☆ “नकळत विसरली जाणारी गोष्ट…” – लेखक: श्री क्षणस्थ नील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आज सर्वजण योगेश्वराला भजतात… पण एक गोष्ट नकळत विसरतात!!!
कुणालाही आठवत नाही की त्याच दिवशी जन्माला आलेली एक मुलगी जी कृष्णाऐवजी अदलाबदल केली गेली होती…
कृष्णाचे आयुष्य अनमोल होते.
पण ही मुलगी जणू त्याला जन्माला घालण्यासाठी जन्माला आली होती.
– – ‘ योगमाया ‘
आज केवळ कृष्णाचा वाढदिवस नाही तर योगमायेचाही वाढदिवस आहे. योगमाया कंसाच्या तावडीतून सुटली अन् स्वर्गाकडे उड्डाण केले आणि जाताना कंसाला आकाशवाणी करून सावध केले की ‘ तुझा मारेकरी जन्माला आला आहे.
शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेले नाही की ती सुद्धा कृष्णाच्या इतर भावंडांप्रमाणे मारली गेली.
Incarnation!
Twin flames!!
Soulmate!!!
योगमाया देखील आदिशक्तीचा अवतार होती. जी काही जुने वचन पाळण्यासाठी भगवान विष्णूच्या अवतारासह जन्माला आली. जेव्हा कंसाने तिचे पाय पकडले आणि तिला जमिनीवर फेकले तेव्हा ती स्वर्गाच्या दिशेने उडाली आणि म्हणाली,
“कंसा, तुझ्या मारेकऱ्याने आधीच जन्म घेतला आहे. मी तुला ठार मारू शकते पण तू माझ्या पायाला स्पर्श असल्याने मी त्याला तुझ्या विनम्रतेची अभिव्यक्ती मानते आणि तुला क्षमा करते.”
कृष्णाचा जन्म रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त जागेत झाला. तथापि, त्याच्या जन्माच्या क्षणी, सर्व रक्षक झोपले, साखळया तुटल्या आणि बंद केलेले दरवाजे हळूवारपणे उघडले.
त्याचप्रमाणे, कृष्ण (चेतना, जागरूकता) आपल्या अंत: करणात जन्म घेताच सर्व अंधकार (नकारात्मकता) नाहीसा होतो.
.. सर्व साखळ्या (मी,माझा आदी अहंभाव) तुटल्या आहेत.
आणि तुरुंगातील सर्व दरवाजे आपण स्वतःमध्ये ठेवतो ते (जात, व्यवसाय, संबंध इ.) उघडले जातात.
जगातील सर्वात त्यागसंपन्न पुरुष म्हणजे कृष्ण!!!
.. आई,बाप,गावशीव, राज्य वंश,मैत्रिणी,गोपिका,गोप वेळप्रसंगी सॊडून द्याव्या लागल्या…
पण तो निर्मोही सहजपणे सोडत गेला…गुंतला नाही!!!
Non Judgemental होणे मी त्याच्याकडून शिकतोय!!!
.. त्या योगमायेपासून,कृष्णापासून हेच शिकतोय!!!
.. की गुंतू नका… कार्य करत राहा.
लेखक: श्री क्षणस्थ नील
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “धूसर…” – लेखक – श्री सचिन श. देशपांडे☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
जानकीबाई ‘घरकुल’ ह्या वृद्धाश्रमात, पोळ्या करायला जायच्या. रोज सकाळच्याच पोळ्या असत जानकीबाईंना, साधारण साठ – सत्तरच्या आसपास. एवढ्या पोळ्या पुरत असत कारण, कोणी एक खाई तर कोणीतरी कधीतरीच दोन. त्यामुळे पन्नासेक पिकली डोकी असलेल्या त्या वृद्धाश्रमात, इतक्या पोळ्या सहज पुरत असत. संध्याकाळी बरेचजण तसेही फलाहारच करत, तर अगदी काही जणच भात खात असत. पण म्हणजे थोडक्यात जानकीबाईंचं, एक वेळच कामावर जाऊन भागत असे.
तर आजही जानकीबाई नेहमीप्रमाणे पोळ्या करायला आल्या खर्या, पण नेहमीची तरतरी काही नव्हती चेहर्यावर त्यांच्या. वृद्धाश्रमाच्या संचालिकाबाईंच्या ते लक्षात आलं… नी त्यांनी विचारलं जानकीबाईंना, त्यांच्या अशा मुड आॅफचं कारण. जानकीबाईंनी पदर लावला डोळ्यांना नी म्हणाल्या… “लेकाला सांगितलं मी की आज एक दिवस इथल्या सगळ्यांना, पोळ्यांना छानपैकी तूप लाऊन देते… तशाही रोज कोरड्या नी पांढरटच पोळ्या खातात ही सगळी मंडळी… तर तुपाचा जो काही खर्च होईल तो देशील का?…”
तर लेक मला त्याचेच खर्च ऐकवू लागला… मलाही माहितीये की तो एका पतपेढीत शिपाई आहे… त्याची बायको घरीच शिवणकाम करुन, संसाराला थोडाफार हातभार लावते… आणि मला इथे जे काय मिळतात ते… आमची तशीही मारामारच असते गरजा भागवायची… पण म्हंटलं एखाद दिवस जरा काय हरकत आहे, तुपाचा खर्च करायला… करु आपलं आपल्यात अॅडजेस्ट “.
इतकं बोलून पुन्हा डोळ्यांना पदर लावला जानकीबाईंनी, आणि तेवढ्यात कसलासा खमंग नी गोडसर वास आला त्यांना स्वैपाकघरातून. जानकीबाईंनी प्रश्नार्थक बघितलं संचालिकाबाईंकडे… त्याही हसल्या नी खुणेनेच त्यांनी जानकीबाईंना, स्वैपाकघरात जायला सांगितलं. जानकीबाई घाईतच आत गेल्या… आणि हबकल्याच आपल्या लेकाला, सुनेला आणि काॅलेज शिकणार्या नातवाला तिथे बघून. सुन आणि नातू प्रत्येक ताटात पोळी… अ हं… पुरणपोळी वाढत होते. आणि लेक प्रत्येक पोळीवर तुप वाढत होता, अगदी सढळपणे. कोणाला तुप, कोणाला दूध आणि कोणाकोणाला तुप अन् दूध दोन्ही… हे आधीच विचारुन त्याप्रमाणेच ताटं वाढली जात होती. दूध हवं असणार्यांच्या ताटात, दूध भरलेली वाटीही होती. जानकीबाई अगदी पुरत्या भांबावल्या होत्या आता. आपल्या गोंधळलेल्या आईकडे बघून दिलखुलास हसतहसतच, लेक आईपाशी गेला. तोपर्यंत संचालिकाबाईही जानकीबाईंच्या पाठी येऊन उभ्या राहिलेल्या. त्या म्हणाल्या… “जानकीबाई… अहो मला कालच फोन आला होता तुमच्या लेकाचा, आणि त्याने मला सांगितलं होतं की तो हे सगळं घेऊन येणारेय आज इथे… तूम्हाला मात्र काहीही न सांगण्याबद्दल विनंती केली होती त्याने मला”.
जानकीबाईंचा लेक त्यांच्याकडे बघत बोलू लागला…
“आई अगं तू तुपाबद्दल बोललीस… तेव्हाच अगदी माझ्या मनात आलं होतं की, तुपासोबत तर मग पुरणपोळीच हवी… पण म्हंटलं तुला जरा धक्का द्यावा, म्हणून मग तुला नाही जमणार म्हणालो मी… आणि खर्चाचे पाढे वाचले तुझ्यासमोर”.
“अरे पण जे काही खर्च सांगितलेस मला, ते तर खरेच होते ना?… मग आता हा एवढा खर्च इथे झाल्यावर, तिथे कसं काय भागवायचं?”.
“अगं आपल्या घरापासून दोन गल्ल्या सोडून तो नवा टाॅवर झालाय ना, तिथेच मला रात्रीची सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी मिळतीये… रात्री आठ ते सकाळी आठ… बाराशे तरी सुटतील तिथून”.
“म्हणजे तू सकाळी नऊ ते चार पतपेढीत काम करणार… घरी येऊन सुनेनी शिवलेली कापडं लोकांकडे पोहोचती करणार, ते सहाला घरी येणार… आणि पुन्हा आठला घराबाहेर पडणार रात्रीच्या ड्युटीला जायला?… अरे नको रे इतका ताण घेऊ”.
“अगं आई तुझी कुठलीही इच्छा अपुरी राहू नये म्हणून… मी मधल्या त्या सहा ते आठ वेळेतही, कुठे काय मिळतंय का ते बघतोय”.
जानकीबाईंनी डोळे वटारत, लेकाच्या दंडावर जोराची चापटी मारली. सुनेनी आणि नातवानी आत्तापर्यंत वाढलेली ताटं, टेबलवर नेऊन ठेवलेली. सगळी मंडळीही एकेक करुन येत, आता जागेवर बसलेली… ताटात पुरणपोळी पाहून खुललेली. टेबलावर मांडलेल्या खुर्च्यांपैकी, मधली खुर्ची मात्र अजूनही रिकामीच होती. कोणीच बसलेलं नव्हतं तिथे, समोर वाढलेलं ताट असूनही. जानकीबाईंनी काहीतरी उमजून, फक्त पाहिलं लेकाकडे… आणि लेकाने होकारार्थी मान हलवली. जानकीबाईंनी पुन्हा पदर लावला डोळ्यांना, नी त्या जाऊन बसल्या रिकाम्या जागेवर.
नेहमीप्रमाणे वदनी कवळ घेता म्हणायला उठलेले एक आजोबा, सगळ्यांना उद्देशून म्हणाले… “आपल्या सगळ्या लोकांतून… खर्याअर्थी सगळ्यात श्रीमंत अशा जानकीबाईंना, खूप खूप शुभेच्छा आजच्या ‘ज्येष्ठ नागरीक दिनाच्या’… आणि त्यांच्या लेकाकडील ही मनाची श्रीमंती त्याच्या लेकातही, म्हणजेच जानकीबाईंच्या नातवातही अर्थातच उतरली असेल… म्हणून जानकीबाईंच्या सुनेचंही आत्ताच अभिनंदन करतो, तिच्या नशिबी पुढे कधीही वृद्धाश्रम नाही म्हणून “.
…. इतकं बोलून रोज खणखणीत आवाज लावणार्या आजोबांनी, आज काहीशा दाटल्या आवाजातच वदनी कवळ घेता सुरु केलं होतं… ताटावर बसलेल्या जानकीबाईंच्या, अन् वाढायला उभ्या त्यांच्या सुनेच्या भरुन आलेल्या डोळ्यांतून… ‘धूसर’ होत जात.
लेखक: श्री सचिन श. देशपांडे
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’तृप्तता…’ – लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
ते दोघे मूळचे नागपूरचे, सध्या पुण्यात कॉट बेसिसवर राहायला. सगळं रुटीन ठरलेलं… सकाळी लवकर उठून आवरायचं, नायतर टॉयलेटला गर्दी होते, मग कोपऱ्यावर जाऊन नाश्ता करायचा, कधी पोहे, कधी उपमा, साबुदाणा खिचडी, ब्रेड पॅटिस, अगदीच कंटाळा आला की इडली, वडा सांबार….. एक कडक चहा…. तिथून सरळ ऑफिसमध्ये. १ ला डबेवाला येणार. मग लंच, ४ ला चौकात जाऊन चहा….. ६ ला हॉस्टेल…. मोबाईल कुटणे, घरी फोन करणे, इस्त्रीचे कपडे आणणे, येताना एखादा कटिंग, क्रीमरोल नाहीतर वाटी केक….. ९ ला डबा येईल की डिनर….. रात्री बेडवर आडवं पडून एखादा सिनेमा, तोही अर्धवट…. ११ नंतर कधीही झोप…. सगळं अगदी ठरलेल्या प्रमाणे….
खरं तर तेच तेच खाऊन, धोपट मार्गाने जाऊन दोघांना प्रचंड कंटाळा आला होता. गोडधोड खावं, माणसांत मिसळून जावं, मनाला शांतता मिळावी असं आतून वाटत होतं… जसं कॉलेजमध्ये असताना अनोळखी लग्नात किंवा कार्यात जाऊन मस्त पोटभर जेऊन यायचं, असलं काहीतरी शिजत होतं…
रविवार होता… सकाळी निवांतपणे आवरून चक्कर मारायला बाहेर पडले. जवळच एक छोटा कार्याचा हॉल होता… लगबग दिसली, गजरे, लफ्फे नेसलेल्या बायका, झब्बे सुरवर, जॅकेट, पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी घातलेले बापे….. परकर पोलक्यात आणि शिवलेल्या धोतरात बारकी पोरी पोरं…..
यांच्या डोक्यात सोडियम व्हेपर लागला… गडी खुश…. रूममध्ये येऊन कुर्ता, सुरवर घातला, डिओ ने अंघोळ केली….. अहहह, वऱ्हाडी जणू….
शून्य मिनिटात हॉल गाठला, सहजपणे दरवाजातून आत गेले… दारात एक तरुण उभा होता, अर्थातच यजमान घरातला… यांनी नमस्कार केला… त्यानेही नमस्कार केला… आत गेले…
हा तरुण त्यांच्या मागे गेला, म्हणाला “तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे, तुम्ही कोणाकडून आहात?…..”
यांची किंचित टरकली….. तरी ध्येयवादी होते त्यामुळे बिनधास्त सांगितलं…. “मुलाचे मित्र आहोत…”
“ओहहहह या या” म्हणत त्या तरुण मुलाने त्यांना बसायला सांगितलं…
हे बोलणं संपलं…..गुरुजींची आरोळी झाली, “ज्यांना पथ्यपाणी असेल त्यांनी जेऊन घ्यावं, मुहूर्ताला वेळ आहे….” एक हशा पिकला, सत्तरीच्या पुढची बरीच यंग इंडिया तिथे होती…. तशी मोजकीच माणसं उपस्थित होती, तीन पिढ्या एकत्र दिसत होत्या… हे दोघे मागे थांबले होते… अगदीच दगा फटका झाला तर कन्नी कापायची…
तो तरुण त्या दोघांच्या जवळ गेला, म्हणाला, “तुम्हाला घाई असेल तर वरच्या हॉलमध्ये जेवायची सोय केली आहे, मुहूर्ताला वेळ आहे, तुम्ही जेऊन घ्या…..”
“नको नको, आहे वेळ अजून. लग्न लागलं की जेवू….”
“अहो ऐका माझं, जेऊन घ्या….”
हो, नाही करत हे दोघे जेवायला गेले…. मोजक्या पदार्थांचा बुफे मांडला होता… सनईचे सूर, उदबत्तीचा घमघमाट होता… वरण, भात… छोटा बटाटावडा आणि हिरवी चटणी, सफरचंदाची कोशिंबीर, मटार उसळ अळणी आणि तर्री वाली, पोळी, दही बुत्ती, सीताफळ रबडी… अहहहहह कसला साधा पण रुचकर मेन्यू आहे असं म्हणत, पान वाढून घेऊन, टेबल खुर्चीवर आसनस्थ झाले….
“ए पाणी पिऊन घे रे, म्हणजे रबडी ओरपता येईल…”
“एक, दोन, तीन, चार…..”
“ए अस मोजू नये रे,” असले डायलॉग मारून, तड येइपर्यंत यथेच्छ जेवले, हात धुवून बनारस पान तोंडात….
तो तरुण इतर पाहुण्यांशी बोलत पुन्हा त्यांच्यापाशी आला…. “काय पोटभर झालं ना जेवण??… सगळं ठीक आहे ना?….”
इतकं आदरातिथ्य बघून या दोघांना गलबलून आलं, तोंडातले पान एका गालात सरकवून…. “वाह अगदी मोजके पदार्थ पण अप्रतिम चव आहे, तृप्त झालो” अशी पावती दिली….
तो तरुण म्हणाला, “चला आता मुहूर्त आला….”
जवळपास वरचा हॉल खाली आला…. गुरुजींनी आरोळी दिली, “नवरा मुलगा आणि नवरीला आणा…..”
सर्वत्र हशा पिकला…. या दोघांनी एकमेकांकडे बघितलं… काही कळायला मार्ग नाही… तो तरुण या दोघांच्या मागे उभा राहिला..
स्टेजवर नवरा मुलगा, मुलगी आले… लग्नी कपडे, मुंडावळ्या, हातात हार…. मंगलाष्टके झाली, सगळ्या मंडळींना कौतुक होतं या सोहळ्याचं….
मुहूर्तावर लग्न लागलं…. हार घातले गेले…. सर्वांच्या कडे तोंड करून दाम्पत्य उभं राहिलं… ७५ गाठलेला वर… सत्तरीची वधू… गोड दिसत होते दोघे..
त्यांना बघून हे दोघे अवाक झाले होते…. हे काय भलतंच सुरू आहे, पोबारा करायची वेळ आली आहे, असं मनात आणत होते…. इतक्यात तो तरुण, या दोघांना मागून म्हणाला, “नवरदेव तुमचा मित्र आहे ना… मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून आज पुन्हा तसाच सोहळा केला…. तुम्ही आत आलात आणि म्हणालात की नवरदेवाचे मित्र आहोत…. तेव्हाच मला समजलं की तुम्ही आमच्या कोणाचेच कोणी नाहीत. पण काळजी करू नका, तुमचा हेतू मला कळला…. मी पण याच वयात आहे….
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देव कोणत्या रुपात येईल सांगता येत नाही आणि भोजनाने तृप्त झालेल्या माणसांचे आशीर्वाद, माझ्या आई वडिलांना मिळाले आहेत, यात मला समाधान आहे…”
काय बोलावं हे न समजता, त्या दोघांनी त्या तरुणाचे आभार मानले आणि नमस्कार करून बाहेर पडले, तृप्त होऊन….. आणि एक प्रकारची मानसिक शांतता त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर होती….
☆ “कृष्णार्पण.. कृष्णार्पण.. कृष्णार्पण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
गोष्ट कधीची ते कुणी कधी नव्हतं सांगितलं …
पण लहानपणच्या आजीच्या गोष्टीतली ही खूप आवडती गोष्ट… सांगायला आजीला आवडायची आणि ऐकायला आम्हाला… आजी कुठलीही असो… पण ही सवय असायचीच..
…. काहीही आपलं कृष्णार्पण म्हणायचं.. जेवण झालं की.. एखादं काम यशस्वी झालं की… अगदी दारावर कुणी आलं आणि भिक्षा.. माधुकरी दिली तरीही कृष्णार्पण..
‘ असं का?? ‘ म्हटलं तर फक्त हसून द्यायचं.. आणि गोष्ट तशी साधीच होती…
एक कीर्तनकार देवळात कीर्तन करायचे तेव्हा देवळातल्या गर्दीत एक म्हातारी एका कोपऱ्यात वाती वळत कीर्तन ऐकायची..
.. एक वात करून बाजूला ठेवली की पुटपुटायची ओठातल्या ओठात… कृष्णार्पण…
कुणाच्या काय.. तिच्याही नकळत घडायचं हे… कीर्तन संपलं की देवाला नमस्कार करायचा, बुवांच्या पाया पडायचं आणि आपलं सामान गुंडाळून घरी परतायचं.
दिवसामागून दिवस जात होते, आणि एक दिवस बुवांचं कीर्तन असं काही रंगलं… आजी ऐकता ऐकता मान डोलवत वाती वळत होती… कृष्णार्पण म्हणत होती…
…. आणि अचानक पुष्पक विमान की हो उतरलं देवळाच्या परिसरात. सगळे अवाक्… कुणासाठी आलं.. बुवांसाठीच असणार.. बुवांनी गाभाऱ्याकडे वळून दंडवत घातलं आणि सगळ्यांचा निरोप घेतल्यासारखं करत पुष्पक विमानाकडे प्रस्थान ठेवलं…
बसलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांमधून वाट काढत दूत पुढे जात होते.. प्रत्येकाच्या मनात उमललेली, ‘माझ्यासाठी …?’ ही आशा क्षणात मालवत होती… ‘आपण नाही तर कोण???’ उत्सुकतेने नजर दूतांचा मागोवा घेत होती… कोण…?
‘आज्जी… आजी…’
‘ काय रे..? कृष्णार्पण..’ वात जुडीत ठेवत आजी विचारत्या झाल्या..
‘ तुम्हाला न्यायला आलोय…’
‘ थांब रे बाबा.. ह्या दोन वाती झाल्या की झालंच… बुवांचं कीर्तन का थांबलंय…? ’
‘ देवांनी बोलावणं धाडलंय… ‘
‘ बुवाsss ’…. आजींनी वर बघितलं तर बुवा हातात हार आणि कपाळावर नाम काढायची तार घेऊन नतमस्तक उभे होते…
‘आजी, चला…’
एव्हाना वातींची जुडी झाली होती.. कृष्णार्पण म्हणत आजींनी ती कनवटीला लावली… चष्म्याच्या भिंगातून बारीक डोळ्याने सगळं न्याहाळत बोलल्या,
‘ देवाचं बोलावणं … निघते आता…’
का..
कशाला..
कुठे..
कसलाच प्रश्न ना मनात आला आजींच्या ना चेहेऱ्यावर.. ना ओठांवर…
…. ‘ तुकारामांना आलं होतं विमान … तसंच त्या आजींना ही … नशीबवान गो बाय…कृष्णार्पण…’ माझी आजी सुस्कारायची..
खूप मोठी होईपर्यंत कधी कळलंच नाही… नक्की गोष्टीत काय घडलं आणि का घडलं…?
दरम्यान आजीही देवाघरी गेली…
…. एकदा अशीच गावी गेले होते… गावचं देऊळ आमच्या वाड्याच्या चौकात …
देवळात बुवा आजीचीच गोष्ट सांगत होते..
“कृष्णार्पण… कृष्णार्पण … कृष्णार्पण…”
.. मी क्षणात जीवाचा कान करून खांबाला टेकले… एव्हढ्या सगळ्यांमध्ये देवांनी पुष्पक आजींसाठीच धाडलं…
.. बुवा बोलत होते… आयुष्याचा प्रत्येक क्षण निरिच्छपणे जगत आजी कृष्णाला अर्पण करत होत्या… आयुष्य जसं येत होतं तशा सामोऱ्या जात होत्या.. “का रे बाबा मीच.. “म्हणून विचारत नव्हत्या….. मिळाल्याची ना असोशी होती.. ना न मिळाल्याची खंत… इतकं की देवाचं बोलावणंही कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य झालं…
☆ “अधिपत्य” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉल मध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे, सासू सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे, पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी, मुलांची बस येणार नव्हती, सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती, तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येतांना मुलांना घेऊन येऊ”
नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं, लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे, त्यानंतर बहुदा पहिल्यांदा दोघे बाहेर जात होते, एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना, तिने छानपैकी तयारी केली, दोघेही निघाले, मुलांना शाळेत सोडलं, तिला खूप वेगळं वाटत होतं, स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागायची, पण मग सासू सासरे घरात नाही असं आठवलं की परत निर्धास्त होई, त्याने मॉलकडे गाडी वळवली, मॉल मधली मोठमोठे शॉप बघत दोघे चालत होते, ती तिथल्या बायकाही बघत होती, वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस..मेकप मध्ये असलेल्या तिच्यातून अधिक वयाच्या बायका, एकदम मॉडर्न..अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती,जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती, पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…
एका दुकानापाशी थांबली, होम डेकोर चं साहित्य होतं तिथे, ती हात लावून एकेक बघत असतांना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे, काहीं कामाचं नाही, चल इथून” ते प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”
“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं..तू चल इथून..”
ती निघाली,
पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,
चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली,
पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला..
तो म्हणाला, “जड आहे खूप”
“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून”
“असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल”
तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली,
नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले,
ती म्हणाली मी मुलं खातात तसा पिझ्झा खाणार,
तो म्हणाला, मी ऑर्डर देऊन येतो..
“मी जाऊ का? तुम्ही बसा”
तो हसला,
“तुला नाही जमणार..मॉल मध्ये आहोत आपण, कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही..”
तो म्हणाला, तीही हसली..तिनेही आपलं “न जमणं” मान्यच केलेलं..
तो काउंटर वर गेला, गर्दी होती तिथे,
ती आजूबाजूला बघू लागली,
एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता,
मॉलमध्ये त्या फ्लोर च्या मधोमध एक छोटासा स्टेज होता, आजूबाजूला बरीच गर्दी होती, माईकवरुन आवाज येत हो..
काय असेल? तिला कुतूहल वाटलं..
नवरा लाईनमध्ये उभा होता, त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली,
“Now next contestant? Please step forward”
तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते, सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरीरीने भाग घेत होत्या, ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली तिला कळलंच नाही, तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला..
अरे देवा, हे कुठलं संकट…!
ती मागे फिरू बघत होती पण तो मुलगा ओरडला,
“ओह मॅडम, तिकडे कुठे, इकडे या”
ते ऐकून ती अजूनच घाबरली,
स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली, तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं…
त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता,
इंग्रजीमधले अवघड स्पेल्लिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते, ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता..
तिला दरदरून घाम फुटला,
सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, ला कुठे काय येत होतं?
त्यांना पहिला शब्द दिला..
लेफ्टनंट…
सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं,
तिला आठवलं,
सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता, त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली, तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं..
तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं,
बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,
पुढचं स्पेल्लिंग, बुके..
तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिले..ते तिच्या लक्षात होतं,
एक बाई आऊट झाली,
आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली,
पुढचं स्पेलिंग, रेस्टरन्ट..
तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं, डोळ्यात पाणी जमू लागलं..
नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोकून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात..फक्त नजर तीक्ष्ण हवी”
तिला येईना, तिने आजूबाजूला पाहिलं,
लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,
“कॉंटिनेंटल restaurant”
तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं..
दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,
ती जिंकली,
सर्वांनी टाळ्या वाजवल्या,
तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,
माईकवर तिचं नाव ऐकलं तसा तो ट्रे टेबलवर ठेऊन तिकडे पळाला,
त्याला सगळं समजलं, तो हैराण झाला..
सर्वांनी तिचं अभिनंदन केलं,
सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती, मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…
ती आनंदाने त्याच्यापाशी आली,
“तू आणि इंग्रजी स्पेल्लिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेल्लिंग विचारलेली की काय? हा हा हा” तो या गोष्टीकडे गम्मत म्हणून बघून हसत होता,
“अशी स्पेल्लिंग होती जी तुम्हालाही जमली नसती”
“मग तुला कशी जमली?”
“कसं आहे ना,
आजवर तूला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही हेच ऐकत होते आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला..तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी..पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले…कदाचित, उशिराच…”
तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..
नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला, सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला, काही जमेना..
तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,
“सोडा, तुम्हाला नाही जमणार”
जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, *अधिपत्य गाजवणं * म्हणतात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “Less luggage, more comfort…” – लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
“Less luggage, more comfort…”
वयाच्या ८९ व्या वर्षी ती शेवटच्या ग्लानीत होती. काही शेवटचे क्षणच उरले असावेत बहुधा. तिने किंचित डोळे उघडले.
तो जवळच होता. नुकताच आला असावा कदाचित.“चला, निघूया का आपण? मलाही उशीर होतोय. काही उरलंसुरलं असेल तर….” तो किंचित हसला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “तसं फार काही नाही पण मी काहींना माफ करणार नाही मरेपर्यंत…ती वाशीची कुमुद, माई सावंत, दिगंबर मुसळे आणि विद्याताई….”
“का बुवा?” मरणासन्न अवस्थेतही तिचा तो निर्धार बघून त्याला हसू आवरेना..
“का म्हणजे काय? या सगळ्यांनी आयुष्यभर छळलंय मला. अपमान, पदोपदी अपमान केलेत. तोंडाला येईल ते बोललेत. माझ्या माहेरचे उध्दार केलेत. प्रॉपर्टीवरुन वीस पंचवीस वर्षे कोर्टकज्जे चालवलेत हरामखोरांनी. त्या विद्याने तर माझा नवरा…. कधीच माफ करणार नाही”
तो उठला होता तो क्षणभर बसला. त्याने तिचा हात नीट धरला, “बरं…पण आता तुझ्या माफ न करण्यानं काय होईल? त्यावेळी तु प्रतिकार करु शकली नाहीस. नंतर कधी केला नाही. आणि आता माफ न करण्याचं ओझं शिरावर कोण घेऊन बसलंय? कुमुद याक्षणी वृध्दाश्रमात खितपत आहे. विद्याताई लंडनला मुलीकडे आहे मजेत असं तुला वाटतंय पण तिथे ती हक्काची मोलकरीण झालीये, वैतागलीये पण बोलणार कुणाला? दिगंबर मुसळे निजधामाला जाऊन दहा वर्षे झाली. माई सावंत अशाच कुठल्यातरी अज्ञातवासात…. नियती बघते काय ते? आणि तु तरी कुठे गं धुतल्या तांदळासारखी आहेस? तुझ्या हातूनही असंख्य चुका, अपमान झालेच आहेत की…. तु त्यांना माफ न करुन आता काहीच फरक पडत नाही. पण तुझ्या माथ्यावर ओझं मात्र झालंय खूप… ऐक एक, ते ओझं इथेच टाक, माफ कर आणि चल माझ्यासोबत”
“तुला काय जातंय बोलायला? मी सोसलंय”
“हो मान्य आहे. पण आता काय? एका ठराविक क्षणी याला काहीच अर्थ उरत नसतो. तु माफ न करुन आता काय होणार आहे नेमकं? तुला तर साधं बोटंही हलवता येत नाही. इथून जाताना ही विषारी आणि विखारी ओझी का नेतेयस? त्यावर पुढे खूप व्याज वाढतं. शिक्षा देणारी ती नियती आहे. तू नव्हेस…. तुला एक सांगू? प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. Less luggage, more comfort…”
ती अस्फुट हसली…. “करते रे बाबा माफ सगळ्यांना… ओझी कधीतरी उतरवायला हवीतच. हो ना?”
“परफेक्ट…” तो म्हणाला… आणि अर्धवट ग्लानीतला तिचा देह आता चिरनिद्रेत जाऊ लागला… तो एव्हाना तिला घेऊन खोलीबाहेर पडला.. आता ओझं हलके झाले होते…
☆
लेखक: श्री सचिन मधुकर परांजपे
(पालघर)
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते: “बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली? ”
मैत्रीण म्हणाली, “काहीच नाही! “
तेव्हा ती विचारते, “हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्या लेखी तुझी काही किंमतच नाही का? “
हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते.
संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की बायकोचा चेहरा उतरलेला आहे. मग दोघांमध्ये वाद होतो. एकमेकांना दोष दिले जातात.
शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो.
तुम्हाला माहितीये सगळ्याची सुरुवात कुठून झाली?
त्या एका निष्कारण प्रश्नातून, जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता.
—
रवि आपल्या जिवलग मित्र पवनला विचारतो: “कुठे काम करतोस? “
पवन – “अमुक एका दुकानात. “
रवि – “किती पगार मिळतो? “
पवन – “१८ हजार. “
रवि – “फक्त १८ हजार? इतक्यात कशी चालते तुमची रोजची जिंदगी? “
पवन – (खाली मान घालून) “काय सांगू रे… बस तसंच. “
या छोट्याशा संवादानंतर, पवनच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होतं.
त्याने पगारवाढीची मागणी केली, मालकाने नकार दिला. पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो.
पूर्वी त्याच्याकडे काम होतं… आता काहीच नाही!
—
एका गृहस्थाने एका वृद्ध पित्याला विचारलं, “तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का? म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटतं? ”
वडील म्हणाले, “तो खूप व्यस्त असतो. त्याला त्याची कामं, बायको, मुलं… वेळ मिळत नाही. “
ते गृहस्थ म्हणतात, “हे काय उत्तर झालं? तुम्ही त्याला वाढवलंत, सगळं दिलंत, आता तो म्हणतो त्याला वेळ नाही? “
त्या संभाषणानंतर, बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली.
जेव्हा मुलगा भेटायला यायचा, तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात असंच चालायचं.. “माझ्यासाठी वेळच नाही… “
—
एक गोष्ट लक्षात ठेवा:
आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोल परिणाम करू शकतात. कधी कधी आपले प्रश्न निष्कपट वाटतात, पण ते दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात. उदाहरणार्थ:
“तुम्ही हे का नाही घेतलंत? “
“तुमच्याकडे हे का नाही? “
“तुम्ही याच्यासोबत कसं राहू शकता? “
“तो तुमच्या योग्य आहे का? “
हे असले बिनधास्त प्रश्न, जे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नाही, पण हे विसरतो की, याचा परिणाम समोरच्याच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो. आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं, तर अनेकदा असं आढळतं की कोणाच्या तरी चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं आहे. जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात, आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. म्हणून एकच विनंती….
लोकांच्या घरात अंधासारखं शिरा आणि मुक्यासारखं बाहेर या!
आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट न पडो, हीच खऱ्या माणसाची ओळख आहे.
☆
लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वर्ग नावाच्या मैफलीतील कलावंत! – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆
शिक्षक म्हणजे बोलणारा कारकून नव्हे. तर तो एक कलावंत आहे. कलावंत ज्याप्रमाणे जन्मावा लागतो असे म्हणतात ;त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा जन्मावा लागतो असे मला वाटते. याचाच अर्थ कलावंताची प्रतिभा जशी उपजत असते, पुढे ती मार्गदर्शनाने फुलवता येते. विविध प्रकारच्या कार्यशाळांतून आकाराला येते. व्यासंगाने कलेची जडणघडण करता येते. परंतु मुळात त्या व्यक्तिमत्त्वात कला निर्मितीचे काही रसतंतू असावेच लागतातत्. केवळ कुणाला तरी वाटते आहे म्हणून, कवी नर्तक, चित्रकार गायक, निर्माण करता येत नाहीत. अध्यापन व्यवसायाचा मी जेव्हा अगदी मुळातून विचार करतो, तेव्हा मला असे वाटते, कलावंताप्रमाणे अध्यापक हा सुद्धा अभिजात असावा लागतो. नव्या पिढीला काहीतरी मनातलं सांगावे, केवळ इथून तिथून गोळा केलेले, आजच्या भाषेत कॉपी-पेस्ट केलेले अध्यापन असून चालत नाही. जमिनीतून तरारून बी उगवावे तसे अध्यापन असावे लागते. केवळ देखावा म्हणून प्लॅस्टिकचे झाड प्लास्टिकची फुले कितीही हुबेहूब केली, तरीही आलेल्या पाहुण्यांना चकवता येईल; परंतु फुलपाखरांना चकवता येत नाही. कारण फुलपाखरांना फुलांच्या आत्म्यातील सुगंध कळतो. त्याचप्रमाणे, नव्या पिढीलाही समोर उभा असलेला आपला शिक्षक हा अंतर्यामातून बोलतो आहे की नाही हे नक्कीच जाणवते. विद्यार्थी उघड व्यक्त करू शकणार नाही, परंतु त्याला अध्यापनातील सच्चेपणा नक्कीच प्रतीत होत असतो. मनापासून केलेल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांची हृदये स्पंदित होतात. खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय म्हणजे ” ये हृदयीचे ते हृदयी “रुजवण्याचा आगळावेगळा स्वधर्म आहे.
अध्यापनाची कलासुद्धा आपल्या पिंडात असावी लागते. अर्थात् प्रशिक्षणाने एक उत्तम अध्यापक घडवता येतो. पण मुळात अध्यापनाचे काही मूलद्रव्य त्याच्यात असावे लागते.
सुमारे पस्तीस वर्षाच्या अध्यापन काळात आणि अनेक विद्यालयांच्या मधून कार्यक्रम केल्यामुळे तेथीलही अनेक प्रकारचे अध्यापक निरीक्षणांतून अनुभवले.
काहीना केवळ प्राचार्यांच्या केबिनमध्ये खलबते करण्यातच रस असे. आपले नियोजित तास बुडतील कसे, याची काळजीपूर्वक काळजी घेताना काही शिक्षक असायचे. काही शिक्षकांना केवळ वेतनश्रेणी, भत्त्यांची वाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक कमाईच्या वाटा यातच रस असायचा. ही मंडळी कधी एखाद्या नव्या पुस्तकाबद्दल बोलली आहेत, किंवा वर्गातील एखादा नवा शैक्षणिक प्रयोग त्यांनी चर्चिला आहे, किंवा स्नेहसंमेलनात एखादा उपक्रम त्यांनी मुलांकडून बसवला आहे, हे मला जाणवलेच नाही. बरीच मंडळी ती अक्षरशः काठावर बसून गंमत पहात. लाटेवर येऊन त्यांना अध्यापनाच्या अथांग तलावात भिजता आलेच नाही. काही जणांना वेगवेगळ्या निमित्ताने चमचमीत खाण्याचे आकर्षण असे. एखादी खाद्य पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हातखंडा. अर्थातच स्टाफरूम मध्ये असे चेहरे लोकप्रिय असतातच तसेच ते होते. त्यातील काहींचे स्वभाव चांगले होते. परंतु प्रत्यक्ष अध्यापनात जितकी उडवा उडवी करता येईल तितकी ते करत असत. आपल्या संपन्न ग्रंथालयाचा लाभ त्यांनी मनापासून कधी घेतला आहे हे मी अनुभवलेच नाही फक्त पाठ्यपुस्तके तेवढे बदलत असतात आणि संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांची मार्गदर्शक आहे या व्यतिरिक्त अनेक प्राध्यापकांचा ग्रंथालयाशी संबंध नसायचा नवीन चरित्रे कुठली आली आहे कथा कादंबरी लेखन कुठले आले आहे याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले आहे हे कधी मला जाणवलेच नाही आणि गंमतही की आपण एखाद्याला सुचवू शकतो पण आपल्या व्यवसाय मित्रांना आपण आग्रह करू शकत नाही, कारण आपला अपमान करण्याचे धारदार शस्त्र त्यांच्याकडे असते. त्यांना आपले हेतू ध्यानात येत नाही, त्यांना फक्त वाटते “हा कोण टिकोजीराव! आम्हाला काहीतरी वेगळे शिकवतो आहे. स्वतःचे ज्ञान घरी ठेवा म्हणाव ” हा त्यांचा सूर लगेच आपल्याला लक्षात येतो आणि अर्थातच आपण त्यांना काही सांगण्याच्या फंदातच पडत नाही
परंतु सुदैवाने अशा प्रकारची मंडळी अगदी तुरळक असत, पण एखादा खडा सुद्धा आपले जेवण काहीसे नीरस करतोच ना! उत्साही शिक्षकांचा उत्साह काही उदास मंडळी मुळे मावळतो, अशावेळी ज्येष्ठ शिक्षक, प्राचार्य, यांनी जे चैतन्याने काम करत आहेत, जे प्रयोगाशील आहेत, आपले तन-मन धन खर्च करत आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. कारण त्यातच वर्गात आशेने वाट पाहणाऱ्या नव्या पिढीचे भवितव्य दडलेले आहे. कुठल्याही क्षेत्रात लोकप्रियता ही योगायोगाने आपोआप मिळत नाही तर ती प्रत्यक्ष काम करून सातत्य ठेवून मिळवावी लागते. मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भक्तीचा पिसारा त्यांना लाभतो. मी असे काळजाचे शिक्षक अनेक पाहिले आणि मुशाफिरीतही आजही मी असे कार्यशील उत्साही शिक्षक पाहतो आहे अनुभवतो आहे. अध्यापनाची मनापासून आवड असणारे अनेक शिक्षक मी असे पाहिले की त्यांना अधिक वेतनाच्या व्यावसायिक संधी त्यांच्या उमेदीच्या वयात मिळत असूनही अध्यापकच व्हायचे याच स्वप्नाने ते झपातून या क्षेत्रात आले होते. जेव्हा कोणत्याही शाळेत कार्यक्रमासाठी जातो तेव्हा डोळ्यात उत्सुकता असलेला, संवादात प्रसन्नता आणि वागण्यात अगत्य असणारा तरुण अध्यापक मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला त्याचा मी न पाहिलेला, अतिशय रंगलेला असा तास कल्पनेने अनुभवतो.
एखादी मैफल रंगवायला गायक रंगमंचावर जावा त्या उत्साहाने जे वर्गात जातात आणि तास संपवून पुन्हा एकदा स्टाफरूम मध्ये परतल्यावर तो उत्तम अध्यापनाचा आनंदरंग त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसत असेल, तर तो अध्यापक या क्षेत्राशी एकरूप झाला आहे असे समजावे.
आपण अध्यापक अखेर माणसेच आहोत. केव्हा तरी कंटाळा येणारच. केव्हातरी मन उदास असणार ; आपल्या घरातील किंवा आयुष्यातील सुखदुःख आपल्या चेहऱ्यावर ते उमटणारच. पण हे ‘केव्हातरी ‘ केव्हातरीच असावे, जर तोच आपला स्वभाव झाला, तर आपणही उदास आणि समोरची पिढी उदास!
शक्यतो एका दालनातून दुसऱ्या दालनात जावे, तसे मनाचा मूड बदलून स्वतःला अंतर्यामातून बदलता येणे ही सुद्धा अध्यापन व्यवसायातील एक कला आहे. एकदा हा व्यवसाय आपण स्वीकारल्यानंतर त्या व्यवसायाविषयी, आणि विशेषतः जिवंत मनांना, नवी पंखभरारी देण्याचा हा व्यवसाय निवडल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. अंतर्मुख होऊन अगदी प्रत्येकाने आपल्याला या व्यवसायात आनंद मिळतोय का? मिळत असेल तर तो अधिक कसा मिळेल आणि मिळत नसेल तर तो का मिळत नाही याचा शोध अंतर्मुख होऊन घ्यायला हवा असे मला वाटते. आपल्या व्यवसायातील व्यावसायिक अस्थिरता, काही वेळा होणारा स्थानिक पातळीवरचा अन्याय, अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी शासकीय कामे ही कारणे आहेतच. नक्कीच अशा तऱ्हेच्या कारणांचे कुणीच समर्थन करणार नाही.
पण मला नेहमी वाटते, या सगळ्या बाह्य गोष्टीची शिक्षा त्या अजाण विद्यार्थ्यांना का बरे द्यायची,? उभे आयुष्य त्यांना साद घालत असत भविष्य खुणावत असते. मोठ्या अपेक्षांनी ती समोरील अध्यापकाकडे पाहत असतात. अशावेळी आपला अनुभव, आपले ज्ञान, व्यवहारज्ञान त्यांना भरभरून दिले तर शिक्षक पदाचा विस्तारही होतो आणि ते पद सखोले होते सखोलही होते.
कलावंत ज्याप्रमाणे कलेतील नवनिर्मितीमुळे चिरतरुण राहतो. अक्षरशः अध्यापकाच्या व्यवसायातही तेच घडत असते. मला काही जण विचारत असत, ” एकच कविता अनेक वर्ष शिकवून तुम्हाला कंटाळा येत नाही का? “
मी त्यांना म्हणत असे, “कविता तीच असेल, पण मी नवा आहे. मी नित्य नवा झालो की आपोआपच कवितेतील नवीन रूपरंग आकळतात. शिवाय दरवर्षी वर्ग बदलतो, चेहरे नवीन असतात. त्यामुळे अर्थात ती कविता मला “तीचतीच “वाटत नाही माझे तर स्पष्ट मत आहे, आपल्या मानसिक वयाबरोबर साहित्यातील संवेदनशील पदर अधिक उलगडत जातात. उदाहरणार्थ ‘औदुंबर’ सारखी कविता एका सारखी शिकवू शकत नाही. सतत त्यात नवे नवे काहीतरी सापडत जाते. खरे म्हणजे नवे जे सापडते, ते केवळ कवितेतील असत नाही, तर ते आपल्यातले नवे सापडते ;आणि त्यामुळे भाषा असो की विज्ञान, गणित असो का इतिहास भूगोल, विषय कुठलाही असो ;सतत नव्या वर्षी नव्या वर्गात नव्या मुलांपुढे आपण नवतेचा शोध घेत असतो आणि त्यामुळेच नवनिर्मितीचा आणि कलावंताचा ज्याप्रमाणे संबंध आहे, त्याप्रमाणे अर्थातच अध्यापकाचा आणि नवनिर्मितीचा संबंध आहे. म्हणूनच मला हाडाचा शिक्षकही कलावंत वाटतो. आचार्य अत्रे यांनी आपल्या आत्मकथनात” मी शिक्षक कसर झालो? “या प्रकरणांमध्ये स्पष्ट म्हणून ठेवले आहे, “पुढे आयुष्यात माझ्याकडून जे लेखन झाले, अनेक नाटके लिहिली गेली, साहित्यात मी अनेक प्रयोग केले, त्या सर्वांची मुळे माझ्या अध्यापन व्यवसायात आहेत. अतिशय बोलके वाक्य आहे त्यांचे. लेखनातील प्रतिभा अध्यापनात येते आणि अध्यापनातील प्रतिभेने आपले लेखने वेगळे होते.
शिक्षकाकडे अक्षरशः संपूर्ण समाज अध्यापनाच्या निमित्ताने वर्गात येतो. आणि त्यामुळेच अनेक सुखदुःखे आपण जवळून पाहतो. केवळ आपण पुस्तके वाचत नाही, विद्यार्थ्यांचे चेहरे वाचतो. चेहरे वाचतावाचता, सामाजिक पुस्तक कळत जाते. समाजात नेमके कुठले बरे वाईट बदल होत आहेत, मानसिक प्रवाह येत आहेत, कुठल्या प्रकृती विकृती जन्माला येत आहेत, हे आपल्याला एक कलावंत म्हणून कळते. अध्यापकाला ती संधी असते. मात्र ती घेतली पाहिजे. अध्यापनाच्या व्यवसायाकडे केवळ एक अनुक्रमाणिका पूर्ण करण्याचा, आणि उत्तर पत्रिका तपासण्याचा व्यवसाय तेवढ्यापुरताच जर आपण पाहिले, तर अनुक्रमणिका पूर्ण होईल आपण मात्र अपूर्ण राहू आणि अर्थातच एक अपूर्ण शिक्षक स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही, आणि आपल्या व्यवसायाला हिला न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच मनाच्या पूर्ण जागेपणाने, उत्फुल्ल मनाने आपण वर्गात जावे लागते. कलावंत ज्याप्रमाणे एखादी मैफल रंगवतो,.
कधी वक्तृत्वाने कधी अभिनयाने, त्याप्रमाणे अध्यापकाला सुद्धा वर्ग नावाची मैफल रंगवण्याची संधी असते. मात्र ते जिंदादिल मन आपल्यामध्ये हवे, ते आपल्यामध्ये तो निश्चित आहे, म्हणूनच हे हितगुज.
एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.
शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.
शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…
करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…
हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…
तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…
हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…
जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…
बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…
तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला,
हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…
अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.
गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्चर्य वाटे.
शाळा अशा मजेत चालायच्या!
आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.
अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.
सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.