवितेच्या ओळींमधून स्पष्ट होईल. या ठिकाणी या ओळी लिहिताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची आठवण येते. रवींद्रनाथ म्हणतात

सार्थक जनम आमार जन्मेछि एइ देशे ।

सार्थक जनम मा गो, तोमाय भालबेसे ।।

जानि ने तोर धन रतन, आछे कि ना रानीर मतन ।

शुधु जानि आमार अंग जुडाय तोमार छायाय एसे ।।

‘या देशात जन्माला आलो म्हणून माझे सार्थक झाले. माते, तुझ्यावर प्रेम केल्याने माझा जन्म सार्थक झाला. तुझ्याकडे किती रत्नभांडार आहे, ते मला माहिती नाही. तू राणीसारखी आहेस का हेही ठाऊक नाही. मला फक्त एवढेच ठाऊक आहे की तुझ्या सावलीत मला शांती मिळते. ’

त्यांचं देशप्रेम इतकं उत्कट आहे की या देशात त्यांना विश्वदेवाचं दर्शन घडतं.

हे बिश्वदेब, मोर काछे तुमि देखा दिले आज कि बेशे ।

देखिनु तोमारे पुर्बगगने, देखिनु तोमारे स्वदेशे ।।

विश्वदेवाचे रूप त्यांना कसे भासते? तर नील गगन त्याचे भाल आहे. स्वच्छ प्रकाशात त्याला अखंड उज्ज्वलता प्राप्त झाली आहे. हिमालय जणू आशीर्वादरूपी कर उंचावून निर्भयतेचा वरदहस्त देत आहे. हा सागर त्याचे चरण धुतो आहे. जान्हवीरुपी हार त्याच्या वक्षावर रुळतो आहे. आपल्या देशातच आपल्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकते हेच जणू त्यांना सांगायचे आहे.

रवींद्रनाथांचे आप्त आणि इंग्रजांचे निष्ठावंत सेवक प्रद्योतकुमार ठाकूर यांनी त्यांना पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर गीत लिहिण्यास सांगितले होते. परंतु राष्ट्रप्रेम नसानसात भिनलेल्या रवींद्रनाथांनी अशा प्रकारचे स्तुतीपर काव्य लिहिण्यास नकार दिला. स्तुतीच करायची तर ती मायभूमीची का करू नये या भावनेतूनच त्यांचे जन-गण-मन हे अप्रतिम राष्ट्रभक्तीपर गीत त्याच वेळी जन्मास आले. २६ ते २८ डिसेंबर १९११ या कालावधीत कलकत्याला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. २६ डिसेंबरची म्हणजे पहिल्या दिवसाची सुरुवात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम गीताने झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ डिसेंबर रोजी रवींद्रनाथांनी लिहिलेले जन-गण-मन गायिले गेले.

या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी देशविदेशातील पत्रकार उपस्थित होते. पण या ठिकाणी उपस्थित असलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी कार्यक्रमाबद्दल आणि जन-गण-मन या गीताच्या आशयाबद्दल पुरेशी माहिती न घेताच या गीताला पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी रचले गेलेले खास गीत असे म्हटले. या वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने इंडिया, स्टेटसमन, इंग्लिशमन या सारखी वृत्तपत्रे होती. यामुळेच या गीताबद्दल लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला.

पुढे २८ डिसेंबर १९१७ मध्ये कलकत्याला पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन भरले. या अधिवेशनात जन-गण-मन समूहगीत म्हणून गायिले गेले. त्याप्रसंगी देशबंधू चित्तरंजन दास उपस्थित होते. त्यांनी या गीताबद्दल ‘ It is a song of the glory and victory of India ‘ असे उद्गार काढले. बेंगाली वृत्तपत्राने या गीताला The Magnificent Song असे म्हटले. अमृतबझार पत्रिकेने या गीताला An Inspiring Patriotic Song म्हटले. स्टेटसमन या इंग्रजी वृत्तपत्राने मात्र या वेळी या गीताचे ‘ A National Song ‘ म्हणून वर्णन केले.

या गीताच्या संदर्भात रवींद्रनाथांनी २० नोव्हेंबर १९३७ रोजी पुलिनबिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, ” त्या वर्षी भारतसम्राटाच्या आगमनाची तयारी चालली होती. राज्यसरकारमध्ये प्रतिष्ठित असलेल्या माझ्या एका मित्राने सम्राटासाठी स्वागतगीत लिहिण्याचा मला आग्रह करताच प्रथम मी चकित झालो आणि नंतर मनात क्षोभाची लाट उसळली. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जन-गण-मन अधिनायक या गीतात त्या भारतभाग्यविधात्याचा जयजयकार केला. हा भाग्यविधाता पंचम, षष्ठ किंवा कुठलाही जॉर्ज कधीच असू शकणार नाही. हे माझ्या राजनिष्ठ मित्रालाही कळले, कारण तो कितीही प्रबळ राजभक्त असला तरी बुद्धिमान होता. आज मतभेदामुळे लोक माझ्यावर चिडलेत, हे काळजीचं कारण नाही; पण लोकांचा जो बुद्धिभ्रंश झालाय, ते लक्षण बरं नव्हे. ”

२४ जानेवारी १९५० या दिवशी घटना समितीने कविवर्य रवींद्रनाथ यांनी लिहिलेल्या ‘ जन-गण-मन ‘ या गीताला राष्ट्रगीताचे स्थान दिल्याचे जाहीर केले. २६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारताची राज्यघटना अधिकृतरीत्या अमलात आली आणि त्याच दिवशी स्वतंत्र भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘ जन-गण-मन ‘ चे स्वर निनादले. पण आज भारतीय स्वातंत्र्याला ७७-७८ वर्षे होऊन गेली तरी १९११ मध्ये लिहिल्या गेलेल्या या गीताबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत.

‘वंदे मातरम’ ला राष्ट्रगीताचा मान मिळायला हवा होता, हे मान्य केले तरी ‘ जन-गण-मन ‘ बाबत गैरसमज पसरवून आपण एका अत्यंत अप्रतिम राष्ट्रभक्तीपर साहित्यकृतीचा आणि रवींद्रनाथांसारख्या महाकवीचा अवमान करीत आहोत याचे भान आपण राखायला हवे.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी…  ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा – –

— — दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा…. क्रमशः स्वरूपातील ही सिरीज! आधीच्या पोस्टवॉल वर “लुप्त होणाऱ्या पाऊलखुणा” या फोल्डरमध्ये आहेतच.

पूर्वीच्या काळी जशा श्रीमंतांसाठी काही गोष्टी होत्या तशाच गरिबांनाही समाजात सामावून घेण्यासाठी काही सुंदर उपाययोजना होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही आजची पाचवी पोस्ट!! बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेलच पण आज सांगतोय…. “दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी” या संकल्पनेबद्दल!

*एका वाक्यात सांगायच तर “दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी” म्हणजे दोन वेगवेगळ्या अर्ध्या साड्या एकत्र शिवून बनवलेली एक अखंड साडी! *

हे पाहण्याआधी थोडा या साडी किंवा लुगडे याचाही धांडोळा जो मी घेतला तो आधी सांगतो.

पाच किंवा सहा वारी लुगड्याला गोल साडी किंवा गोल लुगडे म्हणतात. सहा ते सात वारीला दंडिया म्हणतात मात्र दहावारीला काय म्हणतात हे तामिळी माणसाला विचारावे लागेल. दक्षिणेकडे दोन तुकड्यांची साडीदेखील असते, तिला तामिळी पावडा म्हणतात. अर्थात हि म्हणजे मी सांगतोय ती महाराष्ट्रातील “दंडाची साडी” नव्हे. गंमत म्हणजे पूर्वी साडी हा शब्द तितका प्रचलित नव्हता तर सर्रासपणे साडीला “लुगडं” म्हटलं जायचं. लुगडे हा बहुतकरून महाराष्ट्रीयन पेहराव आहे. मात्र लुगडे ‘एखादेवेळेस’ साडी म्हणून नेसता येऊ शकेल पण साडी लुगडे म्हणून नाही. कारण लुगडे नेसण्याची पद्धत ही धोतरासारखी असते तर गोलसाडी नेसण्याची पद्धत लुंगीसारखी. त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक वातावरणास अनुसरुन ही पद्धत वापरण्यात येते.

आतापर्यंत नऊवारी म्हणजे स्त्रीसौंदर्य खुलवणारे लुगडे असा माझा समज. पण एकदा वाचनात आले की संत तुकारामांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘धुवीन मी संतांची लुगडी. ’ त्यावरून कुतूहल जागृत झाल्यामुळे ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त दिलेला अर्थ पाहिला तर तो असा आहे: ‘साधारणपणे वस्त्र (पुरुषाचेसुद्धा); मानाचा पोशाख; कापड; देशमुख-पाटील ह्यांना पूर्वी वस्त्रे देत त्यांना ‘लुगडी’ अशी संज्ञा होती. ’ 

मराठी संतांच्या साहित्यात ‘लुगड्या’बद्दल असे अनेक उल्लेख आहेत. एवढेच काय, ते ताम्रपटातही आढळतात. उदाहरणार्थ, खातेगावच्या ताम्रपटातील उल्लेख पाहा:

तुमासि आमिं थानेमाने लुगडिं विडा गंध आकेत दिधले

स्वराज्यकाळी व पेशवाईतही ह्याच अर्थाने ‘लुगडे/डी’ शब्द वापलेला आढळतो. वानगीदाखल पाहा:

लुगडी दिली हेजीबाला l हेजीब बेगी रवाना झाला l

(संदर्भ: केळकर, य. न. , ऐतिहासिक पोवाडे, १९२७ पृष्ठ १३)

(हेजीब म्हणजे वकील, मध्यस्थ, बोलणी करणारा)

‘दंडाची साडी’ बद्दल अजून एक माहिती हाती आली ती म्हणजे हा शब्दप्रयोग “दंडा” किंवा “काठाची” साडी याला उद्देशून वापरला जातो अशी काहीठिकाणी नोंद आहे. ही साडी तिच्या “दंडा” किंवा काठावरच्या विणलेल्या नक्षीकामामुळे ओळखली जाते, अर्थात आजच्या या “दंडाची साडी” एपिसोडमध्ये मी ज्या साडीबद्दल सांगतोय ती दोन जोडांची साडी असली तरी त्या दोन्ही साड्या काठपदरच्याच असायच्या. कारण मुळात चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत रोजच्या वापरातील जवळपास सर्व साड्या या काठ पदर टाईपच्याच होत्या.

आता साडी म्हणायच की लुगडं? हाही प्रश्नच! मात्र “लुगडे” या शब्दाची उत्पत्ती शोधायचा प्रयत्न केला असता मजेशीर माहिती सापडली. तलम कापड, रेशमी वस्त्र या अर्थाने संस्कृतमध्ये त्याला ‘दुकुलम’ शब्द आहे. त्यावरून पुढं मग ‘दुगुल…. दुगुल्ल…. डगुलम…. लुगडं अशा क्रमाने तो मराठीत आला. असं श्री. कृ. पा. कुलकर्णी यांनी “व्युत्पत्तीकोशात” म्हंटल आहे.

असो 

साडी की लुगडं? यात पडण्यापेक्षा “दंडाची साडी / लुगडं” म्हणजे काय ते सांगतो.

गरीब, कष्टकरी महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे एखादी साडी फाटली / विरली तर लगेच नवीन दुसरी घेणे शक्य नसायचे. तर एक साडी अशी फाटली तर ती व्यवस्थित धुवून घडी करून पेटीत ठेवून दिली जायची. आणि काही दिवसांनी / महिन्यांनी दुसरी एखादी साडी जेव्हा फाटायची / विरायची तेव्हा मग त्या साडीचा जिथे फाटले आहे तिथून पुढचा भाग कापून बाजूला काढला जायचा. म्हणजे उदा. नऊ वारी साडीच्या पदाराकडील भाग फाटला असेल तर तो पदर (सुमारे एक वार, म्हणजे एक मीटर) ते कापड कापून बाजूला ठेवायचं, म्हणजे बाकी साडी ओके असते तिचा आता जीर्णोद्धार करायचा म्हणजे काय तर पहिली जी साडी फाटलेली पेटीत ठेवलेली असते ती बाहेर काढायची अन त्यातीलही फाटका भाग कापून टाकायचा,. आणि मग त्याची शिल्लक राहिलेली साडी आणि दुसरी साडी (जी अशीच कापून घेतलेली) या दोन्ही एकत्र घेऊन मधोमध शिवून एक साडी करायची,. थोडक्यात काय तर दोन अर्ध्या साड्या मिळून एक पूर्ण नऊवारी साडी त्यातून करायची. आणि वापरायला घ्यायची. (दोन साड्यांचे जणू हे जॉईंट व्हेंचर….. गरिबी झाकणारे) यात ज्या दोन अर्ध्या साड्या शिवल्या जायच्या त्या शिवणकामाला आमच्या मराठवाड्यात तरी “दंड घालणे” असं म्हणतात. त्यावरून कदाचित “दंडाची साडी” असा शब्दही रूढ झाला असावा.

त्यातही दंड लावलेली साडी (म्हणजे जोडलेली) ती त्या दुसऱ्या साडीला मॅचिंग असेलच असं नसायचं. अगदी विजोड रंग पण असायचे. मात्र दोन्ही साड्याची कंडिशन (फाटका भाग काढल्याने) आता चांगली झालेली असायची. तरी त्यातल्या त्यात मग दोनपैकी चांगला कलर ज्या दोनपैकी एका साडीचा असायचा तो भाग वरच्या बाजूला येईल आणि विजोड दुसरा भाग आतल्या बाजूला (निऱ्या वगैरेमध्ये) जाईल अशी ती साडी नेसली जायची.

तर अशी हि पूर्वीच्या काळची एक उत्तम अशी प्रथा होती जी गरिबीलाही सामावून घेऊन पुढे जायची. आता अशात मी ग्रामीण भागातील काही मित्रांना विचारलं की “अजूनही तिकडे अशा दंडाच्या साड्या नेसतात का? ” 

त्यावर बहुतेक लोकांनी “नाही” असं उत्तर दिले. एकाने तर सिक्सर शॉट उत्तर दिलं… म्हणाला, “डीडी, आजकाल काही न करता घरबसल्या महिलांना “लाडकी बहीण” मध्ये दीड दीड हजार रुपये येतात. मग फाटक्या दोन साड्या एकमेकांना जोडून कोण शिवत बसणार अन नेसणार रे बाबा? “

मात्र भटक्या जमातीत (धनगर मेंढपाळ) अशा काही मध्ये अजून काहीजणी अशा दंडाच्या साड्या वापरतात हेही कळलं. मात्र ते प्रमाण वरचेवर कमी होत जातेय हे नक्की!

असो… कालाय तस्मेय नमः!! तर अशी हि दंडाच्या साडीची लुप्त होत जाणारी प्रथा!

डॉ. डीडी क्लास : कोणतीच गोष्ट टाकाऊ नसते…. फाटली तरी पुन्हा वापरात आणता येते…. हि खरी आपली संस्कृती ज्यातून दंडाची साडी हि संकल्पना आली असावी. दुसरं उदा. द्यायच तर त्याच दंडाच्या साड्या बनवताना जुन्या साडीचा जो फाटका भाग बाजूला काढून ठेवलेला असायचा तोही फेकून दिला जात नसे. असेच चार पाच तुकडे एकत्र करून त्याचे मग लहान बाळासाठी दुपटे (पांघरूण) केले जायचे नाहीतर मग शेतात जाताना यात भाकरी भाजी बांधून नेलं जायचं किंवा मग दारात किमान पायपुसणी तरी याची केली जायची! एकेक तुकडा पण कामाचा…. हि भावना तेव्हा होती जी आता लुप्त झालीय.

त्या फाटक्या जुन्यातलं फाटक तेव्हढं बाजूला ठेवून चांगलं तेव्हढं घेऊन पुढं जाणे हा देखील त्या संस्कृतीचा संदेश होता. जुन्यातलं वाईट टाकून देऊन आणि चांगलं घेऊन पुढं जायचं…. किती छान न! हीच फिलॉसॉफी आज जगण्यातही लागू पडते. जी लुप्त होत जातेय.

कारण आता वापरातील कपड्याला थोडं जरी फाटलं तरी रफ़ू करत कुणी बसत नाही. सरळ फेकून दिले जाते.

आणि ब्रँडेड कंपन्या मात्र फाटक्या जीन्स चौपट किमतीत बाजारात आणतात तेव्हा तरुणाईच्या त्यावर उड्या पडतात. याचे मात्र नक्की हसू येते. गेल्या महिन्यात एका मॉलमध्ये असेच सहज चक्कर मारायला गेलेलो तर तिथं प्लाजो (लेडीजसाठीचा ढिलाढाला पायजमा) तिथल्या पोस्टरकडे लक्ष गेलं. का लक्ष गेलं तर त्या पोस्टरमधील मॉडेलच्या अंगावर चक्क दोन वेगळ्या रंगाचे कपडे एकत्र करून शिवले होते आणि किंमत? चक्क अडीच हजार रुपये!

मग आमची ती “दंडाची साडी” मागची कल्पना काय वेगळी होती? दोन रंगाच्या दोन साड्या मिळून एक नव्यासारखी साडी घरीच तयार व्हायची अन इथं मात्र मॉलमध्ये अशाच दोन भिन्न रंगाचे कापड वापरून एक वस्त्र विकले जातेय. क्या बात है!

दंडाची साडी बद्दल सांगायचे एक महत्वाचे कारण म्हणजे… मागच्या पिढीने काही चांगल्या चालीरीती जपल्या होत्या, त्या आताच्या काळात आपण कालानुरूप बदल करून का होईना पण जपल्या पाहिजेत त्यासाठी आधी त्या माहित तरी करून घेतल्या पाहिजेत म्हणून हा पोस्टप्रपंच!

असो.

भले ठिगळ लावलेली दोन साड्याची मिळून हि “दंडाची साडी” असेल पण चेहऱ्यावर मात्र मस्त स्माईल असायचं त्या महिलांच्या! हेही आपण पाहिलं पाहिजे अन त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे! 

धन्यवाद! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या पाऊलखुणांबद्दल!

🙏

तोवर स्टे ट्यून!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तो एक हुतात्मा वीर!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “तो एक हुतात्मा वीर!” ☆ श्री संभाजी बबन गायके

तो काही बेसावधपणे पावलं टाकत चाललेला नव्हता. पायांखालच्या गवताचा आवाज झाला तरी काही बिघडणार नव्हते. जंगलाची वाट त्याच्या पायांखालची होती… ओळखीची तर होतीच. त्या जंगलाचा तोच तर तारणहार होता. कुणी तिथल्या हत्तींची त्यांच्या दातांसाठी हत्या तर करत नाही ना, चंदनाच्या झाडांची लाकडे कुणी बेकायदेशीरपणे तोडून विक्री तर करत नाही ना, कुणी जंगलाच्या जागेवर अतिक्रमण तर करत नाही ना? हे पाहणे त्याचे कर्तव्यच होते आणि अधिकारसुद्धा.

देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी शासनाने स्वतंत्र सेनेची निर्मिती केलेली आहे… वनसेना… वनसेवा! यांतील कर्मचारी, अधिकारी जणू सीमेवर लढणारे सैनिकच. आय. एफ. एस. अर्थात इंडियन फॉरेस्ट सर्विस नावाने या सेनेचे कार्य सुरु असते. या सेनेत भरती होण्यासाठी स्पर्धात्मक निवड प्रक्रिया असते.

त्याच्या सोबत त्यादिवशी एक साथीदारसुद्धा चालत होता. हा साथीदार पूर्वाश्रमीचा चंदन तस्कर, हत्ती-हत्यारा. पण त्याने तो काळा धंदा आता सोडला होता…. आणि त्याच धंद्यात असणा-या त्याच्या भावालाही तो आता शरण आणणार होता…. होय, त्याचा मोठा भाऊ… वीरप्पन! याच्या नावाचा अर्थच मुळी होता… शूर पिता… किंवा शूर थोरला भाऊ! पण याचे शौर्य केवळ नावापुरतेच मर्यादित होते. हत्तीच्या दातांना जगभरात मोठी मागणी असते. श्रीमंत लोक यांपासून विविध शोभेच्या वस्तू बनवून घेतात. हत्ती नैसर्गिकरीत्या मेल्यावर त्याच्या या दातांचा हवा तसा उपयोग करून घेणे मान्य. पण त्यासाठी जिवंत हत्तीची निर्घृणपणे हत्या करणे, किंवा त्यांना पकडून त्यांचे दात उपटून घेणे… हे किती क्रौर्याचे काम! पण वीरप्पन हे काम बिनदिक्कतपणे करीत असे. शिवाय चंदनाच्या लाकडासही विविध कारणांनी बाजारात उत्तम किंमत मिळते. वने ही देशाची संपत्ती असतात. त्यांत असलेल्या संपत्तीवर अर्थातच देशाचा अधिकार असतो. पण वीरप्पन चंदनचोर होता. पुष्पा चित्रपटात चंदन चोरी करणारा नायकाच्या भूमिकेत दाखवला आहे…. हे आपल्या समाजाचे दुर्दैव!

वीरप्पनने ५००हून अधिक हत्ती मारले होते. १९४ कोटी ८८ लाख, ५३ हजार रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड त्याने चोरून विकले होते. या त्याच्या बेकायदेशीर कामांत आडवे येणा-या सुमारे १५० ते १८० लोकांना त्याने निर्दयपणे ठार मारले होते… यात निम्मे पोलिस अधिकारी, वनरक्षक होते… त्याने एकाच भूसुरुंग स्फोटामध्ये तब्बल २२ पोलिस कर्मचारी ठार मारले होते! या कुकर्मातून मिळालेल्या प्रचंड पैशांतील काही भाग तो स्थानिक लोकांना देत असे… आणि हे भुकेकंगाल लोक त्याला मोठा दानशूर मानीत… त्याच्यासाठी हेरगिरी करीत!

१२ सप्टेंबर, १९५४ रोजी आंध्रप्रदेशातील राजमुंद्री गावात पंडीलापल्ली श्रीनिवास यांचा जन्म झाला. आंध्र विद्यापीठात लाईफ सायन्सेस विषयात एम. ए. ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या या उमद्या युवकाचं झाडांवर, प्राण्यांवर अतिशय प्रेम होते. त्यांचेच संरक्षण करण्यची संधी देणारी नोकरी त्याने पत्करली… पण त्यासाठीही मोठी स्पर्धा असते! १९७९ मध्ये श्रीनिवास वन संरक्षण अधिकारी बनले. कर्नाटक राज्यात चामराजनगर या प्रचंड जंगल असलेल्या भागात नेमणूक असल्याने त्यांची गाठ तेथील हस्तीदंत तस्कर, चंदनचोर यांच्याशी पडली.

श्रीनिवास यांनी या सर्व चोरांची कुंडलीच तयार केली. त्यांची नावे, पत्ते, छायाचित्रे, त्यांचे काळे कारनामे यांची जंत्री तयार करून ती प्रसिद्ध करवली. त्यामुळे लवकरच अनेक तस्कर, चोर पकडले गेले. या कामगिरीमुळे श्रीनिवास साहेब बढती मिळून डी. सी. एफ. अर्थात डेप्युटी कन्सर्वटर ऑफ फॉरेस्ट झाले.

या दरम्यान वीरपन्न हा फुटकळ, चिंधीचोर तस्कर होता… पण त्याच्या कारवाया वाढीस लागल्या होत्या… एक भस्मासुर आकार घेत होता! १७ नोव्हेंबर, १९८६.. भारतात सार्क देशांची बैठक होत होती. याचवेळी श्रीनिवास यांनी वीरप्पनला बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी गजाआड केली! बुडीपडागा जंगलातील वनखात्याच्या कैदेत वीरप्पनला चौदावे रत्न दाखवताच त्याने त्याच्या साथीदारांची नांवे सांगितली… आणि त्या माहितीचा उपयोग करून घेत श्रीनिवास साहेबांनी तस्कर, चोर यांच्यावर प्रचंड वेगाने कारवाई केली…. कोट्यावधी रुपयांचा माल हाती लागला… अनेक चोर पकडले गेले….! या कामांत श्रीनिवास साहेब व्यग्र असताना वीरप्पन कैदेतून फरार झाला… भस्मासुर निसटला होता! हत्ती, माणसे आणि वनाधिकारी, पोलिस यांचा जीव आता धोक्यात आलेला होता!

वास्तविक चूक इतर अधिका-यांची होती… कुणीतरी फितूर झाले असावे…. पण याचा सारा दोष स्वत:वर घेत पी. श्रीनिवास साहेबांनी वीरप्पनला पुन्हा पकडण्याचा विडा उचलला!

वीरप्पन कर्नाटक, आंध्र, केरळ या जंगलांतून अक्षरश: बेफाम वावरत होता. त्याने आपली टोळी पुन्हा उभी केली. गावकऱ्यांना पैसे देऊन तर कधी धाक दाखवून त्याने त्याच्या कामात सामील करून घेतले. विरोधात जातात अशी नुसती पुसट शंका जरी आली तर तो थेट ठार मारत असे.. ज्यांची हत्या केली, त्यांची शिरे कापून झाडांना टांगून ठेवली जात… बलात्कार, अपहरणे तर नित्याचीच झाली होती. एवढेच काय एका प्रसिद्ध सिनेअभिनेत्याचे अपहरण करून त्याने खंडणीही उकळली होती. पण सर्वांत वाईट गोष्ट झाली ती म्हणजे वीरप्पन (काही) लोकांचा हिरो बनला… त्याच्या बापाचे काहीही जात नव्हते… बेकायदेशीर मार्गाने (लोकांचा) लुटलेला पैसा, त्या पैशांतील अगदी नगण्य भाग तो लोकांच्या ‘कल्याणा(? )साठी दान देत असे… रॉबिन हूड म्हणत लोक त्याला… लुटलेल्या पैशांतून दान म्हणजे एक विनोदच!

वीरप्पन ज्या गोपिनाथम नावाच्या गावात जन्माला आणि वाढला… त्याच गावात श्रीनिवास साहेब जाऊन राहू लागले… नीडर होऊन. त्यांनी स्थानिक जनतेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. शरण आलेल्या तस्करांना जंगलातच राखणदारांच्या जबाबदा-या दिल्या. रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, दूर संचार यांबाबत मार्गदर्शन, साहाय्य उपलब्ध करून दिले…. एवढेच नव्हे तर प्रसंगी स्वत:चे पैसे खर्च करून वनसेवक, स्वयंसेवक यांच्यासाठी घरे उभारून दिली! कित्येकदा श्रीनिवास साहेब जखमी गावकरी लोकांवर स्वत: वैद्यकीय उपचार करीत.. ते त्यांनी खास शिकून घेतलेले होते! सामान्य लोकांना यापेक्षा वेगळे हवे असते तरी काय? पण यामुळे वीरप्पन चिडून जाणे स्वाभाविकच होते. त्याने श्रीनिवास साहेबांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होतीच. प्रसारमाध्यमांनीसुद्धा वीरप्पनला मोठे करण्यात कसर ठेवली नाही! आता वीरप्पन कुणाच्याही माथ्यावर हात ठेवून त्याला भस्म करू शकत होता. त्याला सर्व आधुनिक सोयीसुविधा जंगलात विनासायास प्राप्त होत… उत्तम कपडे, औषधे, टीवी त्याला उपलब्ध होत! एका पत्रकाराने तर जंगलात जाऊन त्याची मुलाखतही घेतली होती!

श्रीनिवास साहेबांना मदत करू पाहणा-या अनेक लोकांच्या वीरप्पनने क्रूर हत्या घडवून आणल्या. त्याचा सामना पी. श्रीनिवास नावाच्या ध्येयवेड्या माणसाशी होता… सत्यान्वेषण.. अर्थात सत्याचा शोध.. हा श्रीनिवास यांचा श्वास होता… लोकनायक जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता… अहिंसा हे हिंसेवरचे प्रभावी उत्तर आहे… असा त्यांना विश्वास होता! श्रीनिवास यांनी वीरप्पनच्या चाळीस पैकी सुमारे तीस लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले होते… या लोकांवर जरूर ती कायदेशीर कारवाई झालीच… पण श्रीनिवास साहेबांनी या सर्वांना न्याय मिळेल, त्यांचे पुनर्वसन होईल याची दक्षता घेतली… त्यामुळे अनेक लोक गुन्हेगारीपासून परावृत्त झाले… साहेबांनी वीरप्पनच्या मारी नावाच्या बहिणीला स्थानिक रुग्णालयात नोकरी मिळवून दिली. ज्यांचे मतपरिवर्तन करण्यात साहेबांनी यश मिळवले… त्यात वीरप्पनचा सख्खा भाऊ, अर्जुनसुद्धा होता!

९ नोव्हेंबर, १९९१. श्रीनिवास साहेबांना वायरलेस मेसेज आला…. वीरप्पन शरण येण्यास तयार आहे! पण अट एकच… साहेबांनी एकटेच, नि:शस्त्र त्याच्या भेटीस त्याच्या लपण्याच्या ठिकाणी जाऊन त्याची भेट घ्यायची… मगच तो शस्त्र खाली ठेवणार! माणूस सुधारू शकतो यावर श्रीनिवास साहेबांचा पूर्ण विश्वास आणि अनुभवही होता… ते एकटेच पायी निघाले. पूर्वी त्यांच्यासोबत स्पेशल टास्क फोर्सचे सशस्त्र जवान असत, पण जुलै महिन्यात त्यांचा एस. टी. एफ. सोबतचा कार्यकाळ संपला होता.. त्यामुळे अधिकचे संरक्षण काढून घेण्यात आले होते…. होते ते कमी करण्यात आले होते…! श्रीनिवास यांना वाटेत अर्जुन भेटला, वीरप्पनचा भाऊ…. जो आधीच शरण आला होता… पण गेल्या महिन्याभरापासून गायब होता… साहेबांनी त्याला वाट दाखवायला सोबत घेतले… वाटेत रात्र झाली… साहेब वीरप्पनच्या चुलत्याच्या घरी मुक्कामी राहिले…!

साहेबांनी वरिष्ठांना मेसेज केला… “मला खात्री आहे वीरप्पन निश्चित शरण येईल.. देव माझ्यासोबत आहे! “

वीरप्पनच्या लपण्याच्या ठिकाणापासून केवळ सहा मैल अंतर राहिले होते… रस्ता अरुंद होता… दाट झाडी… श्रीनिवासन नीडर, जंगल त्यांचे ओळखीचे…. आभाळ शांत होते. मात्र त्यांच्या पायांखालचे गवत आज निराळाच आवाज करीत होते…. अर्जुन मागे राहिला होता काही पावले… तेवढ्यात झाडांच्या आडून रायफली धडाडल्या….. गोळ्यांचा रोख श्रीनिवास साहेबांवर होता…. नेम चुकले नाहीत…. साहेब रक्ताच्या थारोळ्यात कोसळले…. जंगलातील पाखरे घाबरून आभाळात उडाली…. झाडे थरारून उठली… आणि हळहळली! वीरप्पनने त्याचा भस्म करणारा हात या निष्पाप, प्रामाणिक आणि सहजी विश्वास ठेवणा-या माणसाच्या माथ्यावर अलगद, फसवून ठेवला…. राख व्हायला विलंब नाही लागला…. पण ही राख नव्हे काळी रांगोळी होती विश्वासघाताची!

काळ या अपराधासाठी वीरप्पनला कदापि क्षमा करणार नव्हता! पिसाळलेल्या श्वानाला मिळाणारा मृत्यू त्याला पुढे मिळणार होता… पण त्याने एक शूर वाघ मात्र जाळयात फसवून मारला होता… देशाच्या संपत्तीचे प्राणपणाने रक्षण करणारा एक सैनिकच त्याने मातीस मिळवला होता…… एक शूर अधिकारी धारातीर्थी पडला होता.. वय अवघे ३६ वर्षे! वीरप्पन केवळ श्रीनिवास यांची हत्याच करून थांबला नाही…. त्या क्रूरकर्म्याने साहेबांचे शीर धडावेगळे करून ते झाडाला टांगले… इतरांना जरब बसावी म्हणून…. साहेबांचा प्रतिशोध, बदला घ्यायचा म्हणून!

हे बलिदान पुढे देशाला समजले… व्यवस्थेला कळाले….. सीमेवर लढणा-या, देशात देशासाठी हाती शस्त्रे धरून लढणा-या सैनिकांना, अधिका-यांना देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार दिला जातो… कीर्ती चक्र! साहेबांना चंदनाच्या लाकडांत पूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला!

श्रीनिवास यांच्या मातोश्रीं पी. जयलक्ष्मी यांनी तत्कालीन राष्ट्रपती महोदय श्रीमान आर. वेंकटरमण यांच्या हस्ते दिल्लीत लाडक्या लेकाला मरणोत्तर जाहीर झालेले कीर्ती चक्र स्वीकारला.

पी. श्रीनिवास यांचा हौताम्य दिवस, १० नोव्हेंबर हा दिवस वन हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.

वीरप्पन नावाचा विषारी कीटक पुढे कित्येक वर्षे त्याच्या कोषात लपून बसला होता…. त्याला १८ ऑक्टोबर, २००४ रोजी ‘ऑपरेशन कुकून’ मध्ये यमसदनी पाठवण्यात यश मिळाले… एक भस्मासुर मातीत मिळाला होता… पण त्याने त्याच्या जीवनकालात मोठा हाहा:कार माजवून ठेवला होता… पी. श्रीनिवास साहेबांनी वीरप्पनला शरण आणण्यासाठी दाखवलेले शौर्य अलौकिक होते… दुर्दैवाने पी. श्रीनिवास साहेबांच्या कामगिरीची माहिती सामान्य जनतेला अजूनही पुरेशी नाही… त्यासाठी हा लेखन प्रपंच.

– – आणखी एखाद्या भारतीय माणसाला ही कहाणी सांगावी. जयहिंद! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘संस्कृत काव्यातील कविकल्पना…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘संस्कृत काव्यातील कविकल्पना…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

संस्कृत ही जगाची व भारताची आद्य आणि अत्यंत समृद्ध भाषा आहे. या भाषेतून केवळ ज्ञान विज्ञान ग्रंथ आणि धर्मग्रंथच लिहिले गेले असे नाही तर संगीत, नाटय, कला काव्य, सौंदर्य, राजनीती आणि भावनांचेही अप्रतिम दर्शन घडते. संस्कृत कवींची प्रतिभा आणि कल्पनाशक्ती विलक्षण आहे. संस्कृत कवी निसर्गातील प्रत्येक घटकाला मानवी भावनांशी जोडतात. हे करताना त्यांनी केलेल्या या विलक्षण कल्पना म्हणजेच “कविकल्पना” प्रतिकात्मक असून त्या तात्त्विक अर्थांनी जीवनमूल्ये व्यक्त करतात.

संस्कृत काव्य केवळ सौंदर्यासाठी प्रसिद्ध नसून, त्यात सद्गुण, विवेक, निष्ठा, नीति, प्रेम आणि जीवनतत्त्वज्ञान यांचे दर्शन घडते. ह्या निबंधात आपण काही प्रसिद्ध कविकल्पना उदाहरणांसह समजून घेऊ.

१. हंसाचा नीर-क्षीर विवेक

हंस पाण्यात मिसळलेले दूध ओळखून, त्यातील पाणी सोडून केवळ दूधच पितो, अशी कवीची कल्पना आहे. ही कल्पना सज्जन व्यक्तीच्या विवेकबुद्धीचे प्रतीक आहे.

हंसो हि क्षीरमादत्ते त्यजत्यंबु ततः पुनः। सज्जन मनुष्याचेही तसेच असते, तो चांगल्या- वाईटातील भेद जाणतो आणि केवळ चांगलेच ग्रहण करतो.

१. अ) हंस मोत्यांचा चारा खातो

संस्कृत काव्यात हंसाला अतिशय सुंदर, शुद्ध आणि विवेकी मानले आहे. काही कवी म्हणतात की हंस केवळ मोत्यांचा चारा खातो. म्हणजे त्याला केवळ मौल्यवान गोष्टीच भावतात. हे वास्तव नाही, तर काव्यात्मक अतिशयोक्ती आहे. याचा भावार्थ असा: मोती म्हणजे मौल्यवान, शुद्ध आणि चमकदार वस्तू. हंस केवळ मोत्यांचा चारा खातो, म्हणजे उच्च आत्मा केवळ मूल्यवान विचार, ज्ञान आणि संस्कार ग्रहण करतो. हंस हे विवेकशील, श्रेष्ठ आणि पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे.

१. ब) हंस बिसतंतूंचा चारा खातो

दुसरी प्रसिद्ध कल्पना अशी आहे की हंस कमलाच्या मुळांमधील बिसतंतू (सूक्ष्म तंतू) खातो. याचा भावार्थ असा की, बिसतंतू सूक्ष्म आणि अप्रत्यक्ष गोष्टी दर्शवतो. हंस हा त्याचे सेवन करतो, म्हणजे विवेकशील मनुष्य सूक्ष्म गोष्टींपासूनही ज्ञान ग्रहण करतो.

हंसाचे हे आचरण सूक्ष्मदृष्टी, संयम आणि सौम्य बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.

२. चकोर आणि चंद्र

चकोर पक्षी चंद्रकिरणांवर जगतो, अशी प्रसिद्ध कविकल्पना आहे. ही कल्पना एकनिष्ठ प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे. चकोरः शशिनं द्रष्टुं नक्तमेवाभिलष्यति। चकोर जसा केवळ चंद्रावर प्रेम करतो, तसा भक्तही ईश्वरावर निष्ठा ठेवतो.

३. चातक आणि पावसाचे थेंब

चातक पक्षी केवळ मेघातून पडणारे पाण्याचे थेंबच पितो. ही कल्पना श्रद्धा, संयम आणि एकनिष्ठतेचे प्रतीक आहे. चातको जलदं प्रार्थयते केवलं नभःस्थम्।

भक्त देवकृपेवरच अवलंबून असतो, इतरांकडे पाहत नाही, हीच त्याची विशेषता.

४. सुंदर स्त्रीच्या आलिंगनाने, वामपदघाताने, लत्ताप्रहाराने, मद्यचुळकीने वृक्ष बहरतात

सुंदर स्त्रीने आलिंगन दिल्यास, आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने वृक्षाच्या बुंध्याला स्पर्ष केल्यास किंवा आपल्या नाजुक आरक्त पावलाने हलका प्रहार केल्यास, मद्याची चूळ वृक्षाच्या मुळाशी टाकल्यास तो वृक्ष बहरतो, अशा कल्पना आहेत. ह्या कल्पना स्त्रीसौंदर्याच्या जीवनदायी शक्तीचे प्रतीक आहे. सौंदर्य आणि प्रेम जीवनाला नवचैतन्य देतात, हा कवीचा भावार्थ.

५. भ्रमर आणि कमल

भ्रमर नेहमी कमलाच्या फुलाभोवती गुंजारव करत राहतो. ही कल्पना प्रेमातील आसक्ती, माधुर्य आणि अनुरागाचे प्रतीक आहे. भ्रमरो यथा कमलेषु रमते।

अजून एक कल्पना लोकप्रिय आहे.

भ्रमरोऽयं निशि निपतति कमले नूनमन्धः स्वभावात् ।

उताहो भाग्यहीनः कुसुमविवरमध्ये न मुञ्चति गात्रम् ॥

भ्रमर कमळावर इतका प्रेम करतो की संध्याकाळ झाली तरी तो क कमळातून बाहेर पडत नाही. सूर्यास्त होताच कमळ मिटते आणि हा प्रेमवेडा भ्रमर आतच अडकतो. तो अंध आहे की भाग्यहीन हे समजत नाही!

६. दीपक आणि पतंग

पतंग दीपकाच्या ज्योतीकडे आकर्षित होतो. तिच्या प्राप्तीसाठी इतका निकट जातो आणि अखेर त्यातच जळून जातो! ही कल्पना प्रेमातील त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. दीपशिखायां पतंगो यथा नश्यति।

७. काक आणि कोकिल

काक आणि कोकिळ दोघेही काळे दिसतात, पण कावळ्याचा स्वर कर्णकर्कश तर कोकिळाचा स्वर मधुर असतो. ही कल्पना सांगते की रूप नव्हे, तर गुणच माणसाचे खरे सौंदर्य ठरतात.

रूपेण समानौ द्वावपि काकः कोकिलः पुनः

वाचा तु विशिनष्टेते शुक्लः कृष्ण इव द्विजौ।

८. मलयमरुत आणि चंदन

मलयगिरीवरून वाहणारा वारा चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरवतो. ही कल्पना सज्जनांच्या संगतीचे आणि सद्गुणांच्या प्रसाराचे प्रतीक आहे. सज्जनांचा सहवास म्हणजे समाजात सद्गुणांचा प्रसार होणे.

९. इतर प्रसिद्ध कविकल्पना

संस्कृत साहित्यात अनेक अन्य रम्य कल्पना प्रसिद्ध आहेत मेघदूतातील यक्ष विरहाने व्याकुळ होऊन मेघाला दूत करतो ही भावना व्यक्त करणारी कल्पना.

सरस्वतीचे वीणावादन म्हणजे ज्ञान, कला आणि सौंदर्याचा संगम.

कुञ्जर आणि कमलपुष्करिणी म्हणजे वैभव, सौंदर्य आणि तृप्तीचे प्रतीक होय.

आता ही एक कल्पना पहा –

हीरकस्यापि संगेन मत्कुणेन विनाशनम् ।

संतश्रेष्ठ तुकोबा एका अभंगात सांगतात, ‘ ढेकणाचे संगे हीरा तो ही भंगे! ‘ सर्वात कठीण वस्तू म्हणजे हीरा. पण जर ढेकणाच्या (मत्कुणाच्या) संगतीत आला तर तो सुद्धा भंगतो, तुटतो. सज्जन माणूस दुष्टांच्या कुसंगतीने नाश पावतो म्हणून दुष्टसंग त्याज्य आहे

कविकल्पनांचा तात्त्विक अर्थ

संस्कृत कविकल्पना या केवळ कल्पनाच नाहीत तर त्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडतात, काही व्यावहारिक शिकवण देतात.

कल्पना अर्थ / प्रतीक /शिकवण 

हंस मोत्यांचा चारा खातो: उच्च अभिरुची, विवेक, सज्जन माणूस मौल्यवान विचारांवर अधिक लक्ष देतो. हंस बिसतंतूंचा चारा खातो: सूक्ष्मदृष्टी, संयम. ज्ञानी मनुष्य लहान गोष्टींपासूनही ज्ञान ग्रहण करतो. हंसाचा नीर-क्षीर विवेक: शुद्धता चांगल्या वाईटातील भेद ओळखणे. चकोर आणि चंद्र: निष्ठा, भक्ती एकनिष्ठ प्रेम राखणे. चातक आणि पावसाचे थेंब: श्रद्धा, संयम केवळ योग्य स्रोतावर अवलंबून राहणे. दीपक आणि पतंगसमर्पण: त्याग, प्रेमात त्याग आवश्यक. कोकिल आणि काक: गुण महत्वाचे बाह्य रूप नव्हे. मत्कुण आणि हीरा: असंगाशी संग केल्यास हानी होते.

थोडक्यात संस्कृत काव्य हे केवळ शब्दसौंदर्य नव्हे, तर भावनांचे आणि जीवनदर्शनाचे विश्व आहे. कविकल्पना या संस्कृत साहित्याचा आत्मा आहेत. त्या निसर्ग, सौंदर्य, व्यवहार, चातुर्य आणि अध्यात्म यांना जोडतात. काव्यं यशसे अर्थकृतं विवेकसिद्ध्यै। काव्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून विवेक, सौंदर्य आणि संस्कारांचे द्योतक आहे.

हंसाची मोत्यांची चारा खातो आणि बिसतंतूंचा चारा खातो अशी कल्पना हे दर्शवते की सज्जन व्यक्ती सूक्ष्म आणि मूल्यवान गोष्टींपासूनच जीवनसत्त्व ग्रहण करतो. इतर कविकल्पना देखील जीवनाच्या उच्चतम मूल्यांचे प्रतिबिंब आहेत. सौंदर्य, प्रेम, निष्ठा, विवेक, त्याग आणि सद्गुण. संस्कृत काव्याची ही समृद्धी आजही आपल्याला शिकवते की सौंदर्य आणि सद्गुण यांच्या मिलनानेच जीवन बहरते.

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares