मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेम : एक चिरंतन स्वर ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रेम : एक चिरंतन स्वर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

तुझ्या नयनांच्या सरोवरात चंद्रकिरणांचे गूढ नांदते,

माझ्या मनाच्या वीणेवर तुझेच नाव अखंड झंकारते.

तुझ्या स्मितातील सुवर्ण पहाट माझ्या क्षितिजी उगवते,

आणि प्रत्येक श्वासात तुझ्या सहवासाची चाहूल दरवळते.

 *

प्रेम म्हणजे स्पर्शापलीकडील आत्म्यांचे मौन मिलन,

दोन हृदयांतून वाहणारे एकाच भावनेचे स्पंदन.

तुझ्या शब्दांचा सुगंध पारिजातापरी दरवळतो,

माझ्या अस्तित्वातील प्रत्येक कण तुझ्याच स्मृतीने फुलतो.

 *

तुझ्या विरहाची सांज चंद्रालाही उदास करून जाते,

अन् तुझ्या भेटीची पहाट सूर्यालाही नवे तेज देते.

तू समोर असलीस की काळही क्षणभर थबकून राहतो,

आणि विश्वाचा प्रत्येक नाद प्रेमगीत बनून दुमदुमतो.

 *

तुझ्या सहवासात ऋतूंनाही नवे अर्थ लाभतात,

फुलांच्या पाकळ्यांतून स्वप्नांचे रंग झरू लागतात.

तू म्हणजे माझ्या आयुष्याच्या आकाशातील ध्रुवतारा,

माझ्या प्रत्येक प्रार्थनेचा अखंड उजळलेला किनारा.

 *

प्रेम हे मागण्याचे नव्हे, तर समर्पणाचे पावन व्रत,

आत्म्याला आत्म्याशी जोडणारे ईश्वराचे निर्मळ सत्य.

तुझ्या प्रेमात माझे संपूर्ण अस्तित्व अर्थपूर्ण झाले,

आणि जीवनाला चिरंतन वसंताचे अमर गीत लाभले…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…☆ श्री जगदीश काबरे ☆

गुरुपौर्णिमा हा दिवस पारंपरिक अर्थाने गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानला जातो. परंतु बदलत्या काळात गुरु या संकल्पनेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ज्ञान हे आज एका व्यक्तीच्या मक्तेदारीत राहिलेले नाही. पुस्तके, प्रयोग, संवाद, संशोधन आणि तंत्रज्ञान यांमधून ज्ञानाचे असंख्य स्रोत उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला केवळ आज्ञाधारक शिष्य बनविण्यापेक्षा विचार करणारा, प्रश्न विचारणारा आणि नवनिर्मिती करणारा नागरिक बनविणे अधिक महत्त्वाचे ठरते.

पारंपरिक गुरुशिष्य परंपरेने भारतीय समाजाला मोठी सांस्कृतिक परंपरा दिली असली तरी तिच्या काही रूपांमध्ये गुरुचे वचन अंतिम मानण्याची प्रवृत्ती वाढली. अशा वातावरणात शंका विचारणे, मतभेद मांडणे किंवा प्रस्थापित विचारांना आव्हान देणे हे अनेकदा अनुचित मानले गेले. अशा विद्यार्थ्याला उद्धट, दुर्वतनी समजले गेले. परिणामी, ज्ञानाचे चिकित्सक आकलन करण्याऐवजी ते स्वीकारण्यावर भर राहिला. गुरुशिष्य परंपरेचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय कमी झाली की नवनिर्मितीची शक्यतादेखील कमी होते, हा आहे. याउलट शिक्षकमित्र ही संकल्पना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला अधिक लोकशाहीवादी आणि सर्जनशील स्वरूप देते. शिक्षकमित्र विद्यार्थ्याला तयार उत्तरे देत नाही; तो योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. तो विद्यार्थ्याच्या शंका ऐकून घेतो, त्याच्या विचारांना दिशा देतो, चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची मोकळीक देतो. अशा वातावरणात विद्यार्थी केवळ माहितीचा संग्रहकर्ता राहत नाही, तर ज्ञानाचा शोध घेणारा संशोधक बनतो. विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि समाजपरिवर्तन या सर्व क्षेत्रांतील मोठे शोध प्रश्न विचारण्याच्या धैर्यातूनच जन्माला आले आहेत.

एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे उद्दिष्ट आज्ञाधारक अनुयायी घडविणे नसून स्वतंत्र विचार करणारे, विवेकशील आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व घडविणे हे असले पाहिजे. त्यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करताना केवळ व्यक्तिपूजेला महत्त्व देण्याऐवजी जिज्ञासा, चिकित्सक विचार, मुक्त संवाद आणि ज्ञानाच्या सततच्या शोधाला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाची गरज आहे. म्हणूनच भविष्यात गुरुपेक्षा शिक्षकमित्र ही संकल्पना अधिक उपयुक्त ठरणारी आहे, कारण ती विद्यार्थ्याला अंधानुकरणाची साखळी तोडण्यासाठी विचारांचे बळ देते. त्यामुळे परंपरेचा आदर राखत, पण आधुनिक काळाच्या गरजेनुसार शिक्षणाचे आणि गुरु म्हणवल्या जाणाऱ्या शिक्षकांचेही स्वरूप बदलण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित. म्हणून मला वाटते की, गुरुशिष्य या नात्यापेक्षासुद्धा शिक्षकमित्र हे नाते जास्त महत्त्वाचे आहे. कारण गुरुशिष्य परंपरेत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ याप्रमाणे गुरु आज्ञा प्रमाण मानली जाते. शिष्य शंका आणि प्रश्न विचारत नाही. त्यामुळे नवीन काही निर्माण करू शकत नाही. गुरुने दिलेले ज्ञान घोकंमपट्टी करून विद्वान झाल्याचा त्याच्यात आभास निर्माण होतो. त्या उलट शिक्षकमित्र या नवीन परंपरेत विद्यार्थी शंका विचारतो, प्रश्न विचारतो आणि आपल्या विचारांना शिक्षकमित्राच्या सहाय्याने निश्चित दिशा देतो. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्याच्यात संचारते.

एवंच कधीतरी पारंपारिक विचारांच्या पलीकडे जाऊन आधुनिक काळानुसार आपण विचार करायला सुरुवात करणार आहोत काय, हा प्रश्न या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”घराचे Alignment…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

☆ “घराचे Alignment ☆ संध्या बेडेकर ☆

कधी कधी घरच्या प्रमूख व्यक्तीला घराचे Alignment करणे आवश्यक असते.

आज प्रविण जरा शांतच बसले होते. या मागच्या दोन चार महिन्यांत घरात घडलेल्या गोष्टींचा, झालेल्या संवादांचा विचार करत होते.

 मी जे बघतोय, ऐकतोय ती सुरुवात आहे पूढे घडणाऱ्या संभाव्य अप्रिय घटनांची. सध्या छोटे मोठे खटके उडतायेत. सध्या तरी भाषेवर सर्वांनी कंट्रोल ठेवला आहे. संवादाचे texture बरे आहे. पण एकदा का ही धुसफूस वाढली तर मर्यादा ओलांडायला वेळ लागणार नाही. आणि मग महाभारत घडायलाही वेळ लागणार नाही.

मी घरचा प्रमूख या नात्याने माझी जबाबदारी आणि कर्तव्य तटस्थपणे मला पार पाडावेच लागेल.

प्राची किंवा प्रिया, प्रथमेश आणि मला सुध्दा 

What is my role in Family?? हे नेहमी लक्षात ठेवावेच लागेल.

प्रवीण स्वभावाने मिश्किल असला तरी त्याचे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थीत लक्ष असते. He can read between the lines. पूढे येणाऱ्या संभाव्य समस्येचा तो अंदाज लावू शकतो. गाडी रूळावरून घसरण्यापूर्वीच त्यांचे overoiling करणे, servicing करणे जमते त्याला.

आज रविवार ची सकाळ चहा घेताना त्याने प्रथमेश आणि प्राचीला विचारले,

आज काय कार्यक्रम तुमचा??

आज जेवण घरी की बाहेर? आज दिवाळी ची shopping आहे का??

तुमचा कार्यक्रम काहीही असू दे आज संध्याकाळी मात्र तुम्ही दोघे घरात असावेत असं मला वाटतं. वेळेचे बंधन नाही, तुम्ही रात्री जेवायला असाल, तर तसं आधी सांगा म्हणजे आज दिवाळीचा विशेष बेत ठरवू.

घरातील स्वच्छता बऱ्यापैकी झालेली आहे, काही गोष्टींची राहिली आहे. ती वरून दिसत नाही पण वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे.

प्रिया लक्ष देऊन ऐकत होती. तिच्या अनुभवी मनाने या बोलण्याचा गूढ अर्थ ओळखला. पंचेचाळीस वर्षे संगतीचाच परिणाम होता तो.

आज प्रविण चे लेक्चर ऐकायचे आहे. हे तिने ओळखले. मधून मधून हे असं घडतच. आणि हे लेक्चर म्हणजे घरांचे Alignment असते. जबाबदारी, कर्तव्य, वागणूक, सवयी, पैशाचा अंधाधुंद वापर यावर प्रविणचे भाषण म्हणजे सर्वांना विचार करायला लावणारा एक धडा असतो. overall analysis असते ते.

हे सर्व प्रथमेश आणि प्रियाला माहीत आहे. पण प्राचीची यावर कशी प्रतिक्रिया असेल?? तिच्या साठी हे‌ नवीन आहे. प्रिया विचारात होती.

संध्याकाळी प्रथमेश प्राची shopping करून घरी आले. आज प्रविण ने सांगितल्या प्रमाणे प्रियाने पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जीरा राईस घरी केले तंदूरी रोटी, नान, व्हेज मंचुरियन बाहेरून मागविले. दिवाळीचा फराळ, गोड वस्तू भरपूर होत्याच. सर्वांच्याच आवडीचा मेन्यू होता.

प्राची खूप खुश होती. आधी shopping आणि घरी आल्यावर काहीही कष्ट न करता आवडीचे जेवण. मॅडम एकदम Happy होत्या.

प्रथमेश मात्र बाबांच्या भाषणाची वाट बघत होता.

प्राची ने विचारले,

बाबा! झाली का स्वच्छता?

बाबा म्हणाले,

अग!! नाही. थोडी व्हायची आहे. त्यात मला सगळ्यांचीच मदत हवी आहे.

अग!! प्राची घरातील कचरा निघाला ग. पण आपल्या मनातला कचरा पण वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. ती स्वच्छता सगळ्यांसाठी जास्त गरजेची आहे.

या कचऱ्याचा डोंगर होण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. कचरा कोणताच चांगला नाही घरातला आणि मनातला.

प्राची बाबांकडे बघतच राहिली.

बरे असो.

मला वाटतं, घरचा प्रमूख म्हणून माझे काही कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मी काय सांगतोय ते नीट ऐका.

प्रिया तू पण ऐक.

आपण नंतर यावर चर्चा करू शकतो. माझ म्हणण तुम्हाला पटेलच असंही नाही.

बाबा पूढे म्हणाले,

प्रिया माझी अर्धांगिनी आहे. आजपर्यंत तिनेच घर सांभाळले. मी बाहेरच सांभाळले. आता मी तर रिटायर्ड झालो. माझी आॅफिसची जबाबदारी संपली. आता मी थोडी बहुत घरची जबाबदारी घ्यायला तयार आहे. प्रियाचे आॅफिशियल retirement as such नाहीच. याबद्दल तिचे किंवा माझे काही म्हणणेही नाहीच. परंतु कामाचे दडपण कंपल्शन नसावे. पंचेचाळीस वर्षानंतर आता थोडा निवांत वेळ मिळाला आहे. तेंव्हा तिच्या बरोबर क्वालिटी टाइम घालवावा, सकाळी फिरायला जावं, एकत्र बसून चहा प्यावा, वर्तमान पत्र वाचावे. संध्याकाळी जेष्ठ नागरिक संघाचे कार्यक्रम अटेंड करावे, सहलीला जावं, सिनेमा, नाटक बघावे असे मला वाटत. आजपर्यंत नोकरी करताना, असा निवांत वेळ मिळाला नाही. आता तिला तिच्या मनासारखं जगू द्यावं. कामाचं दडपण नसावं. तिला आराम मिळावा, हे बघणं पण माझी जबाबदारी कर्तव्य आहे. आणि तिचा अधिकारही आहे.

आमच्या पिढीच्या बहुतेक सर्वांचेच आतापर्यंत असेच आयुष्य गेले असेल.

मी फक्त आमच्या दोघांचाच विचार करतोय असं नाही. मला तुमच्या दोघांची पण काळजी आहे. तुमचे पण रोजचे आॅफिस, दगदग आम्ही बघतोच. तुमच्या वयाच्या सर्वांचीच थोड्या फार फरकाने हीच दैनंदिनी आहे /असेल.

देवाच्या दयेने आज ची पीढी आमच्या पेक्षा financially चांगल्या परिस्थितीत आहे.

कामावरून घरात वादविवाद नको, ते आपण टाळू शकतो. जसा प्राचीला वेळ मिळत नाही तसंच प्रिया ला पण आता तिला तिचा छंद जोपासायला वेळ मिळावा असं मला वाटतं. आतापर्यंत घडाळ्याच्या काट्या प्रमाणे काम करणाऱ्या प्रियाने आताही असेच वागावे अशी तिच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे.

उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात कटूता यायला नको. कारण आपण चांगल्या गोष्टी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करतो. आणि कटूता मनात. हे बरोबर नाही. माझी आणि प्रथमेशची फरफट व्हायला नकोय.

पुरूषांना बायको आणि आई दोघांपैकी एकीची निवड करायला भाग पाडू नये. प्रिया आणि प्राची दोघीही महत्वाच्या.

हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे.

मी कशाचेही स्पष्टीकरण देत नाहिये.

जसे प्रश्न पत्रिकेत MCQs 

असतातत म्हणजे एका प्रश्नाचे Multiple choice options असतात. तेंव्हा चार उत्तरांपैकी एक बरोबर उत्तर निवडायचे असते.

तसेच आपले घर सुव्यवस्थित चालावे. आपण सर्वांनी शांत, आनंदी राहून जीवनाचा आनंद घ्यावा. यासाठी वेगवेगळे options आहेत. म्हणून सर्वांनी मिळून एक उत्तर शोधणे महत्वाचे आहे.

Options हे आहेत।

१. आपापली जबाबदारी समजून काम वाटून घ्यावी.

२. पूर्ण वेळ कामासाठी बाई ठेवावी. मग ती जे जसं करेल ते सहन करायची तयारी ठेवावी. तिला स्पष्ट instructions द्यावे लागतील. म्हणजे अन्न वाया जाणार नाही. अन्न वाया गेलेले प्रिया ला आवडत नाही.

खर्च फक्त तुम्हीच करावा असंही नाही. मी खर्च करायला तयार आहे.

३. आपण वेगळे राहण्याचा ही विचार करू 

शकतो. आमच्या साठी मात्र हा शेवटचा पर्याय असेल. पण तुमच्या दोघांची इच्छा असेल तर आम्हाला मान्य आहे.

४. किंवा प्राचीचे आईवडील तुमच्या जवळ येऊन राहू शकतात. प्राची ला त्यांच्या सोबत जास्त मोकळीक मिळेल. अस प्राची ने बरेचदा बोलून दाखविले आहे. प्राचीला space हवी असते.

यातही आम्हाला काही प्रोब्लेम नाही.

बाबांचे विचार ऐकून प्राची बाबांकडे बघतच राहिली.

बाबा म्हणाले,

प्राची!! तुला एक महत्वाचे सांगायचे आहे. तुम्ही socializing करू नये. पार्टीला जाऊ नये. इतक्या जून्या विचारांचे आम्ही नाही. परंतु मागच्या आठवड्यातील घटना बघून आम्हाला वाईट वाटले. काळजी वाटली आणि हो रागही आला. तुझ्या ड्रिंक्स मध्ये कोणीतरी काहीतरी मिसळत आणि त्याचा तुला दुसऱ्या दिवशी पर्यंत त्रास होतो हे बरोबर नाही. ही घटना चांगली नाही. तुला याबाबतीत सतर्क, सचेत, सावधान राहणे आवश्यक आहे.

शिस्त आणि बंधन गरजेचे आहे. मला वाटतं तुझ्या आईबाबांनाही हे आवडणार नाहीच. तेंव्हा विचार कर. पुन्हा हे असं होता कामा नये.

तुम्ही दोघे आई बाबां होण्याचे स्वप्न बघत आहात, तेंव्हा आधी तुम्ही physically and mentally तयार व्हा. शिस्त पाळा.

बरे असो.

माझे बोलणे झाले आहे. सध्याची परिस्थिती बघता मला जे योग्य वाटल ते मी बोललो. तुम्ही सर्व शांत मनाने आजचा आणि भविष्याचा विचार करा. काही घाई नाही. माझ्या बरोबर फ्रिली बोला. मग निर्णय घ्या.

We both are ready for anything and everything.

आज प्रणव ने सवयी प्रमाणे सर्वांना सद्य परिस्थिती व त्यांचे भविष्यात होणारे परिणाम थोडक्यात पण परखडपणे सांगितले.

प्रथमेशला मनातल्या मनात समाधान वाटले. प्रिया ला पण अशीच काहीशी अपेक्षा होती.

प्राचीला मात्र बाबांचे हे वेगळेच रूप बघायला मिळाले.

दिवाळी च्या मुहूर्तावर बाबांनी घरातील सर्वांना एक संदेश दिला 

जसे आपण धूळ, अडगळ, कचरा, जाळ्या जळमट, रद्दी, जूने कपडे सारे सारं काही आपण काढतो, त्यांची योग्य विल्हेवाट लावतो. घर स्वच्छ लखलखीत झाले की मोकळं आनंदी वाटू लागतं. घर सजवायलाही उत्साह येतो.

तसेच घराबरोबर मनही स्वच्छ कराव.

मनातील विचारांची अडगळ दूर करावी. मनात मनःशांती ची, आनंदाची ज्योत चेतवावी.

बरोबर आहे.

म्हणतात ना,

विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासाठी आहे. तेंव्हा काळजी करत बसण्यापेक्षा स्पष्ट संवाद साधणे केंव्हाही चांगलेच नाही का??

आज प्रवीणने प्रियाची बाजू मांडून आपल्या पत्नीचा ही मान राखला. ज्या घरात नवरा बायकोचा मान ठेवतो, त्या घरातील बाईचा अपमान करायची हिम्मत कोणी दाखवत नाही.

वेळेवर स्पष्ट बोलायला धाडस लागतं हे नक्की पण बोलणही गरजेचेच असते. घरातील प्रत्येकाचा मान ही असायला हवा. एखाद्या ला granted घेऊन चालत नाही. नात्यामध्ये ही मर्यादा असायलाच हवी.

प्रवीण च्या बोलल्या नंतर एक वेगळीच शांतता पसरली. प्रत्येक जण विचारात होता. शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला.

आज नरकचतुर्दशीच्या दिवशी बाहेरच्या उजेडापेक्षा अंतर्मन उजळून निघाले होते.

बरोबर आहे.

आपलं कुठे चुकतंय?? हे शांतपणे सांगणार कोणी तरी आयुष्यात असले की एकतर चूका कमी होतात किंवा त्या वेळेत सुधारता येतात.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझी आई पंजाबी ड्रेस घालायची. साडी किंवा लुगडं नेसणाऱ्या बायांमध्ये ती वेगळीच दिसायची. मला ते खूप खटकायचं. असं वेगळं दिसणं मला अजिबात आवडायचं नाही. मी लहान असतांनाची ही गोष्ट. मी लाडीगुडी लावायचो, कधी कधी हट्ट करायचो, साडी नेस म्हणून. तिला काही ते जमलं नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती घागरा-कुर्ता घालायची. हरियाणाचा हा पारंपरिक वेश आहे. तिकडे गावी सोनिपतला असतांनाची ही गोष्ट. लग्नात माझ्या नानांनी तिला अकरा किलो चांदीचे दागिने दिले होते. घागरा-कुर्त्यासह एव्हढे दागिने अंगावर ती कसे वागवत असेल या विचारांनी आम्ही अचंबित व्हायचो. मग जेव्हा इकडे आली महाराष्ट्रात, तेव्हा पंजाबी ड्रेस घालू लागली. तिला मग त्याचीच सवय झाली. नंतर तिला पेहराव बदलणं जमलंच नाही. आयुष्यात एकदाही तिने साडी नेसली नव्हती.

महाराष्ट्राचे परिधान नाही पण भाषा मात्र तिने पुरेपूर आत्मसात केली होती. घराबाहेर तिचा सगळा जीवनव्यवहार मराठीतच चालायचा. नंतर सगळ्या बहिणींच्या बाबतीतही अगदी असंच घडलं.

आईच्या मैत्रिणी सगळ्या मराठी बोलणाऱ्या बाया होत्या. ती त्यांच्याशी उत्तम मराठीत बोलायची. नर्सरीत कामाला जायची. ही नर्सरी (नाशिक जिल्ह्यात) वैतरणा धरणाच्या जवळ होती. ७२च्या दुष्काळात आईची पाटबंधारे खात्यातील नोकरी गेली. वडिलांच्या एकट्या नोकरीवर घर चालणे कठीण होते. दोन बहिणी लग्नाच्या होत्या. नर्सरीत रोजंदारीवर ती जाऊ लागली.

मी दुसरीत असेन. तिच्या सोबत कधी कधी नर्सरीत जायचो. दुपारी सगळ्या बाया रिंगण करून जेवायला बसायच्या. सगळ्यांच्या पुरचुंड्या आणि डबे मधोमध मांडले जायचे. ज्वारी-बाजरी-नाचणीच्या भाकऱ्या, लसणाची चटणी, बेसन, ठेचा, कांदा, मुळा, मेथी, कांद्याची पात, भाजलेले शेंगदाणे… त्या सगळ्या गप्पा मारता मारता आवडीने जेवायच्या. कष्टकरी समूहाचे एकमेकांशी वाटून खाण्याचे ते दृश्य माझ्या मनावर कायमचे कोरलं गेलं आहे.

धृपताबाई आईची मैत्रीण. दोघी शनिवारी नाशिकला जाऊन फळं आणि भाज्या आणायच्या. रविवारच्या आठवडे बाजारात दोघी ते विकायच्या. शेजारी-शेजारी जमिनीवर दुकान मांडली जायची. सगळा व्यवहार मराठीत चालायचा. एक काष्टेवाली आणि एक पंजाबी ड्रेसवाली अशा या मैत्रिणी सगळ्यांच्या खूप परिचयाच्या होत्या.

सकाळी लक्ष्मीबाई दूध घालायला यायची. लुगड्यातली लक्ष्मीबाई, तिच्या कपाळावरील भलं मोठं कुंकू, नाकातील नथ आजही ठळक आठवते. सगळ्यात शेवटी ती आमच्याकडे यायची. किटली-कळशीत शिल्लक असलेलं सगळं दूध बळंबळं घालून जायची. आई तिला कप-बशीत चहा द्यायची. एका हाताने हळूच नथ बाजूला सारून बशी ओठाला लावून ती जोरात फुरका मारायची. फुरक्याचा तो आवाज अजूनही कानात गुंजतो. चहा झाला की त्या दोघी सुख-दुःखाच्या गोष्टी करत घटकाभर बसायच्या.

माझा जन्म इथे महाराष्ट्रात झाला. इथेच वाढलो. आसपास मराठी वातावरण होतं. आम्ही सगळी बहीण-भावंडं मराठी माध्यमातून शिकलो. त्यामुळे आम्ही सगळे उत्तम मराठी बोलू लागलो. आज मी सगळं वाचन-लेखन मुख्यतः मराठीतच करतो. हे मला आपसूकच मिळालं आहे. आसपासच्या वातावरणातून.

आश्चर्य वाटतं मला आईचं. तिचा जन्म लाहोरचा. फाळणीनंतर उसळलेल्या दंगलीत जीव वाचवून त्यांचं कुटुंब इकडं आलेलं. फाळणीच्या काळात आई अकरा वर्षांची असेल. तसं कळतं वय होतं तिचं. तेव्हा तिला दोन भाषा यायच्या, घरात बोलली जाणारी हरियाणवी आणि आसपास मोहल्ल्यात बोलली जाणारी पंजाबी.

पुढे दहा बारा वर्षे हरियाणात गेली. नंतर तिचं लग्न झालं अन रोजगाराच्या शोधात ती वडिलांसोबत महाराष्ट्रात आली. अंगावरच्या कपड्यानिशी ते आले होते. हरियाणवी आणि पंजाबीशिवाय त्यांना इतर कोणतीही भाषा येत नव्हती. मराठीचा एक शब्दही त्यांनी ऐकलेला नव्हता.

त्यांचा पहिला ठिकाणा नगर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातला घोडनदी प्रकल्प. पाटबंधारे खात्यात रोजंदारी कामगार म्हणून लागले. पुढे सेवेत पर्मनंट झाले. तिथे जवळपास एक दशक राहून बदली होऊन ते आले नाशिक जिल्ह्यात वैतरणानगरला. तिथे आणखी एक दशक राहिले. मग परत बदली झाली ठाणे जिल्ह्यातील सुर्याप्रकल्पावर. तिथे २००० साली ती सेवानिवृत्त झाली. तिथून पुढचा काळ देहूरोडला. २०१५ ला पुण्यात माझ्याकडे असतांना तिचा मृत्यू झाला.

अर्ध्या शतकाचा हा महाराष्ट्रातला तिचा रहिवास. या काळात अगदी पहिल्या टप्प्यातच तिने मराठी आत्मसात केली. वडील सुद्धा चांगलं मराठी बोलायचे. पण आईसारखं अस्खलित नाही.

आईने मराठी कशी आत्मसात केली असेल. तिला प्रेरणा नेमक्या कशा मिळाल्या असतील. ती पूर्ण निरक्षर होती. नवी भाषा शिकण्याची प्रक्रिया तिच्या अंतःकरणात नेमकी कशी घडली असेल, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा मला ती गेल्यानंतर निर्माण झाली. आयुष्याच्या धावपळीत बरेच तपशील असेच सुटून जातात. नंतर त्याचं महत्व जाणवतं. मग जीव हळहळत राहतो.

भाषा आत्मसात करतांना नेमकं काय घडलं होतं आईच्या बाबतीत? आज ते कसं कळणार? आता केवळ आठवणी उरल्या आहेत. मी आठवणींचा धांडोळा घेऊ लागतो. मागे मागे जाऊ लागतो. मला तिचे शब्द आठवतात.

ती म्हणायची,

“बेटा, जिस मिट्टी में उगा अन्न खाते हैं,

जहां का पाणी पिते हैं,

वहां की बाणी (भाषा) 

म्हारी नस नस में बस जाणी चेईये. ” 

अशी नाळ जुळली होती मायची अन मराठीची!

जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहून ती खऱ्या अर्थाने मराठी मातीची लेक बनली होती. शेवटी या मातीत ती सामावली.

आम्ही तिचं अस्थी विसर्जन देहूगावला इंद्रायणी नदीत केलं.

#लाहौर_की_मिट्टी

#इंद्रायणी_के_जल_में_समा_गयी

– 

लेखक : अमरनाथ सिंग

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बांध!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “बांध!!!☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

मी युगान युगाची विरहिणी! सागर मिलनाची आस असलेली!! अनंत काळापासून!!

नाही आवडत मला, माझ्या वर बांध घातलेले! मला वाहू द्या माझ्या मनाप्रमाणे! निरागसपणे! अविरत! अखंड! सागराकडे!! जो बाहू पसरून कधीची माझी वाट बघत आहे!!!

घाला बांध माझ्यावर, कितीही, पण माझ्या मनावर बांध घालू शकत नाही कोणी! ते तर कधीच सागरा कडे जाऊन त्याच्या बाहुपाशात विसावले आहे.!! जेव्हा त्याची ओढ अनावर होते, तेव्हा मी माझे मित्र काळे मेघ, यांना मदतीला साद घालते आणि तेही तेवढ्याच तत्परतेने येतात. कदाचित माझी स्थिती पाहून त्यांचे त्यांना अश्रू थोपविता येत नसावे आणि ते बरसताता, वर्षाव करताता… तेव्हा बांधकाम विशारद म्हणतात, “बांधाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे ‘, हे ऐकून माझे कान तृप्त होतात!

मी प्रियकराला भेटायचे म्हणून तयारीला लागते. खूप खूप बोलायचे असते. कमी वेळात! त्याची एकदा उजळणी करून घेते आणि तो क्षण येतो ज्याची मी आतुरतेने वाट बघत असते!! दरवाजे धडकन उघडतात… मी बेभान धावत सुटते,… माझ्या पायाचे मलाच ओझे वाटते… पण मी धावत असते… माझ्या भेटीसाठी आसुसलेला तोही! तो आपले भरभक्कम बाहू पसरतो… आणि त्याच्या बाहुपाशात मी विरघळत जाते,… स्वतःचे अस्तित्व विसरते! एकरूप होते!!

पण ह्या मिलानाला मात्र चंद्र साक्षी नसतो! कारण तो फक्त नश्वर प्रेमीयुगल यासाठीच आपले चांदणे पसरत असतो!!

आमच्या अमर प्रेमासाठी काळे मेघ असतात, दिलासा देतात! मध्येच कधीतरी वीज चमकते. त्या प्रकाशात मला दिसतात ते माझ्या प्रियकराचे सागराचे अथांग डोळे, ज्यात माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी प्रेम सामावलेले असते! आणि आणि माझ्यावर कधी तरी बांध घातले होते, हेदेखील मी विसरते!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८७ आणि ८८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८७ आणि ८८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८७ – – 

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।

गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।

हरिभक्त तो शक्त कामास मारी ।

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।।८७।।

अर्थ : ज्या व्यक्तीच्या मुखी रामनाम आहे, त्याला कामवासना त्रास देऊ शकत नाही. नामाच्या शक्तीमुळे कामवासनेवर ताबा मिळवण्यासाठी लागणारे धैर्य त्याला आपोआप प्राप्त होते. नामामुळे सामर्थ्य प्राप्त झालेला भगवंताचा भक्त कामवासनेला सहज नष्ट करू शकतो. या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरण असलेला आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारा मारुती जगामध्ये खरोखरच धन्य झाला आहे.

(काम – कामवासना, गुणे – त्या योगाने, शक्त – सामर्थ्य)

विवेचन :  काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे मोठे शत्रू आहेत. ठरवले तर क्रोध, मद, मोह आदी विकारांवर नियंत्रण मिळवणे सोपे असते. परंतु काम हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. त्यावर नियंत्रण प्राप्त करणे भल्याभल्यांनाही अवघड. विश्वामित्रांसारख्या तपस्वी ऋषींची तपश्चर्या मेनकेने भंग केली. पराक्रमी आणि विद्वान असलेला रावण आपल्या कामवासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कामवासना जिंकणे अत्यंत अवघड. संसारी माणसाला कामवासनेचा मर्यादित उपभोग घेण्यास शास्त्रांची ना नाही. परंतु साधना करायची असेल तर संसारी व्यक्तीने देखील कामवासनेवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त असते. आपण ‘ काम ‘ आणि ‘ राम ‘ दोन्ही एकाच वेळी साध्य करू शकत नाही. ‘ राम ‘ हवा असेल तर ‘ काम ‘ सोडावा लागेल.

परंतु ज्याच्या मुखी रामनाम येते आहे, अशी व्यक्ती कामवासनेवर विजय मिळवू शकते. त्याला कामवासना बाधित करू शकत नाही. रामभक्त हनुमान हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याच्या हृदयात रामनामाचा अखंड जप सुरु आहे. त्यामुळे ‘ काम ‘ भावनेला तेथे थारा नाही. हनुमंत म्हणजे अखंड ब्रह्मचर्य पालन करणारा. मुखात रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन यामुळे त्याच्या अंगी धैर्य, शक्ती यासारखे इष्ट गुण निर्माण झाले आहेत. त्याला ‘ काम ‘ विचलित करू शकत नाही. जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी तो लंकेत गेला तेव्हा रावणाच्या अंतःपुरात अनेक सुंदर स्त्रिया नको त्या अवस्थेत त्याच्या नजरेस पडल्या. परंतु सदैव जो रामनामातच रंगला आहे, अशा महाबली हनुमंताला ते दृश्य विचलित करू शकले नाही. सीतेच्या समोरही तो आपल्या स्वतःचा तिचा पुत्र म्हणून उल्लेख करतो. म्हणूनच ब्रह्मचारी असलेला हनुमान जगात धन्य आहे.

म्हणून समर्थ म्हणतात, ” हरिभक्त तो शक्त कामास मारी ” जो कायम हरीची भक्ती करतो, असा सामर्थ्यशाली माणूस कामवासनेला मारून टाकण्यासाठी समर्थ असतो. अशा व्यक्तीचे नाम परा वाणीपर्यंत पोहोचलेले असते. परा वाणीचे केंद्र हे नाभीजवळ आहे असे म्हटले जाते. कामवासनेचे केंद्र देखील त्याच ठिकाणी आहे. एकदा का नाम नाभीपर्यंत परा वाणीच्या माध्यमातून पोहोचले की तेथे कामवासना राहूच शकत नाही. संत कबीर म्हणतात, ” जहाँ काम तहाँ राम कहाँ । जहाँ राम तहाँ काम कहाँ।”

स्वतः समर्थच या श्लोकाचे उत्तम उदाहरण आहेत. मुखी अखंड रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन. त्यामुळे शक्ती, धैर्य हे गुण आपोआपच त्यांच्या ठायी वास करीत होते. त्यामुळे रामसेवेचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. म्हणूनच तेही जगात धन्य आहेत.

स्वसंवाद :: 

१. माझ्या दैनंदिन व्यवहारात माझे मन बाह्य आकर्षणे किंवा विकारांमुळे विचलित होते का? अशा वेळी मी हनुमंताप्रमाणे रामानामाचा आश्रय घेतो का?

२. “जिथे काम तिथे राम नाही, आणि जिथे राम तिथे काम नाही, ” हे कबीरांचे वचन लक्षात ठेवून मी माझ्या मनात प्रभू श्रीरामांना अढळ स्थान दिले आहे का?

३. माझ्या हातून होणारे नामस्मरण केवळ ओठांवर (वैखरी) आहे, की ते नाभीपर्यंत (परा वाणी) पोहोचून माझ्या विकारांचे शुद्धीकरण करत आहे?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, स्वतःमध्ये ‘धैर्य आणि शक्ती’ हे उत्तम गुण निर्माण करण्यासाठी मी रोजच्या धावपळीत जाणीवपूर्वक भगवंताचे नाम घेतो का?

===== 

श्लोक क्र. ८८ – – 

बहू चांगले नाम या राघवाचे ।

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।

जिवा मानवा हे चि कैवल्य साचे ।।८८।।

अर्थ :  या रामाचे नाव अतिशय चांगले आहे. ते सुंदर, छोटेसे, म्हणायला सोपे आणि बिनखर्चाचे आहे. हे नाम भवाचे म्हणजे संसाराचे मूळ कारणच नाहीसे करते. हे नाम मोक्ष किंवा परमात्म्याचे दर्शन घडवणारे आहे.

(साजिरे – सुंदर /शोभून दिसणारे, स्वल्प – छोटेसे, फुकाचे – बिनखर्चाचे, मूळ – मूळ कारण, निर्मूळ – समूळ उच्चाटन करणे, कैवल्य – मोक्ष/चिरंतन सुख, साचे – नक्कीच/खरोखर)

विवेचन :  या श्लोकात समर्थ नामाचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट करतात. ‘ राम ‘ हे नावच किती चांगले आहे! सुंदर आहे, अल्पं आहे. ते घेण्यास कोणताही खर्च करावा लागत नाही. बरं, हे नाव घ्यायचे तरी कशासाठी? तर समर्थ सांगतात की हे नाम ज्या संसारात येऊन माणूस सुखदुःखे भोगतो, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, त्याचे मूळ कारणच नाहीसे करणारे आहे. हे मूळ कारण नाहीसे करते म्हणजे तरी काय करते? तर हे नाम कैवल्यप्राप्ती करून देणारे आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे चिरंतन सुख! तेच प्राप्त करून देणारे हे रामनाम.

एखादी छोटीशी परिणामकारक गोळी असावी आणि ती घेतल्याने आजार समूळ नाहीसा व्हावा तशी ही गुटिका आहे. दिसायला छोटी पण अत्यंत परिणामकारक. ज्याने ज्याने ती घेतली, त्याचा भवंताप नाहीसा झाला. पण खरे कारण असे की आमचा विश्वासच यावर बसत नाही. एक छोटेसे दोन अक्षरांचे नाम. त्याच्यात एवढे सामर्थ्य कसे असेल? पण त्याच्यातील सामर्थ्याचा प्रत्यय तेव्हाच येईल, जेव्हा ते मनापासून घेतले जाईल. वाल्या कोळ्याने रामनाम घेतले आणि अखिल विश्वाला वंदनीय अशा वाल्मिक ऋषींमध्ये त्याचे रूपांतर झाले. त्यांच्या हातून ‘ रामायण ‘ हा अजरामर ग्रंथ लिहिला गेला. रामाचे नाव काय करू शकत नाही. समुद्रात सेतू बांधणाऱ्या वानर सेनेने दगडावर फक्त ‘ राम ‘ असे लिहिले आणि काय आश्चर्य! ज्या दगडांचा मूळ गुणधर्म पाण्यात बुडण्याचा, ते चक्क पाण्यावर तरले. एवढेच नाही तर त्यावरून रामाची सेना लंकेला पोचली.

या भवसागरात आपल्यालाही तरून जायचे असेल तर हृदयामध्ये ‘ रामनामाला ‘ स्थान देणे जरूर आहे. अन्यथा पाषाणात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. बुडणे हे ठरलेले. रामनाम ही या भवसागरातून तारून नेणारी नौका आहे. बरं, हे नाम तरी किती सोपं, सुंदर आणि बिनखर्चाचे. बसल्या बसल्या, काम करताना तुम्ही केव्हाही ते घेऊ शकता. त्यातली गोडी ही अनुभवावी लागते. ती सांगून कळत नाही. अनुप जलोटा यांनी गायिलेले भजन ‘ जगमें सुंदर हैं दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम.’ आपल्याला माहिती असेल. ‘ राम ‘ या दोन अक्षरी शब्दात ‘ र ‘ हे अक्षर अग्निवर्णाचे निदर्शक आहे तर ‘ म ‘ हे अक्षर चंद्राची शीतलता दाखवणारे आहे. थोडक्यात म्हणजे ‘राम ‘ या शब्दात सूर्यशक्ती आणि चंद्रबल यांचा मिलाफ आहे. ते संतुलित आहे. म्हणूनच ज्याने ते घेतले, त्याच्या आयुष्यात संतुलन साधले जाते. ‘ जय जय राम, जय श्रीराम, दो अक्षर का प्यारा नाम, रामनाम के जपनेसेही बन जाते सब बिगडे काम. ‘

रामनाम घेण्याची मनाला सवय लावली तरच आयुष्याच्या अखेरीस मुखात रामनाम येईल. हे घडले तर कैवल्यप्राप्ती आहेच. मन विषयविकारात अडकले तर अखेरीस ओठावर रामनाम न येता अन्य कशात तरी मन अडकेल आणि मग पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. रामनामाचा जप केल्याने साधक रामरूप होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनि पदवी घेईजे. “

स्वसंवाद :: 

१. जे नाम अतिशय सुंदर, सोपे आणि ‘फुकाचे’ (बिनखर्चाचे) आहे, ते घेण्यासाठी मी आळस करतो की अत्यंत आदराने त्याचा स्वीकार करतो?

२. संसारातील सुखांमध्ये रमून मी केवळ ‘बुडणाऱ्या पाषाणासारखे’ आयुष्य जगत आहे, की रामनामाची नौका धरून या भवसागरातून ‘तरून’ जाण्याचा प्रयत्न करत आहे?

३. माझ्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येताना मानसिक संतुलन राखण्यासाठी, मी रामनामातील सूर्यशक्ती आणि चंद्रबलाचा अनुभव घेतो का?

४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “राम म्हणता रामच होईजे” या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या मनाला नामस्मरणाची अखंड सवय लावत आहे का?

क्रमशः श्लोक ८७ आणि ८८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते ७३८ दिवस – – –  लेखक : श्री मनीष वाघ ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ते ७३८ दिवस – – –  लेखक : श्री मनीष वाघ ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

ज्युलिया हिल

ते_७३८_दिवस – – 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यालगत तब्बल दोन ते तीन हजार वर्षे वयोमान असलेल्या आणि ३०० फुटांपर्यंत वाढणाऱ्या ‘सेक्विया सेम्परविरन्स’ म्हणजेच ‘कोस्टल रेडवूड’ या प्रजातीच्या झाडांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. हे वृक्ष जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. या वृक्षांचे लाकूड फर्निचर बनविण्यासाठी वापरता येते, हे कळल्यावर एका लाकडी साहित्य बनविणाऱ्या कंपनीने या लाकडांचे कंत्राट मिळवले आणि मग या वृक्षांची बेसुमार तोड होऊ लागली. याचा दुष्परिणाम म्हणून जमिनीची धूप, सुपीक माती वाहून जाणे यांसारखे पर्यावरणाचे नुकसान तर झालेच; शिवाय जंगलातील इतर जैवविविधतेचेही अस्तित्व धोक्यात आले.

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात तेव्हा अवघ्या विशीत असणाऱ्या ज्युलिया हिल या तरुणीने या जंगलाच्या संरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला. बरोबर २३ वर्षांपूर्वी, १० डिसेंबर १९९७ या दिवशी ती एका १, ५०० वर्षे वय असलेल्या वृक्षावर जमिनीपासून १८० फूट उंचावरील एका छोटय़ा मचाणावर जाऊन बसली. जोपर्यंत या वृक्षांना जीवदान मिळत नाही तोपर्यंत खाली उतरायचे नाही आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे, असे तिने व तिच्या सहकाऱ्यांनी ठरवले होते. त्यांचे हे आंदोलन दिवसागणिक पुढे सरकू लागले तसे त्या कंपनीचे धाबे दणाणले.

हाडे गोठविणारी थंडी, पावसाचा मारा होत असतानाही आंदोलन चालूच ठेवण्याचा ज्युलियाचा निर्धार पक्का होता. हे आंदोलन थांबवावे म्हणून त्या कंपनीने तिला साम-दाम-दंड-भेद वापरून अतोनात त्रास द्यायला सुरुवात केली, धमकीसत्र सुरू झाले. परंतु या कशालाच ज्युलिया बधली नाही. तिचे कुटुंबीय, तिचे सर्व सहकारीही ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. तिच्या या अनोख्या आंदोलनाला हळूहळू जगभरातून पाठिंबा मिळू लागला. अखेर लाकूडतोडय़ा कंपनीने माघार घेतली. ती ज्या झाडावर (तिने या झाडाला ‘लुना’ हे नाव दिले होते! ) ठाण मांडून बसली होती ते झाड तर वाचलेच, शिवाय त्याच्या आजूबाजूचे ६१ मीटर परिघातील जंगल हे कायमस्वरूपी ‘बफर झोन’ म्हणून घोषित करण्यात आले.

१८ डिसेंबर १९९९ रोजी, म्हणजे ७३८ दिवसांनी ज्युलिया झाडावरून खाली उतरली! आज ज्युलिया ‘सर्कल ऑफ लाइफ’ या ट्रस्टमार्फत ‘अहिंसक मार्गाने पर्यावरण रक्षण करा आणि वसुंधरा वाचवा’ हा संदेश देत जगभरातील जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी झटत आहे.

लेखक : मनीष चंद्रशेखर वाघ

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच; पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली, तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही, असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला, तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीजमध्ये ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला, तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात, पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच).

ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या, तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.

आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे, घरातील कोणाकडेही मित्र-मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे, घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे, असं समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घरपण म्हणतात. तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक, उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो, सर्वांचे समान आदरातिथ्य

असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मन अंकुरे अंकुरे” – लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर ☆ परिचय –  श्री अशोक ल. देशपांडे ☆

श्री अशोक ल. देशपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

“मन अंकुरे अंकुरे” – लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर ☆ परिचय –  श्री अशोक ल. देशपांडे ☆

पुस्तक : मन अंकुरे अंकुरे

लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर 

प्रकाशक : ज्ञानपथ प्रकाशन

पृष्ठसंख्या : ११६ 

किंमत : रु. २०० /- 

मन अंकुरे अंकुरेजणू दरवळलेला मृदगंधच……

नुकत्याच २० व २१डिसेंबर २०२५ ला परिवर्तन प्रबोधिनी आयोजित तिसऱ्या विचारवेध साहित्य संमेलनात प्रकाशित झालेले, ज्ञानपथ प्रकाशनाचे डॉ नेहा विनोद भटकर लिखित, वैविध्यपूर्ण अशा एकूण सोळा लेखांचा संग्रह असलेले ‘मन अंकुरे अंकुरे’ हे पुस्तक वाचनात आले आणि त्यासंबंधीचा अभिप्राय लिहिण्यास लेखणी सहजच उद्युक्त झाली. त्याला अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम तर पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून आतील अक्षरधनाचा अंदाज आला. लेखिकेचं नाव ‘डॉ. ‘ ह्या उपधीशिवाय पाहून लेखिकेचा विनय, ऋजुता दिसून आली. मलपृष्ठावर नजर गेली असता, तिथे लेखिकेचा परिचय असेल म्हणून पाहीले तर पुस्तकातील अंतरंग तेथे अवतरलेला. सगळी अवतरणं वाचूनच सहृदय वाचक पूर्णानंदाची अनुभूती घेतो. निसर्गाचं किंवा परिस्थितीचं अचूक, नेमकं निरिक्षण, बारकावे टिपलेले दिसतात व वाचक पुस्तक वाचनास प्रवृत्त होतो. विज्ञानाच्या प्राध्यापिका सेवानिवृत्तीनंतर बालपणीच्या आठवणी इतक्या सुंदर व जश्याच्या तश्याच चित्रित करतात याचे कौतुक आणि नवलही वाटले.

गुलबकावली किंवा सिंदबादच्या सफरी ज्या उत्सुकतेने एकेकाळी वाचल्या जात होत्या त्याच उत्कंठतेशी साधर्म्य साधणारे हे ग्रामीणबाजाचे लेख आहेत, केवळ हळवं मनंच इतके बारकावे टिपू शकतं. ग्रामीण जीवन केव्हढं समृद्ध, परिपक्व, सहज, रोखठोक होतं, ह्याचं दर्शन वर्तमान पिढीला लेखिकेने करून दिलं आहे. ह्या विविध विषयांवरील लेखांमुळे लेखिकेच्या मनातील आजवर सुप्तावस्थेत असलेल्या बीजांना सशक्त अंकुर आले आहेत. वठलेल्या वृक्षांना कोमल पालवी प्रस्फुटित व्हावी तसा लेखिकेच्या मनमोराचा पिसारा डवरून जाऊन अक्षरधनाच्या रुपाने वाचकांसमोर आला आहे, ह्याचा वाचकांना देखील आनंदच होईल. व-हाडी भाषेचा पेरा; जसे की नानीमावशी या लेखातील ‘थांब आमासाक’ किंवा इतरही लेखातील अनेक वऱ्हाडी शब्दप्रयोग, वाचकांना सुखावून जातो. अथांग सागरात बुडी मारून तळाशी असलेल्या शिंपल्यातील मोतीच फक्त मुठीत धरून येणाऱ्या पाणबुड्यासारखीच लेखिकेने स्मृतीच्या अंतराळात झेप घेऊन आठवणींच्या रत्नांची पखरण प्रत्येक लेखात केली आहे. रम्य त्या बालपणातील बारकावे लालित्याने नटलेले आहेत. ‘अनवट मैत्री’ पृ. ७९’ “विचारांच्या भुंग्याने अनेक पावसाळे अगदी सहजपणे मागे टाकलेत हे कळलेही नाही“, अशी लालित्यपूर्ण किंवा त्यापेक्षाही सहज सुंदर व समर्पक वाक्य ठिकठिकाणी आढळतात. रात्रभर भुंग्याने कमलपुष्प दलात स्वतःच्याच धुंदित बंदिस्त करून घ्यायचे व सूर्योद‌यालाच बाहेर पडून मुक्त संचार करावा तसे विचारांचे /आठवणींचे काहूर स्मृर्तीची परते खुलवून गेली.

.. खेड्यातील लोकांचा जीवनाधार असलेल्या गुलाब भाईचं कामास काम एवढेच मर्यादित असलेलं साधं व निरागस असलेलं वलय लेखिकेने लिहिल्याप्रमाणे ‘कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धूसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालं आहे. ’ आज सामाजिक जाण हरवलेली, उजाडलेली खेडी पहिली की ‘गुलाबभाई’ सारख्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

.. ‘शतदा प्रेम करावे’ ह्या पाडगावकरांच्या कवितेच्या ओळीने संपलेले, माणुसकीच्या वाड्याचे वर्णन संपूच नये असे वाटत असतानाच वाचून संपले. वर्तमान पिढीला सांगूनही विश्वास न बसेल असे ते दिवस, ती माणसं, ते सामाजिक भान, भारतीय जीवन पद्धतीचे दर्शन, संस्कृती व परंपरेला जपणारा समाज लेखिकेच्या ओघवत्या लेखणीने ‘वाडा माणूसकीचा’ मध्ये जिवंत केला. त्या वाड्याचे वैभव जपणाऱ्या अन्नपूर्णांचे; एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे, वर्णन वाचून वाचक तृप्तीची ढेकर देऊन आनंदित झाल्यावाचून राहणार नाही.

.. ‘सामा’ या लेखातील दारकुची अविश्रांत श्रमाची कहाणी अंतर्मनाला स्पर्शूनच जात नाही तर ती त्याला चिकटते. ‘नाना’ सारखी माणसं जेथे जेथे असत ते तेथील सर्वांसाठी जीवनाधारच असत. खेड्यातील नाना सारख्या व्यक्तींना तर आधारवडच म्हटलं पाहिजे. ‘अनवट मैत्री’ ‘ओकरा’, ‘प्राजक्त सडा’ या लेखांत आलेल्या शब्दांना दिलेले प्राणी वा वनस्पती शास्त्रीय शब्द इंग्रजीत दिल्याने फार सोयीचे झाले. त्यातील कीटक आणि वनस्पतींचे बारकावे समजणे सोपे झालेत. वरील लेखांमध्ये आलेल्या बहुतेक सर्व कीटकांसोबत अनेकांची लहानपणी दोस्ती झाली असेल.

.. तिळभर नातं हा लेख संपूच नये असे वाटत असताना बैलगाडी व ढवळ्या पवळ्याच्या गळ्यातील घुंगरांची किणकिण मंदावल्याचा भास झाला. या लेखामध्ये लेखिकेने माहेरचा वारसा फारच ताकदीने उभा केला आहे असे निश्चितपणे वाटते कारण लिहिले ते काल्पनिक नाही याचा लेख वाचताना ठायी ठायी साक्षात्कार होतो आणि वाचकही त्या वाटेचा आनंदी वाटसरु होऊन बसतो.

.. ‘दिवस जून-जुलैचे’ या लेखातील प्रत्येक व्यक्ती, घटना, हेंबाडवानाची वगैरे शब्द, पेरणीच्या सरत्यावरील लक्षुम्या, सुतार, लोहारादि कारागिरांची ठिकाणं, आंब्याचं लोणचं घालण्याचा सोहळा, लहरी मिरुगाच्या सचैल पावसाने प्रफुल्लित झालेले शेतकऱ्यांचे चेहरे आदिचा मनमुराद समाचार घेऊन त्या स्मृतींना कलाबतूची झालर लावली.

.. ‘प्राजक्त सडा’ या लेखातील लालित्याचे मनोहर लेणे लेऊन आलेला प्राजक्त लेखिकेने भरभरून फुलविला आहे. श्रावण भाद्रपद मासी जसा तो पहाटेच्या समयी बरसतो तशीच लेखिकेची लेखणी देखील त्याच्या नाजूक फुलांचा दरवळ घेऊन अक्षरश: ओसंडली आहे. लेखिकेने आत्यंतिक तन्मयतेने ती सुगंधी दरवळाची वलयं, अनेक स्मृतींनी बांधून ठेवली आहेत.

.. ‘नामनिराळे गाव’ नावाचा अतिशय साध्या विषयाला धरून असलेला एक खुसखुशीत लेख, नामनिराळ्या गावातील नामनिराळ्या माणसांच्या नावातील गमतीजमातींवर कटाक्ष टाकणारा हलकाफुलका लेख वाचून चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या नाहीत तरच नवल.

.. ‘गोमटे वैराग्य’ मधील गोमट्याचे भावचित्र; ‘भिकारी नाही मी दादी, मी माह्या फुईच्या घरी पावना आलो’ तसेच ‘हो का, ते ठीक आहे पन मी तुह्या नावानं हे भाजी भाकर काढली, तं आता घरात ये, बस जरासा खाऊन घे कसा… ‘, ही निरागस आजीबाईच्या तोंडची वाक्यं आणि अशा अनेक ग्रामीण घाटाच्या जीवनातील सहजतेने समृद्ध झालं आहे. हा लेख वाचून खरोखरीच त्या नवलाईच्या विश्वातील इतर गोमट्या भटक्या पाहुण्यांची आठवण जागी झाली.

.. ’मार्च एक अनुभूति’ हा नुसती वसंत ऋतूची निसर्गातील रम्य पखरणच नाही तर मार्च महिन्यात घडणाऱ्या व्यावहारिक घडामोडीचे सक्षम दर्शन या लेखात घडले आहे. गोष्टी नित्याच्याच पण त्या देखील वाचनीय झाल्या आहेत व आपणही हा अनुभव घेतला आहे असे वाटून जाते. बाळपणीचा काळ सुखाचा म्हणून शाळकरी असताना खाल्लेल्या कैऱ्या तसेच होळी शिमग्याच्या वेळी केलेल्या चाकोल्याच्या माळांच्या उल्लेखांनी वाचकही त्या लेखात समरसून जातो. शासकीय कार्यातही ठराविक वेळी करावयाच्या कामांच्या घेतलेला आढाव्यात आपणही भागीदार होतो/आहे याची जाणीव करून देतो.

.. ‘लंडन ब्रिज’ लेखामुळे बऱ्याच मनोरंजक व ऐतिहासिक गोष्टी समजल्यात. बालपणी अर्थ न समजलेल्या पण सततच्या उच्चारणामुळे स्मरणात राहिलेल्या इंग्रजी कवितेचा भाव आणि अर्थ लेखिकेला गवसला व त्या आनंदीत झाल्या. अशाच प्रकारचा आनंद हा लेख वाचताना वाचकाला होतो. लंडन ब्रिजचं वास्तुशास्त्र, त्यात कालानुरूप झालेले बदल, पुढे अमेरिकेत ब्लॉकस रूपाने पोहचलेला लंडन ब्रिज, हे सर्व वाचून अचंबित व्हायला होते आणि मुख्य म्हणजे लेखिकेने त्याचा सुसूत्र असा घेतलेला आढावा, त्यामुळे लेख वाचनीय झाला आहे. हा लेख वाचताना पु. लं च्या ‘चितळे मास्तर’मधील वर्ड्सवर्थच्या ‘वेस्टमिन्स्टर ब्रिज’ या कवितेची आठवण व्हावी असाच हा ‘लंडन ब्रिज’.

लेखिकेने ग्रामीण बाजाचा हा रथ छानच सजविला आहे. आता ही संस्कृती वर्तमानात अगम्य आणि सांगूनही कुणाला खरं वाटण्यापलीकडची झाली आहे. टिनाच्या गुंड्या ज्या की आता कुणाला आठवतही नसतील तसेच दौत, टाक, चिंदकाच्या भुलाया (बाहुल्या), लाकडी भोवरे, बालपणी कित्येकांनी फुंकलेल्या आंब्याच्या कोयीतील बाटीच्या पुंग्या इत्यादीची आठवण ताजी करीत ग्रामीण स्मरणरंजनाचा सारीपाठ सुरेख मांडला आहे. या पुस्तकाच्या वाचन प्रवासात वाचक सचैल डुंबण्याचा आनंद उपभोगू शकतो.

…. लेखिकेने चितारलेल हे ग्रामीण भागातील जीवन, एक प्रकारे डॉक्युमेंटेशनच आहे. लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक असून, खूप छान असा हा अभिनंदनीय लेखन प्रपंच आहे.

प्रस्तावनेसाठी उपोद्‌घात हा शब्द जुन्या पुस्तकांच्या प्रथम पृष्ठावर असायचा तो पाहून बरे वाटले. डॉ. रा. गो. चवरे यांनी खूप विस्तृत आणि जरा जास्तच लांबलेली प्रस्तावना केली आहे.

.. पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ आणि प्रत्येक कथा सौ. प्रज्ञा सोनखासकर यांच्या समर्पक, सुंदर आणि सुबक रेखाचित्रांनी सजली आहे. त्यामुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भरच पडलेली आहे.

.. पुस्तक बांधणी, छपाई, दोन ओळीतील स्पेस, टाईप (फॉन्ट), जाड कागद ही चांगल्या पुस्तकाची लक्षणं आहेत व त्यातील साहित्याला असलेला मृद्‌गंध हा वाचकांना हवाह‌वासा वाटणारा आहे.

…. लेखिकेच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देऊन येथेच थांबतो.

परिचय : श्री अशोक ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३३३ ☆ अहं या वहम… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख अहं या वहम…। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

(डॉ मुक्ता जी द्वारा रचित एक भजन – ये दुनिया है दो दिन का मेला / स्वर- रुखसार, सौजन्य – तरूनम चैनल)

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३३३ ☆

☆ अहं या वहम… अत्यंत घातक… ☆ डॉ. मुक्ता ☆

‘जल्दी जागना हमेशा फ़ायदेमंद होता है, फिर चाहे वह अपनी नींद से हो; अहं से हो; वहम से हो या  सोए हुए ज़मीर से… इनसे जितनी शीघ्रता से मुक्ति पा ली जाए; शरीर व मन के लिए उपयोगी है।’ जितनी शीघ्रता से मानव भोर होते, सूर्योदय से पूर्व नींद से जाग जाए… स्वास्थ्य-प्रदायक है। ‘जो सोवत है, सो खोवत है’ अर्थात् जो जागता है, वही पाता है। सो! समय से पूर्व जागने वाला व्यक्ति सदैव लाभ प्राप्त करता है और देर तक सोने वाले की हानि होना निश्चित है। यह सार्वभौमिक सत्य है कि कुछ पाने के लिए, कुछ खोना अवश्य पड़ता है। हम अगली सांस तब तक ग्रहण नहीं कर सकते, जब तक हम पहली श्वास का त्याग नहीं करते। प्रकृति की सब वस्तुएं हमें मुफ़्त में प्राप्त होती हैं, पर्याप्त हैं–परंतु संग्रहणीय नहीं हैं। यदि हम सीमा में रहते हुए उनका उपयोग करते हैं, तो उनका अभाव कभी नहीं खलता। परंतु जब हम आवश्यकता से अधिक उनका संग्रह करना प्रारंभ कर देते हैं, तो प्रकृति अपना विकराल रूप दिखा कर, मानव को सचेत करती है कि समय रहते चेत जाओ … अपनी बढ़ती लालसाओं पर अंकुश लगाओ … अपने संसाधनों का अतिरिक्त दोहन मत करो, अन्यथा तुम्हें इसका हर्ज़ाना अथवा दुष्परिणाम अवश्य भुगतना पड़ेगा। परंतु मदहोश मानव उसकी ग़ुहार की ओर ध्यान नहीं देता, बल्कि उपेक्षा भाव दर्शाता है–तो प्रकृति भीषण आपदाओं के रूप में अपना रोष प्रकट करती है।

हरी-भरी धरा को कंक्रीट के जंगल बनाने के कारण तापमान निरंतर बढ़ रहा है; ग्लेशियर पिघल रहे हैं; सुनामी दस्तक दे रहा है; ज्वालामुखी पर्वत फटने से भूकंप आ रहे हैं; सुनामी दस्तक दे रहे हैं; धरती फट रही है और मानव का सर्वस्व सैलाब में बह रहा है। ऐसा प्रतीत हो रहा है कि प्रकृति अपनी असीम वेदना व अथाह दु:ख प्रकट करते हुए आंसू बहा रही है। परंतु फिर भी मानव प्रकृति से खिलवाड़ कर रहा है; अपनी सीमाओं का उल्लंघन कर प्रतिबंधित क्षेत्र में हस्तक्षेप कर रहा है और उसके आक्रोश को समझने की ज़ेहमत नहीं पा रहा, क्योंकि वह चिरनिद्रा में सो रहा है।

अहम् और वहम एक सिक्के के दो पहलू हैं, जिनका चोली-दामन का साथ है। अहं मानव का सबसे बड़ा शत्रु है, जो इस वहम में जीता है कि उससे अधिक बुद्धिमान, समझदार व शक्तिशाली कोई दूसरा हो ही नहीं सकता है। सो! वह पूरी सृष्टि पर अधिपत्य स्थापित कर, अपने अहम् की पुष्टि करना चाहता है। वह अहंनिष्ठ प्राणी केवल अपने बारे में चिंतित रहता है; अपनी सुख-समृद्धि के निमित्त प्रयासरत रहता है तथा दूसरों पर विजय प्राप्त करने के बारे में सोच- विचार कर योजनाएं ही नहीं बनाता, बल्कि उसके कार्य-क्षेत्र में हस्तक्षेप करने की अनाधिकार चेष्टा भी करता है। सो! वह राह में आने वाले प्रत्येक वस्तु व व्यक्ति को मिटा डालना चाहता है; भले ही उसे कितने ही निम्नतम स्तर पर ही क्यों न उतरना पड़े? वह किसी अन्य को समान स्तर पर देख आत्म- नियंत्रण खो बैठता है; अपने आपे से बाहर हो जाता है… मानव-मूल्यों को तज, उचित-अनुचित को नकार सभी सीमाओं को लांघ जाता है। इस स्थिति में मर्यादा भी उसकी राह का रोड़ा नहीं बनती, क्योंकि वह स्वयं को सर्वश्रेष्ठ समझता है … भले ही वह उसका वहम क्यों न हो? लाख प्रयास करने पर भी वह दम्भी मनुष्य उस स्वनिर्मित चक्रव्यूह से बाहर निकलना ही नहीं चाहता। सो! ऐसे अहंनिष्ठ व्यक्ति का व्यवहार सामान्य कैसे रह सकता है और वह अपनी अंतरात्मा की आवाज़ कैसे सुन सकता है? उसके लिए अच्छा-बुरा, पाप-पुण्य कोई मायने नहीं रखता। वह बॉस की भांति केवल स्वयं को सदैव ठीक मानता है… अपनी सोच को उचित ठहराता है,  क्योंकि ग़लती तो वह कभी कर ही नहीं सकता। ऐसे व्यक्ति को यदि आप हिटलर की संज्ञा भी देंगे, तो भी अतिशयोक्ति नहीं होगी।

काश! मानव सोच पाता कि संसार में जो जन्मा है, उसकी मृत्यु अवश्यंभावी है। संसार रूपी रंगमंच पर सबको अपना क़िरदार अदा कर, ज़िदगी के सफ़र पर चल देना है। कोई भी व्यक्ति इस संसार में सदैव नहीं रहा तथा मृत्यु समय आने पर उसे लाख परदों के पीछे से भी ढूंढ लेती है। सो! मानव को अपना अहं त्याग कर, सबको समान दृष्टि से देखना चाहिए; उनसे अच्छा व्यवहार करना चाहिए, क्योंकि जैसा व्यवहार आप दूसरों के साथ करते हैं, वही प्रतिध्वनि के रूप में लौट कर आपके पास आता है।

‘जैसा बोओगे, वैसा काटोगे’ अथवा ‘बोया पेड़ बबूल का, आम कहां से खाए’ अर्थात् जैसे कर्म करोगे, वैसा ही फल आपको प्राप्त होगा। इसलिए जो व्यक्ति आप का अहित चाहता है; आपके पथ में कांटे बिछा कर अवरोध उत्पन्न करता है; उस स्थिति में आपके लिए वैसा ही प्रत्युत्तर न देना बेहतर है,

अर्थात् अपना रास्ता बदल लेना अधिक कारग़र है, क्योंकि मानव को अपने कृत-कर्मों के अनुसार फल अवश्य मिलता है। यदि कोई आपके साथ बुरा भी करता है, तो भी आपको उसके साथ अच्छा व्यवहार करना चाहिए…यही जीने का सबसे सर्वश्रेष्ठ व उत्तमोत्तम मार्ग है। परंतु कुछ परिस्थितियां अपवाद भी हो सकती हैं।

वहम सब रोगों की जड़ है। वहम केवल एक आदत नहीं… स्वयं को, अपनी सोच को ठीक व उचित समझने का मात्र जज़्बा नहीं है। यह भ्रम की वह स्थिति है, जिसमें अवगाहन कर मानव अपने सम्मुख सबको हेय समझता है तथा उनके अस्तित्व को नकार देता है। वह लाज-मर्यादा तज, जीवन-मूल्यों का तिरस्कार कर, सब पर दोषारोपण कर सुक़ून पाता है तथा सबको एक ही लाठी से हांकने में विश्वास रखता है। उसका सुप्त अहं व मृत्त ज़मीर उसके सोचने-समझने की शक्ति का हरण कर लेता है। इस स्थिति में सब उससे घृणा करने लग जाते हैं; कोई भी उससे बात तक करना पसंद नहीं करना चाहता। परंतु एक लंबे अंतराल के पश्चात् जब उसकी शारीरिक शक्तियां क्षीण हो जाती है; मनो- मस्तिष्क साथ नहीं देता… एकांत की त्रासदी झेलता वह अहंनिष्ठ शख़्स अपनों के बीच; अपनों के साथ जीवन का आखिरी समय व्यतीत करना चाहता है, परंतु उसके हाथ केवल निराशा ही लगती है। इन परिस्थितियों में वह अपना मानसिक संतुलन खो बैठता है…पागलों जैसा असामान्य व्यवहार करने लगता है और प्रायश्चित-स्वरूप उन्हें जीवन के समस्त सुख प्रदान कर, अपने दायित्व का निर्वहन करना चाहता है…अपने सुख-दु:ख साझे करना तथा अपनी विवशता व अप्रत्याशित परिस्थितियों से अवगत कराना; उसकी प्राथमिकता बन जाती है… परंतु सब निष्फल। उसके आत्मज उस स्थिति में उसे अतिव्यस्त, आत्मनिष्ठ, आत्ममुग्ध व आत्मलीन  भासते हैं… जिसका अंजाम उसे नियति के अनुसार अपने कर्मों के अनुरूप अवश्य भुगतना पड़ता है।

काश! मानव का ज़मीर ज़िंदा रहता… संवेदनाएं मृत्त नहीं होतीं… संबंधों की गरिमा बनी रहती… रिश्तों की अहमियत बरक़रार रहती..जीवन-मूल्य प्रासंगिक रहते, तो मानव संवेदनहीनता के दायरे में प्रवेश करके दुष्कर्म, फ़िरौती, कन्या भ्रूण-हत्या आदि के हादसों को अंजाम न देता; बालिकाओं की अस्मत सुरक्षित रहती; मां, बहन, बेटी को मात्र उपयोगिता की वस्तु न समझा-स्वीकारा जाता, लूट-खसोट, फ़िरौती, दुष्कर्म व हत्या की घटनाएं आम नहीं होतीं और उन पर अंकुश लग पाता। परंतु यह तभी संभव हो सकता था; यदि हमारा ज़मीर ज़िंदा होता।

आइए! लौट चलें ,अपनी संस्कृति की ओर… जहां ज्ञान-रूपी सूर्योदय सबसे पहले होता था। जहां सांस्कृतिक एकता के रूप में, विविधता में एकता विद्यमान थी। सभी धर्म-जातियों के लोग मिल-जुल कर रहते थे। पारस्परिक स्नेह-सौहार्द व मर-मिटने का भाव था, सब मर्यादा की सीमा-रेखा का स्वेच्छा से पालन करते थे और अधिकारों के स्थान पर कर्तव्यनिष्ठता व्याप्त थी। सब परमात्म-सत्ता के सम्मुख नत रहते थे…इसलिए असामान्य व अमानवीय हादसे घटित नहीं होते थे और समाज में समन्वय व सामंजस्यता व्याप्त रहती थी।

इए! हम लौट चलें! अपने स्वर्णिम अतीत की ओर.. जहां सुक़ून था, शांति थी, सुख का साम्राज्य था। मानव राग-द्वेष व स्व-पर से ऊपर था; वहां नकारात्मकता का लेशमात्र भी स्थान नहीं था तथा सर्वहिताय व सर्वमंगल की भावनाएं जन-मानस में निहित थीं। सो! हमें अहं का त्याग कर, वहम से मुक्ति प्राप्त करने का प्रयास करना चाहिए, क्योंकि प्राणी-मात्र में परमात्म-सत्ता उसी प्रकार व्याप्त है, जैसे सूर्य आकाश में दिखाई पड़ता है और वह विभिन्न घड़ो के जल में भी समान रूप में प्रति- भासित होता है। इसलिए हमें सम्पूर्ण जीव-जगत् में उस ब्रह्म की सत्ता को अनुभव करना चाहिए, ताकि ऐसे सुदृढ़ समाज की संरचना हो सके; जहां सत्यम्, शिवम्, सुंदरम् का साम्राज्य हो।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares