(वरील कविता गेल्या शतकात मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. ही कविता वाचून आजच्या भक्तांच्या विचारात काही फरक पडावा ही अपेक्षा..)
प्रस्तुती : जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझे whatsap ज्ञान!!” – लेखिका : सुश्री नीलिमा जपे कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
गेल्या काही वर्षांत मी अभ्यास करून एवढे ज्ञान मिळवले आहे, जे मी कुठल्याही विद्यापिठाच्या पदवी साठी अभ्यास करतांना मिळवले नसेल. यासाठी मला एखाद्या विद्यापिठाने एखादी डॉक्टरेट प्रदान करावी, अशी शिफारस मी करू इच्छिते, पण ती कोणत्या विषयात द्यावी हे अजून ठरत नसल्याने घोडे अडले आहे.
खरंच मी या काही वर्षांत जगातील सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला असावा असे मला वाटते आहे. मी विज्ञान, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, भाषा, गणित, धार्मिक शास्त्रे, या आणि इतर अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला आहे. जेंव्हा पासून माझ्या भ्रमणध्वनी वर whats ap हे अतिशय उपयुक्त अॅप घेतले, तेंव्हा पासून ज्ञानाची अनेक कवाडेच माझ्यासाठी जणू खुली झाली.
त्या दिवसाासून मला आलेले एकूण एक लेख मी वाचून काढले आहेत, काहींची तर पुन्हा पुन्हा पारायणे केली आहेत. काही लेख तर पिंजून काढले आहेत. आणि त्यावर होणाऱ्या चर्चांचा अभ्यास बघता विचारमंथनातून नवनीत निघावे असे एकाहून एक सरस ज्ञानकण मी वेचित असते.
मी या अॅपची शतश: ऋणी आहे, इतकी की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी याच गुरुला साक्षात दंडवत घातला.
यावरच मला बाल संगोपनाचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून धडे मिळाले, पूर्वीच्या शिक्षा कशा अगदी मानस शास्त्राला धरून होत्या हे मी जाणले. त्यापायी मला अनेकदा माझ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करावे लागले, पण त्यात पुढे जाऊन त्यांचेच भले आहे हे उमजून मी त्याबद्दल जराही खंत बाळगली नाही. त्यातच अनेक पौष्टिक व समतोल पाककृतींचाही अभ्यास करता आला. आता त्या प्रत्यक्ष करून बघण्या इतका अवधी मिळाला नाही तो भाग अलहिदा. बऱ्याचदा बाहेरच्या पदार्थांवरच भागवावे लागले, पण ते सर्व मिळालेल्या ज्ञानामृतापुढे क्षुल्लकच, नाही का!
यावरच मला आईवडील कसे श्रेष्ठ असतात हेही कळाले, हे सर्व शिकत असताना त्यांच्याकडे जायला, अथवा संपर्क साधायला जमले नाही तो भाग वेगळा, पण आईवडील तेवढे तरी समजून घेतीलच!
संवाद कसा साधावा याचे धडे इथेच मिळाले, त्यामुळे शेजारी बसलेला दुरावला एव्हढेच नुकसान झाले दुसरे काही नाही.
कित्येक अनाथ मुले, हरवलेली कागदपत्रे माझ्यामुळे योग्य व्यक्तीला मिळाली असतील याची गणनाच नाही. Whats app मुळे माझी समाजसेवाही सुरु झाली. अनेक गरजू लोकांसम्बंधीचे लेख कधीकधी तर न वाचता देखील केवळ पुढे पाठवून मी आतापर्यन्त भरपूर पुण्य गोळा केले आहे. त्या नादात आजूबाजूच्या गरजूंकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही इतकेच.
यामुळेच मी नतमस्तक झाले आहे, कारण सतत मी मान खाली घालून काहीतरी वाचतच असते. ‘केल्याने देशाटन मनुजा येत ऐसे पांडित्य फार’अशी जुनी म्हण बाद करून ‘केल्याने व्हाट्सपायन…. …….. ‘अशी नवीन म्हण आता वापरावी असे मला वाटते.
यावरच मला कळले की माझी मराठी ही वैज्ञानिक भाषा आहे (? ) भाषा वैज्ञानिक कशी काय असू शकते असा प्रश्न ही मला कधी पडला नाही, कारण माझा w. a. वरील गाढ ( अंध) विश्वास. आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वश्रेष्ठ ठरले हेही समजले, तेव्हाही मला प्रश्न पडला नाही की सर्वच देशाचे राष्ट्रगीत त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. पूर्वी असे मानायची पद्धत होती की जे पेपर मध्ये छापून आले ते सर्व खरे. आता मी मानते की w. a. वर येते तेच फक्त खरे.
या नादात एकच कविता वेग वेगळ्या कवींच्या नावे आली, तरी मी संशय घेतला नाही. कारण great men think alike ही उक्ती मला माहीत होती. आपल्या प्रथा परंपरा कशा विज्ञानाला धरून होत्या याचाही मी अभ्यास केला. आणि त्या सर्व परपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. अर्थात ज्ञान कण वेचण्यातून वेळ मिळाला तर!
याशिवाय आयुर्वेद, आहारशास्त्र, वजन कमी करण्यासाठी असंख्य उपाय, घरगुती औषधे इत्यादी अनेक शास्त्रे मी अभ्यासली आहेत. त्या सर्व गडबडीत माझे वजन थोडे वाढले आहे, पण कदाचित ते वाढलेल्या ज्ञानाने असू शकेल असे मी मनाचे समाधान करून घेतले आहे. व्यायामाचे फायदे वाचता वाचता व्यायाम करायला वेळच न मिळाल्याने माझे आरोग्य गमावले आहे.
हे सर्व ज्ञान मिळवून त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करायला वेळच न मिळाल्याने मी माझे उरले सुरले शहाणपण गमावून बसले आहे हाच एक लहानसा तोटा!! ज्ञान मिळवून त्यातील काय घ्यावे व काय त्यागावे ही नीर क्षीर वृत्तीच मी हरवली आहे. बाकी काही फार नुकसान नाही. काही मिळवायचे असेल तर काही तरी गमवावेच लागते ना! शहाणपण गेले पण ज्ञान तर हाती आले ना!!
लेखिका : सुश्री नीलिमा जपे- कुलकर्णी
नाशिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.
एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!
☆
लेखिका : सुश्री दुर्गा भागवत
प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सगळी गल्ली अजूनही गाढ झोपेत असायची. आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायची.
पेपरवालादेखील याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा आणि दरवेळी म्हणायचा,
“नमस्कार मॅडम! ”
हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही.
आता मी सकाळी सातला उठू लागले.
कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल.
एका रविवारी, तो सकाळी नऊ वाजता माझ्या घरी आला. चेहऱ्यावर काळजी होती, पण बोलण्यात आदर.
“मॅडम, ” त्याने हात जोडत सांगितले,
“एक गोष्ट सांगू का? “
मी हसून म्हटले,
“नक्की, बोला. “
तो म्हणाला,
“तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलंत? मी रोज गांधी मार्गावरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो आणि विचार करतो, ‘मॅडम वाट पाहत असतील’.
म्हणून सर्वात आधी तुमचंच घर गाठतो. “
मी थोडीशी आश्चर्यचकित झाले:
“तू एवढ्या लांबून येतोस? “
“हो मॅडम, तिथूनच वितरण सुरू होतं. “
“मग तू झोपेतून किती वाजता उठतोस? “
“अडीच वाजता. सव्वा तीनपर्यंत तिथे पोचतो. सातपर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि मग दहाला दुसऱ्या कामावर निघतो…
मॅडम! मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे… करावंच लागतं. “
त्याचं समर्पण ऐकून मी निःशब्द झाले.
फक्त एवढंच म्हणू शकले,
“ठीक आहे, मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन. “
काही वर्षे लोटली…
पंधरा वर्षांनंतर, तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला.
हातात एक सुंदर आमंत्रणपत्रिका होती.
“मॅडम! मुलीचं लग्न आहे… सगळ्यांसह जरूर या. “
मी कार्ड पाहिलं…
एक डॉक्टर मुलगी, एक डॉक्टर जावई.
आश्चर्याने विचारलं,
“तुझी मुलगी? “
तो हसला, आणि म्हणाला:
“काय बोलताय मॅडम! हो, माझीच मुलगी. तिने एमबीबीएस केलंय. आणि जावईही एमडी आहे. “
“आणि मुलगा? “
“तो इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे. “
त्याचा साधेपणा आणि यश बघून काही क्षण मी स्तब्ध झाले.
“आता निघतो, मॅडम … अजून खूप कार्डं वाटायची आहेत. “
तो गेला…
पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं होतं.
—
दोन वर्षांनंतर तो पुन्हा भेटला.
“मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय, ” असं अभिमानाने सांगितलं.
मी थोडं कुतूहलाने विचारलं,
“इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं? “
तो सौम्य हसला आणि म्हणाला:
“मॅडम! पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर. जे स्वस्त, जे हंगामातलं.. तेच खात होतो. कधी कधी फक्त दोडका, भोपळा, वांगी… “
थोडा थांबला, मग हळूच म्हणाला:
“एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला, ‘रोज हीच कोरडी भाजी! दुसऱ्यांच्या घरात काय काय बनतंय बघा. ’
मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं, ‘बाळा, आधी स्वतःचं ताट पाहा. दुसऱ्यांची ताटे पाहशील, तर स्वतःचंही हरवून बसशील. ही कोरडी भाजी नाहीये, या ताटात मी तुझं भविष्य वाढतोय…
त्याचा अपमान करू नकोस. ’
तो माझ्या डोळ्यांत पाहत राहिला, हसला… आणि चुपचाप सगळं खाल्लं. त्या दिवसानंतर त्याने कधीही तक्रार केली नाही. “
—
आज, ही आठवण शब्दांमध्ये उतरवत असताना,
माझं मन विचारात गुंतून जातं…
आजकालची मुलं. आपल्या पालकांची परिस्थिती न समजता, ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते. कोण त्यांना समजावेल, की कधी कधी कोरड्या ताटातही
पूर्ण भविष्य वाढलेलं असतं…
फक्त डोळ्यांत पाहण्याची दृष्टी लागते…!
लेखिका: अज्ञात
प्रस्तुती: सौ. मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संपत चाललेली निरागसता… – लेखक : श्री अनिश सहस्त्रबुद्धे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
संपत चाललेली निरागसता… आणि ती टिकावी म्हणून आमची चाललेली धडपड.
सध्या आपण बघितलं, तर लहान मुलं लहान असल्यासारखी वागतच नाहीत. त्यांचे कपडे मोठ्यांसारखे, त्यांची भाषा मोठ्यांसारखी, आणि हल्ली तर त्यांचा attitude पण मोठ्यांसारखाच!
त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या वागण्यातला सहजपणा, आणि एकंदर त्यांचं आयुष्य जगण्याकडचा दृष्टिकोन — हे सगळं प्रचंड बदलताना दिसतंय.
आणि या सगळ्या बदलांचं खापर नक्की कोणावर फोडायचं, हे ठरवणं खरंच अवघड आहे.
म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न — या गुंत्यातलं गोंधळ समजून घेण्याचा…
१. आजी आजोबांचा अभाव – नात्यांच्या मुळांपासून तुटलेली मुलं
कधीकाळी आजी आजोबांचं घर म्हणजे मुलांसाठी एक छोटंसं परीकथांचं विश्व असायचं —
पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या गोष्टी, शाळेतून येताना त्यांच्या कुशीत विसावलेलं मूल, आणि त्या नजरेतल्या प्रेमाचा थेट हृदयाशी लागणारा स्पर्श…
आज मात्र बऱ्याच मुलांना आजी आजोबांचं अस्तित्वच माहीत नाहीये.
कोणी दूर शहरात राहतात, कोणी वृद्धाश्रमात, तर कोणी आपल्या घरात असूनही irrelevant झालेत — फक्त या ‘generation gap’ मुळे.
आणि त्याचबरोबर हरवलीय ती मुलांमधली मुरलेली माया, शिस्त, आणि rooted भावना.
२. पालकांची सोशल रेस –परिपक्वतेच्या नादात हरवतंय बालपण
आजचा पालक फक्त आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी नव्हे, तर समाजात काय दिसेल यासाठीही झगडतोय.
पण या सगळ्या checklist पूर्ण करताना, मुलाच्या डोळ्यातली चमक, त्याच्या प्रश्नांमागचं कुतूहल, आणि त्याचं निखळ हसू कुठेतरी हरवतंय.
Quality time या संकल्पनेवरच ‘busy’ या शब्दाने कुर्हाड मारलीय. आणि त्यामुळे पालक असूनही आपण कधी कधी मुलांच्या आयुष्यात guest appearance होतो, हे कळतही नाही.
३. नको इतकं इंटरनेट – जोडणाऱ्यांनी दुरावलेली माणसं
तंत्रज्ञानानं माणसं जवळ आणायची होती, पण त्याच तंत्रज्ञानामुळे आज घरातली माणसं एकमेकांपासून दूर गेलेली दिसतात.
एकाच घरातली माणसं वेगवेगळ्या स्क्रीनकडे पाहत जेवतात, बोलत नाहीत, ऐकत नाहीत. आणि त्या वातावरणात वाढणारी ही पिढी — भावनांचं ’emoji version’ शिकते, पण माणसं समजून घेणं विसरते.
मुलांना संवादाची सवय कमी होतेय, सहवेदनांची जाणीव कमी होतेय…
जे लहानपणी मिळायला हवं तेच डिजिटल दुनियेत हरवलंय.
४. मुलांना दिल्या जाणाऱ्या गोष्टी – engagement की isolation?
मुलांना हातात स्क्रीन देऊन ‘बिझी’ ठेवणं म्हणजे त्यांना गुंतवणं नव्हे, त्यांना त्यांच्याच बालपणापासून दूर ठेवणं आहे.
मुलं गप्प बसावीत, त्रास द्यायला नकोत म्हणून त्यांच्याकडे दिलेली गॅजेट्स काही काळ कामाची वाटतात, पण हळूहळू ती मुलं गप्पगप्प, आतल्या आत बंद होत जातात.
एकटी बसलेली मुलं आता फक्त गेमच्या लेव्हल्समध्ये आनंद शोधतात, पण रिअल लाईफमध्ये हरवलेले वाटतात.
हे खरं ‘disconnect’ आहे — जिथे आपण त्यांचं अस्तित्व acknowledge करत असतो, पण त्यांचं actual presence विसरतो.
५. अति प्रोटेक्शन – ‘mature’ बनवताना मुलांना लहानपण विसरायला लावणं
मुलांना सुरक्षित ठेवणं, वाईटापासून वाचवणं ही जबाबदारी समजण्यासारखी आहे, पण अत्यंत प्रोटेक्शनमध्ये त्यांचं लहानपण गुदमरू लागलंय.
मुलांना त्यांची स्पेस नाही, चूक करायची मुभा नाही, वेडेपणा करायचं स्वातंत्र्य नाही.
‘शाळा बुडवणं म्हणजे बिघडणं’, ‘दंगा करणे म्हणजे बेशिस्त’ — असा perception तयार झालाय.
“माझं मूल खूप समजूतदार आहे, तो mature आहे” असं अभिमानाने सांगणारे पालक विसरतात की — मुलगा असो वा मुलगी, लहानपण हे जगण्यासाठीच असतं, दाखवण्यासाठी नाही.
आणि या सगळ्यात भरडले जातायत — आमच्यासारखे काही पालक
जे खरंच आपल्या मुलांना बालपण द्यायचं ठरवतात.
जे त्यांना दंगा करू देतात, जमिनीवर लोळू देतात, नाचू-उड्या मारू देतात…
पण याच गोष्टी केल्या की आम्हाला बेजबाबदार, निष्काळजी पालक ठरवलं जातं.
शिस्तीचे गोंडस मुखवटे घालून जगणाऱ्यांना अशा मोकळ्या बालपणाचं भय वाटतं, म्हणून त्यात दोष शोधले जातात.
मुलांनी इंग्लिश कविताच पाठ करावी – मग ते बुद्धिमान! पण रामरक्षा म्हंटली, की गावंढळ?
हे द्वंद्व अजूनही ठसठशीतपणे समाजात आहे, आणि त्याला आपण प्रश्न विचारायलाच विसरलो आहोत.
कदाचित ही धडपड फारशी कुणाच्या लक्षात येणार नाही,
कदाचित समाजाला त्यातली किंमतही कळणार नाही…
पण आमच्या मुलांचं हसरं, वेडसर, स्वच्छंदी बालपण हेच आमचं यश आहे.
एक दिवस हेच मूल मोठं होईल…
तेव्हा त्याच्या मनात आपण सोडून दिलेलं ते निरागस आठवणींचं बीज हळूहळू उगम पावेल…
तेव्हा कळेल – बालपण शिस्तीने नाही, प्रेमाने जपावं लागतं!
स्त्रीचा स्वयंपाक हे केवळ रोजचे काम नाही — ती एक साधना आहे.
आणि त्या साधनेतून प्रकट होते सप्तदेवता. प्रत्येक अन्न शिजवणं, प्रत्येक फोडणी, प्रत्येक थाळी — ही एक दिव्य प्रक्रिया आहे.
आपण पाहूया, स्वयंपाक करताना कोणत्या सात देवतांचं स्त्रीजीवनात प्रकट रूप घडतं आणि त्या देवता तिच्या स्वयंपाकात कशा उतरतात.
१. श्री अन्नपूर्णा– अन्नाची देवी
‘नित्यान्नदा अन्नपूर्णा सदा पूर्णमयी मम’
गृहिणी अन्नपूर्णेचे सजीव रूप आहे. अन्नशुद्धी, सात्त्विकता, आणि प्रेम — या तीन गोष्टी ती जपते. अन्न हे शरीरासाठीच नव्हे, तर प्राणासाठी असतं — याची ती जाणीव ठेवून जेवण बनवते, त्यामुळे तिचं स्वयंपाकघर म्हणजे अन्नयज्ञाचं स्थान ठरतं.
२. श्री लक्ष्मी– समृद्धीची देवी
लक्ष्मी केवळ पैशात नाही, तर अन्नात, वेळेत, मनात आणि वर्तनात असते. जेव्हा गृहिणी वेळेवर आणि नीटनेटकं अन्न बनवते, स्वच्छता ठेवते, प्रेमपूर्वक जेवण वाढते — तेव्हा लक्ष्मी स्थिर होते.
स्वच्छ अन्नात आणि संतोषात लक्ष्मीचा वास असतो.
३. श्री सरस्वती – नादब्रह्म व ज्ञानाची देवी
स्वयंपाक करताना स्त्री किती प्रकारांनी कल्पना वापरते — कोणता मसाला, कोणती पद्धत, कोणता पदार्थ कोण पचवू शकेल, याचे विचार ती करते. तिचं हे ज्ञान, अनुभव, आणि विचारशक्ती म्हणजेच सरस्वतीचं प्रकट रूप होय.
शिवाय ती ‘मंत्र जप’ करत असते — “श्रीराम जय राम”, “दुर्गा दुर्गा”, यामुळे तिचा स्वयंपाकही मंत्रमय होतो.
४. श्री दुर्गा– रक्षण करणारी देवी
स्त्री जेव्हा स्वयंपाक करते, तेव्हा ती घराच्या आरोग्याचं संरक्षण करते. पावसाळ्यात उष्ण अन्न, उन्हाळ्यात शीत पदार्थ — ऋतूनुसार अन्न देणं ही तिची आयुर्वेदीय समज.
ती नियोजन, काळजी, आणि दक्षता वापरून अपायकारक गोष्टींपासून घराला वाचवते – ही दुर्गेचीच कृपा आहे.
५. श्री गायत्री – मंत्ररूप प्रकाशाची देवी
ती केवळ अन्न शिजवत नाही, तर भावनांचा प्रसाद बनवते. तिचा जप, तिचा सुसंस्कारित विचार – हे सगळं अन्नात उतरून येतं. यामुळे घरातले सदस्य केवळ पोटानेच नाही, तर मनानेही तृप्त होतात.
‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, हे जिच्या कृपेतून अनुभवाला येतं, ती गायत्रीच.
६. श्री कालिका – उर्जा व निर्भयतेची देवी
स्वयंपाकघर म्हणजे तपश्चर्येचा अग्निकुंड! ती एकटीच शिजवत असते, हात पोळून घेतले तरी रडत नाही, उन्हात तळत राहते, वेळ सांभाळते, अनेक जबाबदाऱ्या सांभाळते – ही तिची कालीशक्ती आहे.
ती अशक्तपणावर विजय मिळवून उर्जेचा स्रोत होते.
७. श्री संतोषी– समाधानाची देवी
घरच्यांनी समाधानाने “छान झालंय!” असं म्हटलं, की ती तृप्त होते. ती अपेक्षा न ठेवता सर्वांना वाढते. संतोषी मातेप्रमाणे तिचं समाधान हे इतरांच्या समाधानात असतं.
गृहिणी जेव्हा समाधानात राहते, तेव्हाच तिचं घरही समाधानी होतं.
निष्कर्ष:
स्त्री जेव्हा शुद्ध मनाने, भक्तिभावाने स्वयंपाक करते, तेव्हा तिचं स्वयंपाकघर हे देवतांचे मंदिर होतं. तिचे हात म्हणजे अन्नपूर्णेचे हस्त, तिचा मनोभाव म्हणजे गायत्रीचे तेज, आणि तिचा स्वभाव म्हणजे संतोषीची कृपा.
ती जेवढं अन्न शिजवते, त्याच्या पलीकडे जाऊन ती पिढ्यांचं भाग्य शिजवत असते!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “…तर थकवा येणारच!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆
साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कुटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत. घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता.
गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चणे, फुटाणे, शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?
कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच.
जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत.
या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही! आयुष्यं आताइतकं गतिमान नव्हतं, पुष्कळ संथ होतं. पण, त्यामुळेच थकवा नव्हता. ‘लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा’, हे तत्त्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळेच, त्यांना आयुष्य जगता आलं.
राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपलं आयुष्य नुसतं धावपळ करण्यातच जातंय..!
लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रुसवेफुगवे होते, पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रीतही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर वाटायचा.
आज प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, तर थकवा येणारच!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती:सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भाषा…” – लेखिका: श्रीमती अलका सुहास जोशी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
सकाळी फराळ अगदी नेमस्त झाला. फार ऊराऊर नाही, काही नाही. शिळासप्तमी नको वाटते बाई.
कुंड्यात भाजी शिल्लक आहे थोडी. सटात चटणी आहे बघ. चमचा चमचा वाढ चारी पानात, संपून जाईल.
भगर परतून घे फोडणीत. तूप जिरं मिर्चीची फोडणी आणि दाणे घाल, जरा दुखवून. दही अधमुरं विरजलंस. पावसाळ्यात जरा सरस घालावं विरजण. दुधाला चांगला चटका द्यावा. ताक बावळट झालं की कुणी प्यायचे नाहीत. पण असूदेत. आता ते दही घुसळ नि त्याला आलं लाव, वर हातफोडणी घाल तुपाची. बेश संपेल.
ताज्या भाजणीचा चेपा लाव. हा तवा नको. उटंटवळा झालाय. दुसरा घे जाड बुडाचा. आणि नीट थाप गं. कडा कश्या खादरटल्या? न्याहार दिसायला हवीत थालीपीठं. कोथिंबीर? नको गं बाई ती जन्मसावित्री!
बरणीचा दादरा काढ. वाटीभर लोणचं पुरेल. ओळबोळ नको भरूस. कमी कर. उपासाला लिंबू पोटात गेलं की पित्त नाही उसळायचं. रीतीचं खावं तोंडीलावणं. नाहीतर आग पडेल पोटात.
तवकीलाची खीर अबोट काढून ठेव गं कुंड्यात. वहिनींचा आहे तो. रात्री येतील तेव्हा आठवणीने दे त्यांना. आणि केवढा रमथाडकाला झालाय ओट्यावर?
तू निरानिपटा कर, तोवर मी पानं घेते टेबलवर.
त. टी.
ही भाषा माझ्या आईची, आजीची, सासूबाईंची आणि त्यांच्याही सासूबाईंची. आम्ही अजूनही असं बोलतो घरात. यातला शब्दनशब्द माझ्या लेकाला, नवऱ्याला, भाचेपुतण्यांना समजतो. जे वळण आमच्या भाषेला आहे आणि घरात वावरण्याला आहे तेच पुढच्या पिढीत उतरलं आहे.
हे काही फार मोठ्या अभिमानाने किंवा गर्वाने, ताठ्याने सांगत नाहीये मी. भाषेतले कितीतरी सुंदर शब्द आम्ही सहजच टिकवतो आहोत हे लक्षात आलं म्हणून लिहिलं, इतकंच.
आणखीन एक,
घरात हाताबरोबर कामं करून टाकण्याची सवय अंगात लहानपणीच मुरली आहे, त्याच्याशी you tube चा कुठलाही संबंध तुम्हालाआढळल्यास youtube वाले आमची नक्कल करतायत असं समजायला अजिबात हरकत नाही.
☆
लेखिका: श्रीमती अलका सुहास जोशी
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈