मराठी साहित्य – विविधा ☆ एक तरी ओवी अनुभवावी… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ एक तरी ओवी अनुभवावी… ☆ अपर्णा परांजपे

“भगवंत हृदयस्थ आहे” ही ओळ आवडणे, त्याचेच सतत चिंतन करणे म्हणजे त्याचा मनापासून हृदयपूर्वक सातत्याने पाठलाग करणे म्हणजे अभ्यास व तो ही अगदी सहजपणे! नैसर्गिकपणे! एखादी गोष्ट मनापासून केली की त्याचा परिणाम मिळतोच!

“As we think we become” या त्रिकालाबाधित सत्याचा अनुभव घेणे म्हणजे “एक तरी ओवी अनुभवावी… ” श्रवण मनन चिंतनानेच सिंहावलोकन शक्य आहे व जीवनानुभवांचा एकेक बिंदू जोडणे तरच जीवनरूपी वर्तुळ पूर्ण करता येईल. पूर्णाचा अंश आपण असल्याने अपूर्णाकडून समाधान शक्य नसल्याने या सर्व बिंदूतूनच संपूर्णाची वाटचाल शक्य आहे.

‘सिंहावलोकन’ आणि ‘अनुभव हेच गुरु’ या न्यायाने व शास्त्र वाचन श्रावणाने सत्य अनुभवणे महत्त्वाचे मानले जाते.

​अनुभव हाच श्रेष्ठ गुरु:

​”नास्ति विद्या समं चक्षुः नास्ति सत्य समं तपः।

नास्ति राग समं दुःखं नास्ति त्याग समं सुखम्॥”

(विद्येसारखा डोळा नाही आणि सत्यासारखे तप नाही. पण ही विद्या केवळ पुस्तकी नसून अनुभवातून आलेली असावी, कारण स्व-अनुभव हाच खरा ‘चक्षु’ म्हणजेच डोळा आहे.)

 ​सिंहावलोकनाचे महत्त्व:

चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, माणसाने सिंहाकडून एक मोठा गुण शिकला पाहिजे:

“बह्वल्पकार्यं वा यो नरः कर्तुमिच्छति।

सर्वारंभेण तत्कुर्यात् सिंहादेकं प्रचक्षते॥”

(सिंह ज्याप्रमाणे आपले पूर्ण लक्ष देऊन शिकार करतो आणि अधूनमधून मागे वळून पाहतो, तद्वतच माणसाने आपल्या कार्याचा आढावा घेत पूर्ण शक्तीने काम करावे.)

​२. संत साहित्याचा आधार

​महाराष्ट्रातील संत परंपरेने ‘अनुभव’ किंवा ‘अनुभवामृत’ यालाच परब्रह्म मानले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज:

ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये अनुभवाचे महत्त्व ठायी ठायी सांगितले आहे. ते म्हणतात की, जोपर्यंत आत्मज्ञान अनुभवाला येत नाही, तोपर्यंत शब्दज्ञान व्यर्थ आहे.

“जैसी हाता आली कडाडी। आणि मती पडे वेडी।

तैसे अनुभवाचे गुढी। उभविली आम्ही॥”

(जेव्हा अनुभवाची गुढी उभारली जाते, तेव्हा बुद्धीचे तर्क तिथे थिटे पडतात. स्वतःचा अनुभव हेच सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे.)

​संत तुकाराम महाराज:

तुकोबांनी तर स्पष्टच सांगितले आहे की, केवळ पाठांतर करून उपयोग नाही, तर जे अनुभवलं आहे तेच बोलावे:

“येथें पाहिजे जातीचें। येरागबाळाचें काम नव्हें॥”

(येथे केवळ पुस्तकी ज्ञान चालत नाही, तर ज्याने तो अनुभव घेतला आहे, तोच टिकू शकतो.)

तसेच, “अनुभवें आले अंगा। ते या जगा देतसे॥” – म्हणजे मला जे अनुभवातून उमजले, तेच मी जगाला सांगत आहे.

समर्थ रामदास स्वामी:

‘दासबोध’मध्ये समर्थांनी ‘प्रचिती’ (म्हणजेच अनुभव) याला फार महत्त्व दिले आहे:

​”प्रत्ययाविण जे बोलणें। तें सगळेंची श्लाघ्यवाणें।”

(ज्या गोष्टीला अनुभवाचा किंवा प्रत्ययाचा आधार नाही, ते बोलणे व्यर्थ आहे. माणसाने आपल्या प्रचितीवरूनच पुढचे मार्ग शोधले पाहिजेत.)

​३. अनुभवातून मार्गदर्शन

​संत साहित्यानुसार, आपले जीवन हाच एक ग्रंथ आहे. जेव्हा आपण ‘सिंहावलोकन’ करतो, तेव्हा:

१. प्रचिती: आपल्याला सत्याचा प्रत्यय येतो.

२. सावधानता: भूतकाळातील ठेच आपल्याला भविष्यात सावध करते.

३. आत्मबोध: “मी कोण आहे आणि मी कुठे चुकलो? ” हे आरशासारखे स्वच्छ दिसते.

​थोडक्यात: संतांच्या मते, तुमच्या हृदयातील ‘अनुभव’ हाच ईश्वर आहे जो तुम्हाला सतत मार्गदर्शन करत असतो

सिंहावलोकन’ हा शब्द अतिशय अर्थपूर्ण आहे. ज्याप्रमाणे सिंह चालता चालता थांबून मागे वळून पाहतो आणि आपण कापलेल्या अंतराचा व परिस्थितीचा आढावा घेतो, त्याचप्रमाणे मानवी आयुष्यात ‘आत्मपरीक्षण’ करणे गरजेचे असते.

१. अनुभवांची शिदोरी आणि शहाणपण

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना—मग ती चांगली असो वा वाईट—काहीतरी शिकवून जाते. जेव्हा आपण शांतपणे मागे वळून पाहतो (सिंहावलोकन करतो), तेव्हा आपल्याला कळते की ज्या संकटांमुळे आपण खचलो होतो, त्यांनीच आपल्याला अधिक मजबूत बनवले आहे.

२. चुकांमधून सुधारणा

माणूस चुकांचा पुतळा आहे, पण त्याच चुकांची पुनरावृत्ती टाळणे म्हणजे प्रगती. स्वतःच्या भूतकाळातील निर्णयांचे विश्लेषण केल्यावर आपल्याला समजते की, “त्यावेळी मी असे वागायला हवे होते. ” हे आकलन म्हणजेच ‘अंतर्गत मार्गदर्शन’ होय.

३. स्वतःची ओळख

बाहेरचे जग आपल्याला काय करावे हे सांगत असते, पण आपला अनुभव आपल्याला काय ‘जमेल’ हे सांगतो. स्वतःच्या अनुभवांचे चिंतन केल्यावर आपल्याला आपल्या मर्यादा आणि शक्ती समजतात. यातूनच ‘स्वत्व’ गवसते.  

४. दृष्टीकोनात बदल

एखादी घटना घडते तेव्हा आपण भावनेच्या भरात असतो. मात्र, काही काळाने जेव्हा आपण ‘सिंहावलोकन’ करतो, तेव्हा त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन अधिक प्रगल्भ आणि तटस्थ झालेला असतो. हा तटस्थपणाच आपल्याला योग्य दिशा दाखवतो.

थोडक्यात सांगायचे तर:

बाहेरचा गुरु फक्त मार्ग दाखवू शकतो, पण त्या मार्गावर चालताना येणारे खड्डे आणि वळणे आपले अनुभवच आपल्याला शिकवतात. जो माणूस आपल्या भूतकाळातील अनुभवांचा आदर करतो, त्याला भविष्यासाठी कोणा दुसऱ्याच्या मार्गदर्शनाची फारशी गरज उरत नाही.

 असे सगळे चिंतन सुध्दा गुरुकृपेशिवाय अशक्य आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

॓सुनंदाबाई, संध्याकाळी चांगली कोवळी मेथीची जुडी आणा. भाईसाहेब दोन-तीन दिवस बाहेरगावी जात आहेत. थोडे पराठे बरोबर देता येतील. ॑ नाश्ता करता करता राजश्री सुनंदाबाईंना दिवसभरच्या कामाच्या सूचना देत होती.

रमेश नाश्ता करून कोर्टाच्या कामासाठी बाहेर पडला होता. त्याच्या वडिलांपासून चालत आलेली त्यांची टॅक्स कन्सल्टेशनची फर्म चांगली नावाजलेली होती. एम कॉम झालेली राजश्री फर्ममध्येच अकाउंटस् चं काम सांभाळायची. आवरायला उशीर झाला की राजश्रीला चित्राची खूप आठवण येई.

  ॓दीदी, ड्रेसला इस्त्री करून ठेवली आहे. मॅचिंग बांगड्या गळ्यातलं पण ठेवलाय तिथेच आणि टेबलावर गोड ताज्या ताकाचा ग्लास ठेवलाय. आठवणीने प्या बरं का. मागचं सर्व आवरून येतेच मी ऑफिसला.॔ असा प्रेमळ आग्रह करणाऱ्या हुशार, चटपटीत चित्राला दुबईला पाठवून आता वर्ष होऊन गेलं होतं.

  ॓हल्ली ती फोनवर पहिल्यासारखी उत्साहाने बोलत नाही. नुसतं हो… नाही.. बरं.. म्हणंत फोन ठेवून देते. काही बिनसलय का तिचं ते एकदा नीट विचारलं पाहिजे.॔ असा विचार करत राजश्री सँडल्स घालत होती. तेवढ्यात फोन वाजला.

  ॓आता कोण असेल? आधीच उशीर झालाय ॔. असं मनात म्हणंत राजश्रीनं फोन उचलला. फोन तिच्या नेहमीच्या बँकेतल्या मॅनेजरचा होता. राजश्रीला शक्य तितक्या लवकर बँकेत भेटायला बोलावलं होतं.

  ॓संध्याकाळी नक्की येऊन जाते.॔ असं म्हणत राजश्रीनं फोन ठेवून दिला. एवढं अर्जंट काय काम असेल तिला प्रश्नच पडला.

 *****

  ॓तुमच्याकडे कामाला असलेल्या चित्राचा आपण इथे तुमच्या मदतीने एन् आर् आय् अकाउंट उघडला आहे. या नॉन रेसिडेंट इंडियन अकाउंटमध्ये दरमहा 22/25 हजार रुपये जमा होतात आणि त्यातले 15/16 हजार रुपये काढले जातात.॔ संध्याकाळी भेटल्यावर बँक मॅनेजरने सांगितलं.

  ॓ हो. मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्राला आम्ही दुबईला माझ्या मैत्रिणीकडे मदतीसाठी पाठवत आहोत. तिचा भाऊ येऊन घरखर्चासाठी थोडे पैसे काढत जाईल. राजश्री म्हणाली.॔

पण गेल्या चार-पाच महिन्यात या अकाउंटमध्ये नेहमीच्या रकमेशिवाय

आणखी जवळजवळ दीड लाख रुपये जमा झाले आहेत. काही फिक्सड् डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर विचारा तिला. ही जमा रक्कम थोडी जास्त वाटली नेहमीपेक्षा म्हणून बोलावलं तुम्हाला. मॅनेजर म्हणाले ॔

  ॓थँक्स! मी कळवते तुम्हाला काय करायचं ते.॔ असं म्हणून राजश्री गडबडीने उठली.

घरी येईपर्यंत उलट सुलट विचारांनी राजश्रीचं डोकं भणभणून गेलं. तोंड धुऊन तिनं कपडे बदलले. सुनंदाबाईने दिलेलं गरम थालीपीठ आणि तिला आवडणारी वेलचीची कॉफी पितानाही तिच्या डोक्यात चित्राच होती. चित्राचा विषय सुनंदाबाईंजवळ… तिच्या आईजवळ… काढावा का हा मनातला विचार तिने बाजूला केला.

आधी रमेशजवळच बोलावं याबद्दल, असं ठरवून ती गप्प राहिली. खाण्यापिण्याची भांडी आवरून सुनंदाबाई बाजारात गेल्या. रमेश यायला अजून तसा वेळ होता. हॉलमध्ये टांगलेल्या वेताच्या झोपाळ्यावर ती विचार करत बसली. तिचं मन पाच सहा वर्ष मागे गेलं.

 *******

राजश्रीचं गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं. कदाचित गर्भाशय काढावही लागणार होतं. ऑपरेशननंतर दोन-तीन महिने राहायला येऊ शकेल असं सासर… माहेरचं कुणीच नव्हतं. त्यामुळे घर सांभाळेल, तिची काळजी घेईल अशा एखाद्या चांगल्या बाईच्या ती शोधात होती. त्याचवेळी तिच्याकडे भांडी घासणाऱ्या बाईंनी तिला चित्राचं नाव सुचवलं होतं. चित्राची आई बाईंच्या लांबच्या नात्यातली होती. अलिबाग जवळच्या एका छोट्या गावात ती मुलगी कुटुंबीयांसह राहत होती. चित्राच्या कामसूपणाची, चांगुलपणाची बाईंनी खात्री दिली आणि मदतीसाठी चित्राला मुंबईला आणायचं ठरलं.

चित्राने थोड्याच दिवसात मुंबईच्या जीवनाशी जुळवून घेतलं. राजश्रीदीदी आणि भाई साहेबांचा विश्वास संपादन केला. ऑपरेशननंतर दीदीची मनापासून काळजी घेतली. तिची औषधं, खाणं.. पिणं सारं सांभाळलं. डायबेटीस असलेल्या भाईसाहेबांचं पथ्याचं खाणं शिकून घेतलं. स्वच्छ, नीटनेटक्या, हसतमुख मितभाषी चित्राला राजश्री आणि भाईसाहेबांनी घरातल्यासारखंच वागवलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि आता राजश्रीच्या ऑपरेशन नंतर ती शक्यताही दुरावली होती.

चित्राच्या बोलण्यातून कळलं होतं की तिच्या वडिलांना मुंबईत चांगली नोकरी होती पण त्यांच्या व्यसनामुळे साऱ्या संसारावर अवकळा आली होती. धाकट्या दोन भावांच्या शिक्षणासाठी चित्रांने स्वतःच शिक्षण आठवीनंतर सोडलं होतं आणि गावातच एक लहानशी नोकरी धरली होती. आईसुद्धा मोलमजुरी करत होती. चित्रा तिला मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाला मदत करत होती. तिला घरच्यांची आठवण यायची पण लांब राहून का होईना आपण त्यांना मदत करतोय हे जाणवलं की तिला बरं वाटायचं.

राजश्री आणि भाईसाहेबांनी तर या कुटुंबाला आधार द्यायचं ठरवलंच होतं.

  ॓चित्रा, तू आता इथेच राहून रात्र शाळेत जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. आपण जमेल तसं तुझ्या भावांना आणि आईलासुद्धा आणू इथे. दीदी आणि भाईसाहेबांच्या या बोलण्याने चित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिची रात्र शाळा सुरू झाली. राजश्रीने खटपट करून, डिपॉझिट भरून एक छोटी दीड खोलीची जागा या कुटुंबासाठी मिळवली आणि काही महिन्यातच चित्राची आई आणि भाऊही मुंबईला आले. राजश्री आणि भाईसाहेबांनी  ॓कमवा व शिका॔ असा चांगला गुरुमंत्र या कुटुंबाला दिला होता. कुटुंब खरंच गुणी होतं. जर मोठा दिनेश शाळेत जायच्या आधी जवळपासच्या सोसायटीतल्या चार-सहा जणांच्या गाड्या पुसायच्या तर कधी कुणाला दूध, भाज्या आणून द्यायचा. चित्राच्या आईला सुद्धा चांगली घरकामं मिळाली. धाकटा भाऊ जवळच्या शाळेत जायला लागला. सगळ्यांचं आयुष्य आधीपेक्षा सुकर झालं होतं.

अशीच एकदा राजश्रीची बालमैत्रीण सुलेखा एका लग्नाच्या निमित्ताने राजश्रीकडे चार-पाच दिवस राहायला आली होती. पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन सुलेखा नवऱ्याबरोबर दुबईला गेली होती. त्यानंतर आत्ताच मैत्रिणींची भेट होत होती. त्यामुळे गप्पांना, खाण्यापिण्याला, फिरण्याला उधाण आलं होतं. सुलेखाचा नवरा सुरेंद्र दुबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. सुलेखा तिथल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती.

इथे आल्यावर, राजश्रीच्या घरी काम करणारी कामसू, विश्वासू, शांत स्वभावाची चित्रा सुलेखाच्या मनात भरली. त्यावेळी नुकतीच बारावी पास झालेल्या चित्रांनं पुढे कुठलं शिक्षण घ्यावं याची चर्चा राजश्रीकडे चालू असतानाच,  ॓चित्रासारखी मुलगी आपल्याला मदतीला मिळाली तर?॔ असा विचार सुलेखाच्या मनात चमकून गेला.

  ॓अगं, चित्राला आमच्याकडे दुबईला पाठवतेस का? तिथे आता मुलींसाठी स्पेशल होम सायन्सचा कोर्स सुरू झालाय. आम्ही चित्राला त्या कोर्सला घालू आणि मला चित्राची घरकामात मदतही होईल. आम्ही दरमहा तिच्या इथल्या अकाउंटमध्ये साधारण 22… 25 हजार रुपये जमा करू. तिचं शिक्षण होईल आणि पैसे पण जमतील.॔ सुलेखाने आपला प्रस्ताव राजेश्रीकडे मांडला.

राजश्री विचारात पडली. चित्राच्या कुटुंबाला पैशाची गरज तर होतीच. दोन्ही भावांचे शिक्षण, चित्राचं लग्न, मुख्य म्हणजे स्वतःची जागा असं सगळंच व्हायचं होतं. त्यांच्या राहत्या खोलीच्या कराराचे अकरा महिने कधी संपायचे कळायचंही नाही. मग राजश्रीलाच धावपळ करून, जादा भाडं कबूल करून जागेचं नवीन ॲग्रीमेंट करून घ्यावं लागायचं. सुलेखाच्या या प्रस्तावामुळे या कुटुंबाचा फायदा होईल असंच राजश्रीला वाटलं.

मुलीला एवढ्या लांब, अनोळखी ठिकाणी पाठवायला सुनंदाबाई प्रथम तयार नव्हत्या. मग चित्रानेच आईची समजूत घातली. चित्राला पासपोर्ट मिळाल्यावर सुरेंद्र सुलेखानं दुबईहून आवश्यक ती कागदपत्रं पाठवली. चित्राच्या येण्याचा उद्देश, तिची राहण्या जेवण्याची व्यवस्था, तिचा दरमहाचा पगार अशा बऱ्याच गोष्टींची नोंद तिथल्या सरकारी खात्यात झाल्यावर अखेर एकदाचं परवाना पत्र आणि तिकीट दुबईहून आलं. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शून्य : एक निःशब्द अनंत… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ शून्य : एक निःशब्द अनंत ✦ श्री दिवाकर बुरसे ☆


शून्य म्हणजे केवळ अभाव नाही,

ते अदृश्याचे प्रकटीकरण आहे.

 

आपण ज्याला रिक्तपणा म्हणतो,

तोच तर विश्वाच्या गूढ गर्भातील स्पंदन आहे.

अस्तित्व नसल्याच्या भासामागे

अस्तित्वाच्या अनंत आकाशाचा विस्तार दडलेला आहे.

 

*शून्य हे केवळ एक वर्तुळ नाही—

तो आरंभ आणि अंत यांना जोडणारा निःशब्द पूल आहे.

जिथे अंक संपतात, तिथे अर्थ सुरू होतो.

नदी समुद्रात विलीन झाली की ती नष्ट होते का?

की तीच समुद्र बनून पुन्हा जन्म घेते?

मानवी अस्तित्वही तसेच—

कधी प्रकट, कधी अप्रकट;

कधी शब्दांत, कधी निःशब्द.

पण कधीच शून्य नाही.

 

निःशब्दता म्हणजे रिक्तता नाही, 

ती सृजनाची गर्भावस्था आहे.

बीज मातीखाली गाडले की ते नाहीसे होते का?

नाही—ते पृथ्वीशी संवाद साधत असते.

अंधार हा प्रकाशाचा शत्रू नाही,

तो त्याचा पूर्वसंगीत आहे.

 

रात्र संपते म्हणूनच प्रभात जन्म घेते—

आणि प्रत्येक प्रभातामागे

एक गूढ, शांत अंधार उभा असतो.

माणूसही तसाच आहे.

कधी स्वतःपासून दूर जाणारा,

कधी स्वतःलाच न सापडणारा.

पण त्या हरवण्यातच शोध दडलेला असतो,

त्या निःशब्दतेतच एक लय असते.

 

तत्त्वज्ञान सांगते—अस्तित्व हा पूर्णविराम नाही;

तो अखंड वाहणारा वाक्यप्रवाह आहे,

ज्यात प्रत्येक स्वल्पविरामावर नवे अर्थ जन्म घेतात.

 

माणूस हा निष्कर्ष नाही, 

ती एक प्रक्रिया आहे—

क्षणोक्षणी घडणारी, अनुभवागणिक विस्तारत जाणारी.

त्याचे सौंदर्य त्याच्या अपूर्णतेत आहे;

त्याच्या थांब्यात पुढील प्रवास दडलेला आहे.

 

शून्य म्हणजे एक विराम—

पण विराम म्हणजे अंत नव्हे.

तो पुढच्या पावलासाठी घेतलेला श्वास आहे.

जीवन हे गणित नाही; ते काव्य आहे.

प्रत्येक ओळीत काहीतरी न सांगितलेले असते—

आणि तेच न सांगितलेले सर्वात गहिरे सत्य असते.

म्हणूनच “शून्य” म्हणणे म्हणजे

त्या काव्याला अपूर्ण मानणे,

त्या निःशब्दतेला नाकारणे,

त्या शक्यतांकडे दुर्लक्ष करणे.

पण जिथे निःशब्दता आहे, तिथे स्वर जन्म घेतात.

 

जिथे रिक्तता आहे, तिथे सृजन उगवते. 

कारण—

शून्य हा शेवट नाही,

ते अनंताकडे नेणारे द्वार आहे.

जिथे शून्य आहे, तिथे विश्व आहे.

जिथे विश्व आहे, तिथे मानव आहे.

आणि

जिथे मानव आहे_

तिथे आशा आहे!

 

आपला दिवस मंगल जावो!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “५ रुपयांचे ५०० रुपये झाले…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “५ रुपयांचे ५०० रुपये झाले…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 “५ रुपयांचे ५०० रुपये झाले – फक्त पंधरा दिवसांमध्ये – मजेशीर आठवण. ” 

आपण सगळेच जण निरनिराळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करत असतो, त्यावर कुठे ७ टक्के व्याज मिळते, कुठे ५ टक्के, काही ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे १० टक्के, हे आपण जाणतोच. आणि जास्तीत जास्त व्याज कुठे मिळेल याकडे आपली कायम नजर असते.

मला चक्क एका ठिकाणी पाच रुपये देऊन त्याबद्दल पाचशे रुपये मिळाले आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये, किती टक्के झाले हे तुम्हीच सांगा.

जुनी गोष्ट आहे, मी एकदा बावधन ला ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता एका म्हशीची मदत घेतली. आणि म्हशी बरोबर अगदी आरामात रस्ता क्रॉस केला. आणि त्याकरता म्हशी च्या मालकाला ५ रुपये दिले.

एकदमच वेगळी घटना म्हणून या घटनेवरती मी ‘म्हैस’ हा लेख लिहिला. आणि लेख मित्रमंडळींना पाठवला. एका मित्राचा फोन आला की लेख खूपच छान आहे, तू लोकसत्तेला पाठव म्हणजे तो खूप लोकांपर्यंत पोहोचेल.

मित्र हे पण म्हणाला की लेख पाठवल्यानंतर त्यांच्याकडून लेख मिळाला असं उत्तर येईल किंवा उत्तर येणार पण नाही, तसेच लेख छापून येईल किंवा येणार पण नाही. कारण त्यांच्याकडे भरपूर लेखांची आवक जावक असणार. आपण पाठवून बघायचं.

मी लगेचच लोकसत्तेचा ई-मेल ऍड्रेस शोधला आणि त्यांच्या ऑफिसला लेख पाठवला.

आणि चक्क तिसऱ्या दिवशी मला लोकसत्ता ऑफिस मधून फोन आला – म्हैस लेख छानच आहे आणि आम्ही येत्या शनिवारच्या चतुरंग मध्ये तो छापत आहोत. आणि लेख छापून आला..

खूप ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे छान छान अभिप्राय कळवणारे मेसेजेस आले / फोन आले. मजा आली.

आणि त्याच आठवड्यात लोकसत्तेकडून मला म्हैस लेखाबद्दल ५०० रुपयांचे मानधन मिळाले.

थोडक्यात म्हणजे ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता म्हशी बरोबरच्या मुलाला मी पाच रुपये दिले, तो अनुभव कागदावर उतरवून मी तो लोकसत्तेकडे पाठवला, आणि लोकसत्तेने मला त्याबद्दल पाचशे रुपये दिले.

अशा रीतीने पाच रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यांचे मला पाचशे रुपये मिळाले, आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये…

आहे की नाही मस्त इन्व्हेस्टमेंट!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

मागील भागात आपण मधुरा भक्ती विषयी थोडी माहिती घेतली. या भागात भक्तीच्या याच प्रकाराविषयी आणखी काही माहिती घेऊ.

स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यांनंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात. स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती.

पुरूषभक्ताने स्त्रीवेष धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्‍नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनले परंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा समाजमनावर असल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले असावेत. आपल्याकडचे पोतराज वगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे.

जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो अशी समजूत आहे. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूने विवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.

चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते.

रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते. वल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला होता.

मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसा सारखी करण्यात आली आहेत.

गुलाबराव महाराजांचा (इ स १८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला फारसे स्थान मिळालेले नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्‍नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादि सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.

भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (१५ वे शतक) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. युरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णने ही आढळतात. मुस्लिम स्त्री संत रबिया (इ स ७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.

जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत मीराबाई या त्यापैकी प्रमुख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी आंडाळ ही रंगनाथाला म्हणजेच कृष्णाला आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.

याच प्रकारच्या भक्तिरसाचा अविष्कार आपल्याला ‘गीतांजली’ तील गीत क्र ५२, ५३, ५४, ५६, ५७, ५९, ७२, ७३, ७४, ८९, ९१, ९४, ९९, १०१, १०२ मध्ये कमी अधिक प्रमाणात पहायला मिळतो.

—–

☆ गीत : ५५ ☆

LANGUOR is upon your heart and the slumber is still on your eyes.

Has not the word come to you that the flower is reigning in splendour among thorns? Wake, oh awaken! Let not the time pass in vain!

At the end of the stony path, in the country of virgin solitude my friend is sitting all alone. Deceive him not. Wake, oh awaken!

What if the sky pants and trembles with the heat of the midday sun ⎯ what if the burning 

sand spreads its mantle of thirst ⎯

Is there no joy in the deep of your heart? At every footfall of yours, will not the harp of 

the road break out in sweet music of pain?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:५५ ☆

जागा असशी परी ये भानावर

दूर जायचे तुज असे खरोखर

डोळ्यात झोप, मनात मरगळ

झटकून दे, व्यर्थ जातोय काळ॥ 

*
काट्यांसंगे गुलाब बहरतसे

वैभवात अन् राज्य करितसे

संकटे झेलण्या तुझेच रे बळ

ध्यानी धरी, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

थांबू नको वाट बिकट जराशी

सखा एकटा त्या निर्जन प्रदेशी

वाट पाहे, करी प्रवास सुफळ

भेट न चुको, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

झेलुनि रवितापा नभ उरी कंपते

तप्त वाळु भिउनि जळात भिजते

तसा सोसुनि भवताप सकळ

मार्ग आक्रमी, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

हर्ष अंतरीचा तुज जाणवेल

चाहूल हरीची जेंव्हा कळेल

सुसह्य होईल वेदनेची कळ

ऊठ ऊठ, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

टाक पाऊले त्या वाटेवरती

पदरवातुनि तारा झंकारती

मुक्त हो, त्यागुनि देहाची खोळ

त्वरा करी, व्यर्थ जातोय काळ॥

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत : ५६ ☆

THUS it is that thy joy in me is so full. Thus it is that thou hast come down to me. O thou lord of all heavens, where would be thy love if I were not?

Thou hast taken me as thy partner of all this wealth. In my heart is the endless play of 

thy delight. In my life thy will is ever taking shape.

And for this, thou who art the King of kings hast decked thyself in beauty to captivate my heart. And for this thy love loses itself in the love of thy lover, and there art thou seen in 

the perfect union of two.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५६ ☆

मला पाहता, तुझ्या अंतरी, प्रीत जागते

उतरलास पायरी, ठाऊक तरी तुला सांगते

*
मी नसते तर सांग कुणावर होशी आरक्त

तुला मिळविण्यासाठी मी ही झाले विरक्त

*
जे जे मजला आनंद देई, ते ते निर्मित जाशी

कान्हा, जिंकाया मन माझे रूपे अनेक घेशी

*

सर्वस्व अर्पुनि मजला, आलास हृदयी रिक्त

आनंद मनी दाटला, काय सांगू त्या नसे अंत

*

कळले नाही, तू माझ्यात मी तुझ्यात विरले

दोन मने जुळता, जीव शिव ना अलग उरले

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ५७ ☆

LIGHT, my light, the world-filling light, the eye-kissing light, heart-sweetening light!

Ah, the light dances, my darling, at the centre of my life; the light strikes, my darling, the chords of my love; the sky opens, the wind runs wild, laughter passes over the earth.

The butterflies spread their sails on the sea of light. Lilies and jasmines surge up on the crest of the waves of light.

The light is shattered into gold on every cloud, my darling, and it scatters gems in 

profusion.

Mirth spreads from leaf to leaf, my darling, and gladness without measure. The heaven’s river has drowned its banks and the flood of joy is abroad.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:५७ ☆

कसे सांगू माझे प्रकाशाशी नाते

तो माझा, फक्त माझाच वाटते

*
डोळ्यांना चुंबतो, हृदयी माधुर्य भरतो

अंतरी नाचतो, हृदयाची तार छेडतो

*

प्रिये, बघ आकाश त्याने उघडले

हास्य किरण धरणीवर उधळले

*

प्रकाश सागरात फुलपाखरांच्या बोटी

तर लाटेवर स्वार पुष्पगंधाची लोटी

*

प्रिये, बघ सोनेरी शिंपल्यात मेघ

भरून, भारून टाकला विश्व परीघ

*

मुक्त हस्ते करतो, रत्नांची उधळण

पानापानांतून आनंदाची पखरण

*

बांध तोडले गंगेने, भरून आला ऊर

अथांग पसरेल आता आनंदाचा पूर

– क्रमशः भाग १९..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवाच्या दिवशी व्हाट्सअपवर नवीन चित्रपटासंदर्भात एक पोस्ट फिरत होती. सालार, डंकी आणि आणखी असेच काही बॉलिवूडचे मसाला चित्रपट येत असताना प्रेक्षकांनी अस्सल हिरोकडे पाठ फिरवली. हा अस्सल हिरो म्हणजे सॅम बहादूर. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल. भारतीय लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावून आपल्या देशातील जवानांना आणि तरुणांना सेवेचा आदर्श त्यांनी उभा केला. तरुणाईने पाहिलाच पाहिजे असा हा चित्रपट पण हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हा थिएटरमध्ये तुरळक गर्दी होती. पाहणारे बहुसंख्य प्रेक्षक साठी ओलांडलेले होते. असाच एक रिअल हिरो म्हणजे प्रकाश बाबा आमटे. आपल्या वडिलांचा म्हणजेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या विकास आणि प्रकाश या दोन सुपुत्रातील द्वितीय. हा द्वितीय पुत्र तसा एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु करतात. एक दिवस आपल्या मुलांसह भामरागडच्या जंगलात सहलीसाठी म्हणून जातात. भामरागडचे जंगल हे जाण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे. रस्ते नीट नाहीत, दळणवळण सुविधा नाहीत. आरोग्याच्या सोयी तर नाहीतच पण जंगलातील माडिया, गोंड यासारखे आदिवासी तर आरोग्य आणि शिक्षण यांच्याबद्दल काडीचीही आस्था नसलेले. अशा वेळी बाबांना प्रश्न पडतो. मी तर आनंदवनात कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु केलंय पण अशा बिकट ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवाना कोण सेवा देणार? त्यांच्या मनातील खंत जाणून घेऊन नुकताच डॉक्टर झालेला प्रकाश म्हणतो, ‘ मी करीन इथे काम. ‘ बाबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो.

एम बी बी एस झालेला, डोळ्यात भविष्याची स्वप्ने तरळत असलेला हा तरुण निश्चय करतो आदिवासींच्या सेवेचा. त्याच्यासाठी हे काम अजिबात सोपं नसतं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि त्या तालुक्यातील हेमलकसा हे ठिकाण. इथे सुरु होतो लोकबिरादरी प्रकल्प. या क्षेत्रात माडिया, गोंड आदी आदिवासी जमातींचा निवास. त्यांची भाषा वेगळी. राहणी तर कमालीची साधी. अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. शिकार करून मिळेल ते खायचे. नाही मिळाले तर उपाशी राहायचे. कुपोषित बालके जन्माला येणं ही तर जणू काही इथली परंपराच! त्यातील काही योगायोगाने जगायचे आणि पुढे अनेक आजारांचे शिकार व्हायचे. बाळंतपणत होणारे मृत्यूही भरपूर. त्यांना कोणी काही सांगू गेले किंवा शिकवू गेले तर, त्या माणसाला ते आपला शत्रू समजायचे अशी सगळी परिस्थिती.

अशा भयाण परिस्थितीत प्रकाशाची एक छोटीशी पणती तेवत होती ती प्रकाश आमटेंच्या रूपाने. जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी उभारली गेली. या झोपडीला दारही नव्हते. प्रकाश यांची सहधर्मचारिणी मंदाताई या झोपडीतच त्यांच्यासवे आल्या. त्याही डॉक्टर होत्या. पण त्यांनीही आपल्या पतीसमवेत सेवाकार्यात स्वतःला झोकून दिले. आदिवासींमध्ये काम करणे सोपे नव्हते. अशा बाहेरच्या व्यक्तींना स्वीकारायला आदिवासी अजिबात तयार नव्हते. त्यासाठी या दाम्पत्याला त्यांची भाषा शिकावी लागली. त्यांच्याप्रमाणेच साधी राहणी ठेवावी लागली. हळूहळू त्या लोकांचा विश्वास या दाम्पत्यावर बसू लागला. ही माणसे आपल्याला मदत करण्यासाठीच आली आहेत अशी त्यांची खात्री झाली. लोकबिरादरी प्रकल्प मार्गी लागला. आदिवांसीसाठी दवाखाना, शाळा सुरु झाली.

४ नोव्हेंबर २०१९ हा तो दिवस. याच दिवशी या सेवाव्रतींचे दर्शन आम्हाला घडले. त्या दिवशी आम्ही हेमलकशाला गेलो होतो. भेटीसाठी प्रकाश आमटेंची वेळ मिळाली होती. प्रकाश आमटे आणि मंदाताई भेटणार म्हणून कोण आनंद झाला होता. माझ्यासारखेच इतरही काही पर्यटक प्रकाश आमटेंचं सेवाकार्य आणि लोकबिरादरी प्रकल्प पाहण्यासाठी आले होते. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. एवढ्यात डॉ प्रकाश आणि मंदाताई आल्या. त्यांच्या राहण्यातला साधेपणा, वागण्याबोलण्यातली अकृत्रिमता लक्ष वेधून घेत होती. आमच्याशी त्यांनी काही वेळ संवाद साधला. त्यावेळी माझं ‘ कवडसे सोनेरी… अंतरीचे ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालं होतं. ते पुस्तक त्यांना भेट देण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ प्रकाश यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती आम्हाला दिली. आणि मग स्वतः आमच्यासोबत येऊन त्यांचे प्राणी अनाथालय त्यांनी आम्हाला दाखवले. प्राण्यांबरोरबर ते संवाद साधत होते. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना भरवत होते. ते मुके जीव सुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या देवमाणसाला अत्यंत प्रेमाने प्रतिसाद देत होते.

डॉ प्रकाश यांचं प्राणीप्रेम, त्यांना घराच्या एखाद्या सदस्यासारखं सांभाळणं या सगळ्या गोष्टी आम्ही त्या थोड्या वेळात अनुभवल्या. त्यांचं हे प्राणी अनाथालय कसं सुरु झालं याची हकीकत रोमहर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. जंगलात राहणारे आदिवासी जो प्राणी दिसेल, त्याची शिकार करून खात.

शक्यतो वानरांची शिकार कोणी करत नाही पण एकदा काही आदिवासी माणसे एका वानरीणीची शिकार करून तिला घेऊन जात होते. वानरी मृत झाली होती पण तिचे पिलू जिवंत होते. ते तशाही अवस्थेत तिचे दूध पिण्याचा प्रयत्न करीत होते. कोणत्याही सहृदय व्यक्तीचे मन हेलावून टाकणारे ते दृश्य होते. प्रकाश यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनी त्या आदिवासींना त्या पिलाला सोडून द्या म्हणून विनंती केली. पण ते म्हणाले की आमच्या लेकरांना खायला काय द्यायचे? तेव्हा डॉ प्रकाश यांनी त्यांना डाळ तांदूळ दिले. तेव्हा आदिवासींनी ते पिलू त्यांच्या हवाली केले. ही त्यांच्या प्राणी अनाथालयाची पहिली सुरुवात होती. पुढे मग जंगलात सापडलेली अनाथ पिले आदिवासी डॉ प्रकाश यांना आणून देऊ लागले. आपल्या आईलाही ज्यांनी पाहिले नाही अशा या अनाथ पिलांना आईची माया डॉ प्रकाश यांनी दिली.

हेमलकसा इथे साधारणपणे १९७४ च्या सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर २६ डिसेंबर हा डॉ प्रकाश यांचा जन्मदिवस. आता त्यांचं वय सुमारे ७६/७७ वर्षे असावं. या दरम्यान जीवनातील खूप चढउतार या दाम्पत्याने अनुभवले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे आमटे कुटुंब. तोच वारसा डॉ प्रकाश आणि मंदाताई यांनी पुढे चालवला. अनेक आदिवासींना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांची पुढची पिढीही हा वारसा जपते आहे, पुढे नेते आहे. आपल्या परिसरातील रुग्णांची सेवा करता करता डॉ प्रकाश याना गेल्या वर्षी एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागला पण सेवाकार्याची पुण्याई पाठीशी असल्याने त्यातूनही ते सुखरूप बाहेर पडले. आदिवासींची सेवा करताना त्यांनी भेदभाव केला नाही. अनेक नक्षलवाद्यांवरही त्यांनी उपचार केले, त्यांचे समुपदेशन केले. भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यांची दूर रवानगी केली.

हेमलकसा येथील शाळा सुद्धा पाहण्यासारखी आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी या शाळेत जीवनाचे धडे गिरवत आहेत. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण त्यांना इथे दिले जात नाही. शेती करणे, निरनिराळे उद्योगव्यवसाय करणे, निरनिराळी कौशल्ये हस्तगत करणे या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. जीवनमूल्ये शिकवली जातात. या विद्यार्थ्यातून अनेक विद्यार्थी शिकून मोठे होऊन आज मोठमोठ्या पदांवर पोहोचले आहेत, तर काही आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करत आहेत. डॉ प्रकाश आमटे म्हणतात, ‘ मी तर केवळ निमित्तमात्र आहे. हे सगळे टीमवर्क आहे. मला सेवाभावी कार्यकर्ते मिळाले म्हणून एवढे मोठे कार्य करणे शक्य झाले. ‘ त्यांचे हे उद्गार त्यांची नम्रता दर्शवतात. डॉ प्रकाश आणि डॉ मंदाताई यांना मॅगसेसे पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या कार्यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यांच्यामुळे या पुरस्काराना मोठेपण लाभले आहे. त्यांनी लिहिलेली ‘ प्रकाशवाटा ‘ आणि रानमित्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा ‘ डॉ प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो ‘ हा सुंदर चित्रपट आहे. यात नाना पाटेकर यांनी डॉ प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटातील गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गीत अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर आहे.

तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे,

जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

अशाच ‘सत्यसुंदराचा ध्यास घेतलेल्या’ डॉ प्रकाश आमटे यांना आणि त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझे वाचन खूप वेगवेगळ्या विषयांवर, पण फार विस्कळीत असते. माझ्या बेडसाईड टेबलवर एकाच वेळी चार ते पाच तरी वेगवगळ्या विषयांवरची आणि वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तके असतात, आणि थोडे हे पुस्तक, थोडे ते पुस्तक असे चाखत माखत वाचन सुरु असते. फक्त मंदिर स्थापत्य, भारतीय वस्त्रकला आणि एकूणच कला हे तीन आवडीचे आणि अभ्यासाचे विषय सोडले तर माझे वाचन बरेचशे बेशिस्त, अघळपघळ आणि विस्कळीत आहे, बट समहाऊ, इट वर्क्स फॉर मी!

आता हेच बघा ना, शंकर रामाणींची कोकणी कविता मला थेट माझ्या बालपणीच्या गोव्यात घेऊन जाते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला गोव्याच्या खाऱ्या वाऱ्याचा गंध आहे, तिथल्या तांबड्या मातीचा रंग आहे, तिथल्या जाई-सुरंगीचा परमळ आहे आणि तिथल्या आठवणींची आंबटगोड अमूरपिकी चव आहे. आता हीच, छोटीशीच कविता पहा ना,

खंयचो हो गांव?

पांचवेंचार सेम

अपरूपाचे ब्रह्म

चंवरता.

 

पालवली वात ;

फांतोडेची भूल

उजवाडाचो धुल्ल

म्हज्या दारां.

पहिल्या वाचनात ही कविता अगदीच साधी वाटते; पण थोडं थांबून विचार केला तर कळतं की रामाणी कुठली अध्यात्मिक जाणीव कवितेत जिवंत करू पाहतात.

‘खंयचो हो गांव? ’ हा प्रश्न साधा नाही, आपण कोण? कुठले? कुठे उभे आहोत? हे विचारणारा हा साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आयुष्याच्या ज्या वळणावर कवी उभा आहे, तिथे तो स्वतःलाच हा प्रश्न विचारतोय. पांचवेंचार सैम/अप्रूपाचे ब्रह्म ह्या ओळीत कवी आधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. सैम म्हणजे निसर्ग, जो स्वतःच जणू अप्रुपाचं ब्रह्म आहे. सगळं निसर्गचक्र एकमेकांत गुंफलेलं आहे. माती, पाणी, उजेड, वारा, आणि मानवी जीवन सारं एकाच धाग्यात ओवलेलं. समुद्राच्या पाण्यात अदृश्य रूपात मीठ असावं तसं हे ब्रह्मरूप आहे. म्हटलं तर हा साक्षात्कार सोपा आहे, पण जीवन इतकं सोपं, सरळ नसतं.

‘फांतोडेची भूल’ हा किती अचूक शब्द वापरलाय रामाणींनी. आयुष्यात किती तरी वेळा आपल्याला चकवा लागतो, पहाटेच्या धुक्यात पुढ्यात पुढ्यात रस्ता असूनही आपण कधी कधी चुकीच्या वाटा धरतो. ‘उजवाडाचो धुल्ल म्हज्या दारां’, म्हणजे प्रकाश आहे, पण तो स्वच्छ नाही. प्रकाशाचा धुरळा आहे. सत्य आपल्या पुढे आहे, पण ते स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी नजर आधी स्वच्छ करावी लागते. मला रामाणींची कविता भाषेचं साधं सौंदर्य आणि तरीही त्या कवितेला व्यापून उरलेली एक प्रकारची अध्यात्मिक गूढता ह्यासाठी आवडते.

‘देखणा देहान्त जो’ हे वनिता पटवर्धन ह्यांचे पुस्तक सर्वांगाने मृत्यूविषयी भाष्य करते. जरा वेगळा विषय आहे, पण अध्यात्मिक, साहित्यिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला मृत्यूचा धांडोळा वाचनीय आहे. तसेही कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला मृत्यू ह्या संकल्पनेबद्दल एक सुप्त आकर्षण असतेच.

नितीन वैद्य Neeteen Vaidya हे फेसबुकवरचे माझे एक आवडते लेखक. ते मुखत्वे पुस्तकांविषयी लिहितात. त्यांच्या वाचनात कमालीचे सातत्य आणि शिस्त आहे, जी बघूनच माझी छाती दडपून जाते. इतक्या शिस्तीने मी काहीच करू शकत नाही, पण ‘वाचून उरणारी पुस्तके’ हे त्यांचे त्यांच्या वाचनप्रवासाबद्दलचे पुस्तक खरोखरी छान आहे. ते म्हणतात तसे ‘पुस्तके तुम्हाला वेगवेगळ्या शक्यतांच्या तिठ्यावर आणून सोडतात’.

भैरप्पांचे सार्थ हे माझ्या अतीव आवडीचे पुस्तक. आठव्या शतकातल्या भारताचा प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक पट वाचकांपुढे उलगडणारे हे पुस्तक मी कितीही वेळा वाचू शकते. आता एक दीर्घ लेख लिहिण्याच्या निमित्ताने कितव्यांदा तरी परत वाचून काढले. भैरप्पांच्याच जास्त लोकप्रिय असलेल्या आवरणचं प्रिक्वेल म्हणून प्रत्येकाने सार्थ वाचावं असं मला वाटतं. भारताच्या ऱ्हासकाळाची सुरवात सार्थ मध्ये नोंदली गेली आहे तर मध्य आवरण मध्ये.

ह्यातलं ‘आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी’ हे पुस्तक इतर पुस्तकांहून वेगळं आहे. बचत, गुंतवणूक आणि खर्च ह्या तिन्ही संकल्पनांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारं हे पुस्तक पैश्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. जवळचा पैसा खर्च करणं म्हणजे फक्त नोटा मोजून एखादी वस्तू विकत घेणे नव्हे, तर आपण पैसे केव्हा, कसा आणि कशावर खर्च करतो ह्यातून आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या प्राथमिकता परिभाषित होतात हेच हे पुस्तक विविध उदाहरणे देऊन सांगतं. पैशाला नाकारायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही पण त्याला आपल्या आयुष्याचा राजाही बनवायचं नाही हेच हे पुस्तक सांगतं. अनुभवांवर, शिक्षणावर, आरोग्यावर, नात्यांवर केलेला खर्च ही उधळपट्टी नसते, ती आपल्या आयुष्यात केलेली गुंतवणूक असते हा महत्त्वाचा धडा हे पुस्तक देतं.

ही सगळी पुस्तकं एकाच वेळी वाचताना मला असं जाणवत होतं ही पुस्तकं वेगवेगळी असली, तीन वेगवेगळ्या भाषांमधली असली तरी कुठेतरी ह्या सगळ्या पुस्तकांना जोडणारा एक अदृश्य धागा आहे, तो म्हणजे वाचक म्हणून माझा दृष्टिकोन. रामाणींच्या कवितेतला “खंयचो हो गांव? ” हा प्रश्न, भैरप्पांच्या लेखनातून उमटणारी इतिहासाची जाणीव, वनिता पटवर्धनांची मृत्यूकडे पाहण्याची शांत, थेट नजर, नितीन वैद्यांचे ठासून सांगणे की पुस्तके मित्र असतात, जगण्याला आधार देतात पण जगावं मात्र आपल्यालाच लागतं आणि मॉर्गन हौसेलची पैशाकडे बघण्याची प्रगल्भ समज हे सगळंच शेवटी वाचक म्हणून आपल्यालाच आपली ओळख नव्याने करून देतं.

वाचन शिस्तीत करता आलं तर आनंदच आहे, पण तसं ते नसलं तरी जिवंत असावं लागतं. थोडं असं, थोडं तसं, कधी विस्कळीत, कधी नेमकं, पण सतत आपल्याला घडवत राहणारं. जसं समुद्राच्या वाऱ्यात मीठ असतं, तसं या सगळ्या वाचनात वाचक म्हणून आपल्या अनुभवांचं, आठवणींचं आणि जाणिवांचं एक सूक्ष्म पण कायम राहणारं अस्तित्व असतं. आणि मग लक्षात येतं, शंकर रामाणी शोधत असलेलं ‘गांव’ हे बाहेर नसून, या सगळ्या शब्दांमध्ये, त्यातून मिळणाऱ्या अनुभूतींमध्ये, स्वतःच्या आतच कुठेतरी शांतपणे वसलेलं आहे.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “म्युझिअम” – लेखक : श्री संजय दाबके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “म्युझिअम” – लेखक : श्री संजय दाबके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : म्युझिअम 

लेखक : संजय दाबके 

पृष्ठ : २१२

मूल्य: ४९९₹ 

लेखक संजय दाबके यांच्या मनोगतामधून  

आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्याला व्यवसाय म्हणून करायला मिळणे हा फार दुर्मिळ योग आहे, पण मी त्या बाबतीत भाग्यवान आहे. गेल्या अनेक वर्षाच्या भटकंतीत ७०/८० देशातून कधी कामाचा भाग म्हणून, कधी आवड म्हणून जवळ जवळ ७०० मोठी छोटी संग्रहालये बघून झाली. युरोप आणि भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये काही संग्रहालयांची रचना करण्याचे आणि उभारण्याचे काम हातून झाले. त्यातून एक लेखांचा संग्रह तयार झाला. हे एक प्रकारे प्रवास वर्णनच आहे. फक्त त्यात जनरल न लिहिता मला आवडलेल्या काही उत्कृष्ट संग्रहालयांबद्दल लिहिलं आहे.

संग्रहालय जर चांगलं असेल तर ती अक्षरशः एक कालकुपी असते. इजिप्तच्या अगदी देन्देरासारख्या लहानात लहान गावातल्या संग्रहालयात आपण गेलो तर, कुठले लोक तिथे हजारो वर्षांपूर्वी कसे स्थिरावले, त्यांचं जनजीवन नाईल नदीच्या साथीने कसं बहरलं याची माहिती कळते. मग आपण गावात हिंडायला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या नकळत आपण त्यांच्या चालीरीती, भाषा, संगीत याच्याकडे बारकाईने बघतो. तीच गोष्ट दुबईसारख्या अगदी लोकप्रिय शहराची. तिथे लोक जातात तेच शॉपिंगच्या उद्देशाने फार थोडे लोक जुन्या दुबईतल्या छोटेखानी दुबई संग्रहालयाला भेट देतात. १९८० पर्यंत एका अगदी गरीब खेड्यापासून आत्ताच्या झगमगणाऱ्या दुबईत एका दूरदृष्टी असलेल्या शेखच्या प्रयत्नांमुळे त्याचं कसं रूपांतर झालं याची चित्तरकथा तिथे अतिशय सुंदर स्वरूपात मांडली आहे. मग जेव्हा आपण दुबईत हिंडतो तेव्हा आपण फक्त दुबई मॉलमध्ये न जाता, जुन्या मसाला बाजारात, नदीकाठी, जुन्या मच्छी मार्केटमध्ये रेंगाळतो. लोकांची भाषा ऐकतो. स्थानिक लोक जिथे जेवतात, चहा पितात तिथे जातो. परिणामी फक्त शॉपिंग करून मिळेल त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त समाधान आपण परत येताना आपल्याबरोबर घेऊन येतो. कारण तो देश थोडा फार तरी आपल्याला समजलेला असतो आणि याच मुख्य कारण असतं आपण पाहिलेलं एक सुंदर संग्रहालय!

युरोप तर संग्रहालय शास्त्रामध्ये आद्य! तिथे इतिहास प्रचंड. फारशी आक्रमणे न झाल्यामुळे (दुसऱ्या महायुद्धाचा मात्र अपवाद) खूपसा भूगोल अजूनही शेकडो नाही तर हजारो वर्षांच्या खुणा अंगावर मिरवतोय. सोळाव्या शतकापासून जगभरच्या वसाहतींमुळे झालेली आर्थिक भरभराट आणि या सगळ्यामुळे आपला इतिहास आणि संस्कृती जिवापाड जपायची आपोआप अंगात निर्माण झालेली वृत्ती यामुळे युरोपातल्या बहुतेक देशात अप्रतिम संग्रहालये बघायला मिळतात. त्यात इंग्रज अग्रस्थानी. गेली ३० वर्षे मी सातत्याने इंग्लंडला जातोय, तिथे दीर्घकाळ राहिलोय पण अजूनही माझी इंग्लंडमधलीच काय पण राजधानी लंडनमधली सगळी संग्रहालये बघून झाली नाहीयेत.

ऐतिहासिक घरांपासून (शेक्सपिअर ते शेरलॉक होम्स) ते प्रचंड ऐतिहासिक संग्रहालयांपर्यंत (ब्रिटिश म्युझिअम, व्हिकटोरिया आणि अल्बर्ट म्युझिअम) फक्त अचंबित व्हावं इतका इतिहास जपलाय या लोकांनी!

पोलंडला गेलं तर ऑश्वित्झ इथल्या दुसऱ्या महायुद्धातल्या छळ छावणीचं मन सुन्न करणारं आता केलेलं संग्रहालयातलं रूपांतर. जगात खूप बघण्यासारखं आहे पण त्याची सुरूवात त्या त्या ठिकाणच्या संग्रहालयांपासून होते ही माझी तरी आता ठाम समजूत झाली आहे.

माझ्या जगभरच्या भ्रमंतीत आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम, काही भव्य तर काही अगदी एका खोलीत मांडलेल्या, काही ड्रेस्डेनमधल्या ग्रीन व्हॉल्टसारख्या अगदी अनपेक्षित अनुभव देणाऱ्या अनेक संग्रहालयांपर्यंत मी जाऊ शकलो. माझ्यासारखे इतिहासप्रेमी, पर्यटन म्हणजे फक्त खरेदी असं न मानणारे खूप असतील पण, कदाचित त्यांच्याकडे वेळ थोडा असेल, अशांसाठी माझ्या प्रवासातून एकत्रित केलेले काही निवडक संग्रहालयांचे अनुभव ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांना तरी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा!

*************

या पुस्तकात  

— ४०-४५ किमी पसरलेलंसुद्धा एक संग्रहालय असू शकतं?

— नेपोलियनची शवपेटी असलेलं म्युझिअम कोठे आहे?

— वेश्याव्यवसायावर आधारितसुद्धा एक संग्रहालय आहे?

— टायटॅनिक जहाजाला अफाट प्रसिद्धी का मिळाली?

— दरवर्षी ३० लाख पर्यटक भेट देतात ते ठिकाण कोणतं?

— शेक्सपिअरच्या घरामध्ये त्याच्या कोणत्या गोष्टी जतन करण्यात आल्या आहेत?

— कोणत्या म्युझिअमवरून माणूस हजारो रुपयांचे खरेदी करून जातो?

— नशीब ठरवणारा दगड’ कोठे जतन केला आहे?

— कसं तयार झालं मिठाच्या खाणीचं म्युझिअम?

… युरोप खंडातील १३ अद्भुत म्युझिअम्स, तेथील रोमांचक वर्णने, अनाकलनीय सत्ये, ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे सांगणारं हे पुस्तक खूप वाचनीय आहे.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २८० – सुमित्र के दोहे ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है,  सुमित्र के दोहे।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २८०

☆ सुमित्र के दोहे ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ✍

जीवन के वनवास को, हमने काटा खूब।

अंगारों की सेज पर, रही दमकती दूब।।

 *

एक तुम्हारा रूप है, एक तुम्हारा नाम ।

धूप चांदनी से अंटी, आंखों की गोदाम।।

 *

केसर, शहद, गुलाब ने, धारण किया शरीर ।

लेकिन मुझको तुम दिखीं, पहिन चांदनी चीर।।

गंध कहां से आ रही, कहां वही रसधार ।

शायद गुन गुन हो रही, केश संवार संवार।।

 *

सन्यासी – सा मन बना, घना नहीं है मोह।

ले जाएगा क्या भला, लूटे अगर गिरोह ।।

 *

कुंतल काले देखकर, मन ने किया विचार ।

दमकेगा सूरज अभी जरा छंटे अंधियार।।

इधर-उधर भटका किए, चलती रही तलाश।

एक दिन उसको पा लिया, थीं सपनों की लाश।।

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २७९ “अनगिन सुख की बरसातें…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत अनगिन सुख की बरसातें...”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २७९ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “अनगिन सुख की बरसातें...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

माँ के पास बैठ कर सोन –

चिरैया की बातें ।

सुनता रामभरोसे कैसी

सन्तावन सातें –

 

होती है बच्चों की

खातिर,हर छठ की पूजा ।

अपामार्ग की दातुन कर

रखती माँ व्रत दूजा ।

 

महुये के पत्ते  में रख कर

चना और लइया –

बाँट  दिया करती प्रसाद

में अनगिन सौगातें ॥

 

सात पुये रख हाथ और

चाँदी का एक सिक्का ।

खुश होकर ले गये साथ

जिसको पंडित कक्का ।

 

सबके हाथ बाँधकर रक्षा –

सूत्र यहाँ जैसे –

करते हैं इस माह देवता

कई कई बारातें ॥

 

मन-विज्ञान तीज त्योहारों

का महिलाओं को ।

देता आत्मतोष संबल सब

समिति, सभाओं को ।

 

धरती यह बुन्देल खंड की

धर्मवती शुभदा –

धर्म ध्वजा ले होती

अनगिन सुख की बरसातें ।

©  श्री राघवेन्द्र तिवारी

09-04-2026

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares