सूचनाएँ/Information ☆ – इंदौर में 30–31 मार्च को साहित्यिक पत्रिकाओं का राष्ट्रीय समागम – मध्य प्रदेश साहित्य अकादमी का आयोजन – ☆ साभार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव – ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹– इंदौर में 30–31 मार्च को साहित्यिक पत्रिकाओं का राष्ट्रीय समागम – मध्य प्रदेश साहित्य अकादमी – ☆ साभार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव –🌹

मध्य प्रदेश साहित्य अकादमी द्वारा आगामी 30 और 31 मार्च को इंदौर में आयोजित किया जा रहा दो दिवसीय ‘साहित्यिक पत्रिका समागम’ देशभर की साहित्यिक पत्रकारिता से जुड़े संपादकों, लेखकों, शोधार्थियों और प्रकाशन विशेषज्ञों को एक साझा मंच पर लाने वाला महत्वपूर्ण आयोजन माना जा रहा है। हिंदी सहित भारतीय भाषाओं की साहित्यिक पत्र-पत्रिकाओं के समक्ष बदलते समय में उत्पन्न हो रही चुनौतियों, उनके स्वरूप, सामग्री और भविष्य की दिशा पर गंभीर विमर्श के उद्देश्य से आयोजित यह समागम साहित्यिक जगत में विशेष उत्सुकता का केंद्र बना हुआ है। अकादमी के अनुसार, इस आयोजन के माध्यम से साहित्यिक पत्रकारिता के समक्ष उपस्थित आर्थिक, तकनीकी और पाठकीय संकटों पर न केवल चर्चा होगी, बल्कि उनके व्यावहारिक समाधान भी खोजने का प्रयास किया जाएगा।

समागम का उद्घाटन 30 मार्च को प्रातः 11 बजे से होगा, जिसमें ‘देश और समाज के प्रति साहित्यिक पत्र-पत्रिकाओं का दायित्व बोध : वीणा का शताब्दी संदर्भ’ विषय पर विशेष विमर्श आयोजित किया जाएगा। इस सत्र में विभिन्न विश्वविद्यालयों और साहित्यिक संस्थाओं से जुड़े विद्वान तथा प्रतिष्ठित साहित्यिक पत्रिका ‘वीणा’ के संपादक अपने विचार व्यक्त करेंगे। उद्घाटन सत्र में साहित्यिक पत्रिकाओं की ऐतिहासिक भूमिका, सामाजिक चेतना के निर्माण में उनका योगदान तथा बदलते मीडिया परिवेश में उनकी जिम्मेदारियों पर विशेष चर्चा अपेक्षित है। इसके बाद आयोजित प्रथम सत्र में पत्रिकाओं के स्वरूप और प्रस्तुति को केंद्र में रखते हुए ‘जो दिखता है वही बिकता है’ विषय पर विमर्श किया जाएगा, जिसमें यह विचार किया जाएगा कि साहित्यिक पत्रिकाओं के कलेवर और लेआउट में आकर्षण की कमी किस प्रकार पाठकों को उनसे दूर कर रही है और उन्हें अधिक पठनीय के साथ-साथ दर्शनीय बनाने की आवश्यकता क्यों है।

दोपहर बाद के सत्रों में समागम का स्वर और अधिक व्यावहारिक तथा बहुआयामी हो जाएगा। ‘थोड़ी हँसी, थोड़ी खुशी’ विषयक सत्र में साहित्यिक पत्रिकाओं में कार्टून और व्यंग्य चित्रों के प्रयोग पर चर्चा होगी, जबकि अगले सत्र में पत्रिका प्रकाशन से जुड़ी प्रशासनिक और आर्थिक प्रक्रियाओं पर विस्तृत मार्गदर्शन दिया जाएगा। इसमें आर.एन.आई. पंजीयन, दृश्य एवं प्रचार निदेशालय से संपर्क, डाक पंजीयन और वितरण व्यवस्था से संबंधित जटिलताओं को सरल भाषा में समझाया जाएगा। इसी क्रम में सरकारी अनुदान और विज्ञापन प्राप्त करने की प्रक्रियाओं पर भी विशेषज्ञ जानकारी साझा की जाएगी, जो विशेष रूप से छोटे और मध्यम स्तर की पत्रिकाओं के लिए उपयोगी सिद्ध हो सकती है। दिन के अंतिम चरण में साहित्यिक पत्रिकाओं की घटती प्रसार संख्या और वैश्विक स्तर पर उनके अस्तित्व पर मंडरा रहे संकट पर चर्चा करते हुए संभावित समाधान तलाशे जाएंगे, जिसके बाद सायंकालीन विशेष सत्र में देशभर से आए संपादक अपनी-अपनी पत्रिकाओं के अब तक के योगदान और अनुभव साझा करेंगे।

समागम के दूसरे दिन, 31 मार्च को, विमर्श का केंद्र साहित्यिक सामग्री की गुणवत्ता, कलात्मक प्रस्तुति और आधुनिक मुद्रण तकनीक पर रहेगा। ‘छपास की भूख के बीच संपादक धर्म का चीरहरण’ विषय पर आयोजित सत्र में पत्रिकाओं में प्रकाशित हो रही रचनाओं के स्तर में गिरावट और संपादकीय मानकों पर पड़ रहे प्रभावों पर गंभीर चर्चा की जाएगी। इसके पश्चात आयोजित सत्र में साहित्य और चित्रांकन के संबंधों पर विचार करते हुए यह देखा जाएगा कि चित्र और कलात्मक प्रस्तुति किस प्रकार साहित्यिक पत्रिकाओं की सौंदर्यात्मकता और पठनीयता को बढ़ा सकते हैं। दोपहर बाद का सत्र आधुनिक मुद्रण तकनीकों और प्रकाशन के बदलते स्वरूप पर केंद्रित रहेगा, जिसमें नई तकनीकों के माध्यम से पत्रिकाओं की गुणवत्ता, प्रसार और लागत प्रबंधन पर प्रकाश डाला जाएगा।

दो दिवसीय इस समागम का समापन ‘पाथेय’ विषयक उद्यापन सत्र से होगा, जिसमें समागम के निष्कर्षों और भविष्य की दिशा पर समग्र विचार प्रस्तुत किए जाएंगे। आयोजन समिति के अनुसार, इस समागम से प्राप्त सुझावों और निष्कर्षों को संकलित कर साहित्यिक पत्रिकाओं के सुदृढ़ीकरण के लिए एक मार्गदर्शक दस्तावेज तैयार करने की भी योजना है। साहित्यिक पत्रकारिता के समकालीन परिदृश्य में यह आयोजन न केवल संवाद का अवसर प्रदान करेगा, बल्कि साहित्यिक पत्र-पत्रिकाओं के भविष्य को लेकर ठोस रणनीति बनाने की दिशा में भी एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है।

 – साहित्य अकादमी , भोपाल

साभार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆  उ च की ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

😩 उ च की ! 😩☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

ही कोणास कधी लागेल

धरू नका हिचा भरवसा,

येई आयुष्यात प्रत्येकाला

एक अनुभव तिचा खासा!

अख्खे शरीर हलवणे

ताकद एव्हढी हिच्यात,

ही लागताच मग वाटे

जीव जाई आतल्या आत!

 *

पाणी पिण्या पासून

सुरु होती मग ऊपाय,

रिचवले जरी दोन तांबे

होई तिजपुढे निरुपाय!

 *

नवा कोणी सुचवी ऊपाय

म्हणे दाबून धरा श्वास,

चुटकी सरशी माघारी

जाईल तिच्या घरी खास!

 *

आधीच पोटाला तडस

त्यात श्वास थांबलेला,

वाटे मनी आता होणार

आपले हरी ओम विठ्ठला!

आपले हरी ओम विठ्ठला!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ सत्य आम्हा उमगले हो… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ सत्य आम्हा उमगले हो… ☆ श्री जगदीश काबरे ☆

माझ्या जवळचा मित्र आणि त्याची बायको हे भिन्न विचाराचे जोडपे आहे. बायको आस्तिक आहे तर मित्र नास्तिक. पण त्या दोघांमध्ये गेली तीस वर्षे कुठल्याही प्रकारचा विसंवाद झालेला नाही. कारण ते दोघेही आपापल्या विचारांचा एकमेकांवर दबाव टाकत नाहीत. त्यांच्यातील हा सुसंवाद मी नेहमीच बघत असतो आणि त्यातून मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले, ते असे…

सत्य आम्हा उमगले हो –जगदीश काबरे

नास्तिक असुन तुला

दर्शनाला नेणारी मी,

माझ्या इच्छेखातर

येणारा तू…

 

हारफुलांचा भाव करत

ताट घेणारी मी,

दारातल्या भिक्षुकांना

मदत करणारा तू…

 

रांगेत पुढे जाण्यासाठी

धडपडणारी मी,

देवळाची सुबकता

न्याहाळाणारा तू…

 

डोळ्यांनी नमस्कारासाठी

तुला खुणावणारी मी,

देवळातले कोरीव काम

अनुभवणारा तू…

 

देवळातही चपलेची

काळजी करणारी मी,

गरजुने नेली असेल

असा विचार करणारा तू…

 

आस्तिक आहे मी

आणि नास्तिक तू,

आस्तिकतेचा भास मी

पण खरा आस्तिक तूच…

 

खरेच देव नक्की

कुणाला पावत असेल,

माझ्यासारख्या आस्तिकाला

की तुझ्यासारख्या नास्तिकाला?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रपत्ती : संपूर्ण शरणागतीचे तत्त्वज्ञान

भक्ती, तत्त्वज्ञान आणि कृपायोगाचा दिव्य संगम

 प्रस्तावना : अहंकारापासून अनंताकडे

मानवी जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात एक असा टप्पा येतो की जिथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवते. त्याच्या अध्यात्मप्रवासात एक क्षण असा येतो की प्रयत्नांची शिडी संपते आणि कृपेचे आकाश सुरू होते.

ज्ञान, कर्म, साधना, तपस्या — या सर्व मार्गांनी प्रयत्न करताना अखेरीस मनाला उमगते की अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी अहंकाराचा सर्वस्वी त्याग आणि परमेश्वरावर संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे. याच अवस्थेला भारतीय ‘ विशिष्ठाद्वैत तत्वज्ञान’ परंपरेत “प्रपत्ती” असे म्हणतात.

संस्कृतमधील “प्र + पत्” या धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द पूर्णपणे शरण जाणे, स्वतःला अर्पण करणे असा अर्थ व्यक्त करतो.

भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध वचन या तत्त्वज्ञानाचे सार सांगते —

“सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।

अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥”

(भगवद्गीता १८. ६६)

या एका श्लोकात प्रपत्तीचा संपूर्ण आध्यात्मिक अर्थ सामावलेला आहे.

 

१. प्रपत्ती : तात्त्विक संकल्पना

प्रपत्ती म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे.

भक्तीमार्गात ही अवस्था तेव्हा येते जेव्हा साधकाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. त्या क्षणी तो म्हणतो —

“मी नाही; सर्व काही तूच. ”

या भावनेचे वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, “आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥” माणूस स्वतः काही करीत नाही; करणारा खरा परमेश्वरच आहे.

 

२. रामानुजाचार्य आणि प्रपत्तीचा मार्ग

आचार्य रामानुज (१०१७–११३७) यांनी प्रतिपादित केलेल्या विशिष्टाद्वैत वेदान्तात प्रपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

त्यांच्या मते जीव आणि परमेश्वर यांचे नाते शेष–शेषी असे आहे —

जीव हा परमेश्वरावर अवलंबून असलेला अंश आहे.

रामानुजाचार्यांच्या “शरणागति गद्य” या ग्रंथात ते परमेश्वराला विनवतात —

“नारायण! तव पादारविन्दयोः शरणं प्रपद्ये।”

ही केवळ प्रार्थना नसून पूर्ण आत्मसमर्पणाची अनुभूती आहे.

 

३. प्रपत्तीची सहा अंगें

या परंपरेत शरणागतीची सहा लक्षणे सांगितली आहेत —

“अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।

रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्ववरणं तथा ।

आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ॥”

या सहा अंगांमध्ये प्रपत्तीचे संपूर्ण स्वरूप दिसते.

अनुकूलस्य संकल्पः — ईश्वराला अनुकूल तेच आचरण करणे

प्रतिकूलस्य वर्जनम् — प्रतिकूल गोष्टींचा त्याग

रक्षिष्यतीति विश्वासः — परमेश्वर रक्षण करील हा दृढ विश्वास

गोप्तृत्ववरणम् — त्यालाच पालनकर्ता मानणे

आत्मनिक्षेपः — पूर्ण आत्मसमर्पण

कार्पण्यम् — स्वतःची दीनता स्वीकारणे

 

४. भक्तिमार्गी संतपरंपरेतील प्रपत्ती

संतपरंपरेत प्रपत्तीचा भाव अत्यंत सजीवपणे व्यक्त झाला आहे. दासबोधात समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

“आपण मिथ्या साचा देव । देव भक्त अनन्यभाव ।… या नाव आत्मनिवेदन ॥”

(४. ९. २२)

रामरायाकडे समर्थ मागणे काय मागतात पहा, “मजविण तू मज दे रे राम!

 मीराबाईंचं ईश्वराशी हे एकरूप होणं पहा…

“लाली मेरे लालकी जिथ देखूं तिथं लाल

लाली देखन मै गयी, मै ही होगई लाल! “

तुकाराम महाराज म्हणतात,

“घालुनिया भार राहिलो निश्चिंती ।

……….

खुंटले सायास आणिक या जीवां ।

धरिले केशवा पाय तुझे ॥

तुज वाटे आता करी रे अनंता ।

तुका म्हणे संता लाज माझी ॥”

 

संत एकनाथ महाराज म्हणतात,

” अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ।

चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥

माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ ।

अनाथांचा नाथ जनार्दन ॥

एका जनार्दनी एकपणे उभा ।

चैतन्याची शोभा शोभतसे ॥ “

 

५. प्रपत्ती आणि कृपायोग

प्रपत्तीचा मार्ग हा केवळ साधकाच्या प्रयत्नांवर आधारित नाही; तो ईश्वरकृपेवर आधारित आहे. भक्त सतत प्रेमपूर्वक भजन करतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला मार्ग दाखवतो.

श्रीवैष्णव तत्त्वज्ञानात मोक्ष हा केवळ साधकाच्या साधनेचा परिणाम नसून परमेश्वराच्या निरपेक्ष कृपेचा प्रसाद मानला जातो. प्रपत्ती म्हणजे त्या कृपेचे द्वार उघडणारी अंतःकरणाची अवस्था होय.

 

६. प्रपत्तीचे आध्यात्मिक सौंदर्य

प्रपत्ती म्हणजे पलायन नव्हे; ती आहे अहंकारावर मात करून अनंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया.

जेव्हा भक्त म्हणतो —

“मी तुझा आहे; तूच माझे सर्वस्व आहेस. ”

तेव्हा त्या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील भेद विरघळतो, द्वैत विरते!

 

७. आत्मनिवेदन आणि प्रपत्ती

नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन’ आणि रामानुजाचार्यांची ‘प्रपत्ती’ हे दोन्ही पूर्ण शरणागतीचे सिद्धांत आहेत, पण त्यांची तात्त्विक चौकट, रचना आणि पायऱ्यांमध्ये स्पष्ट भेद आहे.

 

आत्मनिवेदनची व्याख्या:

नवविधा भक्ती ही भगवद्गीतेच्या भक्तियोगावर आधारित नऊ पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्यात नववी पायरी ‘आत्मनिवेदन’ आहे. यात भक्त स्वतःचा देह, मन, धन, कर्तृत्व आणि फळ—सर्वस्व भगवंताला समर्पित करतो, “मी तुझाच” ही श्रद्धा दृढ पणे अंतःकरणात बाळगतो. यात ईश्वरावर संपूर्ण विश्वास आणि स्वातंत्र्य-अहंकाराचा पूर्ण त्याग करून वाट्याला आलेल्या सुख-दुःखाला त्याचीच इच्छा मानणे हे मुख्य आहे.

 

प्रपत्तीची व्याख्या:

रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांतात प्रपत्ती ही शरणागतीची प्रक्रिया आहे, जी कर्म-ज्ञान-भक्तींपेक्षा थेट परमेश्वरकृपेवर अवलंबून आहे. यात वर उल्लेखिलेली सहा अंगे आहेत: अनुकूल कर्मांचा संकल्प, प्रतिकूलांचा त्याग, रक्षकत्वाचा विश्वास, गोप्तृत्वस्वीकार, कार्पण्य (असहाय्यता) आणि आत्मनिक्षेप (आत्मार्पण). ही संरचित, शास्त्रोक्त पद्धत मोक्षासाठी एकमेव साधन मानली जाते

 

साम्याचे मुद्दे:

दोन्ही सिद्धांतांचा केंद्रबिंदू “पूर्ण समर्पण” हा आहे—अहंकारत्याग, ईश्वरकेंद्रित जीवन, कृपेवरील अवलंबन आणि स्वतःचे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण. भावार्थाने ही एकाच अध्यात्मिक सत्याची दोन रूपे दिसतात.

 

भेदाचे मुद्दे:

भावतत्त्वाने दोन्ही जवळजवळ समान आहेत, पण शास्त्रीय रचना, परंपरा आणि तात्त्विक चौकटीमुळे हे वेगळे सिद्धांत मानले जातात. त्यांना एकच म्हणता येत नाही.

 

८. उपसंहार : समर्पणातच अनंत

मानवी जीवनात ज्ञान, साधना, तपस्या आणि कर्म यांना महत्त्व आहे. परंतु या सर्व प्रयत्नांचा अंतिम अर्थ तेव्हाच उमगतो जेव्हा साधकाला समर्पणाची अनुभूती प्राप्त होते.

 

प्रपत्ती म्हणजे प्रयत्नांचा पराभव नव्हे;

ती आहे अहंकारावरचा विजय होय.

भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा ही जाणीव उमलते —

“देवा, मी तुझा आहे. ”

तेव्हा परमेश्वरही जणू त्याला अश्वासक उत्तर देतो —

“हो, तू माझाच आहेस.”

अशा या दिव्य संवादातच भक्तीचा परमोच्च क्षण जन्म घेतो.

आणि त्या क्षणी साधकाला उमगते —

समर्पणातच स्वातंत्र्य आहे,

आणि शरणागतीतच मोक्ष आहे!

 

त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वं मम देवदेव ॥

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर

(‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.

‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं…. सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.) 

इथून पुढे – – 

‘खूप वेदना होताहेत मॅम… प्लीज… मला पेन किलरचा आणखी एक डोस द्या. ’

‘आत्ता दोन तासांपूर्वी जेवणानंतर तुला इंजक्शन दिलं होतं ना! इतकं जास्त पेन किलर घेणं योग्य नाही. तुझ्या शरिरावर पुढे त्याचा वाईट परिणाम होईल. ’

‘मला त्याची पर्वा नाही. इंजक्शन द्या. बस्स! ’ गौरव अशा काही अवस्थेत बोलून गेला की शकुंतला मॅमचं अंतर कापत कापत गेलं आणि मग त्याला इंजक्शन देणं त्यांना भागच पडलं. इंजक्शन देता देता त्या म्हणाल्या, ‘त्या दिवसाबद्दल… ऑपरेशनबद्दल तुला काही बोलावंसं वाटलं, तर तू मला तुझी फ्रेंड समज…. बोलण्यामुळेसुद्धा वेदना थोड्या कमी होतील. ’ गौरव काहिशा विचित्र नजरेने, काही वेळ त्या बेस हॉस्पिटलच्या मायाळू हेड नर्सकडे बघत राहिला आणि हळू हळू इंजक्शनच्या गुंगीत निद्रेच्या कवेत शिरला.

दर दुसर्‍या तिसर्‍या दिवशीचं हेच दृश्य असायचं. ते बेचैन दिवस आणि त्रासदायक रात्रीच्या दरम्यान एक हसवणारा क्षणदेखील आला होता. मोबाईलवर बोलता बोलता गीतालीनं एकदा एक विचित्रच मागणी केली. मोबाईलवरच्या नेहमीच्या सांभाषणानंतर, टिप्सीच्या नवनवीन करामती, बोलणं, ऐकवता ऐकवता ती एकदम म्हणाली, ‘मला त्या गोळ्या हव्या आहेत हीरो…. डॉक्टरांनी तुझ्या पोटातून आणि हातातून काढलेल्या सगळ्या गोळ्या… ’

‘काय? ? ? ’ चमकून गौरवने विचारलं. आपण जे ऐकलं, त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

‘शोना, मला त्या गोळ्या हव्या आहेत…. सगळ्याच्या सगळ्या.. तुला लागलेल्या. जेव्हा घरी येशील तेव्हा आपल्याबरोबर घेऊन ये. सगळ्याच्या सगळ्या.. सात गोळ्या. ’

‘अरे, तू काय करणार त्यांचं? ’

‘काहीही करीन. तुला काय करायचय? नवी रेसिपी बनवीन एखादी. ’

‘काय फलतु गोष्ट बोलतेयस गीतू, इथे हॉस्पिटलमध्ये त्या गोळ्यांचा डिस्प्ले केला जातो. कमॉन… डोन्ट बी चाइल्डिश.. काय करणार तू त्यांचं? ’ गौरवचं हसू थांबता थांबत नव्हतं.

‘तू बस, घेऊन ये. ,. कमीत कमी एक तरी गोळी मला हवीच! ’

तो हसरा क्षण किती तरी वेळपर्यंत वॉर्डाच्या भिंतींवर रेंगाळत राहिला. श्रीनगरच्या त्या आर्मी बेस हॉस्पिटलच्या एका खोलीत एक खास असं संग्रहालय बनवलेलं होतं…. दुनियेतील सगळ्यात वेगळं असं ते संग्रहालय असावं बहुतेक. इथे मागच्या काही युद्धात आणि आतंकवादाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये, घायाळ झालेल्या सैनिकांच्या शरिरावर झालेल्या सर्जरीनंतर काढलेल्या गोळ्या, ग्रेनेडचे तुकडे, बॉम्बमध्ये वापरले गेलेले टोकदार खिळे, छर्रे इ. गोष्टींचा संग्रह होता. ज्या हुतात्म्यांच्या वा घायाळ सैनिकांच्या शरीरातून ते काढले होते, त्यांचे नाव, ते कधी काढले याची तारीख, तो सैनिक घायाळ कधी झाला, त्याची तारीख या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तिथे होत्या. जगातील सगळ्यात वेगळा असा कोलाज संग्रह होता तो… जसा काही जखमांचंही नक्षीकाम केलय. पाच वर्षांपूर्वी गौरव जेव्हा काश्मीरमध्ये पहिल्यांदा पोस्टींगवर आला होता, तेव्हा एक दिवस असाच, इथे भरती झालेल्या एका जवानाला तो भेटायला आला होता. त्यावेळी त्याने हे अद्भूत संग्रालय पाहिलं होतं. त्या दिवशी एक उनाड विचार त्याच्या मनात चमकून गेला. कधी आपलंही नाव या जखमांच्या नक्षीकामात सामील होईल का? काही भटक्या विचारांना वास्तवाचा पदर ओढून घेण्याची मोठी वाईट सवय असते.

बेस हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या गौरव विचार करत होता, जर त्या दिवशी… इतक्या दिवसांच्या पूर्वी, त्याने जो विचार केला, तसा केला नसता तर आज खुशहाल आणि सिद्धार्थ जिवंत असते का? कसं सगळं उलटं पालटं होऊन गेलं. त्या दोघा आतंकवाद्यांना मारण्याचं किती व्यवस्थित, छान प्लॅनिंग केलं होतं. खरं म्हणजे ते अगदी साधं आणि सोपं ऑपरेशन होतं. सिद्धार्थचा हट्ट त्याने का बरं पुरवला? गोळ्यांचा आवाज कानात अजूनही घुमतोय आणि धूसर धूसर झालेल्या स्मृतीच्या पडद्यावर किती तरी दिवसांनंतर त्या दिवसाचं दृश्य स्पष्ट उमटू लागलय. एवढ्यात शकुंतला मॅम त्याची नेहमीची औषधं देण्यासाठी त्याच्याजवळ आल्या, तेव्हा त्याने हात धरून त्यांना बसवून घेतलं आणि भिंतींवरच्या समोरच्या झरोक्याकडे एकटक बघत त्या दिवशीची कहाणी सांगू लागला. त्याचा आवाज जसा काही खोल विहीरीतून येत होता… घुसमटल्यासारखा.

सप्टेंबरला ढकलून पळवत लावत, कुडकुडायला लावणारा, हुडहुडी भरवणारा, ऑक्टोबर येऊन पोहोचला होता. जिथे तिथे उघडे-बोडके चिनार उभे होते. जमीन त्याच्या लाल, तपकिरी पानांनी नटली होती। बर्फाची पांढरी शुभ्र चादर पांघरण्याच्या त्रासापूर्वी जणू ती आपल्या परीने उत्सव साजरा करत होती. धरतीच्या या उत्सवाकडे गौरवच्या बटालियनचं मुळीच लक्ष नव्हतं. आत्ता आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीमुळे, बटालियनला जसा काही विद्युत करंटने स्पर्श केला होता. बटालियनचा खास खबर्‍या शौकतचा फोन आला होता. कॅंम्पपासून काही अंतरावर असलेल्या दल सरोवराला लागून असलेल्या गावात दोन आतंकवादी लपून बसले आहेत. बातमीनुसार गावातील सगळ्यात मोठा सफरचंदाचा बागायतदार मोहम्मद रसीद अहमदने एवढ्यातच दोन मजली घर बांधले होते. त्याच्या या नव्या घरात काही दिवसांपासून दोन विदेशींनी… बहुदा अफगाणी आतंकवादींनी आश्रय घेतला होता. शौकतच्या विस्तृत वर्णनानुसार पहिल्या मजल्यावर बनवलेल्या दोन खोल्यांच्यामधील भिंत जरा जास्तच रुंद दिसते. त्याच्या आत एक लहानसं तळघर बनवलेलं आहे. पोलीस किंवा फौजेची तुकडी जेव्हा तिकडच्या बाजूने गस्त घालत जाते, तेव्हा हे दोन आतंकवादी तळघरात उतरून लपून बसतात. भिंतीत बनवलेल्या त्या तळघरात उतरण्यासाठीचा रस्ता, दुसर्‍या मजल्यावरून आहे. सर्वसामान्य काश्मिरी घरांप्रमाणे धान्य वगैरे ठेवण्यासाठी जसा माळा बनवला जातो, तशा माळ्यावरून तळघरात उतरण्याचा रस्ता आहे. एका लाकडी पट्टीने तो झाकला आहे. ऑपरेशनचं प्लॅनिंग सुरू झालं. गावाचा नकाशा चांगल्या रीतीने समजून घेतला गेला. जवळ जवळ पस्तीस घरांचं हे गाव दल सरोवराच्या दक्षिणेकडून निघणार्‍या नाल्याने दोन्ही बाजूंनी घेरलेलं होतं. रसीद अहमदचं घर आणि बाग गावाच्या एका कडेला होती. प्लॅनप्रमाणे असं ठरलं की दहा दहा जवानांच्या दोन तुकड्या मेजर गौरव वत्स आणि कॅप्टन सिद्धार्थ रायच्या नेतृत्वाखाली औपचारिक गस्तीच्या स्वरुपात गावात प्रवेश करतील… गावातील लोकांची सहजच चौकशी करत, अचानक रसीद अहमदचं घर घेरतील. तिसरी रिझर्व्ह तुकडी नाल्याजवळ, अचानक काही परिस्थिती उद्भवली, तर त्याचा निपटारा करण्यासाठी तिथे थांबेल.

गावात जाण्यासाठी नाल्यावरचा छोटा पूल ओलांडताना गौरवच्या छातीत धडधड होऊ लागली होती. गावात प्रवेश केल्यावर दोन्ही तुकड्या वेगवेगळ्या दिशेने विभक्त झाल्या. गाववाल्यांकडून दुआ-सलाम घेत पुढे जाताना, जवळ जवळ प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवत होता. त्यांचा हा तणाव शौकतच्या बातमीला पुष्टी देत होता. दुआ-सलाम करत आणि वाटेत भेटणार्‍या लहान मुलांना चॉकलेट्स वाटत, दोन्ही तुकड्या स्वत:ला अगदी सामान्य असल्याचं भासवत दोन्ही दिशांनी रसीद अहमदच्या घराच्या दिशेने पुढे निघाल्या. काही क्षणातच रसीद अहमदचं घर चारी बाजूंनी घेरलं गेलं. तुकडीमध्ये असलेल्या लाइट मशिनगन्स योग्य जागी लावून ठेवल्या गेल्या. घरातून बाहेर पडणारे त्यांच्या निशाणावर रहातील आशा तर्‍हेने त्या लावल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थ आपल्या एक एक साथीदार जवानाला घेऊन घराच्या समोर आले. ट्रेनींगच्या दरम्यान शिकवलेलं असतं की कुणीही सनिक एकेकटा कुठलीही गोष्ट करत नाही. सगळ्या गोष्टी जोडी जोडीने होतात. इंग्रजीत त्याला बड्डी – पेअर असं म्हणतात. त्यानुसार दोघांनी आपल्या आपल्या बड्डी – पेअरसह चाल केली होती. घरातल्या सगळ्या व्यक्तींना बाहेर येण्यास सांगितलं गेलं. जेव्हा रसीद अहमदला विचारलं गेलं की घरात आणखी कोण कोण आहेत, तेव्हा रसूल निष्पापपणे म्हणाला, ‘पता मत है! अल्लाह कसम सब खैरियत है’ त्याचं उत्तर निष्पापपणाची एक नवी परिभाषा लिहीत होतं आणि त्यावर गौरवला वाटत होतं, वळून त्याला एक जोरदार थप्पड मारावी…

आत्तापर्यंत सगळं गपचूप ऐकणार्‍या शकुंतला मॅमनी अचानक गौरवला थांबवत म्हंटलं, ‘त्यांची तरी काय चूक आहे यात गौरव? त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, तर ती एके-47 ने मरणार आणि फौजेचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्यांच्याकडून मार खाणार. कधी कधी मला वाटतं, या काश्मीरी लोकांचे जितके हाल होताहेत ना, तितके जगातल्या दुसर्‍या कोणत्याच लोकांनी सहन केले नसतील. ठीक आहे… तू पुढे सांग. ’

रसीद अहमद आणि त्याच्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी बसवल्यानंतर गौरवने मशिनगन घेतलेल्या सैनिकाला समोरच्या दरवाजावर लक्ष ठेवण्याची ताकीद दिली आणि नंतर त्याने आणि सिद्धार्थने आपआपल्या बड्डी – पेअरबरोबर अतिशय सावधगिरी बाळगत घरात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर पोचल्यावर जिन्याजवळ असलेया दोन खोल्यांमधील भिंतींची जरा जास्तच असलेली जाडी पाहिल्यावर शंकेला कुठे जागाच नव्हती. बटालियन कॅंम्पमध्ये विचार विनिमय होऊन ठरल्यानुसार, वर माळ्यावर पोचून गौरवला माळ्याच्या फरशीवर पडून आपल्या रायफलच्या नळीने त्या लाकडी पट्टीला उचलायचं होतं. ही पट्टी भिंतीमध्ये काढलेल्या जागेला लपवून ठेवत होती. पट्टी उस्कटताच गौरवच्या बड्डीने, लांसनायक खुशहाल सिंहने त्या खालच्या जागेत दोन ग्रेनेड फेकायचे होते. बस्स! काम तमाम! सिद्धार्थ आणि त्याच्या बड्डीला जिन्यावरून आपआपल्या रायफलद्वारे तळघराच्या तोंडाशी कव्हरिंग फायर द्यायचं होतं. गडबडीला सुरुवात इथून झाली. सिद्धार्थ त्याला म्हणाला, ‘गौरव सर आपण आत्तापर्यंत खूप यशस्वी ऑपरेशन्स केलीत. माझी ही पहिलीच वेळ आहे. आत तळघरात ग्रेनेड मी फेकेन. सर.. प्लीज… ’ सिद्धार्थच्या त्या ‘प्लीज’मध्ये काय होतं कुणास ठाऊक, गौरव एकदम ‘होय’ म्हणून गेला.

‘ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्यासाठी मी कधीच स्वत:ला माफ करणार नाही. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं होतं की ऑपरेशनच्या शेवटच्या भागात कुठलाही बदल करता कामा नये पण मी तीच चूक केली. ’ शकुंतला मॅम त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला थोपटत राहिल्या आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्या, ‘ही सगळी नियती आहे बेटा… ’

अचानकच विहीरीच्या अधीक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला….

– क्रमशः भाग दुसरा 

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कधी सुधारणार?? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ कधी सुधारणार?? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

 – – – अंगातली मस्ती कधी उतरणार

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉलमध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला. तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरियामध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय? ” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्समध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात-आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात! पराक्रम दाखवण्याच्या नादात एक्स्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल.

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही. महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का?

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं, त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाईक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको?

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.

 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेम… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेम… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

प्रेमाच्या अनेक व्याख्या अनेकांनी केल्या असतील….! प्रेम ही भावना अशी आहे की ती तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवते….!

संत स्वतः जगावर खरे प्रेम करतात आणि आपल्याला प्रेम कसे करावे हे शिकवतात….!

दुसऱ्याचे अत्यंतिक कल्याण व्हावं, त्यासाठी आपण काही कष्ट/कृति आनंदाने करावेत आणि ईश्वराच्या कृपेने त्यात यश मिळाले तर दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदित व्हावे, दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावे, त्याच्या दुःखात त्याच्या मनावर फुंकर मारून, त्याच्या दुःखाची जाणीव कमी करण्याचा प्रयत्न आपण निरपेक्ष वृत्तीने करावा….!

…. याला प्रेम म्हणता येईल….!!

आपण आपल्या कुटुंबातील, परिवारातील सर्वांवर अशा प्रेमाचा वर्षाव करावा….! जगावर प्रेम करणे म्हणजे देवावर प्रेम करणे, कारण या साऱ्या सृष्टीचा मालक भगवंत आहे….!

लेकरावर प्रेम केले, त्याचे कौतुक केलं की नकळत त्याचा आईला आनंद होतो….

प्रेम जगावर करावे, फक्त त्यात पडू नये…!! “

कारण.. प्रेम करायला पैसे लागत नाही, पण प्रेम दाखवायला पैसे पुरत नाहीत… हे लक्षात असावे.

सर्व संत सांगतात,

*देवावर प्रेम करायला शिकायचे (भक्ति करायला शिकायचे असेल…..) तर आपल्या जवळच्या माणसांवर विनाअट (त्यांचे गुण अथवा दुर्गुण न पाहता…) प्रेम करण्यास सुरुवात करावी…! *

*देवाने दिलेल्या माणसांवर निर्व्याज, निर्मम प्रेम करायला शिकलो की देवावर आपसूक प्रेम बसेल…! *

*मग, आपण म्हटलं तरी तो देव आपल्याला सोडणार नाही….. *

असे *निर्व्याज, निरपेक्ष आणि निर्मळ प्रेम करणारा एखादा मनुष्य आपल्या आयुष्यात असावा अशी प्रार्थना मी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी करत आहे. *

आपण प्रयोग करून पाहू….

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास…” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे

गोदरेजच्या टाईपरायटरने एका भारतीय पिढीचा इतिहास लिहिला!! 

टाईपरायटर आता अडगळीत गेला आहे. 

कम्प्युटर, स्मार्टफोनच्या युगात जुनाट टाईपरायटर मशीन वापराणार तरी कोण? * *पण या एका मशीनने भारतातल्या २ पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली होती. 

 स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून नोकरी मिळवून देण्यात याच मशीनचा हातभार होता हे तुम्हाला माहित आहे का? या लहानशा मशीनने आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आज आपण याच टाईपरायटर मशीन विषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून आपण टाईपरायटरकडे एका नव्या दृष्टीने बघू यात शंका नाही.

****

१९४० च्या काळात भारत टाईपरायटर परदेशातून मागवत असे. परदेशातून येणाऱ्या टाईपरायटर मध्ये अमेरिकेतून येणाऱ्या टाईपरायटर्सची संख्या जास्त होती. यात अमेरिकेची रेमिंग्टन ही कंपनी अग्रगण्य समजली जायची. टाईपरायटर वगळता रेमिंग्टनचा आणि भारताचा आणखी एका बाबतीत संबंध आहे. रेमिंग्टन शस्त्र बनवणारी कंपनी आहे. या कंपनीनेच १८५७ साली गाय आणि डुकराची चरबी असलेल्या बंदुका तयार केल्या होत्या. त्यांच्या या घोटाळ्यामुळेच भारतात १८५७ चा उठाव घडून आला.

****

तर, ही रेमिंगटन कंपनी जवळजवळ १९१० पासून खास भारतासाठी मराठी, गुजराती, उर्दू, अरेबिक आणि गुरुमुखी अशा स्थानिक भाषांमधले टाईपरायटर तयार करत होती. स्थानिक भाषा लिहिता येत असल्याने टाईपरायटर भारतात प्रचंड प्रसिद्ध होते. लेखक, पत्रकार, राजकारणी टाईपरायटरचा नियमित वापर करत.

पण भारताला हवा होता आपला स्वतःचा स्वदेशी टाईपरायटर. ही कल्पना १९४८ सालीच सुचवण्यात आली होती, पण पुढे जाऊन ज्या कंपनीने पहिला भारतीय टाईपरायटर बाजारात आणला ती गोदरेज कंपनी त्यावेळी एका अत्यंत महत्वाच्या कामात गुंतली होती. हे काम होतं भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘मतदान पेटी’ तयार करण्याचं.

****

भारतीय टाईपरायटरचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९५५ साल उजाडावं लागलं. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली कंपनी ठरली. या पहिल्यावहिल्या टाईपरायटरला नाव मिळालं “गोदरेज प्राइमा”.

आज आपण टाईपरायटरला तितकसं महत्व देणार नाही, पण त्याकाळी ही गोष्ट आधुनिक आणि स्वतंत्र भारताचं प्रतिक मानली गेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्ष उलटून गेली होती आणि एवढ्या कमी वेळात भारतीय इंजिनियर्सनी संपूर्णपणे स्वदेशी असा टाईपरायटर तयार केला होता. ही बाब स्फूर्तिदायक ठरली.

काही वर्षातच परदेशी टाईपरायटरच्या जागी ‘गोदरेज प्राइमा’ने संपूर्ण भारत व्यापला. ऑफिस म्हटलं की टाईपरायटर आलाच आणि तिथला तो परिचित असा खडखडचा आवाजही आलाच. या सगळ्या गोष्टींची सुरुवात १९५५ नंतर झाली. सरकारी कार्यालये, कोर्ट, संरक्षण यंत्रणा या गोदरेज टाईपरायटर वापरण्यात पहिल्या क्रमांकावर होत्या.

****

त्याकाळी रेमिंग्टन व्यतिरिक्त हाल्डा (Halda), ओलीवेटी (Olivetti), स्मिथ-कोरोना (Smith-Corona), अॅड्लर-रॉयल(Adler-Royal), ऑलम्पिया (Olympia), नाकाजिमा (Nakajima) या कंपन्या सुद्धा प्रसिद्द होत्या. गोदरेजने फारच कमी वेळात या प्रसिद्ध कंपन्यांना टक्कर द्यायला सुरुवात केली.

गोदरेजचा खप किती होता याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण बघूया. त्याकाळी भारतभरातून जवळजवळ १, ५०, ००० टाईपरायटर्सची मागणी असायची. पण कंपनीकडून फक्त ५०, ००० टाईपरायटर्स तयार केले जायचे. भारताबाहेरही गोदरेज प्राईमाचे ग्राहक होते. श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मोझांबिक, अंगोला, मोरोक्को या देशांमध्ये या टाईपरायटर्सचा प्रचंड खप होता.

****

टाईपरायटर आणि महिला सबलीकरण:

टाईपरायटर हे पहिल्यांदा महिलांशी जोडलं गेलं ते अमेरिकेत. अमेरिकन रेमिंग्टन कंपनीने असा विचार केला होता की टाईपरायटरचा सर्वाधिक उपयोय हा महिलांकडून होईल. या विचाराने त्यांनी महिलांसाठी फुलांचं डिझाईन असलेले टाईपरायटर बाजारात आणले. ही कल्पना चांगलीच प्रसिद्ध ठरली. महिला मोठ्या संख्येने टाइपिंगच्या कामाकडे वळल्या.

या ट्रेंडने त्याकाळी उच्चांक गाठला होता. १९१० साली अमेरिकेतील जवळजवळ ८१ टक्के टाईपिस्ट या महिला होत्या. टाईपरायटरने मोठ्या प्रमाणात अमेरिकन महिलांना काम मिळवून दिलं. पण अमेरिकेत याचा एक विपरीत परिणामही झाला. त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या पोर्नोग्राफिक मासिकांमध्ये “टाईपरायटर गर्ल” हा एक नवीन विषय बनला होता. भारतात असा कोणताही प्रकार घडला नाही. उलट या एका मशीनने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. १९६० नंतरच्या चणचणीच्या काळात अनेक संसार या स्त्रियांच्या मदतीवर उभे राहिले. नोकरी करणारी बायको ही कन्सेप्ट इथून सुरू झाली. पाचवारी साडी, सायकल आणि टायपिंग मशीन या तीन गोष्टी म्हणजे आधुनिक भारतीय स्त्रीचे प्रोफाइल बनले. भारतीय महिलांना घराचा उंबरठा ओलांडून स्वतःच्या पायावर उभं करण्यात टाईपरायटरचा खूप मोठा हातभार लागला.

****

गोदरेज टाईपरायटरची भारतातली प्रसिद्धी

भारतात गोदरेज प्राईमा सुपरहिट का ठरलं? याचं एक प्रमुख आणि गमतीदार कारण आहे. भारतीयांना गोदरेज टाईपरायटरचा खडखडाट प्रचंड आवडला होता. हीच बाब इतर कंपन्यांनी लक्षात घेतली नाही. तसं पाहायला गेलं तर गोदरेज टाईपरायटरचा हा एक अवगुण म्हणता येईल, पण त्यानेच गोदरेजला भारतभर पोहोचवलं.

दिल्लीच्या ‘परवाना प्राधिकरण’ (driving licence authority)च्या ऑफिस बाहेर बसणारे ६० वर्षीय सतीश कालाकोटी गोदरेजच्या सुवर्णकाळाबद्दल सांगताना म्हणतात की, “जर्मन एरिका कंपनी त्यांच्या आवाज न करणाऱ्या आणि टाईप करण्यास अगदी सोप्प्या टाईपरायटर्ससाठी प्रसिद्ध होती. पण मी गोदरेजचा आवाज करणाऱ्या टाईपरायटरची निवड केली. ” सतीश कालाकोटी आजही दिल्लीत टाईपरायटरवर काम करतात. गोदरेज टाईपरायटरचा सुवर्णकाळ जगलेल्या मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. भारतात टाईपरायटर म्हणजे प्रतिष्ठेचं चिन्ह समजलं जायचं. आजचा मध्यमवर्गी तरुणवर्ग बाइक किंवा कारची स्वप्न बघतो तर त्यावेळचा तरुणवर्ग हा टाईपरायटरची स्वप्न बघायचा. मॅट्रिक पास झालं की टायपिंग, शॉर्टहँड आणि नोकरीत रुजू असा प्रघातच पडलेला होता.

****

त्याकाळच्या गोदरेजच्या जाहिरातीचा मजकूरही बघण्यासारखा आहे. १९५० साली गोदरेजने आपल्या जाहिरातीत म्हटलं होतं, “Godrej presents The all-Indian Typewriter, ”. आणखी एका जाहिरातीत “Today’s typewriter with the touch of tomorrow” हे वाक्य होतं. गोदरेजची टीव्हीवर येणारी ही जाहिरात जुन्याजाणत्या लोकांना नक्कीच नॉस्टॅल्जिक करेल.

****

कॉम्प्युटर आणि टाईपरायटरचा उतरता काळ

कम्प्युटरने टाईपरायटरच्या सुवर्णयुगाचा अंत केला. २००० पासून टाईपरायटरची जागा कम्प्युटरने घेतली. कम्प्युटरच्या लाटेने गोदरेज कंपनीला जबरदस्त धक्का दिला होता. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी तर होतीच, पण गोदरेज कंपनीच शेवटचा टाईपरायटर बनवणारी कंपनी पण ठरली.

गोदरेजने त्यांचा शेवटचा टाईपरायटर १२, ००० रुपयांना विकला होता. २०११ साली त्यांचा मुंबईचा टाईपरायटर तयार करणारा कारखाना कायमचा बंद झाला. यावेळी ५०० टाईपरायटर कारखान्यात पडून होते. गोदरेजच्या पुण्याच्या कारखान्याची अशी दश झाली नाही. कारण हा कारखाना पुढे रेफ्रिजरेटर तयार करण्यासाठी नव्याने वापरण्यात आला.

तर मित्रांनो, गोदरेजच्या टाईपरायटरने अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या एका संपूर्ण पिढीचा इतिहास लिहिला.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

कालनिर्णयचे “मागील पान ” वाचताना १९ मार्च २०२६ ला सुरु होणाऱ्या नवीन संवत्सराचे नाव “पराभव” असे आहे असे वाचले. २०२५ संवत्सराचे नाव “विश्वावसू” असे छान होते. मनात विचार आला, सौर वर्षाचे नाव कोणी पराभव असे कसे ठेवेल. मग थोडासा रिसर्च सुरु केला आणि छान माहिती मिळाली:

संवत्सर म्हणजे हिंदू पंचांगातील एक सौर-वर्ष, ज्याला स्वतंत्र नाव दिलेले असते. ख्रिस्ती संवताप्रमाणे (२०२६ इ. स.) फक्त आकडे न वापरता,

हिंदू कालगणनेत ६० वर्षांचा एक नामांकित चक्र वापरला जातो. याला म्हणतात: षष्टी‑संवत्सर चक्र (६० वर्षांचे चक्र)

या ६० वर्षांना नावे आधीपासून निश्चित केलेली आहेत. नेमकी ६० वर्षेच का? यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे.

गुरू आणि शनी या ग्रहांचा ग्रहपरिभ्रमण (rotation) कालावधी सुमारे गुरू(बृहस्पती) ११. ८६ (~ १२) वर्षे आणि शनीचा परिभ्रमण काळ २९. ४६ (~ ३०) वर्षे आहे. १२ आणि ३० चा ल. सा. वि. (LCM) ६० आहे त्यामुळे साधारण ६० सौर वर्षांनंतर गुरू‑शनी यांची परस्पर स्थिती पुन्हा जवळजवळ तशीच होते.

म्हणून हा ६० वर्षांचा चक्र खगोलशास्त्रावर आधारित आहे.

या ६० संवत्सरांची निश्चित यादी ही यादी कधीही बदलत नाही. संवत्सर चक्र नेहमी याच क्रमाने सुरू होते:

कोणत्या वर्षाला कोणते नाव कसे ठरते? यासाठी कलियुग कालगणना वापरली जाते. हिंदू कालगणनेनुसार: कलियुगाचा आरंभ — इ. स. पू. ३१०२ मध्ये झाला.

त्या दिवसापासून दरवर्षी संवत्सराचे नाव एकाने पुढे सरकत जाते. ६० नंतर पुन्हा पहिल्यापासून सुरू होते.

षष्टी‑संवत्सर चक्र (६० संवत्सरे)

१) प्रभव २) विभव ३) शुक्ल ४) प्रमोदूत ५) प्रजापती ६) आंगिरस ७) श्रीमुख ८) भाव ९) युव १०) धातु ११) ईश्वर १२) बहुधान्य १३) प्रमाथी १४) विक्रम १५) वृष १६) चित्रभानु १७) स्वभानु १८) तारण १९) पार्थिव २०) व्यय २१) सर्वजित २२) सर्वधारी २३) विरोधी २४) विकृति २५) खर २६) नंदन २७) विजय २८) जय २९) मन्मथ ३०) दुर्मुख ३१) हेमलंबी ३२) विलंबी ३३) विकारी ३४) शार्वरी ३५) प्लव ३६) शुभकृत ३७) शोभकृत ३८) क्रोधी ३९) विश्वावसु ४०) पराभव ४१) प्लवंग ४२)कीलक ४३) सौम्य ४४) साधारण ४५) विरोधिकृत ४६) परिधावी ४७) प्रमादी ४८) आनंद ४९) राक्षस ५०) नल ५१) पिंगल ५२) कालयुक्ति ५३) सिद्धार्थी ५४) रौद्र ५५) दुर्मती ५६) दुंदुभी ५७) रुधिरोद्गारी ५८) रक्ताक्षी ५९) क्रोधन ६०) अक्षय

ही यादी सूर्यसिद्धांत, आर्यभटीय, व पारंपरिक पंचांगांनुसार प्रमाणित आहे

प्रत्येक संवत्सर हिंदू नववर्षापासून (गुढीपाडवा / उगाडी) लागू होतो. ६० वर्षांनंतर चक्र पुन्हा प्रभव पासून सुरू होते

गंमत म्हणजे चिनी पंचांगातही ६० वर्षांचे फिरते चक्र आहे. परंपरागत चिनी पंचांगात ६० वर्षांचे चक्र वापरले जाते, याला गान्झी (干支) चक्र म्हणतात.

हे चक्र २००० हून अधिक वर्षांपासून अखंडपणे वापरले जात आहे. हे चक्र दोन स्वतंत्र चक्रांच्या संयोगातून तयार होते:

१) १० स्वर्गीय कांड्या (Heavenly Stems – 天干)

या कांड्या पंचमहाभूत तत्त्वे (five elements) आणि स्त्री‑पुरुष (Yin–Yang) गुणधर्म दर्शवतात.

२) १२ पार्थिव शाखा (Earthly Branches – 地支)

या शाखा म्हणजेच प्रसिद्ध चिनी राशी प्राणी:

उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, शेळी, माकड, कोंबडा, कुत्रा, डुक्कर.

६० वर्षांचे चक्र का होते?

दरवर्षी १ स्वर्गीय कांडी पुढे जाते आणि १ पार्थिव शाखा पुढे जाते. १० आणि १२ यांचा ल. स. वि. (LCM) = ६०

त्यामुळे तोच कांडी‑शाखा संयोग प्रत्येक ६० वर्षांनी पुन्हा येतो.

उदाहरण

१९८४ = Jia‑Zi (लाकूड उंदीर वर्ष) → नवीन ६० वर्षांच्या चक्राची सुरुवात

२०२४ = Jia‑Chen (लाकूड ड्रॅगन)

२०४४ = Jia‑Shen (लाकूड माकड)

२०८४ = Jia‑Zi पुन्हा (चक्र पूर्ण)

म्हणजे “ड्रॅगनचे वर्ष” असे म्हणताना,

त्यामागे तत्त्व + प्राणी + स्त्री‑पुरुष गुणधर्म यांचा एक पूर्ण संयोग असतो.

६० वर्षे हा आकडा पंचांगाचा योगायोग नाही. तो मानवी स्मृतीचा नैसर्गिक नियम आहे.

मानवी पिढी (generation) म्हणजे एकाच काळात जन्मलेले लोक, जे समान सामाजिक, आर्थिक, राजकीय अनुभवांतून गेलेले असतात.

साधारणपणे एका पिढीचा कालावधी: २०–२५ वर्षे असतो. ३ पिढ्या = आजी‑आजोबा → पालक → मुले: ३ × २० ≈ ६० वर्षे

म्हणजे ६० वर्षांत एक संपूर्ण कुटुंबीय अनुभव‑चक्र पूर्ण होते

६० वर्षानंतर अनुभवांची पुनरावृत्ती इतिहासात वारंवार दिसते:

युद्धे

आर्थिक मंदी

सामाजिक आंदोलन

मूलभूत मूल्यांचे चक्र

हेच कारण आहे की अनेक इतिहासकार म्हणतात: “History repeats itself every 2–3 generations. ”

भारत आणि चीनसारख्या संस्कृतींनी ६० वर्षांना पूर्ण कालचक्र मानले आहे.


लेखक : वैभव साठे, अटलांटा, अमेरिका 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.

नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला.

त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. मं

घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले.

हात जोडून तो नाथांना म्हणाला की,

“नाथबाबा,

मला_भगवंताचं,

श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. “

एकनाथ महाराज यांना काहीच समजेना.

हा कोण कुठला ब्राह्मण?

आपली व त्याची ओळख पण नाही,

त्याला मी कोठे रहातो?

हे पण माहीत नाही.

माझे घर शोधत शोधत तो आलाय.

तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या.

त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.

नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले.

पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.

“नाथबाबा, मला भगवंताचे,

श्रीकृष्णाचे दर्शन घडवा. “

त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती.

नाथांनी त्याला मंचकावर बसवले.

स्वत:च्या हाताने त्याचे पाय धुतले.

तोपर्यंत गिरीजादेवींनी गूळपाणी आणले.

ते पाहून त्या ब्राह्मणाचे ढमन भरून आले.

तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की,

“नाथबाबा, मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला.

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की,

‘मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे.

आता माझी येथून जायची वेळ झाली आहे.

तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. ‘

नाथबाबा,

मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते.

ते कोठे आहेत? “

हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली.

नाथ देहभान विसरले.

प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता.

आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही.

इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगितले.

तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो, असे सांगून निघून गेला होता.

नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले.

गिरिजादेवी भानावर आल्या.

मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.

ते श्रीखंड्याचे साधेपण,

त्याची प्रत्येक हालचाल,

शांतपणे आपले काम करणे

काल जातानाचे त्याच मुग्ध हसणे.

नाथांचे डोळे भरून वाहू लागले.

त्यांनी ध्यान लावले.

त्यांना समजले की,

खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनून गेली १२ वर्ष रहात होता.

इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती.

दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.

गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की….. ‘चोर, माखनचोर, चितचोर..

बारा वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस.

इतक्या वर्षात तू

 आमच्यावर अपार माया केलीस. ‘

नाथ खांबाला धरून ऊठले.

त्यांनी रांजण पाहिला,

त्याला स्पर्श केला.

श्रीखंड्यान बारा वर्षं खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला.

नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा,

जिथे विश्रांती घ्यायचा

नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जेथे जेथे झाला होता,

तेथे तेथे हाताने स्पर्श करू लागले.

गिरीजादेवींनी तर डोळ्यांतील अश्रूंनी,

श्रीखंड्या जिथे बसत असे, तेथली जमीन अक्षरशः भिजवून काढली.

कंठ दाटून आला.

त्यांनी आकाशाकडे बघितले.

आणि त्या म्हणाल्या की,

“हे भगवंता,

सगळीकडे तूच आहेस,

डोळ्यांत तूच, देहात तूच,

अंतर्बाह्य तूच आहेस.

आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास.

आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो.

आम्हाला क्षमा कर देवा

_श्रीकृष्णा…..

पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे….. “

काय आश्चर्य…..

त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला,

जोरात वारा सुटला कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूरकाठी त्या वाऱ्याने पडली.

घुंगरांचा आवाज झाला.

त्या घुंगूरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता.

त्या शेल्यातून केशर- कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.

तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता.

तो आ वासून हे बघत होता.

भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.

आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते.

देव कुणाच्या तरी रूपात

आपल्या आसपास रहात असतो.

आपली सेवा करत असतो.

आपल्याला मदत करत असतो.

आणि आपल्याला हे माहीत नसते.

कळते तेव्हाच,

जेव्हा ती व्यक्ती निघून जाते.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares