☆ “पंढरीचा चोर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्रधर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे “विठ्ठल”.
ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले.
ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे:
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!
विठ्ठला, तू वेडा कुंभार!”
प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो.
विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार यांचा” असही झालं. कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचा अंतपार लागत नाही. तो अनादी, अनंत आहे.
एकूणच विठ्ठल अनेक युगे पुतळा चैतन्याचा बनून उभा ठाकला आहे. ज्याने अनेकांना विविधरंगी, विविध अंगी दर्शन दिलं आहे.
संत एकनाथ महाराज लिहितात..
“काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल”
या ओळीचा खूप मोठा अर्थ आहे. पंढरी म्हणजे नुसतीच जमलेली गर्दी. अगदी शरीराच्या अवयवांसारखी. नुसता कलकलाट, नुसता गोंगाट.
एक एक अवयव, हळूहळू निघून गेला की गर्दी संपते. शेवटी काहीच उरत नाही.
मग विठ्ठल कुठे आहे?
एकनाथ उत्तर देतात…. “आत्मा हा विठ्ठल !”
शेवटी जो उरतो तो आत्मा, विठ्ठल !! शरीर नष्ट होईल पण आत्मा अटळ विठ्ठल अमर आहे असा धीरही एकनाथ महाराज देतात.
तसा विठ्ठल सावळा आहे; पण त्यातही अनेक रंग आहेत, त्याची रूपेही खूप आहेत. त्याचं सावता माळी ह्यांना वेगळंच रूप दिसलं.
सावता माळी आपल्या मळ्यात दिवसरात्र राबत असत. त्यांच्या मळ्याजवळून अनेक लोक पंढरपूरला जात असत. एकदा एक जण सावता माळींना म्हणाला- आम्ही नेहमी उपास-तापास करून पंढरपूरला अनवाणी जातो, तू कधीच का येत नाहीस.
सावता माळींनी उत्तर दिलं-
कांदा-मुळा-भाजी।
अवघीं विठाबाई माझी॥
*
लसुण-मिरची-कोथिंबिरी।
अवघा झाला माझा हरीं॥
सावता माळी बी पेरत असत. उन्हातान्हात उभे राहून त्याला पाणी घालत असत आणि मग ते बी तरारून बाहेर येई. लसूण, मिरची, कोथिंबिरी हेच हरीसारखे प्रसन्न होत असत.
साक्षात विठ्ठल सावता माळींसमोर उभा राही!!
सावता माळींनी मनगट वापरलं, ते कर्म करत राहिले, मग विठ्ठलाने त्यांना दर्शन देण्याचं स्वतःच कर्म – स्वतःच कर्तव्य पार पाडलं.
इथे पुन्हा शब्दप्रभू ग. दि. मा. आठवतात. त्यांनी लिहिलं आहे :
जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्न होऊनि ठाकेल श्याम
दिसे सांवळे रूप त्याचे शिवारी!
नसे राउळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी!
जे सावता माळींनी सांगितलं तेच माडगूळकर वेगळ्या शब्दात सांगतात.
भूमिपुत्राने घाम गाळला तर स्वतः श्याम म्हणजे देव येऊन उभा राहील. जिथे हात राबतील, तिथे हरी येईल.
विठ्ठल अनेकांना अनेक रूपात दिसला आणि महाराष्ट्रात फार मोठी संतपरंपरा उभी राहिली.
संत कान्होपात्रा, सेना महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई, निवृत्तीनाथ आणि अनेक ज्ञात -अज्ञातांनी विठ्ठलाला पाहिले.
नरहरी सोनारांनी देवाचे वर्णन करताना म्हटले,
“देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार”
इथे नरहरी आणि कबीर ह्यांच्यातील साम्य दिसते. कबीर म्हणत असे की मी वस्त्र विणतो तेव्हा राम म्हणतो. नरहरीही आपली प्रत्येक कृती देवासाठी करत राहिले. तोच धागा पकडून पी. सावळाराम ह्यांनी गीत रचले,
“धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया”
संत जनाबाईंनी म्हटले,
हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला
गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर
कृष्ण लोणी चोरून मित्रांना वाटत असे. विठ्ठलाचंही वर्णन करताना जनाबाईंनी “चोर” म्हटले आणि मराठी भाषेची प्रतिभा पहा, हा चोर लोकांना आवडला.
आपली संत परंपरा विवेक जागृत करायला शिकविते, अंतरीचा दिवा उजाळायला शिकविते. संत सोहिरोबाई ह्यांनी लिहिले:
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।
तेथ कैचि दिवस-राती।
तयावीण नेत्रपाती हलवू नको रे।
हरिभजनाविण काळ घालवू नको रे।
ज्ञानजोतीविना नेत्रपातीही हलवू नको रे, दिवस-रात्र या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत आराम करू नको रे. हरिभजनाशिवाय वेळ वाया घालवू नको रे.
आणि बहिणाबाईंनी देवावर भाष्य केलं नसतं तरच नवल. अंधश्रद्धेतून देव संकल्पनेला मुक्ती देताना त्या म्हणतात:
बापा नको मारू थापा
असो खऱ्या, असो खोट्या
नहि नशिब नशिब
तया हाताच्या रेघोट्या
*
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये
माझ्या दारी नको येऊ
अनेकांनी देव ही संकल्पना कर्मवादाशी जोडली. महाराष्ट्रात देवाला दगडातून बाहेर काढणारी परंपरा उभी राहिली.
कवी बोबडे यांनी स्वतःमधला देव दाखवण्यासाठी लिहिले:
*
सागर पोहत बाहू बळाने।।
नाव तयास… मिळो न मिळो रे ॥१॥
*
स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥
तदगृही दीप… जळो न जळो रे ।।२॥
*
जो करी कर्म अहेतू निरंतर ॥
वेद तयास… कळो न कळो रे ॥३॥
*
ओळख पटली ज्यास स्वतःची ॥
देव तयास… मिळो न मिळो रे ॥४॥
बघा या कवितेतून किती सुंदर अर्थ त्यांनी सांगितला आहे. “जो स्वतःच्या हाताने पोहत जाईल, त्याला नाव मिळाली नाही तरी चालेल. जो स्वतःच्या ज्ञानाने प्रकाशित आहे, त्याच्या घरात दीप नसला तरी चालेल. जो निरंतर कर्म करतो, त्याला वेद कळले नाही तरी चालेल आणि ज्याला स्वतःची ओळख पटली आहे, त्याला देव मिळाला नाही तरी चालेल. “
काही कारणास्तव, काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, जवळच्या विठ्ठल मंदिरातही जाता येणार नाही. तरीही हरकत नाही. विठ्ठल तर आपल्या आत आहे. त्याला चोरून देवालयात बंद करण्याइतका पुण्यवान कोण आहे?
ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहे..
*
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई
*
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वभूता ठायी
*
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शिर झुकवुनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही, देव भरुनिया राही
*
देव इतका सोपा आहे, सुलभ आहे. बस स्वतःमध्ये पाहिला की सापडतो.
।। राम कृष्ण हरी ।।
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “Non – Confirmist – देशपांडे ऑन देशपांडे” – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्यही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले –
“अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजाहीर असे दण-दण दण-दण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील! ”
वसंताच्या स्वभावातच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा ‘मिजाज’ आहे.
निखारे असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! म्हणूनच की काय कोण जाने ‘शतजन्म शोधितांना’, ‘असे जीत पहा’ यासारख्या किंवा ‘रवी मी भाळी चंद्र असे धारिया’ ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रीक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे.
पण कलावंताला म्युनिसिपालिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!
वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारातली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे!
पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हणासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही.
नागर आणि ग्रामीण हिंदीचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतरावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट!
कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला, अध्यात्म, अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती- त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही.
आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्या तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे ‘कारकुनी’ ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा.
पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही.
मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिले आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी!
पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमाला पाठ असाव्यात त्याला! ‘जिनमध्ये लाइम कॉर्डियलचे प्रमाण काय’, इथपासून ते ‘अवकहडा चक्र’ म्हणजे काय इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य!
वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चंपूताईचा घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे.
कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदार मामला आहे.
भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी. पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी.
परवाचीची गोष्ट… ‘कट्यार’ मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे. भीमसेनने मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. “वश्याबुवा, हा तुझा तबलजी! ”
जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणून रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो! ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात.
एवढ्याने काय झाले आहे… हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन “ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या – हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोंबला. ” अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना.
तीन वर्षापूर्वी प्रथम ऐकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या ‘सुलतान षरके यार’ या गाण्यापासून अगदी परवा ऐकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे.
आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे “माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला. ” त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या स्नेहाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी घातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे.
वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऐकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते.
वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपंणाने मिरवीत जाणारी नाही. दर्याखोर्यातुन बेफाम दौडत जाणार्या जवान घोडेस्वारासरखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.
वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. सूरांचा हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्यांना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्या बर्या!
वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.
☆
लेखक : श्री. पु. ल. देशपांडे
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गावाच्या कडेला एक लहानसं घर होतं. मातीच्या भिंती, लाल कौलारू छप्पर, अंगणात फुललेली जास्वंदी आणि कुंपणावर चढलेली पांढऱ्या मोगऱ्याची वेल. त्या घरात राहत होता सखा — एक शेतकरी. अंगावर झब्बा, डोक्यावर पांढरी पटकी आणि चेहऱ्यावर नेहमीच एक प्रसन्न शांत स्मित.
तो एकटा राहत असे, आई-बाबा गेले होते काही वर्षांपूर्वी. लग्न झालं नव्हतं. काही जण म्हणायचे, “बिचारा एकटाच राहतो. ” पण जेव्हा कोणी त्याच्या अंगणात चहा प्यायला बसायचं, तेव्हा त्यांच्या मनात ‘बिचारा’ ऐवजी ‘तो सुखी आहे’ हेच शब्द येत असत.
सखाचं आयुष्य अगदी ठरावीक — पहाटे चारला उठणं, गायींसाठी चारा आणणं, शेतात फावडं घेऊन माती फोडणं, आणि दुपारी झाडाखाली भाकरी-लोणचं खाणं.
संध्याकाळी तो ओढ्याजवळ जाई, पाण्यात आपले पाय भिजवून बसत असे. आकाशाचा रंग केशरी होत जाई, पक्ष्यांचे थवे घरी परतत. सखा त्या क्षणांना कवेत घेत बसायचा — एकदम शांत, स्थिर, पूर्ण.
एके दिवशी गावात एक शहरी माणूस आला — लेखक होता. सुखाविषयी पुस्तक लिहीत होता. गावकऱ्यांनी त्याला सांगितलं, “सखाला भेटा. तो खरा सुखी माणूस आहे. ”
लेखक आलाच. अंगणातल्या झाडाखाली सखा बसला होता — गवतावर, एक चहा समोर, आणि डोळ्यांत खोल आकाश. लेखक थोडासा विस्मयाने म्हणाला:
> “तुझं जीवन इतकं साधं आहे. ना पैसा, ना सोयीसुविधा, ना साथी. तरी तू एवढा शांत आणि समाधानात कसा? तु खरंच सुखी आहेस?”
सखा हसला. हातातला चहा पुढे करत म्हणाला,
> “हा घ्या. आधी चहा घ्या. मग उत्तर देतो. ”
लेखकाने चहा घेतला. त्या मातीच्या कपात एक वेगळीच ऊब होती. गरम वाफ डोळ्यांत पाणी आणणारी, आणि कपातून येणारा गवतीचहाचा सुगंध… काहीतरी खोलवर हलवून गेला.
सखा शांतपणे बोलायला लागला…
> “माझ्या शेतात कधी पीक चांगलं येतं, कधी येत नाही. गायी कधी आजारी पडतात. अंगात कधी ताप, कधी थकवा. पण रोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा मी स्वतःला सांगतो – आजचा दिवस ‘माझा’ आहे. मी जिवंत आहे. श्वास घेतोय. आणि तेच मला सुख वाटतं.
सुख ही सवय आहे, साहेब. माणसाने स्वतःला रोज शिकवायचं असतं — ‘माझ्याकडे जे आहे, त्यात मी समाधानी आहे. ‘ मग तो एक कप चहा, एक झाडाची सावली, किंवा मातीचा सुगंध… हे सगळं सोन्यासारखं वाटायला लागतं.
माझ्याकडे कमी आहे, हे पाहत राहिलात, तर आयुष्य एक रडकं नाटक होईल. पण मी रोज पाहतो — माझ्या गायी डोकं घासतात, आकाशात ढग नाचतात, आणि झाडाच्या फांदीवर साळुंखी गात असते… त्या सगळ्यांत सुख आहे. फक्त पाहायची सवय लागली पाहिजे.”
लेखक स्तब्ध झाला.
त्याला एका क्षणी जाणवलं — शहरात हजार गोष्टी असूनसुद्धा, तो एक दिवससुद्धा पूर्णपणे समाधानात जगला नव्हता. पण या शेतकऱ्याच्या दोन भाकऱ्या, एक कप चहा आणि ढगांच्या सावलीत एक पूर्ण जग सामावलेलं होतं.
त्या रात्री लेखकाने आपल्या वहीत लिहिलं…
“सुख हे समृद्धीमध्ये नसतं, ते सजगतेत असतं. आणि सजगतेची सवय ज्याला लागते, तोच खरा श्रीमंत असतो.”
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
परवा एका मर्डर केसमधील आरोपीला जमानतकामी भेटण्याकरता आणि वकीलपत्रावर सही घेण्याकरता येरवडा येथील जिल्हा कारागृह येथे गेलो होतो. परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकीलपत्रावर सही आणि भेटण्या करता 3. 30 वाजेपर्यंत थांबावे लागणार होते.
त्यामुळे थोडी विचारपूस करण्याकरता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना, मला एक कैद्याचे कपडे घालून असलेला एक माणूस दिसला. तो कारागृहासमोरील मैदानाची साफ सफाई करीत होता. मी त्याच्याकडून कारागृह प्रशासनाविषयी आणि इतर माहिती घेतली. तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्तीसारखा भासत होता. मी त्याचा स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले. त्यावर त्यानी रमेश (बदललेले नाव) आणि गाव पुणे. (बदललेले ठिकाण)सांगितले. त्यानंतर संभाषण वाढविण्यासाठी मी त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का? हे विचारले.
त्यावर तो म्हणाला की, “मी 302(खून) च्या केसमध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. परंतु मी व माझ्या घरातील लोकांनी सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले. “
मी त्याला सहजपणे विचारले, ” तू तर एकदम शांत आणि संयमी दिसतोस आणि बोलण्यावरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोस. तू मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. ” त्यावर रमेश म्हणाला की, “हो साहेब. मी सुशिक्षित आणि चांगल्या घरातील आहे. वडील नोकरी करीत होते आणि मी मेडिकल (बी ए एम एस) करीत होतो, परंतु खून मीच केलेला आहे. ” त्यावर अवाक होऊन मी त्याला विचारले, ” एवढे असताना खून का केला? ” तर तो म्हणाला, “तो खून मी नाही केला तर माझ्या ‘रागाने’ केला. “
त्याने माझ्या समोर बसून सांगायला सुरुवात केली, “मी 18-19 वर्षाचा असताना खूप जास्त रागीट होतो आणि चीड चीड करीत होतो. एक दिवस त्याच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते. समोरचा व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने बाजूला पडलेला टिकाव (जमीन खोदण्याचे हत्यार) उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला आणि त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जागेवरच मेला. त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेलमध्ये आहे. त्या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका हुशार आणि सुशिक्षित मुलगा जेलमध्ये माझ्यामुळेच गेला, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे त्यांची नोकरी गेली आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करायला लागले आणि आता इकडे तिकडे फिरत असतात. खूप साऱ्या वकिलांनी माझ्या आईला तुमच्या मुलाला जामीन मिळवून देतो, त्याला निर्दोष सोडवतो, असे सांगून माझ्या आईकडून बरेच पैसे घेतले आणि इकडे मला शिक्षा झाली. मला एक भाऊ व एक बहीण आहे, केसकरता पैसे लागले आणि बाबांची नोकरी गेल्यामुळे घरची परिस्थितीसुद्धा खूप खराब झाली. मी खून करून जेलमध्ये आल्यानंतर कोणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या दारुड्या मुलाशीच करुन दिले आणि माझा भाऊ फार्मसी करत होता, परंतु वडिलांची मानसिक स्थिती बिघडलेली असल्यामुळे आणि केससाठी पैसे लागत असल्यामुळे त्याने त्याचेसुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेरचे काम करून आई वडिलांना पोसत आहे. “
त्यावर मी रमेशला विचारले, ” तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का? ” त्यावर तो म्हणाला, ” मी ज्याला मारले तो तर काही वेळातच मेला. पण त्याला मारल्यानंतर मी रोजच मरत असतो. मी रोज मरणयातना भोगत असतो. आणि साहेब, त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला, तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला. ” असे म्हणून रडतच निघून गेला आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले.
वरची घटना किती मोठी शिकवण देणारी आहे! छोट्याश्या रागाने एक सुशिक्षित आणि सुसंकृत कुटुंब मातीला मिळवले. एक नोकरीवाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतो. एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेलमध्ये आहे. एक औषधशास्त्राचा विद्यार्थी शेतात काम करतो. एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे. एका आईला एका मुलाशिवाय आणि पतीशिवाय जगावे लागत आहे.
त्यामुळे सर्वांनी रागावर नियंत्रण ठेवा. संयम आणि प्रेमाने विचार करुनच सर्व करा. वाचा आणि दोन मिनिटाचा राग किती मोठे पारिवारिक नुकसान करते. याचा विचार करा…
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ क्षणांचे सोने… लेखक : स्व. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर☆
जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते, तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.
असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.
असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किमतींमुळे अस्वस्थ होत नाही.
भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.
त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची अॅडमिशन- परीक्षा- निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.
त्याला एक मुलगी असली तरी तो खूश असतो. दोन मुली असल्या तरी खूश असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.
त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे- डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो…
तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.
त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.
परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!
☆
लेखक : पु. ल. देशपांडे.
प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रिरूट… लेखक : श्री राजन पोळ ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर☆
नक्की समजत नाही, पण हल्ली खूपच कंटाळा येऊ लागलाय. रिटायर झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटणे, इकडे तिकडे भटकंती करणे, आवडीची गाणी ऐकणे, अधून मधून नाटक-सिनेमा एन्जाॅय करणे यात कशी गेली समजलंच नाही. त्यानंतर मात्र दिवस मोठा वाटू लागला. मग मॉर्निग वाॅक, घरातील कामे, बाहेरची स्वच्छता आणि जमेल तसं बागकाम इत्यादीत मन रमवू लागलो. पण कुठं माशी शिंकली, कळलं नाही. थोडसं आजारी पडल्याचं निमित्त झालं आणि सारंच बदलून गेलं. अंगात कुठून आळस शिरला, पत्ताच लागला नाही. थकवा जाणवू लागला, कशातच मन लागेनासं झालं. काहीसं एकटं एकटं वाटू लागलं, पहिल्यासारखा उत्साह, जोम राहिलाच नाही. कालचा, आजचा आणि उद्याचा दिवस सारखाच वाटू लागला. प्रत्येक कृती यांत्रिक बनत चालली. आजूबाजूची सारी दुनिया मजेत असताना माझ्याच वाट्याला हे का आलं, याचा विचार करताना माझ्या बायकोकडे माझं लक्ष गेलं.
ती अगदी टवटवीत आणि फ्रेश दिसत होती. चोवीस तास तिचा उत्साह ओसंडून वाहत असायचा. नातवंडांत ती अशी काही रमायची की त्यांच्यापेक्षा तिचंच हसणं, गाणं आणि नाचणं जास्त व्हायचं. शेजारचा कार्यक्रम, मग ते हळदी कुंकू असो वा लग्न, ओटीभरण असो वा बारसं तिच्या सहभागाशिवाय पूर्ण होतच नव्हतं. इतकंच काय, कॉलनीतली गौरी-गणपती, नवरात्र, दांडीया हे सारं काही करताना तिला रात्र कमी पडायची.
खरंतर तिच्यापेक्षा केवळ दोन वर्षांनीच मी मोठा होतो. तरीपण तिच्यात आणि माझ्यात इतका कसा काय फरक असू शकतो, हे मोठं कोडंच होतं. यामागे ओल्डएज या फॅक्टरचा दुरान्वयानेही संबंध येत नव्हता, याची मला खात्री होती. कारण बायकोच्यात आणि माझ्यात तसं फारसं अंतर नव्हतंच. शिवाय माझी प्रकृती अगदीच एथलॅटिक नसली तरी चारचौघांसारखी होती. सुदैवानं अजूनतरी बीपी, शुगरादी मित्रांची चाहूल लागली नव्हती. तरीही हल्ली कशातच मन लागत नव्हतं, ही गोष्ट मात्र खरी होती. इतकंच काय पूर्वीसारखं थोडंसं वावडं खाण्याची किंवा पिण्याची इच्छाही होत नव्हती. थोडक्यात वयाचा प्रश्न नव्हता, तब्येतही तशी ठीक होती. तरीही असं उदास, निरुत्साही आणि मरगळल्यासारखं का वाटतंय, हा संशोधनाचा विषय बनून राहिला होता.
मग म्हटलं, एखाद्या डॉक्टरकडं जावं. पण त्यानं भलतंच काहीतरी सांगितलं. म्हणे माझी ही लक्षणं सायकोडिप्रोफ्रेझिया किंवा अशाच काहीश्या गंभीर रोगाशी साम्यभाव दाखवतात. अर्थात डॉक्टर काय म्हणतात, ते मला काहीच समजलं नव्हतं. पण घरच्यांच्या प्रेशरखाली कौन्सिलिंग, मेडीसीन यात बराच पैसा व वेळ खर्च केला आणि त्यातून काहीच निष्पन्न झाल नाही.
त्यामुळे मला नक्की काय होतंय, हे समजून न आल्यानं खूपच काळजी वाटू लागली. कॉन्फिडन्सलेस वाटू लागलं. दाढी न करताच बाथरूमला जाताना टॉवेल विसरणं, माझी समजून मुलाची अंडरवेअर घालणं, भाजी मंडईत गाडी नक्की कुठे पार्क केली हे न समजणं असं वारंवार घडू लागलं.
खूप विचार केला. मग लक्षात आलं, काहीतरी नक्कीच चुकलेलं आहे. कॉलेजमधे असताना मित्र- मैत्रिणीत रमणारा, कथा-कविता करणारा, समाजसेवेची आवड असणारा माझ्यातला हरहुन्नरी मी, नोकरी आणि लग्नानंतर संसाराचा रगाडा हाकताना दुनियादारीच्या दुष्ट चक्रव्यूहात कुठंतरी हरवून गेलेला होता.
तरुणपणी स्वीकारलेले सारे छंदमार्ग केव्हाच दृष्टीआड झाले होते. त्यातील एखाद्या मार्गावर थोडीसी जरी वहिवाट ठेवली असती, तरी आत्ताच्या कंटाळवाण्या परिस्थितीला सामोरं जायला लागलं नसतं.
पण आता, केलेल्या चुका पुन्हा पुन्हा उगाळून काहीच उपयोग नव्हता, हेही खरंच होतं.
मग, असंच एकदा ठरवलं-
चला. एक दिवस सगळे पाश तोडूया, सगळं काही विसरूया आणि थोडसं रूमानी होत मनसोक्त उनाड भटकंती करूया.
मग, घरी कुणालाही न सांगता हळूच माझी जुनी मारुती काढली. पेट्रोलटाकी फुल्ल केली. खिशातलं पैशाचं पाकीट चेक केलं. एटीएम कार्ड घेतल्याची खात्री केली आणि गाडी स्टार्ट केली.
आता गाव कधीच मागं पडलं होतं. दुपारची वेळ झाली होती. नक्की कुठे आलो होतो, माहीत नव्हतं. पण समोरच एक डिसेन्ट गार्डन रेस्टॉरंट दिसत होतं. गर्द झाडीत गाडी पार्क करून बिनधास्त आत शिरलो. चमचमीत, चटपटीत, चरचरीत, सामिष वगैरे जे जे काही उपलब्ध होतं, त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. एकदोन आइस्क्रीम रिचवली आणि पान टपरीवर येऊन मस्तपैकी शिगार शिलगावली.
सहज घड्याळात लक्ष गेलं.
बापरे! संध्याकाळचे चार वाजत होते. पाठोपाठ बायकोचाच फोन वाजला…
“अहो, कुठे गेलात? इतका उशीर?आणि सांगायची वगैरे पध्दत आहे की नाही?”
अचानक झालेल्या या नेमक्या हल्लाबोलामुळं मी थोडासा बिथरलो. तरीही धाडस करून तिला सांगितलं…
“हे काय इथंच आहे, येतोय तासाभरात. घरीच येतोय… ”
आता मात्र पंचाईत झाली होती. गावापासून मी किती दूर आलेलो आहे आणि नेमका कुठे आहे याची काहीच कल्पना येत नव्हती. आलेला मार्ग, जायचा मार्ग, लांबचा मार्ग, जवळचा मार्ग, नेमक्या कोणत्या मार्गाने परत जायचं, काहीच सुचत नव्हतं.
मग, पटकन गाडीत बसून इंजिन स्टार्ट केलं आणि मोबाइल वरचा गुगल रोडमॅप ऑन केला.
ओके! …
आता काहीच काळजी नव्हती. खरंतर येताना नुसतंच भटकायचं होतं, कोणतंही डेस्टिनेशन नव्हतं, पण आता मंजिल मालूम थी म्हणजे घराचं लोकेशन माहीत होतं. सिर्फ गुगलको फॉलो करना था और सफर काटना था.
पण गंमत अशी झाली की, कधी कधी गुगल काय सांगतोय, हे ध्यानी न आल्यानं मी भलतीकडेच वळायचो.
कधी, ‘काम चालू रस्ता बंद’ हा बोर्ड पाहून गाडीसहित गुगलही तिथेच थबकायचा. मग मी मनातल्या मनात एखादी शेलकी…. हासडून रागाने उजव्या किंवा डाव्या बाजूला गाडी वळवायचो.
पण यावर गुगलवरची गोड आवाजाची निवेदिका अजिबात रागवायची नाही. त्याच मधुर आवाजात ती पुन्हा परतीच्या मार्गाचं रिरूट सादर करायची. असं करता करता मी जवळच्या रस्त्याने अगदी अर्ध्या तासातच चक्क घराच्या गेटपाशी येऊन थडकलो.
आणि त्याच वेळी मला माझ्या कंटाळ्यावरचं रामबाण उत्तर मिळालं..
“रिरूट ”
खरंतर कार चालवतानाच माझ्या ते लक्षात आलं होतं.
मी कार चालवत असताना गुगलवरची स्वर्गीय स्वरमाधुर्यात चिंब झालेली निवेदिका मला इनडायरेक्टली सांगत होती…
‘प्रिय मित्रा,
काळजी करू नकोस.
तू फक्त तुझं डेस्टिनेशन ठरव.
मग तू कितीही चुकीची वळणं घेतलीस, कितीही वेळा रस्ता चुकवलास, कुठेही भरकटलास तरी हरकत नाही.
मी तुझ्यावर अजिबात रागावणार नाही. तुला वचन देते की तुझ्या इच्छित स्थळी मी तुला नक्की पोहचवेन. ‘
आपल्या जीवनाचंही असंच आहे. पाठीमागे वळून पाहिलं की झालेल्या चुका, चुकलेले मार्ग पटकन नजरेसमोर येतात, पण गुगलची स्वरलता भूतकाळाची आणि चुकलेल्या वळणांची चर्चा न करता अपेक्षित डेस्टिनेशनला भिडणाऱ्या रस्त्याचा मॅप पुन्हा पुन्हा रिरूट करत असते.
अगदी तसंच, झालं-गेलं विसरून आपण स्वतःलाच रिरूट करत राहिलो तर…
तर, मला वाटतं, जीवनपटलावरच्या इंद्रधनूत पुन्हा पुन्हा रंग भरायला कोणतीच हरकत राहणार नाही.
तुम्ही हत्तीची गोष्ट ऐकली आहे काय? हो नक्कीच ऐकली असेल.
तरी पण आणखी एकदा नव्यानं ऐकूया…
एका राजाचा एक हत्ती असतो. राजाला तो अतिशय प्रिय असतो. प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी तो राजासोबत असतो.
निसर्गनियमाप्रमाणे हत्ती म्हातारा होतो. मग राजा त्याला युद्धभूमीवर सोबत घेत नाही. त्यामुळे हत्ती उदास राहू लागतो. चालता चालता एकदा हत्तीचे पाय चिखलात रुततात. काही सैनिक धावतच येऊन राजाच्या लाडक्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण आत्मविश्वास गमावून बसलेला हत्ती जागचा हलत नाही. मग कोणालातरी कल्पना सुचते. युद्धभूमीवरची तुतारी अशी काही वाजवली जाते की हत्ती अंगातली सगळी मरगळ झटकून, झटक्यात चिखलातून बाहेर येतो.
मित्रहो, निवृत्तीनंतर बऱ्याच जणांची अवस्था हत्तीसारखी होते.
चला तर,
कुणीतरी तुतारी वाजवेल याची प्रतीक्षा न करता आपणच ती स्वप्राणाने फुंकूया…
आनंदाचं डेस्टिनेशन पक्कं करूया…
झालं गेलं विसरून जाऊया…
रस्ता पुन्हा रिरूट करूया…
आणि आनंदमार्गी होऊया.
☆
लेखक : श्री. राजन पोळ
प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
. ” प्रश्न.. प्रश्न.. अन् फक्त प्रश्न ” लेखिका : लक्ष्मी यादव प्रस्तुती : आशिष बिवलकर
सोमवार २३जून २०२५
‘ वाचताना वेचलेले’
प्रश्न… प्रश्न…अन् फक्त प्रश्न
लेखिका: श्रीमती लक्ष्मी यादव
प्रस्तुती: श्री.आशिष बिवलकर
एका नातेवाईकांसाठी खारघरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला तीन-चारदा जाणं झालं. प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये शिरताना काळजात धस्स होत होतं. सगळ्या वयोगटातील माणसं. श्रीमंत, गरीब सगळीच एका लायनीत बसलेली. एकसमान धागा असलेली. कॅन्सर. काही प्रकारचे कॅन्सर बरे होतात. कॅन्सर कोणत्या स्टेजवर आहे, कोणत्या अवयवाला आहे, यावरही व्यक्ती पूर्णपणे बरी होईल की नाही हे अवलंबून असतं हे माहिती असतंच आपल्याला. तरी इथं आलं की अस्वस्थ होतं.
इथं आलेली ही सगळी माणसं मृत्यूबद्दल आपल्याला काहीतरी सांगतात, असं वाटतं…इथे येणारी जवळजवळ सगळीच माणसं मृत्यूला स्पर्शून, भयानक वेदनेतून परत आलेली असतात, तर काहींच्या आयुष्याचे किती दिवस बाकी आहेत हे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना कळलेलं असतं.
कल्पनाही करवत नाही.
या वातावरणात जायला मन तयार होत नाही.
इथल्या वातावरणात आल्यावर श्वास बंद पडेल, अशी भीती वाटू लागते.
या माणसांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नाही. त्यांची वेदनेची गोष्ट ऐकू वाटत नाही. इथे येणारी प्रत्येक व्यक्ती आत्यंतिक टोकाची वेदना सहन करून आलेली असते किंवा सहन करत असते. आता अनेकांना आयुष्यही नको आणि वेदनाही नको वाटू लागतं. किमो, रेडिएशन फक्त माणसाचं शरीरचं खरवडून काढत नाही तर मनही बोथट करतं.
अंथरुणात संडास, लघवी होणं, अन्नाचा एकही कण पोटात न जाणं, सतत उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, चक्कर येणं, सर्जरी आणि त्यासोबतच्या वेदना या सामान्य बाबी. आयुष्यभर कुणावरही अवलंबून न राहिलेली, ताठ कण्याची माणसं अशा आजारानं उन्मळून पडतात. लाज, शरम, अस्वस्थपणा, अव्हेरलेपण, अपमान या सगळ्यातून जात असतात. घरात करणारं, समंजसपणे जबाबदारी घेणारं कुणी असेल तर वेदना सहन करायला बळ येतं. नाही तर ही माणसं स्पष्ट-अस्पष्टपणे मरण मागतात.
ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते, ते कर्ज काढतात, हातउसने घेतात. ते फेडण्यासाठी घर, जमीन विकतात. कधीकधी घरातली सख्खी, जवळची माणसं आपल्याच माणसांवर खर्च केलेले पैसे दामदुपटीनं वसूल करतात. मरताना त्या माणसाला रक्ताची नाती शरीराच्या वेदनेबरोबर काळजाच्या वेदनाही देतात. सुखानं मरूही देत नाहीत.
जगण्यासाठी धडपड करणारी इथली माणसं पाहिली की आपल्या निरोगी शरीराचं, जगणं असण्याचं मोल कळतं.
खरं तर असा त्रास कुणाच्याच वाट्याला येऊ नये. पण मला सगळ्यात जास्त वाईट या पिटुकल्या मुलांचं वाटतं. खेळण्याच्या, मस्ती करण्याच्या वयात यांची असह्य वेदनेशी गाठ पडते. “मला खूप दुखतंय, त्रास होतोय,” यापलीकडे ही बिचारी लेकरं काय बोलणार? ही मुलं किमो, रेडिएशन कशी सहन करत असतील, यांना किती दुखत असेल असा विचार मनात येतो.
स्ट्रेचरवर केस नसलेली, वाळून गेलेली मुलं पाहिली की हुंदका येतो. हाताला सलाईन लावून पायऱ्यांवर खेळणारी, आई बापांच्या अंगावर पहुडलेली, शून्यात नजर लावून गुपचूप बसलेली मुलं पाहिली की ती काय विचार करत असतील, असा प्रश्न पडतो. यांच्या डोळ्यात पाहिलं की “का?गरज नव्हती ना. प्लीज नको.” असं वाटल्याशिवाय राहवत नाही. या लेकरांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. आपल्याच जगण्याचा राग येऊ लागतो. त्यांचे फोटो काढताना हात आणि मन थरथर कापत होतं. एक प्रकारचा अपराधभाव. इथं करुणाही कामी येत नाही.
निसर्गानं यांना वेदनारहित, आनंदी आयुष्य जगू द्यायला हवं होतं की, असं वाटतं.
यांना चांगले उपचार मिळून ही सगळी लेकरं कॅन्सरमुक्त व्हावीत असा मनातल्या मनात, आतून आवाज येतो. सगळीच माणसं. इथून “आता तुम्ही कॅन्सरमुक्त झाल्या आहात, पण काळजी घ्या,” असं ऐकून बरी होऊन जाणाऱ्या काही माणसांच्या चेहऱ्यावरील वेदनेतून मुक्तीचा निःश्वास तेवढाच काय तो मनाला हिरवेपण देतो.
या मुलांच्या आई- वडिलांच्या मानसिक अवस्थेचा तर विचारच करवत नाही. पैशांची जुळवाजुळव कशी करत असतील?(तरी टाटामध्ये खूप वाजवी दरात, मोफतही उपचार होतात. इथं संवेदनशील वागणूक, मार्गदर्शन, सहकार्यही मिळतं. टाटासारखी अनेक हॉस्पिटल्स उभी राहण्याची गरज आहे. तीही सरकारी.) आपल्या लेकराला अशा वेदनेत पाहून त्यांच्या काळजाला घरे पडत असतील? लेकरू त्रास होतोय म्हणून रडत असेल तर यांचा जीव किती कळवळ करत असेल? रडून रडून यांचे अश्रू संपले असतील की अजूनही रोजची रात्र उशी ओली करून संपत असेल? यांना आपलं काळीज किती घट्ट करावं लागत असेल? आपल्या लेकराला असा आजार का झाला असेल, हा प्रश्न ते कुणाकुणाला विचारत असतील?देवाला, डॉक्टरला? माणसांना? स्वतःला?
आपल्या लेकरांच्या वेदना आपल्याला मिळोत अशी प्रार्थना ईश्वराकडं, मनाला करत असतील का?
सगळी माणसं निरोगी राहावीत!
☆
लेखिका: श्रीमती लक्ष्मी यादव
प्रस्तुती: श्री.आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈